रविवार, ५ जानेवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ होय....)

भगवान बुद्धांचा यज्ञसंस्थेला असलेला विरोध जगजाहीर आहे. प्राचीन काळी वैदिक लोक ईश्वराला व देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये अनेक प्राण्यांची आहुती द्यावी लागत असे, अशा प्रकारच्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता, परंतु ज्या यज्ञामध्ये हिंसा होत नाही अशा प्रकारच्या अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध नव्हता व अशा प्रकारचे यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांचा हा समज अगदी चुकीचा आहे.




१. हिंसक यज्ञ : हिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य नव्हते, प्राण्यांची आहुती देऊन केल्या जाणाऱ्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता. 


२. अहिंसक यज्ञ : अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांनी विरोध केला नव्हता कारण या यज्ञांपासुन कोणाचीही हानी होणार नव्हती.





भगवान बुद्धांनी अहिंसक यज्ञांना विरोध केला नव्हता., मगअहिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते काय...?


नाही...! भगवान बुद्धांनी जरी अहिंसक यज्ञांना विरोध केला नसला तरी ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता, याबद्दल आपल्याला धम्मपदातील पुढील गाथांमधुन समजते....




• मासे मासे सहस्सेन, यो यजेथ सतं समं। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥





→ महिनो महिने हजार यज्ञ, शंभर वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा, आणी एकच विषेश प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे पुजन श्रेष्ठ होते, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा..





• यो च वस्ससतं जन्तु, अग्गिं परिचरे वने। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥ 




→ शतवर्ष, वनात विहारणाऱ्या जीवांना यज्ञात आहुती, आणी एकच विशेष प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे सत्कार श्रेष्ठ आहे, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा.





• यं किञ्चि यिट्ठं व हुतं व लोके, संवच्छरं यजेथ पुञ्ञपेक्खो। सब्बम्पि तं न चतुभागमेति,अभिवादना उज्जुगतेसु सेय्यो॥





→ या लोकात पुण्याच्या अपेक्षेने वर्षभर यज्ञ करणे, काही आहुती देणे, हे सर्व उज्वल-श्रेष्ठाला अभिवादन करण्याच्या चौथ्या भागा इतकेही नाही.


(खुद्यकनिकाय १० : १०६-१०८)


वरील गाथांवरुन आपल्याला समजते कि यज्ञ हिंसक असोत कि अहिंसक भगवान बुद्धांना कोणत्याही प्रकारचे यज्ञ मान्य नव्हते...


मग भगवान बुद्धांची यज्ञाची संकल्पना कशी होती..? याचे उत्तर आपल्याला दिग्घ निकायाच्या कुटदंत सुत्तामध्ये सापडते...




बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ आहे....



एकदा कुटदंत नावाच्या ब्राह्मणाने यज्ञ करायचे ठरवले, त्या यज्ञासाठी विविध गावांमधुन निरनिराळे विद्वान ब्राह्मण आले होते, भगवान बुद्ध त्याच्या गावामध्ये विहार करत आहेत हे त्याला समजल्यावर तो ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांच्या भेटीला गेला. भगवंतांना भेटुन कुटदंतांनी त्याला नमस्कार केला. आणि म्हणाला, आपल्याला यज्ञाचा उत्तम विधी माहीत आहे, कृपया तो समजावुन सांगावा..

तेव्हा भगवंतांनी कुटदंताला पुढील कथा सांगीतली.


प्राचीन काळी एक राजा होता, एके दिवशी तो एकांतामध्ये बसला असताना त्याचा मनात असा विचार आला कि, माझ्याजवळ खुप संपत्ती आहे तिचा वापर मी महायज्ञात केला तर यामुळे मला पुण्य प्राप्त होईल आणि या पुण्याद्वारे मी चिरकाळापर्यंत सुखी बनेन. हि इच्छा त्याने त्याच्या राजपुरोहिताला सांगीतली.

पुरोहित म्हणाला, ठिक आहे महाराज, परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या अशांतता आहे, गावे आणि शहरे लुटली जात आहेत, वाटसरुंना लुटले जात आहे, अशा स्थितीत यज्ञामुळे खुप आर्थिक हानी होईल आणि लोकांवर कर बसवावा लागेल अशा स्थितीत लोकांवर कर बसवला तर राज्यात अराजकता निर्माण होईल.

सर्वप्रथम आपल्याला चोरांचा बंदोबस्त करावा लागेल, जे आपल्या राज्यात शेती करु इच्छितात त्यांना बी बियाणे पुरवा, जे व्यापार करु इच्छितात त्यांना भांडवर कमी पडु देऊ नका, जे सरकारी नौकरी करु इच्छितात त्यांना योग्य वेतन द्या, याच्यामुळे सर्व कामामध्ये जातीने लक्ष दिल्याने, वेळोवेळी भरगच्च कर वसुल होऊन राज्याच्या तिजोरीमध्ये धनाची वृद्धी होईल.


राजाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे केले, यामुळे खुप कमी काळातच त्याचे राष्ट्र एक समृद्ध राष्ट्र बनले, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे जास्तीत जास्त मिळणाऱ्या करामुळे तिजोरीतील धनाची वृद्धी झाली. राज्यात सगळीकडे सुखासमाधानाचे वातावरण निर्माण झाले.


काही दिवसांनंतर राजा पुरोहिताला म्हणाला,

तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी सर्व काही केले माझ्या तिजोरीतील संपत्ती खुप वाढली असुन राष्ट्रातील लोक निर्भयपणे व आनंदाने जीवन जगत आहेत. तेव्हा आत्ता मला महायज्ञ करायचा आहे.

पुरोहित म्हणाला, महाराज यद्न करण्यापुर्वी सर्वप्रथम आपण आपल्या प्रजेची परवानगी घ्यावी..

पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे राजाने प्रजेची परवानगी मिळवली.

आणि पुरोहिताने यज्ञाची तयारी केली. तो राजाला म्हणाला, या यज्ञामध्ये माझी अमाप संपत्ती नष्ट होणार आहे, असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये, यज्ञ सुरु असतानाही आपली संपत्ती नष्ट होत आहे असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये., यज्ञ संपल्यावर आपली संपत्ती यामध्ये नष्ट झाली असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये.


आपल्या यज्ञामध्ये अनेक चांगले वाईट लोक येतील पण तु चांगल्या लोकांकडे लक्ष ठेवुन आपले मन आनंदित ठेवावे.



त्याच्या यज्ञामध्ये गाय, बैल, बकरी, मेंढी, इत्यादिंची आहुती देण्यात आली नाही, झाडे तोडण्यात आली नाही, मजुरांना जबरदस्तीने काम करायला लावले गेले नाही. ज्यांना इच्छा होती त्यांनी स्वेच्छेने कामे केली, तेल, मध, लोणी, तुप आदी पदार्थांनी यज्ञ पुर्ण करण्यात आला.



यज्ञ संपल्यावर राज्यातील धनाढ्य लोक भेटवस्तु घेऊन आले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, मला तुमच्या भेटवस्तुंची मुळीच गरज नाही धार्मिक कराच्या रुपाने माझ्याजवळ भरपुर संपत्ती जमा झाली आहे. त्यापैकी तुम्हाला काही हवे असेल तर खुशाल घेऊन जा. आणि राजाने गोरगरीबांना आपली भरपुर संपत्ती दान देण्यात वाटली.



भगवान बुद्धांकडुन हि कथा ऐकल्यावर कुटदंत आणि त्याचे ब्राह्मण मित्र म्हणाले, फारच चांगला यज्ञ... असे म्हणत ते ब्राह्मण आणि कुटदंत भगवाम बुद्धांचे उपासक बनले, व यज्ञासाठी आणलेले सातशे बैल, सातशे गोरे, सातशे मेंढ्या, व सर्व प्राण्यांना त्याने मोकळे केले...



या कथेद्वारे भगवान बुद्धांचे दोन्ही हिंसक आणि अहिंसक यज्ञाबद्दलचे मत कळते. यज्ञात प्राण्यांची आहुती देणे हे भगवान बुद्धांना मान्य नव्हते, तर केवळ यज्ञ केल्याने राज्य सुख समृद्ध बनते हा सिद्धांतही त्यांना मान्य नव्हता. तर ते यज्ञ करण्याऐवजी लोकांची बेकारी दुर करणे हाच खरा यज्ञ होय हे या कथेवरुन समजते...



निष्कर्ष : जो धर्म सुखसमृद्धीच्या इच्छेने ईश्वराला व देवतांना संतुष्ट करण्यासाठी प्राण्यांची हत्या करुन त्यांची आहुती देण्याला यज्ञ मानतो त्याच्यापेक्षा राज्यातील बेकारी दुर करायला सांगणारा मानवधर्म केव्हाही श्रेष्ठच ठरणार..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

पूजेचा खरा अर्थ

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा...
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा