गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

बुद्धांच्या कथा : हारीति वर विजय

सदर लेख हा आमचे धम्मबंधू विशालवज्र यांनी शेयर केलेला आहे...


बुद्धांच्या काळी एक हारीति नावाची स्त्री होती जी लहान मुलांना खात असे. तिला स्वतःची ५०० मुले होती, ज्यांच्या वर तिचे खूप प्रेम होते पण दुसऱ्यांची मुले मात्र ती चोरुन आणून खायची. सर्व मुलांचे पालक तिच्याबद्दल ऐकून खूप चिंताग्रस्त होते की कधी तरी त्यांच्या मुलांचे देखील ती अपहरण करेल.

लहान मुलांना चोरून खाणारी हरिती


शेवटी बुद्धांनी देखील या स्त्री आणि तिच्या त्या राक्षसी आहाराबाबत ऐकले. बुद्धांनी पाहिले की ती कुणी सामान्य स्त्री नसून एक नरभक्षी यक्षिणी आहे आणि ती पाचशे यक्षपुत्रांची माता देखील आहे. त्यावेळी बुद्धांनी आपल्या उपाय कौशल्याचा उपयोग करण्याचे ठरविले आणि एका भिक्षुला हारीतीच्या सर्वात लहान मुलाचे अपहरण करून त्याला विहारात आणण्याची सूचना केली. जेव्हा हारीतिच्या लक्षात आले की तिचा सर्वात लहान मुलगा हरवला आहे तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि अन्न जल त्यागून रडत राहिली.

हे ऐकून बुद्धांनी हारीतिला बोलाविले आणि तिला तिच्या दुःखाचे कारण काय आहे असे विचारले. त्यावेळी आपले अश्रु पुसत ती बुद्धांना म्हणाली की तिचा सर्वात लहान मुलगा जो तिला खूप प्रिय आहे, तो हरवला आहे.

बुद्धांनी तिला विचारले की तिच्या पासून मुलगा कधी आणि कसा हरवला. ती आश्चर्यचकित झाली, तिला लक्षात आले की ती ज्यावेळी इतरांची मुले चोरत होती त्याच वेळी तिचा मुलगा सुद्धा बेपत्ता झाला होता. तिला याची जाणीव झाली की तिचा क्रूरपणा आणि दुष्कृत्यांमुळेच ही वेळ तिच्यावर आली होती. अतिशय आर्त अश्या पश्चातापाणे तिने बुद्धांना प्रणाम केला आणि तिला मदत करण्यासाठी विनवणी करू लागली.

"तुझे तुझ्या मुलावर प्रेम आहे का?" बुद्धांनी विचारले.

"हो" हारीति लगेच म्हणाली, "माझ्या लहान मुलावर माझे सर्वात जास्त प्रेम आहे, तो कधीच माझ्या नजरेसमोरून दूर गेला नाही -- मी त्याच्या शिवाय जगूच शकत नाही."
तिचे प्रबोधन करण्याची हीच योग्य वेळ आहे हे जाणत भगवंत तिला म्हणाले, "आता जेव्हा तुला मूल गमविण्याची असह्य वेदना आणि दुःख लक्षात आले आहे आणि तू इतरांना किती दुःख दिले होते हे पण तुला माहिती आहे, तरीही तुला असे वाटते का की तुला तुझे मूल परत मिळेल?"

"माझा मुलगा परत मिळवण्या साठी मी काहीही करायला तयार आहे."

"तुझे मूल तुला परत मिळविण्यासाठी मी मदत करू शकतो. पण तु खरंच इतरांची मुले चोरण्यासाठी पश्चाताप करते आहेस का?"
"हो! माझ्यावर कृपा करा, मला तुमची शिकवण द्या मी सदैव त्या शिकवणीचे पालन करीन."

त्यानंतर बुद्धांनी तिला पंचशील शिकवले, "यापुढे, हत्या करू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करू नकोस, खोटे बोलू नकोस, आणि मादक द्रव्यांचे सेवन करू नकोस. सर्वात महत्त्वाचे, तुझ्यातील आईच्या करुणेने आजपासून जगातील सर्व लहान मुलांची तू काळजी घे."

हारीतिने सहमती दर्शवली, पण तिने बुद्धांना विचारले की आता जेव्हा तिने लहान मुलांना खाणे सोडून दिले आहे तेव्हा तिने तिचे अन्न कुठून प्राप्त करावे.

"आतापासून या पुढे," बुद्ध म्हणाले, "मी माझ्या भिक्षूंना आज्ञा देतो की त्यांनी त्यांच्या भिक्षेत मिळालेल्या भोजनापूर्वी तुला एक भाग अर्पण करावा." तेव्हापासून हारीतिने बुद्धांची शिकवण स्वीकार केली आणि जगातील सर्व लहान मुलांची रक्षणकर्ती म्हणून विख्यात झाली. आजही भिक्षुसंघ बुद्धांच्या आज्ञेप्रमाणे भोजनापूर्वी हारीतिला एक भाग अर्पण करतो.

~ मास्टर ह्सिंग युन
फुटप्रिंटस् इन दि गँजेस्: दि बुद्धास् स्टोरीस् ऑन कल्टीवेशन अँड कंपॅशन या पुस्तकातून साभार, या कथेचे मराठी भाषांतर मी (विशालवज्र)केले आहे.


टीप:-

१. मूलतः ही कथा सर्वास्तिवादि त्रिपिटकाच्या विनय पिटकात येते. पाली जातकांतील महौषध जातकात जवळपास याच स्वरूपाची कथा पहावयास मिळते. तसेच महावस्तू या ग्रंथात देखील ही कथा नमूद आहे.

२. हारीति ला आजही नेपाळ पासून चीन , जपान पर्यंत लहान मुलांची रक्षणकर्ती बोधिसत्व म्हणून सन्मान दिला जातो. या सर्व देशांमध्ये हारीति पूजेची परंपरा आजही जिवंत आहे.
३. महाराष्ट्रात देखील हारीति पूजेची बौद्ध परंपरा अस्तित्वात होती, अजिंठा येथील लेणी क्र. २ मध्ये हारीति आणि पंचिकाचे भव्य आणि अतिशय सुंदर असे शिल्प कोरले आहे, या लेणीचे नावच यक्ष सभा असे आहे, यात जांबाल आदी अनेक यक्षांची शिल्पे आहेत. वेरूळ येथील बौद्ध लेणी क्र. १० च्या बाहेरील भिंतीवर सुद्धा हारीति आणि तिचा सहचारि पंचिक यांचे भव्य शिल्प कोरले आहे. अनेकदा हारीति लहान मुलांनी वेढलेली असते.
४. भारतभरात तसेच आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्थानातील गांधार बौद्ध संस्कृतीत हारीति ची परंपरा खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होती, त्याची शिल्पे आजही सापडतात. हारीति चा पती पंचिक हा गांधार देशातील यक्ष राजपुत्र होता अशी कथा आहे.
५. हिंदू लोकांमधील लहान मुलांच्या देवीची जी पूजा केली जाते ती या मूळ बौद्ध प्रथेचेच भ्रष्ट स्वरूप आहे.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...हे सुध्दा वाचा :

आळवक नावाच्या यक्षावर विजय

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

त्रिशरण / शरणगमन / Refuge

    

शरणगमन/Refuge किंवा त्रिशरण हे सर्व बौद्ध पद्धतींचे, परंपरांचे मूळ आणि प्रवेशद्वार आहे. सर्व भिक्षु प्रातिमोक्ष, उपासकांच्या तसेच बोधिसत्वांच्या प्रतिज्ञांचा पाया आहे आणि हेच बौद्ध आणि अबौद्ध लोकांमध्ये फरक करण्याचे  चिन्ह देखील आहे, जे त्रिरत्नांना शरण जात नाहीत त्यांना बौद्ध म्हणता येत नाही.

शरणगमन म्हणजे काय, त्यामागील भावना काय आहे, शरणगमनाच्या किती पद्धती आहेत, या विषयी आपण थोडक्यात पाहू.

त्रिशरण/शरणगमन

बुद्धं सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि ।
सङ्घं सरणं गच्छामि।

दुतीयम्पि बुद्धं सरणं गच्छामि।
दुतीयम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
दुतीयम्पि सङ्घं सरणं गच्छामि।

ततीयम्पि बुद्धं सरणं गच्छामि।
ततीयम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
ततीयम्पि सङ्घं सरणं गच्छामि।

मी बुद्धाला शरण जातो.
मी धम्मा शरण जातो
मी संघाला शरण जातो.

दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
दुसऱ्यांदा मी धम्मा शरण जातो
दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.

तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी धम्मा शरण जातो
तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.

अश्या प्रकारे वरील ओळींना प्रत्येकी तीनदा उच्चारून आपण बुद्ध, धर्म आणि संघाला शरण जातो.

आपण त्रिरत्नांना शरण का जातो आणि त्यामागील आपली भावना काय आहे हे खूप महत्वाचे आहे. त्यावरून आपले ध्येय काय हे लक्षात येते.

सामान्य लोक ज्यावेळी अनित्य, अनात्म आणि दुःख अश्या संसाराबाबत ऐकतात त्यावेळी त्या संसाराच्या भीतीतून ते त्रिरत्नांना शरण जातात.
बुद्धांच्या धर्म पालनाने आपली संसारापासून रक्षा व्हावी, अशी त्यामागील भावना असते.
त्रिशरण घेण्याची ही अगदी मूलभूत भावना असते.
या भावनेतून जे लोक त्रिरत्नांना शरण जातात ते तथागतांचा धर्म अभ्यास व पालन करून 'अर्हत', 'प्रत्येकबुद्ध' या महान पदांना त्यांच्या प्रयत्नांतून प्राप्त करू शकतात. किंवा कमीतकमी ते पुढील जन्मांच्या अवस्थांमध्ये 'सुगती' प्राप्त करतात अथवा सर्व सुख सुविधानीं युक्त, सुंदर असा मनुष्य देह धारण करू शकतात.

ही त्रिशरणांना शरण जाण्याची अगदी प्राथमिक पद्धत आहे, जी सर्व बौद्ध संप्रदाय व परंपरांना लागू आहे. पण या व्यतिरिक्त शरण ग्रहण करण्याची दुसरीही एक पद्धत आहे, त्याविषयी पुढील लेखात, तो पर्यंत आपण यावर चिंतन करून बुद्ध, धर्म आणि संघाला खरोखर अगदी मनापासून आपले शरणस्थान म्हणून पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला काही प्रश्न असल्यास कंमेन्ट  मध्ये आपण विचारू शकता.