बुधवार, ८ जानेवारी, २०१४

खरा ब्राह्मण कोण……?




आजकाल एखाद्या विशिष्ट जातीत, समाजात कोणी जन्म घेतला कि तो स्वतःला ब्राह्मण समजु लागतो, परंतु भगवान बुद्धांना त्यांचा हा अर्थ अभिप्रेत नव्हता... भगवान बुद्ध एखाद्याचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावरुन मानायचे जन्मावरुन नव्हे. यासाठी भगवान बुद्धांनी अश्वलायन ब्राह्मण कुमाराला अश्वलायन सुत्तामध्ये केलेला उपदेश, भारद्वाज ब्राह्मणाला वसल सुत्तामध्ये दिलेला उपदेश व आणखीही बरीच उदाहरणे देता येतील. परंतु या लेखामध्ये आपण धम्मपदातील सर्वात शेवटच्या ब्राह्मण वग्गाचा उपयोग संदर्भ म्हणुन घेऊया...


भगवान बुद्ध धम्मपदाच्या ब्राह्मण वग्गामध्ये ब्राह्मण कसा असावा..? कोणाला ब्राह्मण म्हणावे याबद्दल सांगतात परंतु काही अज्ञानी मात्र याकडे बोट दाखवुन म्हणतात कि बुद्ध ब्राह्मणांना किती धन्य मानायचा, ब्राह्मणांची किती स्तुती करायचा. असे बोलुन ते अज्ञानी आपण किती अज्ञानात आहोत याचा जणु पुरावाच देत असतात. परंतु त्यांच्या मुर्ख बडबडीकडे दुर्लक्ष करा, बौद्धांना धम्ममार्गावरुन हटविणे हेच त्यांचे ध्येय असते. अशा अज्ञानी लोकांना मी म्हणेन कि प्रत्येक गाथेतुन खरा अर्थ घ्यायला शिका.. ते आकलन करण्याची लायकी नसेल तर धम्मपदाच्या अट्ठकथा वाचा.... मी सुरुवातीलाच सांगीतल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे मानवाला त्याच्या कर्मानुसार लेखत असत जन्मानुसार नव्हे... बुद्ध ब्राह्मणावर कोपणाऱ्याचा धिक्कार करायचा...


अरे हो पण कोणते ब्राह्मण..? ब्राह्मण जात का...? नाही पुढील वर्गामध्ये सांगीतलेले गुण ज्याच्यामध्ये आहेत तोच खरा ब्राह्मण....

अशोक तपासे सरांनी अनुवादीत केलेला धम्मपदाचा ब्राह्मण वग्ग पुढील प्रमाणे :


ब्राह्मणवग्ग



• हे ब्राह्मणा.! स्त्रोत तोडुन टाक, प्रयत्नाने कामना दुर कर, भौतीकतेचा क्षय करुन अकृताचा जाणकार हो, ब्राह्मणा!

• जेव्हा ब्राह्मण दोन स्वभाव (चित्त संयम व विपश्यना) गुणात पारंगत होतो, त्या ज्ञानीची सर्व बंधने विनाशाकडे जातात.

• ज्याचा पार, अपार, पारापार असत नाही. जो निर्भय आहे, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो ध्यानी, निर्मळ, कृतकृत्य, स्त्रोतहीन आहे ज्याने उत्तम अर्थ प्राप्त केला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दिवसा सुर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो, सशस्त्र क्षत्रीय तळपतो, ध्यानमग्न ब्राह्मण तळपतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवसरात्र तळपत असतात.

• ज्याचे दुष्कर्म वाहुन गेले आहेत तो ब्राह्मण, ज्याचे आचरण सम्यक आहे तो श्रमण, ज्याचे चित्त-दोष दुर सारले आहेत तो प्रवज्जीत म्हणवीला जातो.

• ब्राह्मणावर प्रहार करु नये, ब्राह्मणांनी त्याच्यावर कोपु नये. ब्राह्मणांची हत्या करणाऱ्याचा धिक्कार, त्यापेक्षा त्याच्यावर कोपणाऱ्याचा धिक्कार.

• मनाला प्रिय असलेल्याचा निषेध, हि गोष्ट ब्राह्मणाला कमी श्रेष्ठ नाही, जसे मन हिंसा निवृत्त होते, तस तसे दुक्खाचे शमन होते.

• ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य केलेले नाही, या तिन्ही ठिकाणी जो संयमीत आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सम्यक संबुद्धाने उपदेशीलेला सिद्धांत ज्याच्याकडुन जाणुन घेतला त्याला तसाच दक्षतेने नमस्कार करावा.

• ना जटेने, ना गोत्राने, जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यता, सदाचार, शुचिता असतो तो ब्राह्मण.

• हे दुर्बुद्ध मानवा! या जटा कशाला? हे व्यघ्र वस्त्र कशाला? तु आतुन मळलेला आहेस. आणी बाहेरुन धुतो(गंगास्नान) आहेस.

• जो चिंध्या धारण केलेला जीव, ज्याच्या धमन्या दिसत आहेत, एकटा वनात ध्यानस्थ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ब्राह्मण मातेच्या योनीतुन उत्त्पन्न झालेला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. त्याला भो(सन्माननीय संबोध) सबोधतात. जो काहीही बाळगुण नाही काहीही घेत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सर्व बंधने तोडुन ज्याला चिंता वाटत नाही, ज्याने सर्व संगती विभक्त केले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दोऱ्या, पट्टे, साखळ्या तोडुन (गाडी जुंपतात ते) जु झिडकारुन जो बाधारहीत होऊन बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• शिव्या, दण्ड, बंधन यांना जो अदृष्टपणे (चांगुलपणाने) सहन करतो, क्षमा शक्ती हीच ज्याची प्रबळ सेना आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अक्रोधी, शिलवान, स्वल्प, जो संयमीत, अंतीम-शरीरी आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• कमळ पानावर जलबिंदु, वा सुईच्या टोकावर मोहोरी, तसा कामनांशी जो चिकटुन राहात नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो आपल्या दुःखाचा क्षय इथेच स्पष्ट जाणतो, जो भारमुक्त, बंधमुक्त आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गंभीर प्रज्ञ, सुजाण, मार्ग- अमार्गाचा सुज्ञ आहे ज्याला उत्तम अर्थ प्राप्त झालेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गृहस्थ, गृहहीन दोघांपासुन अलिप्त आहे, जो घरापासुन दुर निरिच्छ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चर अचर प्राण्यांना दंडापासुन अलिप्त असतो, जो ना मारतो ना घात करतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• विरोधकात अविरोधी, दण्डधारींमध्ये शांत, ग्रहणकर्त्यात अग्रहणकारी, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या चित्तातुन, मोह, द्वेष, मान, अहंकार, मत्सर निखळला आहे, जसे सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अप्रिय न बोलता, सत्य वचन बोलतो, ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• लांब वा आखुड, लहान वा मोठी, चांगली वा वाईट, जी जोवर कुणी दिलेली नाही, तोवर घेत नाही. (चोरी करत नाही) त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याला कुठेही कसलीच आशा असत नाही, जो निरिच्छ, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या मनात इतरांचा संशयाने काहीही निमीत्य असत नाही, ज्याला अगाध अमृताची प्राप्ती झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे सत्कर्म व दुष्कर्म दोहोंच्या इच्छा पार केल्या आहेत. जो शुद्ध व शोकरहीत आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चंद्रासारखा निर्मळ, स्वच्छ मनाचा आहे. ज्याचा मोह-भाव अतिक्षीण झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने हा धोकादायक दुर्गम संसार-मोह ओलांडला आहे. ध्यानधारणेत उत्तीर्ण. तृष्णेचा पार गेलेला नि:संशयी ज्याच्या निवृत्तीला कारण नाही. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो वासनांचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा वासना भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.


• जो तृष्णाचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा तृष्णा भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने मानवी संबंध सोडले आहेत, जो दिव्य संबंधांच्या पार गेलेला आहे, जो सर्व संबंधांपासुन परावृत्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो प्रीती आणी अप्रीती सोडुन शांत भावप्राप्त क्लेशहीन आहे. ज्या विराने सर्व लोकांना जिंकले त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणी अंत जाणतो, जो अनासक्त सन्मार्गावर आहे, सुज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याची गती देव, गंधर्व, मानव कुणीही जाणत नाही, ज्याचे स्त्रोत क्षीण झाले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे पुर्वी, आता, पुढेही काहीच नाही, जो काहीही बाळगुन नाही, काहीही घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो,

• जो प्रज्ञावंत आहे, ज्याला निर्वान पद प्राप्त झाले आहे. जो वृषभ, श्रेष्ठ, वीर, महर्षी, विजेता, तृष्णाहीन आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो पुर्व स्थान जाणतो, स्वर्ग व नरक पहातो, ज्याचे जीवन क्षीण झाले आहे, जो प्रज्ञावान मननी आहे, जो निर्वाण प्राप्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

ब्राह्मण वर्णाची थोरवी.. (अश्वलायन सुत्त...)

वसल सुत्त


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा