बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

भगवानांचा श्रावक संघ.... (भाग १ : भिक्खु संघ)
सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो, ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो, सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो। यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला एस भगवतो सावकसंघो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो, दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥

भगवानांचा श्रावक संघ सन्मार्गावर आरुढ आहे.. भगवानांचा श्रावक संघ सरळ मार्गावर आरुढ आहे. भगवानांचा श्रावक संघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे. भगवानांचा श्रावक संघ उत्तम मार्गावर आरुढ आहे. भगवानांचा श्रावक संघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे, हा संघ निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास पात्र, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे.
भगवान बुद्धांच्या श्रावक संघाबद्दल आपण या लेखमालिकेमध्ये थोडक्यात माहीती पाहणार आहोत..


अ. भिक्खु संघ१. कौण्डिण्य : भगवानांच्या श्रावक संघामध्ये सर्वात जास्त काळ विहार करण्याचा मान कौण्डिण्य यांना जातो. यांचा जन्म शाक्यांची राजधानी कपिलवस्तू शहराच्या जवळच असलेल्या द्रोणवस्तू गावातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


२. सारीपुत्र : सारीपुत्र यांना धम्मसेनापती हि पदवी देण्यात आली होती, कारण भगवानांच्या श्रावक संघातील सर्वात महाप्रज्ञावान हे सारीपुत्रच होते. त्यांचा जन्म मगध राष्ट्रातील राजगृह शहराच्या जवळच असलेल्या नालक नावाच्या गावामध्ये एका ब्राह्मण कुळात झाला. सध्या तो परिसर नालंदा जिल्ह्यामध्ये येतो..


३. महामोग्गलायन : हे दुसरे धम्मसेनापती आहेत, कारण भगवानांच्या श्रावक संघामध्ये सर्वात महाॠद्धीमान हे धम्मसेनापती महामोग्गलायनच आहेत, यांचा जन्म मगध देशातील राजगृहापासुन जवळच असलेल्या कोतीत नावाच्या गावातील एका ब्राह्मण कुळामध्ये झाला.


४. महाकश्यप : तपोनिधीचे निरिक्षण करणाऱ्यांपैकी भगवानांच्या श्रावकसंघामध्ये महाकश्यप अग्रणी आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील महातीर्थ नावाच्या ब्राह्मण-ग्रामात एका ब्राह्मण कुळामध्ये झाला..


५. अनुरुद्ध : भगवानांच्या श्रावक संघातील दिव्य दृष्टी मध्ये अनुरुद्ध अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय शाक्यांच्या कुळात झाला.


६. काळिगोध : उच्चकुळातुन भगवानांच्या श्रावक संघामध्ये सामील झालेल्यांपैकी काळिगोध पुत्र भद्दीय अग्रणी आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय शाक्यांच्या कुळात झाला.


७. लकुण्डक भद्दिय : भगवानांच्या श्रावक संघातील मधुर स्वर असलेल्या श्रावकांमध्ये लकुण्डक भद्दिय अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील एका श्रीमंत कुळामध्ये झाला.


८. पिण्डोल भारद्वाज : भगवानांच्या श्रावक संघातील सिंहनाद करणाऱ्या श्रावकांमध्ये पिण्डोल भारद्वाज अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशाच्या राजगृह शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


९. मंतानि पुत्र पुण्ण : भगवानांच्या श्रावक संघातील धर्मकथन करणाऱ्यांमध्ये मंतानि पुत्र पुण्ण अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाची राजधानी कपिलवस्तू शहराच्या जवळच असलेल्या द्रोणवस्तु नावाच्या ब्राह्मण ग्रामातील ब्राह्मण कुळामध्ये झाला..


१०. महाकात्यायन : भगवानांच्या श्रावक संघातील श्रावकांमध्ये (एखाद्या गाथेचा) थोडक्यात अर्थ समजावुन सांगणाऱ्यांमध्ये महाकात्यायन अग्र आहेत. त्यांचा जन्म अवंति देशाच्या उज्जयनि शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


११. चुळपंथक : भगवानांच्या श्रावक संघातील मनामध्ये प्रतिमा निर्माण करणाऱ्यांमध्ये चुळपंथक हे अग्र आहेत. भव चित्त प्रवर्तित करण्यासाठी काया, वाचा आणि मनाने सत्कर्म करणाऱ्यांमध्ये चुळपंथक अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृह येथे झाला.


१२. सुभूती : भगवानांच्या श्रावक संघातील शांतचित्ताने विहार करणार्यांमध्ये, दक्षीणा घेणार्यांमध्ये सुभूती अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील वैश्य कुळामध्ये झाला.


१३. खादिरवनिय रेवत : भगवानांच्या श्रावक संघातील आरण्यकांमध्ये खादिरवनिय रेवत अग्र आहेत. ते धम्म सेनापती सारीपुत्र यांचे लहान बंधू आहेत. त्यांचा जन्म मगध राष्ट्रातील राजगृह शहराच्या जवळच असलेल्या नालक नावाच्या गावामध्ये एका ब्राह्मण कुळात झाला. सध्या तो परिसर नालंदा जिल्ह्यामध्ये येतो..


१४. कङ्खारेवत : भगवानांच्या श्रावक संघातील ध्यान करणाऱ्यांमध्ये कङ्खारेवत अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील महाभोग कुळामध्ये झाला.


१५. सोण कोळिविस : भगवानांच्या श्रावक संघातील सर्वाधीक प्रयत्नशील श्रावकांमध्ये सोण कोळिविस अग्र आहेत. त्यांचा जन्म अंगदेशातील चंपानगरामध्ये झाला.


१६. सोण कुटिकण्ण : भगवानांच्या श्रावक संघातील स्पष्ट बोलणाऱ्या श्रावकांमध्ये सोण कुटिकण्ण अग्र आहेत. त्यांचा जन्म अवंति देशातील कुररघर गावातील वैश्य कुळामध्ये झाला.


१७. सीवलि : भगवानांच्या श्रावक संघातील लाभ प्राप्त करणाऱ्या श्रावकांमध्ये सीवलि अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील क्षत्रीय कुळामध्ये झाला.


१८. वक्कलि : भगवानांच्या श्रावक संघातील प्रज्ञावानांमध्ये वक्कलि अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


१९. राहूल : भगवानांच्या श्रावक संघातील शिक्षणाची कामना करणाऱ्या श्रावकांमध्ये राहूल अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय शाक्यांच्या कुळात झाला.


२०. रट्ठपाल : भगवानांच्या श्रावक संघातील श्रद्धेने प्रव्रज्जीत होणाऱ्या श्रावकांमध्ये रट्ठपाल अग्र आहेत. त्यांचा जन्म कुरु देशातील थुल्लकोट्ठित शहरातील वैश्य कुळामध्ये झाला.


२१. कुण्डधान : भगवानांच्या श्रावक संघातील सर्वप्रथम भिक्षा ग्रहण करणाऱ्या श्रावकांमध्ये कुण्डधान अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


२२. वङीस : भगवानांच्या श्रावक संघातील प्रतिभावान कवींमध्ये, धर्माचे विवेचन करणाऱ्या श्रावकांमध्ये वङीस अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


२३. वङतपुत्र उपसेन : भगवानांच्या श्रावक संघातील सर्वांना प्रसन्न करणाऱ्या श्रावकांमध्ये वङतपुत्र उपसेन अग्र आहेत. ते धम्म सेनापती सारीपुत्र यांचे लहान बंधू आहेत. त्यांचा जन्म मगध राष्ट्रातील राजगृह शहराच्या जवळच असलेल्या नालक नावाच्या गावामध्ये एका ब्राह्मण कुळात झाला. सध्या तो परिसर नालंदा जिल्ह्यामध्ये येतो..


२४. मल्ल पुत्र दब्ब : भगवानांच्या श्रावक संघातील शयनासनाच्या व्यवस्थापकांमध्ये मल्ल पुत्र दब्ब अग्र आहेत. त्यांचा जन्म मल्ल देशाच्या अनुपियानगरातील क्षत्रीय कुळात झाला.


२५. पिलिंदवच्छ : भगवानांच्या श्रावक संघातील देवांच्या प्रिय श्रावकांमध्ये पिलिंदवच्छ अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहराच्या ब्राह्मण कुळामध्ये झाला.


२६. बाहिय दारुचीरिय : भगवानांच्या श्रावक संघातील शिकवण सर्वात कमी वेळात अनुभव करुन ती ग्रहण करणाऱ्या श्रावकांमध्ये बाहिय दारुचीरिय अग्र आहेत. त्यांचा जन्म बाहिय देशामध्ये झाला. (सध्याचा जालंधर, होशियारपूर आदी पंजाबचा प्रदेश.)


२७. कुमार कस्सप : भगवानांच्या श्रावक संघातील धुरंधर वक्त्यांमध्ये कुमार कस्सप अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृह शहरामध्ये झाला.


२८. महाकोट्ठित्त : भगवानांच्या श्रावक संघातील विश्लेषणात्मक ज्ञान प्राप्त करणाऱ्या श्रावकांमध्ये महाकोट्ठित्त अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


२९. आनंद : भगवानांच्या श्रावक संघातील बहुश्रुत, स्मृतीमान, सेवक, चतुर, धीट, शौर्यवान श्रावकांमध्ये आनंद अग्र आहे. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय शाक्यांच्या कुळात झाला.


३०. उरुवेल कस्सप : भगवानांच्या श्रावक संघातील सर्वात जास्त अनुयायी असणाऱ्या श्रावकांमध्ये उरुवेल कस्सप अग्र आहेत. त्यांचा जन्म काशी देशाच्या वाराणसी शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


३१. काळुदायी : भगवानांच्या श्रावक संघातील कुळांना प्रसन्न ठेवणाऱ्या श्रावकांमध्ये काळुदायी अग्र आहे, त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तुच्या अमात्याच्या घरी झाला.


३२. बाकुल : भगवानांच्या श्रावक संघातील निरोगी राहणाऱ्या श्रावकांमध्ये बाकुल अग्र आहे. त्यांचा जन्म वत्स्य देशाच्या कोशांबी देशातील वैश्य कुळामध्ये झाला.


३३. शोभीत : भगवानांच्या श्रावक संघातील पुर्वजन्मांचे स्मरण करणाऱ्या श्रावकांमध्ये शोभीत अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


३४. उपालि : भगवानांच्या श्रावक संघातील विनयांचे पालन करणाऱ्या श्रावकांमध्ये उपालि अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तू शहरातील न्हावी कुळामध्ये झाला.


३५. नंदक : भगवानांच्या श्रावक संघातील भिक्खुणींना उपदेश करणाऱ्या श्रावकांमध्ये नंदक अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


३६. नंद : भगवानांच्या श्रावक संघातील इंद्रियांच्या द्वारांचे रक्षण करणाऱ्या श्रावकांमध्ये नंद अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय कुळामध्ये झाला.


३७. महाकप्पिन : भगवानांच्या श्रावक संघातील भिक्खुंना उपदेश करणाऱ्या श्रावकांमध्ये नंदक महाकप्पिन आहेत. त्यांचा जन्म कुक्कुटवती नगरातील राजवंशामध्ये झाला.


३८. सागत : गवानांच्या श्रावक संघातील अग्नी घटक प्रविष्ट करुन ध्यान साधना करणाऱ्या श्रावकांमध्ये सागत अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.


३९. राध : भगवानांच्या श्रावक संघातील भगवानांची शिकवण विस्तारपुर्वक सांगणाऱ्या श्रावकांमध्ये राध अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशाच्या राजगृह शहरातील ब्राह्मण कुळात झाला.


४०. मोघराज : भगवानांच्या श्रावक संघातील रुक्ष चीवर धारण करणाऱ्या श्रावकांमध्ये मोघराज अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील ब्राह्मण कुळामध्ये झाला.अशा भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला मी जीवंत असेपर्यंत शरण जातो.

सुचना : या लेखामध्ये त्या त्या विषयामध्ये अग्र असलेल्या श्रावकांचाच उल्लेख केला असल्याने अश्वजीत, अंगुलीमाल यांच्यासारख्या भिक्खुंची नावे सुटलेली आहेत. वाचकांनी याची नोंद घ्यावी...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...आमच्या ब्लॉगचे सदस्य व्हा.

आम्हाला फेसबुकवर Follow कर

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ८ : बक ब्रह्माचे गर्वहरण)


बक ब्रह्माची कथा हि जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा या लेखमालिकेतील शेवटची कथा आहे..


एकदा भगवान बुद्ध उकट्ठ मधील सुभगवनामध्ये विहार करीत असताना बक नावाच्या ब्रह्माला दुष्ट दृष्टी उत्पन्न झाली, तो समजु लागला कि मी ज्या लोकात (ब्रह्मलोकात) राहतो आहे तो नित्य, ध्रुव आणि शाश्वत आहे, मी अमर आहे असे तो स्वतःला समजु लागला होता. तेव्हा भगवान बुद्धांनी बक ब्रह्माचे मन ओळखुन ते ब्रह्मलोकात गेले आणि बक ब्रह्माला म्हणाले,


हे ब्रह्मा, तु अज्ञानाच्या घोर अरण्यामध्ये विहार करतो आहेस. जेव्हा अनित्याला नित्य म्हणतोस, अध्रुवला ध्रुव, अशाश्वताला शाश्वत ; ब्रह्मलोकापासुन श्रेष्ठ शांती (निर्वाण) असुन सुद्धा तु म्हणतो आहेस कि यापेक्षा श्रेष्ठ शांती नाही.बकब्रह्मा म्हणाला :
हे श्रमण गौतमा, आम्ही (ब्रह्मा) आपल्या पुण्यकर्माने जगावर राज्य करत आहोत. ब्रह्मलोकात उत्पन्न होणे हीच दुःखापासुन मुक्ती आहे.


भगवान म्हणाला :
हे ब्रह्मा तु ज्या आयुष्याला मोठे समजत आहेस ते आयुष्य सुद्धा थोडेच आहे, शेकडो, हजारो वर्षांच्या तुझ्या आयुष्याला मी जाणतो. मी अनंतदर्शी भगवान आहे. वेदनेच्या पलीकडे गेलो आहे.

हे ब्रह्मा.. मी तुझ्या गतीच्या प्रभावाला जाणतो, महान ऋद्धीबल असलेला तु महाशक्तीशाली आहेस... परंतु दुसऱ्या लोकसमुहातील असे लोक आहेत ज्यांना तु जाणत नाहीस, त्यांना तु पाहु शकत नाहीस, परंतु मी त्यांना पाहतो, मी त्यांना जाणतो.


तु आभस्सर नावाच्या लोकातुन येथे उत्पन्न झाला आहेस, तो खुप लांब प्रवास असल्याने तुला त्याची स्मृती नाही., परंतु मी त्याला जाणतो, मी त्याला पाहतो. यापुर्वीही तु सुभकिण्ह, वेहप्पाल, अभिभु नावाच्या लोकांमधुन प्रवास केला आहेस. परंतु तु त्याला जाणत नाहीस. परंतु मी जाणतो.

ब्रह्मा! पृथ्वी, जल, वायू, अग्नी आदींना त्यांच्या योग्य स्वरुपात जाणले, मी जगाच्या परम सत्याला, निर्वाणाला जाणले, याद्वारे ज्ञानामध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व ऐकुन बक ब्रह्मा भगवान बुद्धांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही.बकब्रह्मा म्हणाला : माझे पहिले शील आणि व्रत काय होते..?


भगवान म्हणाले,


• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु पुष्कळ तहानलेल्यांची तहान भागवली आहेस.
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहातुन वाहत जाणार्या माणसाला तु वाचविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहात नावेला पकडलेल्या मोठ्या सर्पापासुन तु सोडविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु मी तुझा कप्प नावाचा शिष्य होतो, ज्याला तु बुद्धीमान समजलेस.हे सर्व ऐकुन अचंबीत झालेला बकब्रह्मा म्हणाला,, खरोखरच भगवान आपण माझ्या आयुष्याला जाणता, त्याचप्रमाणे इतर गोष्टींना सुद्धा जाणता. आपल्या दैदिप्यमान तेजाने संपुर्ण ब्रह्मलोक प्रकाशमान झाले आहे.
दुग्गाहदिठ्टिभुजगेन सुदठ्टहत्थं, ब्रम्ह विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं । ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्ति संपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...
एतापि बुद्ध जयमंगल अठ्ट गाथा, यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वान नेका विविधानि चुपद्दवानि, मोक्खं सुंखं अधिगमेय्य नरो सपञ्ञोजो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना....सब्बे सत्ता सुखी होंन्तु , सब्बे होंन्तु च खेमिनो । सब्बे भद्रानिपस्स न्तु , माकत्र्चि दुक्खमागमा

सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...
आमच्या ब्लॉगचे सदस्य व्हा.

आम्हाला फेसबुकवर Follow करा

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

कालाम सुत्ताचे चुकीचे भाषांतर


Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I have said it, unless it agrees with your own reason and your own common sense.आजकाल इंटरनेटच्या माध्यमातुन या इंग्रजी सुभाषीताचा बुद्धवचन म्हणुन प्रचार होताना दिसत आहे. परंतु हे खरे बुद्धवचन नाही आहे. तर मुळ पाली गाथेचे चुकीचे भाषांतर करण्यात आले आहे.


या इंग्रजी सुभाषीताचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो. कोणी सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका, पवित्र धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका., मी स्वतः सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. तुमच्या बुद्धीलापटत असेल तरच त्यावर विश्वास ठेवा. (जो खऱ्या वचनापेक्षा अगदी वेगळा आणि चुकीचा आहे)


या सुभाषिताचे मुळ आपल्याला अंगुत्तर निकायाच्या तिक्कनिपातातील 65 व्या कालाम सुत्ता मध्ये सापडते. जर आपण कालाम सुत्त बरोबर वाचले तर आपल्याला खरा समजुन येईल.


भगवान बुद्धांची कल्याणकारी शिकवण देशाच्या शहरा-शहरात, गावा-गावात एखाद्या झंजावाताप्रमणे पसरु लागली होती. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी देशोदेशीचे श्रमण आणि ब्राह्मण त्यांच्याजवळ येत होते. असेच एकदा भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या गावाला गेले असता, त्या गावातील कालामांनी भगवान बुद्धांना योग्य तो उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले...‘एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ।

१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....


तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.हा या गाथांचा खरा अनुवाद आहे. यामधील चौथा मुद्दा आहे कि कोणती गोष्ट तर्कसंगत आहे, आमच्या बुद्धीला पटते म्हणुन ती गोष्ट स्वीकारु नका, त्या गोष्टीवर विश्वास ठेवु नका. तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी वाईट, ज्या मार्गावर चालल्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल त्यानुसार आचरण करा आणि त्याचाच स्वीकारा... असे भगवान बुद्ध आपल्याला उपदेश करतात.जर तर्कच सर्वश्रेष्ठ असता तर भगवानांना उपदेश करण्याची आवश्यकता काय असती...?


कारण प्रत्येक गोष्ट तर्कावर सुटु शकत नाही. आणि सत्यही तर्काच्या बळावर गवसणार नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या बुद्धीचे लोक राहत असतात जर प्रत्येक जण आपआपल्या तर्कावरच विश्वास ठेवायला गेला तर जगातुन सत्य नाहीसे होईल. अंधविश्वासही वाढेल..


चांगल्या मानवकांचे तर्क चांगले तर वाईट माणवकांचे तर्क वाईटच असतील. परंतु सत्यापेक्षा ते वेगळेच असेल. ज्याचे त्याचे तर्क ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसारच असतील शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे कि सामान्य मानवाचे इंद्रिय हे मर्यादीत असतात. प्रत्येक गोष्ट ते त्याच्या तर्कावर सोडवु शकणार नाहीत.


उदा. मानवाचे कान अल्ट्रासोनीक साऊंड ऐकु शकत नाहीत., तसेच कित्येक सुक्ष्म जीव आपल्या डोळ्याने तो पाहु शकत नाही, हे सर्व मानवाच्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत..


या सर्वांपेक्षाही बुद्धाचा धर्म सहावा इंद्रिय मानतो, ते म्हणजे आपले मन.... सामान्य मानवाच्या मनाचीही शक्ती इतर इंद्रियांप्रमाणे मर्यादीत आहे...त्यामुळे केवळ तर्कावर तो सत्याचा शोध लावु शकणार नाही.


परंतु त्यासाठी (मनाची शक्ती वाढविण्यासाठी) एक मार्ग सांगीतला आहे. त्याने असा कुठेही दावा केला नाही कि त्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे. परंतु त्याचा हा धम्ममार्ग एकमेव मध्यम मार्ग आहे एवढे मात्र नक्की.

बुद्ध हे मानवाचेच विकसीत रुप आहे., मानवाच्या मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्धत्व होय.

भगवान गौतम बुद्धांनी जे काही सांगीतले ते सर्वकाही स्वतःच्या अनुभवातुन, (तर्कावरुन नव्हे.!) आणि त्यांचा असा दावा आहे कि कोणीही हा सिद्धांत स्वतः अनुभवुन पाहु शकतो....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


आमच्या ब्लॉगचे सदस्य व्हा.

आम्हाला फेसबुकवर Follow करा

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (भाग २ : अजीत केसकंबल विरुद्ध भगवान बुद्ध आणि यज्ञाचा खरा विधी..)भगवान बुद्धांचे यज्ञांच्या संबंधी काय मत होते हे आपण मागच्या भागात बघितलेच आहे, त्यांनी हिंसक यज्ञाचा खुप विरोध केला होता, तर अहिंसक यज्ञांची प्रशंसा केली होती. (कारण त्यात कोणत्याही प्राण्यांची हिंसा होणार नव्हती..) सविस्तर लेख येथे वाचा.


या भागामध्ये आपण तत्काळातील यज्ञांच्या विरोध करणाऱ्यांच्या विरोध मार्गातील फरक पाहणार आहोत.


वैदिकांच्या यज्ञांचा विरोध करणाऱ्यांमध्ये भगवान बुद्ध आणि निर्गंथ नाथपुत्र महावीर स्वामी, इत्यादी श्रमण अग्रणी होते. परंतु यज्ञ विरोधकांच्या यादीतील एक महत्त्वपुर्ण नाव म्हणजे अजीत केसकंबल.


माझ्या मागील लेखामध्ये मी अजीत केसकंबलाच्या नास्तिकवादावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उच्छेदवादी अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन आणि नास्तिक होता. तत्कालील श्रमण आणि ब्राह्मण हे दोन मतांचे होते : १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.


शाश्वतवादी मतांचे लोक समजत होते कि आत्मा हा नित्य आहे, तर उच्छेदवादी मतांचे म्हणायचे कि पंचमहाभुतांपासुन (काही चार महाभुत मानायचे) बनलेला हा आत्मा, शरीरनाशानंतर निसर्गात आपापल्या तत्वांना जाऊन मिळतो. तो उच्छेदवादी होता.


असा हा अजीत केसकंबल उच्छेदवादी असल्या कारणाने त्याचा पाप पुण्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्याच्या पंथात नैतिकता नावाची गोष्ट नव्हती. म्हणुन तो मनाला वाटेल तसा (नैतिकतेची सीमा ओलांडुन) इतरांवर टिका करीत असे. तत्कालीन ब्राह्मणांचा, ब्राह्मण व्यवस्थेचा आणि वेदांचा तो अत्यंत कडवा विरोध होता.अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन (नपुसंक) पुरुषांची उपजिविका आहे.यज्ञातील अग्नीहोत्रामध्ये मारलेला प्राणी जर स्वर्गात जात असेल, तर यज्ञाचे आयोजन करणारा आपल्या पित्याची आहुती त्यामध्ये का देत नाही... यज्ञयागांवर अशा प्रकारच्या टिका करणाऱयांमध्ये अजीत केसकंबल अग्रणी होता.


परंतु भगवान बुद्ध मात्र यज्ञ विरोधात आंधळे होऊन आपली नैतिकता विसरत नव्हते (तर दुसऱ्यांच्या श्रद्धांना ठेस न पोहोचवता) त्या यज्ञांमधुनच ते आपल्या धर्माचा प्रचार करीत होते, लोकांना सदाचार शिकवित होते. ते कसे काय...?

भगवान बुद्ध म्हणतात, यज्ञात प्राण्यांची आहुती दिल्याने यज्ञाचा आयोजक काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्मांचे आयोजन करतो. त्यामुळे यज्ञ हे अमंगल कार्य आहे असे भगवान म्हणतात.

एकदा भगवान बुद्ध एका ब्राह्मणाला यज्ञाचा खरा विधी समजावुन सांगतात अशा प्रकारची एक कथा अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातातील महायान्नवग्गातील अग्गीसुत्तामध्ये सांगतात (अ.नि. ७:५:४)


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनात्थपिंडिकाच्या जेतवनामध्ये राहत असताना उन्मत्त शरीराच्या ब्राह्मणाने एक महायज्ञ आयोजीत केला होता. त्या यज्ञांमध्ये पाचशे बैल, पाचशे गाई, पाचशे बकऱ्यां, पाचशे मेंढरी, इ. यज्ञामध्ये आहुती दिली जाणार होती. तेव्हा तो भगवान बुद्धांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करुन बाजुला बसला.

ब्राह्मण म्हणाला,, हे श्रमण गौतम यज्ञासाठी अग्नीहोत्र उभारणे आणि अग्नी पेटविणे हे खुप फलदायक आहे असे मी ऐकले आहे.

भगवान म्हणाला, होय ब्राह्मणा मी सुद्धा तसेच ऐकले आहे.

दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ब्राह्मण हे वाक्य बोलला आणि भगवंतांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले...


ब्राह्मण म्हणाला, छान गौतमा! आपले विचार किती जुळतात.

त्यावर आनंद म्हणाला, हे ब्राह्मणा तुझे वाक्य बरोबर नाही. मी असे ऐकले आहे च्या ऐवजी तु असे म्हण कि यज्ञासाठी व अग्नीहोत्र पेटविण्याची मला इच्छा आहे आणि ती पुर्ण करण्याच्या मी प्रयत्नात आहे, तेव्हा भगवंतांनी मला उपदेश करावा कि त्याच्या प्रतापाने माझे चिरकाळापर्यंत कल्याण होईल.

आनंदाच्या म्हणण्या प्रमाणे ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न विचारल्यावर भगवान म्हणाला,, हे ब्राह्मणा,, यज्ञासाठी जो अग्नीहोत्र उभारतो आणि त्यात अग्नी पेटवितो तो त्या यज्ञापुर्वी तीन प्रकारची शस्त्रे उगारतो. जे दुर्गुण, दुःखाची उत्पत्ती आणि इतर अनेक प्रकारच्या दुःखाच्या उत्पन्नाला कारणीभूत असतात.

कायाशस्त्र, वाचाशस्त्र आणि मनशस्त्र...• जो यज्ञाला सुरुवात करतो त्याच्या मनात इतके, बैल, बकरे, मेंढरे मारले जाणार इत्यादी दुःख उत्पन्न करणारे अकुशल विचार जन्म घेतात, याप्रमाणे तो सर्वप्रथम चित्त (मन) शस्त्र उगारतो. त्यानंतर त्या सर्व जीवांना आहुती देण्याला तो स्वतःच्या तोंडाने आज्ञा देतो. अशाप्रकारे तो दुःख उत्पन्न करणारे वाचाशस्त्र उगारतो.

• त्यानंतर जीवांना आहुती देण्यासाठी सर्वप्रथम तो स्वतःच त्यांचा बळी घेतो. आणि त्याप्रमाणे दुःख उत्पन्न करणारे तो कायाशस्त्र उगारतो.

• हे सर्व करताना तो समजतो कि मी पुण्यकर्म करीत आहे, या पुण्यकर्माने खचीतच मला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु तो पापकर्म करतो, तो नरकाच्या मार्गावरुन चालत असतो.
हे ब्राह्मणा, तीन अग्नीचा त्याग करावा,, 
१. कामाग्नी, 
२. द्वेषाग्नी, 
३. मोहाग्नी
• कामाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती कामाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा कामाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.• द्वेषाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती द्वेषाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते ज्यामुळे ती दुर्गतीला जाते, नरकात जाते, म्हणुन हे ब्राह्मणा द्वेषाग्नी पासुन नेहमीच दुर राहायला हवे.
• मोहाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती मोहाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा मोहाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.
भगवान पुढे म्हणाला, हे ब्राह्मणा कामाग्नी, मोहाग्नी आणि द्वेषाग्नी या तीन अग्नींचा त्याग केल्यानंतर तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांची पुजा करावी. कोणते आहे ते तीन अग्नी. 
१. आहुनेय्यग्गि, 
२. गहपतग्गि, 
३. दक्खिनेय्यग्गि...

•आहुनेय्यग्गी : माता आणि पिता हे आहुनेय्यग्गी आहेत, मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात. म्हणुन त्यांचा आदरसत्कार करावा, त्यांची पूजा करावी.

• गहपग्गि : बायको, मुलंबाळं, मित्र व नौकरचाकर हे गहपतग्गि आहेत म्हणुन त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा, औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.

• दक्खिनेय्यग्गि : हे ब्राह्मणा,, श्रमण आणि ब्राह्मण हे दक्खिनेय्यग्गि आहेत, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा.. आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.हे ब्राह्मणा हा लाकडाचा अग्नी आहे कधी पेटवावा लागतो तर कधी विझवावा लागतो....

हे सर्व उपदेश ऐकुन तो ब्राह्मण खुप प्रभावीत झाला, त्याने सर्व प्राण्यांना मोकळे सोडले व तो भगवान बुद्धांचा उपासक झाला..

यातुन तुमचा निष्कर्ष काय...?

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


संबंधीत लेख :

यज्ञाचा खरा अर्थ भाग : १

अजीत केसकंबलाचा नास्तिकवादा

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)