मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

तीन प्रकारच्या मिथ्या (नास्तिक) मान्यता


प्रस्तावना :


आज आपल्या सभोवताल विविध जाति, संप्रदायाचे लोक राहतात. परंतु प्रत्येकाच्या मान्यता (श्रद्धा) एकमेकांच्या पासून भिन्न असतात. सामान्यतः आपल्या समाजामध्ये आपल्याला दोन मुख्य प्रकारच्या मान्यता दिसून येतात :

 आस्तिक
 नास्तिक


         ह्या दोन्ही मान्यता एकाच नदीचे दोन किनारे आहेत. जे कधीच एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत. ह्या दोन्ही परंपरेतील विद्वानांचा असा दावा आहे कि, आमच्याच मान्यता सत्यआहेत, बाकीच्यांच्या मिथ्या. भगवान बुध्द आस्तिक कि नास्तिक याबाबतीत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. परंतु मी सांगतो पारंपारिक पाली तीपिटक वाचल्यावर आपल्याला समजून येईल कि, भगवान ना आस्तिक मतप्रवर्तक ना नास्तिक मतप्रवर्तक त्यांचा मार्ग हा दोघांच्या मधला मार्ग होता. हेच कारण असेल कि आजच्या काळात आपल्याला आस्तिकच नाहीत तर नास्तिक सुद्धा भगवान बुद्धांच्या मार्गाला फसवा मार्ग आहे असे असा प्रचार करताना दिसतात. हा प्रसंग आज नव्याने जन्माला अशातला भाग नाही, त्यांच्या समकाळात सुद्धा नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही मतप्रवाहामध्ये त्यांचे विरोधक होते. कारण बुद्धांनी आस्तिकच नाहीत तर नास्तिक परंपरेतील अनेक चुकीच्या मान्यतांचा विरोध केला होता. असो.... असे असले तरी खरी स्पर्धा ह्या कट्टर आस्तिक आणि कट्टर नास्तिक यांच्यातच असते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मान्यता असलेल्या लोकांनी ह्या महत्वपूर्ण लेखाचे वाचन अवश्य करावे.


       अगदी आजच्या प्रमाणेच बुद्धांच्या काळात सुद्धा ईश्वरवादी तसेच निरीश्वरवादी लोक सुद्धा होते, त्यांच्या विविध प्रकारच्या मान्यता होत्या, त्यांच्यापैकी कोणत्या मान्यता मिथ्या आणि कोणत्या मान्यता सम्यक याचा उपदेश भगवानांनी अंगुत्तर निकायाच्या तिकनिपातातील विभिन्न वाद सुत्ता मध्ये केला आहे. त्याचा सारांश इथे देत आहे.


मिथ्या (नास्तिक) मान्यता :



  •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व त्याच्या पूर्व जन्मात केलेली कर्मांचे फळ आहे.
  • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व ईश्वर निर्मित आहेत.
  •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते कोणत्याही कारणाविना घडत आहेत, त्यांच्या मागे कोणतेच कारण नाही.



विवेचन :


प्रथम मिथ्या  धारणा :


  •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व त्याच्या पूर्व जन्मात केलेली कर्मांचे फळ आहे. त्यांना मी विचारतो कि आयुष्यमान तुमच्या मतानुसार पूर्व जन्मातील कर्मांच्या फळानुसारच लोक प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे बनतात, अब्रह्मचारी बनतात. काय पूर्व जन्माच्या फळाच्या स्वरूपातच लोक शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे बनतात, पूर्वजन्मातील कर्मांच्या स्वरूपातच लोक लोभी, क्रोधी बनतात, किंवा पूर्वजन्मातील कर्मांच्या फळाच्या स्वरूपातच लोक मिथ्या (नास्तिक, आंधळी, सत्याचे दर्शन नसलेली) दृष्टी वाले बनतात.


          याप्रकारे पुर्वाकार्मांनाच सर्वकाही मानणाऱ्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समझत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.


उदाहरण :  भगवान बुद्धांच्या काळात निर्गंथ (जैन) नावाचे श्रमण होते, ज्यांचा अशा प्रकाराचा सिद्धांत होता. या मताच्या अनुसार आपल्याला येणारे सुखकर आणि दुःखकर अनुभव हे आपल्या पूर्व जन्मातील कर्मावर आधारित असते. म्हणून या जन्मात काही कर्म केले नाहीत तर पुढील जन्मात काही भोगावे लागणारच नाही, हा त्यांचा सिद्धांत असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या कर्मांचे क्षय करण्यातच गुंतले राहतात, त्यानुसार ज्याने आपल्या सर्व कर्मांचे क्षय केले त्याला निर्वाण किंवा मोक्ष प्राप्ती झाली असे म्हणतात.



दुसरी मिथ्या धारणा :


  • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व ईश्वर निर्मित आहेत. त्यांना मी विचारतो - कि प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे, अब्रह्मचारी, शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे, लोभी, क्रोधी, मिथ्यादृष्टीसंपन्न, इत्यादी सर्व जे काही जीव आहेत ते सर्व ईश्वरनिर्मित फळाच्या स्वरूपातच बनतात.?


        याप्रकारे, ईश्वरनिर्मिती मुळेच सर्वकाही घडणाऱ्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समजत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.


उदाहरण : आज जे काही लोक स्वतःला आस्तिक समजतात, त्यांच्या अशा मिथ्या मान्यता आहेत, त्यांच्या मते आपल्या सोबत ज्या काही सुखदायक किंवा दुःखदायक गोष्टी घडत असतात त्या सर्व सृष्टीनिर्मात्या ईश्वराच्या इच्छेनेच घडतात अशी त्यांची मान्यता आहे.



तिसरी मिथ्या धारणा :


  • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते कोणत्याही कारणाविना घडत आहेत, त्यांच्या मागे कोणतेच कारण नाही. त्यांना मी विचारतो कि - प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे, ब्रह्मचारी, शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे, लोभी, क्रोधी, मिथ्यादृष्टीसंपन्न, इत्यादी सर्व जे काही जिव आहेत, ते सर्व कोणत्याही हेतुविना (कारणाविना, योगायोगाने) बनतात का ?

        याप्रकारे अशा मान्यतेच्या लोकांमध्ये जे समजतात कि घडणाऱ्या गोष्टी कोणत्याही कारणाविना, कोणत्याही हेतुविना घडतात त्यांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समजत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.

उदाहरण : भगवान बुद्धांच्या काळात अजित केसकंबल नावाचा एक नास्तिक मतप्रवर्तक होता, त्याची आणि त्याच्या पंथाची अशी मान्यता होती कि घडणाऱ्या गोष्टी कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडत असतात. आज स्वतःला जे लोक नास्तिक समजात त्यांचीही अशीच मान्यता आहे, कि घडणाऱ्या सर्व गोष्टी कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडत असतात.


अशाप्रकारे भगवान बुद्धांच्या मतानुसार वरील तीन मान्यता ह्या मिथ्या (नास्तिक) मान्यता आहेत, ज्याच्या मान्यता ह्या सम्यक नाहीत, मिथ्या आहेत ते अज्ञानाच्या घोर अंधकारात खितपत पडलेले असतात.


विवेचन :




  •  ज्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहेत. त्यांनी सांगावे कि - तुम्हाला परीक्षेत बरे किंवा वाईट मार्क्स मिळाले, अपघात झाला, नौकरी मिळाली इत्यादी सर्व बऱ्या वाईट गोष्टी ते पूर्वजन्मात केलेल्या कर्माचे फळ आहेत काय...? सचिन तेंडुलकर चांगला क्रिकेटर बनला, त्यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले, कसाब ला फाशी झाली ते त्यांच्या पूर्वजन्मात केलेल्या कर्माचे फळ आहे काय..? भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला, ऑलिम्पिक मध्ये केवळ एक पदक जिंकले हे पदक विजेत्याचे पूर्वजन्मातील केलेल्या कर्माचे फळ आहे काय..? जर पूर्वजन्मातील कर्मांद्वारे तुमचे आजचे जीवन घडणार असेल तर मग आता प्रयत्न करून काय उपयोग..?

  •  ज्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या सर्व ईश्वराच्या इच्छेनेच घडणाऱ्या आहे, सर्व गोष्टींचा निर्माता ईश्वर आहे, त्याच्या इच्छे विरुद्ध काहीच होत नाही. त्यांनी सांगावे कि - तुम्हाला परीक्षेत बरे किंवा वाईट मार्क्स मिळणे, नौकरी मिळणे किंवा न मिळणे इत्यादी सर्व ईश्वराच्या मर्जीत आहे. तर मग तुम्ही अभ्यास कशाला करता ? म्हणजे कोणी अभ्यास करो किंवा न करो, परीक्षेत पास केवळ ईश्वरच करवतो, जर तसे आहे तर मग नापास होणाऱ्या लोकांनी त्याचे काय घोडे मारले होते.. त्यांच्यातील बरेच लोक तर ईश्वराचे परम भक्त असतात. सचिन तेंडुलकर क्रिकेट चा बादशहा ईश्वराच्या इच्छेने झाला कि त्याच्या इच्छेच्या विरुध्द..? त्यामध्ये त्याचे कर्तुत्व नव्हते काय..? समजा भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट चा सामना सुरु आहे, जेव्हा भारत सामना जिंकतो तेव्हा पाकिस्तान्यांचा देव सुध्दा भारताला जिंकवतो काय. किंवा पाकिस्तान ने सामना जिंकला यामध्ये भारतातील देवांची सुद्धा इच्छा असेलच, म्हणूनच रुसलेल्या ईश्वराला (देवतांना) खुश करण्यासाठी (जेणे करून भारत क्रिकेट सामना जिंकावा यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ सुद्धा केले जातात. (इथे कथित ईश्वर मानवी भावनांचा गुलाम आहे हे समजते.) त्यांनी आमच्या प्रार्थना स्थळांना हानी पोहोचविली म्हणून आम्ही त्यांची हत्या करणार, अशी विचारांचे काही ईश्वरवादी असतात. परंतु ते कधी असा विचार करताना दिसत नाहीत, कि जे काही घडले त्यात ईश्वराची काहीच इच्छा नसेल काय.....?

  •  काही लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी कोणत्याही हितुविना, कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडणाऱ्या आहेत. - वरील ज्या दोन मिथ्या (नास्तिक) धारणा आहेत, त्या आज स्वतःला आस्तिक समजणाऱ्या लोकांमध्ये आढळतात. परंतु हि धारणा स्वःताला आस्तिक समजणाऱ्या लोकांमध्ये सापडते. त्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या कोणत्याही कारणाविना घडत असतात. परंतु त्यांची हि धारणा मिथ्या आहे, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे कोणते न कोणते कारण असते. आणि जी गोष्ट घडण्याच्या मागे कोणते कारण राहत नाही त्या गोष्टीला चमत्कार असे म्हणतात.



उदाहरण :


  •  सचिन तेंडुलकर महान क्रिकेटर बनला ते कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) ?
  •  मोदी प्रधानमंत्री बनले ते योगायोगाने ?
  •  कॉंग्रेस निवडणूक हरली
  •  फडणवीस मुख्यमंत्री झाले.
  •  भारत मंगळावर गेला.
  •  अमेरिका महासत्ता आहे,
  •  जगात काही लोक श्रीमंत तर काही लोक गरीब आहेत.

        इत्यादी अनेक उदाहरणे सांगता येतील जे सिध्द करतात कि घडणाऱ्या प्रत्येक सुखदायक किंवा दुःखदायक गोष्टी मागे कोणते ना कोणते कारण असते. वरील ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या घडण्याच्या मागे कोणते ना कोणते कारण आहे, त्या योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्यासाठी त्यांनी तशी कर्मे केली आहेत आणि त्याची फळे ति भोगत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष द्या आणि अनुभव करा कि त्यां घडण्याच्या मागे कोणते न कोणते कारण असेलच. आणि ज्याची कारणे आपण समजू शकले नाहीत याचा अर्थ आपले ज्ञान कुठे तरी कमी आहे असाच होतो.

भगवान बुद्धांनी या तीन मिथ्या मान्यतांचा उपदेश केल्यानंतर सम्यक धर्माचा उपदेश अंगुत्तर निकायाच्या तिकनिपातातील विभिन्न वाद सुत्ता मध्ये केला आहे, आपण ते पूर्ण सुत्त वाचून काढावे.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



विभिन्न वाद सुत्त इथे वाचा  :