सोमवार, १३ जानेवारी, २०१४

धम्म परिषदा सामाजीक भान हरविलेल्या आहेत का.....? (भाग - १ : वर्तमान पत्रातील लेखाला उत्तर )

दिनांक १०-१-२०१३ च्या दैनिक लोकमतच्या संपादकीय मध्ये आंबेडकरवादी विचारवंत बी. व्ही. जोंधळे यांनी लिहिलेला 'सामाजीक भान हरवलेल्या धम्म परिषदा' या सदराखाली एक लेख प्रकाशीत झाला, जो मला मुळीच पटला त्यावर माझी प्रतिक्रिया म्हणुन हा लेख लिहितो.


सदर लेखात लेखकाने मांडलेल्या मुद्यांवर प्रकाश टाकणारा (नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा.... ) माझा हा लेख काही दिवसांपुर्वीच इंटरनेटवर प्रकाशीत केला, आपण सर्वांनी तो सर्वप्रथम वाचुन घ्यावा....


बुद्धाच्या धम्मामध्ये शीलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध उपासक होण्याच्या पुर्वी काया, वाचा व मनाने दहा पापांचा त्याग करायला सांगीतले आहे. त्यामधुन मानसीक पापे म्हणजे १. परद्रव्याबद्दल आसक्ती, २. क्रोध आणि ३. नास्तिकता....


याठिकाणी नास्तीकता म्हणजे ईश्वर व आत्मा न मानणे नव्हे, तर शील पालन करण्यात काही अर्थ नाही, दान करण्यात काही अर्थ नाही, समाधीपासुन काही लाभ नाही असे ज्यांचे विचार आहेत ते नास्तिक... सदर लेखक भगवान बुद्धांच्या धर्मानुसार नास्तिकात मोडतो त्यांची बुद्धाच्या धर्मावर श्रद्धा नाही..... ते म्हणतात बुद्ध वंदना करणे हा बाबासाहेबांचा बौद्ध धर्म सांगत नाही..


मला वाटते लेखकांना माहीत नसावे कि श्रिलंकेत जाऊन सर्वप्रथम भारतीय बौद्धजन समितीच्या प्रकाशनाखाली बाबासाहेबांनी 'बौद्ध पुजा पाठ' नावाचे पुस्तक लिहिले...प्रस्तावनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,, बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दल लोकांमध्ये ज्या दिवसापासुन आतुरतात उत्पन्न झाली आहे त्या दिवसापासुन बौद्ध धर्म म्हणजे काय व त्याचे वाङ्मय काय आहे..? या संबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय कुतुहल दिसुन येते.


काही वर्ग कुतुहलाच्या मर्यादेपलिकडे गेलेले दिसतात. त्यांना बौद्ध धर्मात पुजापाठ कशाप्रकारे होते, हे जाणून घेण्याचे एक वेडच लागले आहे. आम्हाला बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो, यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा सारखा तगादा लागुन राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थेमुळे त्यांची जिज्ञासा पुर्ण करणे आतापर्यंत मला शक्य झाले नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजा पद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाहीत. त्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळु शकतात.


१९५० साली मी सिलोनला गेलो असताना त्या काळात याच विषयावर भर देऊन या गाथा मी संग्रहित केल्या व माझे मित्र गुणतिलके यांना गावयास लावुन त्याचे रेकॉर्ड बनवले. येथे आल्यानंतर काही बौद्ध भिक्षुंच्या सहाय्याने या गाथांमध्ये भर टाकली. आज बहुतेक सर्व गाथा समजण्यास सुलभ जाव्या म्हणुन पाली गाथेचे मराठी भाषांतर एका बाजुस दिले आहे.....- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 
दि. २४-०२-१९५६
२६, अलिपुर रोड, 
सिव्हील लाईन्स, दिल्ली


जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध पुजा पाठ नावाचे पुस्तक लिहिले तेव्हा, बाबासाहेबांचा बौद्ध धर्म बुद्ध वंदना सांगत नाही या दाव्याला काय आधार उरतो.....?


लेखक हे बौद्ध धर्मीय नसल्याने ते आपल्या धार्मिक जीवनामध्ये बुद्ध वंदनेचे काय महत्त्व असते ते समजु शकत नाही. त्यांच्या मते बुद्धाचा धर्म म्हणजे केवळ क्रांती, मग ती कोणत्याही मार्गाने का असेना...? लेखक म्हणतो त्रिशरण, पंचशील, बुद्धाचा अष्टांगिक मार्ग सर्व थोतांड आहे. लोक क्रांतीकारक बुद्ध विसरुन या सर्व कर्मकांडाच्या नादाला लागले आहेत हे कटु वास्तव आहे.


बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील, आर्य अष्टांगीक मार्ग, इत्यादी यांना नाकारले नाही तर हाच खरा बौद्ध जीवन मार्ग आहे असे बाबासाहेब म्हणतात.जर प्रत्येकाने आर्य अष्टांगीक मार्गाचा अवलंब केला तर एक माणुस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दुर होईल. 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
लेखक पुढे म्हणतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध धम्माने आत्मा, पुनर्जन्म नाकारला परंतु बौद्ध भिक्खु परित्राण पाठ (ज्याला लेखक मृतात्म्यांच्या नावे पितर घालण्याची प्रथा म्हणतो) यासारखे थोतांडी काम करुन घेत असतात.


आतातर हा लेखक मला मुळीच आंबेडकरवादी वाटत नाही जो खरा बौद्ध बनु शकला नाही, ज्याला बुद्धाचा धर्म काय तो कळलाच नाही. डॉ. बाबासाहेबांनी आत्मा नाकारला बरोबर आहे, पण भगवान गौतम बुद्धांनी तरी कोठे आत्म्याचा स्वीकार केला हे लेखकाने दाखवुन द्यावे. अनात्मवाद तर बौद्ध धर्माच्या मुळ शिकवणीपैकीच एक आहे. कोण म्हणते बाबासाहेबांनी पुनर्जन्म नाकारला...? बाबासाहेबांनी पुनर्जन्माचा स्वीकार केला आहे फक्त त्याला लागुन असलेला कर्मसिद्धांत त्यांना ब्राह्मणी कर्मसिद्धांता सारखा वाटला. (जो ब्राह्मणी कर्मसिद्धांता सारखा वाटत असला तरी त्यापेक्षा खुप वेगळा आहे...) त्याबाबत तुमची काहीही श्रद्धा वा मान्यता असो, परंतु त्यामुळे त्याने तुमच्या धार्मिक जीवनावर काहीही फरक पडणार नाही, कारण बुद्ध वंदना म्हणजे आत्म्याच्या शांतीसाठी केले जाणारे कर्मकांड नव्हे तर भगवान बुद्धांच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा वाढावी, आपल्या मनाला शांती मिळावी यासाठी केले जाणारे शरण होय... बुद्ध वंदना म्हणजे ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी केली जाणारी आरती नव्हे. (अधिक माहीती साठी वाचा : बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज )


या लेखकाने बौद्ध भिक्खुंची तुलना एखाद्या भोंदु बाबांसोबत केली आहे. बुद्ध वंदनेला कर्मकांड म्हटले आहे. या लेखकाने अशा सर्व टिका करण्यापुर्वी एखाद्या सुज्ञ व्यकीशी याबाबत चर्चा करायला हवी होती असे मला वाटते... अहो हि कर्मकांड नव्हेत, हिंदु धर्मातल्या कर्मकांडामध्ये आणि बुद्ध वंदनेमध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे....आता लेखकाने भगवान बुद्धांवर त्यांच्या धर्मावर आणि संघावर केलेल्या आरोपाचे सरळपणे उत्तर देतो.... मी तुम्हाला संदर्भ देतो तुम्ही वाचा आणि योग्य काय तेच ठरवा....लेखक : बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील, आर्य अष्टांगीक मार्ग, दान पारमिता वगैरे गोष्टी थोतांड कर्मकांड म्हणुन नाकारल्या..
उत्तर : वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बौद्ध पूजा पाठ वाचा (प्रकाशक : भारतीय बौद्धजन समीती), The Buddha & His Dhamma Book II, Section 4-6

लेखक : डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध धर्माने आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला..

उत्तर : जगातला कोणता बौद्ध धर्म आत्मा स्वीकारतो ते लेखकाने आधी सांगावे. पुनर्जन्म बाबासाहेबांनाही मान्य होता, वाचा : The Buddha & His Dhamma (Book IV, Section 2)


लेखक : परित्राण पाठ म्हणजे कर्मकांड, बौद्ध भिक्खु म्हणजे भोंदु बाबा...लेखक : बुद्धांनी दुःख दुर झाले पाहिजे, म्हणजेच समाजाचे ऐहिक प्रश्न सुटले पाहिजेत बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गा सारख्या कर्मकांडात पडु नये...


उत्तर : मनुष्य ऐहिक प्रश्नाच्या बंधनातुन मुक्त व्हावा म्हणजेच तो दुःखमुक्त व्हावा असा भगवान बुद्धांच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे.


उदा : खुद्यकनिकायाच्या सुत्त निपात ग्रंथातील धनीय सुत्तामध्ये

पापी मार : पुत्रामुळे पुत्रवंताला आनंद होतो. तसेच गायीमुळे गवळी आनंदीत होतो. उपाधी हि मनुष्याच्या आनंदाचे कारण आहे, ज्याच्याकडे उपाधी नाही तो कधीच आनंदीत होत नाही.


भगवान म्हणाला : पुत्रामुळेच पुत्रवंताला दुःख होतो. तसेच गायीमुळे गवळयाला दुःख होतो. उपाधी हि मनुष्याच्या दुःखाचे कारण आहे. ज्याच्याकडे उपाधी नाही तो कधीच दुःखी होत नाही.


या उदाहरणावरुन भगवान बुद्धांचे दुःखासंबंधी खरे मत कळते.... आणि त्या दुःखातुन मुक्त होण्यासाठी भगवान बुद्ध आर्य अष्टांगिक मार्ग सांगतात...
लेखक : दर रविवारी बुद्ध विहारात जाऊ नये,

उत्तर : नवीन झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे कि त्यांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेले पाहिजे असे जर झाले नाही तर नवी बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजेत. विहारात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, थायलंड इत्यादी देशातील भिक्षुंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व भारतातील बौद्ध लोकांना मदत करावी.


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकुणच काय तर हा स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणवणारा हा लेखक खरा आंबेडकर द्रोही विचारवंत वाटत आहे, ज्याला बुद्धाच्या धर्माबाबत कवडीचेही ज्ञान नाही आणि चालला आहे बुद्ध वंदनेला, आर्य अष्टांगिक मार्गाला कर्मकांडाचा मार्ग म्हणायला, बौद्ध भिक्खुंना भोंदु बाबा म्हणायला, बौद्ध धम्म परिषदांना सामाजीक भान हरविलेल्या म्हणायला.....

धम्म परिषदांचे कार्य उदात्त आहे...धम्म परिषदांचे, धम्म प्रचार संघटनांचे कार्य महान आहे ते यांच्यासारख्यांना काय कळणार....? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दर एकाने, दर एकाला धम्म शिकवावा... तेव्हाच प्रत्येकाला बुद्धाचा धर्म समजेल.... भारत बुद्धमय करणे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते, त्याचा स्वप्न रथ ह्या धम्म परिषदा पुढे नेत आहेत याउलट धम्मावर श्रद्धा नसलेले तुमच्यासारखे नास्तिक सदाचाराची सीमा ओलांडुन दुष्कर्म करत आहेत. आणि त्यांच्या दुष्कर्मा मुळेच तो रथ मागे सरकत आहे.


धम्म प्रचार संघटना बिचाऱ्या खेड्यापाड्यात जाऊन धम्म परिषदा घेतात, लोकांना बुद्धाचा धम्म सांगतात, लोकांना सदाचाराचे जीवन कसे जगायचे ते सांगतात, डॉ. बाबासाहेबांचा धम्म रथ खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत....


मित्रहो असल्या लेखकांच्या लेखनाला बळी पडुन संभ्रमीत होऊ नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,,• बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे शुद्ध आचरण करणारे पाचच अनुयायी मिळाले तरी पुष्कळ झाले.


• बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.


• माझा सर्व बौद्ध जनांना असा सल्ला आहे कि त्यांना जगात सन्मानाने जगावयाचे असेल तर बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा.


• भगवान बुद्धाने जगाला सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्त्व सांगितले असेल तर ते हे कि, मनाची स्वच्छता ठेवा. या द्येयाचे मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवाची सुद्धारणा होणार नाही. 


• बुद्धाच्या शिकवणीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व सामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील. बुद्ध धर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी समर्थ बनवणारा असाच धर्म आहे.
बुद्धाचा धम्म म्हणजे नैतिकतेशिवाय दुसरे काहीच नाही.


•बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.


• बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्यच होय. एवढी गोष्ट कोणत्याही देशातील लोकांनी लक्षात ठेवली म्हणजे पुरे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजे मानवसेवा करणे होय. हा विश्वास ठेवला म्हणजे कार्य यशस्वी होणार.


• माझे आयुष्य थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्याकडुन कदाचित पुर्ण झाली नसतील, पण मी निश्चय केला आहे. इतर कार्यातुन मी निवृत्त होणार आहे, मला आता बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे.  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर...


बाबासाहेबांच्या ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार बौद्ध धम्म प्रचारक संघटना बौद्ध धम्म परिषदांच्या माध्यमातुन करतात आणि तुमच्यासारख्या आंबेडकरवादी (?) लेखकाला ती गोष्ट समजत नाही..


शेवटी एवढच म्हणेन ज्याला बुद्धाचा धर्म कळला नाही तो कसला आंबेडकरवादी...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...See also :


नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

मूळ लेख इथे वाचा..

बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

२ टिप्पण्या:

  1. Very good sir.. aapla ha lekh kharch asha ambedkar 'vadi' lokana chaprak aahe. Ha lekh lokmat madhe prasidh vhava hich sadichha..

    उत्तर द्याहटवा
  2. पियूषजी, खूपच छान, वरील लेखकाचा लेख मीही वाचला होता, तूम्ही दिलेले संदर्भासहीत उत्तर खूपच सुंदर आहे. अशा अर्धवट ज्ञान असलेल्यांनी लेख लिहून समाजाची फसवणू करू नये असे वाटते. आपण असेच चांगले अभ्यासपूर्ण लेख लिहावेत ही विनंती. संदीप त्रिभुवन.

    उत्तर द्याहटवा