शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

प्रतिक्रियांना प्रत्युत्तर... (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक)

काही दिवसांपुर्वी मी माझा (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक ) या नावाने लेख लिहिला होता, तो सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन वाचु शकता...हा लेख प्रकाशीत होताच समाजातील विविध स्तरांवरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रीया यायला लागल्या. आपल्या देशातील विविधतेप्रमाणे सर्वांच्या प्रतिक्रियांमध्ये विविधता होती, परंतु एकता कुठेच दिसत नव्हती, हा लेख वाचुन काही बुद्धद्वेष्ट्यांनी माती खाल्लीच, तर काहींनी भाषाशुद्धीकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा पराक्रम केला. या सर्वांना प्रतिउत्तर देण्याएवढी यांची लायकी तर नाही आहे, परंतु बुद्धांबद्दल कोणाच्या मनात किंचितही संभ्रम असेल तर तो दुर व्हायला हवा असे मी माझे कर्तव्य मानुन हा लेख लिहित आहे.सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि प्रस्तुत लेख हा भगवान बुद्धांचे गुण दर्शविणारा आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या आरतीसारखी कोणाची काल्पनीक थोरवी सांगीतलेली नाही, तर सम्यक संबुद्धाचे गुण सांगीतलेले आहेत.


हा सम्यक संबुद्ध म्हणजे कोण.,? सिद्धार्थ गौतम का.? नाही.. सम्यक संबुद्ध हे एक पद आहे याचा अर्थ होतो संपुर्ण जागृत असा. ह्या विश्वाचे सत्य जाणणारा. तो कोणी ईश्वर नव्हे, त्याचा अवतार किंवा दुतही नव्हे. तर सम्यक संबुद्ध हे एक पद आहे, ते आपल्यासारखा कोणताही मनुष्य भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेल्या धम्ममार्गावर चालुन प्राप्त करु शकतो... आणि ते प्राप्त करण्यापुर्वी जे गुण कोणत्याही मानवामध्ये येण्याची गरज आहे. ते गुण मी मागील लेखामध्ये सांगीतले आहेत. त्याचा मुख्य अर्थ लक्षात न घेता कोणीही वेड्यांप्रमाणे संदर्भहीन टीका का करावी..? कदाचित टिकाकार वेडे तर नसतील ना..? नाही ते वेडे तर मुळीच नाहीत. परंतु त्यांच्या मनात भगवान बुद्धांच्या प्रती असलेल्या धर्मद्वेषामुळे ते मनुष्य लोक सोडुन असुर लोकांत वास करत आहेत. (असुर म्हणजे क्रोधी व भांडखोर जीव, आता असुरांच्या गुणांवर लेख लिहिण्याची गरज पडु नये, नाहीतर असुर गुण लिहिल्यावर तो तुम्हाला तुमचा अपमान वाटायचा.)सम्यक संबुद्धाचे हे सर्व गुण वाचुन मार आणि असुर लोक म्हणतात,,


बुद्धाने कुठला शोध लावला आहे..? ज्याला बुद्धाच्या धर्माबद्दल 'अ' सुद्धा माहीत राहत नाही ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, परंतु आपण महाधर्मज्ञानी आहोत असे भासवतात... तसे बुद्धाने कुठला शोध लावला, हे मारांना आणि असुरांना सुरुवातीला समजणे कठीण जाते, परंतु मी मनुष्याच्या नात्याने काही असुरांना मनुष्यत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करुन पाहतो, तर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन भगवान बुद्धांबाबत म्हणतात..."भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्मशास्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयांना व्यापेल आणि तो धार्मिकदृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक बाबीँचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौध्द धर्म हा वरील कसोट्यांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधूनिक विज्ञानाच्या कल्पनांशी सूसंगत असेल तर तो बौध्द धर्मच होय. बौद्ध धर्मात मानवाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला असला तरी मी धार्मिक व्यक्ति नाहीय. परंतू जर मी तसा(धार्मिक) झालो तर मी बौध्दच होईल !"


--अल्बर्ट आइनस्टाईनआईनस्टाईन म्हणतात,, मानवाला पडलेल्या पुर्ण प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही, परंतु बुद्धाच्या धर्मात एवढे सामर्थ्य आहे..

एवढा मोठा शास्त्रज्ञ जो भगवान बुद्धांना जगातील पहिला वैज्ञानीक मानतो., असे का..? तुम्हा असुरांनुसार भगवान गौतम बुद्धांनी कोणताचा शोध लावला नसेल म्हणुन काय..? जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल संपुर्ण ज्ञान नसेल, तर आपल्या ठाई असलेल्या अर्धवट ज्ञानाच्या बळावर हे असुर लोक असले बिनबुडाचे आरोप का करतात..?भगवान बुद्धांनी फार मोठे संशोधन केले आहे, आपल्या मनावर होणाऱ्या आजारांना कशाप्रकारे मात देतायेईल, याचा मार्ग सांगीतला. काही असुर म्हणत होते कि, बुद्धाच्या धर्माची आणि विज्ञानाची तुलना कशाला करता,..? खरंतर मी कधीच तुलना केली नव्हती जे काही सांगीतले ते बुद्धाचे गुण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असली टिका करणारे हेच असुर वेदातील विज्ञान, इत्यादी विषयांवर निबंध लिहित असतात... असो..


तर काही भाषाशुद्धीवाले होते, जे मुख्य मुद्यांवर प्रतिक्रिया न देता काना, मात्रा, उकार इत्यादी चुकींवर शुद्धलेखनाच्या चुकींवर लक्ष वेधुन घेतात... अशा विचारसरणीचा मी धिक्कार करतो...आणि भगवान बुद्धांना जातीय कक्षेत मांडुन, समाजात जातीय द्वेष, धर्मद्वेष... पसरवु पाहणाऱ्या सर्व जातीय वादी व धर्मांध लोकांचा जाहीर निषेध करतो.... परंतु हे सर्व असुर प्रवृत्तीचे जातीय वादी व धर्मांध सर्व प्रकारच्या दुराचाराचा मार्ग सोडुन एक दिवस बुद्ध भगवंतांनी सांगीतलेल्या सदाचाराच्या मार्गावर येतील अशी खात्री आहे, म्हणुन मी आपल्या मंगल मैत्रीची कामना करतो....भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्तामध्ये सांगीतलेल्याप्रमाणे,, कोणताही व्यक्ती बुद्ध, धर्म व संघाची निंदा करत असेल तर त्याच्याशी वैरभावना ठेवु नये, त्याच्याप्रती असंतोषाने वागु नये, नाही मनात त्याचा कोप करावा. त्याने आपलीच हानी होते. आपण सत्याचा शोध घ्यायला हवा. ते जे काही बोलत आहेत ते सत्य आहे कि असत्य हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा. (म्हणुनच मनात निर्माण झालेले संभ्रम दुर करण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे. तेव्हा वरील लेखामध्ये ज्यांच्या साठी असुर हा शब्द वापरला आहे, त्यांच्या प्रती लेखकाच्या मनात कोणतीही द्वेष भावना नाही आहे, हे समजुन घ्यावे...)मंगल मैत्री...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

२. मराठी धम्मपद

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ नाथपुत्रावर विजय)

सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थाविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले. सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा....तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा 


मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही..एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने स्थाविर अश्वजीत यांना बघितले. ते भिक्षाटन करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली.


भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि,, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले.


त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थाविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)


सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?


त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत.


यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात.


ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे.


तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?


यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे..


यानंतर त्यान विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.


वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता.


• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे.

• रुप अनित्य आहे.

• जो अनित्य आहे, तो दुःख आहे.

• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही.

• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे.त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक काशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?

भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, नाही हा माझा आत्मा आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात.


यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंतत्व प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत जेवणाला आमंत्रीत केले...
सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं, वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं । पञ्ञा पदीपजलितो जितवा मुनिंदो, तं तेजसा भवतु ते जयमंगलाननिज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

रोहीणीचे वडील म्हणाले,,

तु झोपताना श्रमणाचे नाव घेतेस,
उठताना श्रमणाचे नाव घेतेस,
तु केवळ श्रमणांची पुजा करतेस,
तु श्रमण बनणार, यात आता काहीही संदेह नाही....


तु नाना प्रकारची पक्वाने आणि द्रव्ये श्रमणांना दान करतेस... माझ्या प्रिय मुली, मि तुला विचारतो हे सर्व तु कशासाठी करतेस..?

ते श्रमण आळशी आहेत, ते कोणतेही श्रम न करता केवळ फुकटचे खातात. तरीसुद्धा त्यांचा एवढा आदरसत्कार का करतेस तु रोहीणी?रोहीणी म्हणाली,,

बाबा खुप वर्षांपुर्वी तुम्ही मला श्रमणांबद्दल प्रश्न विचारला होता, कि मी श्रमणांचा एवढा आदर सत्कार का करते.?


मी श्रमाणांच्या दुर दृष्टीला पुजते, त्यांच्यातील योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या सामर्थ्याला पुजते, त्यांच्या नीतियुक्त धर्माचरणाने, त्यांच्यातील नैतिकतेने, सद्गुणांनी, सदाचाराने, कर्तव्यपारायणतेने मी प्रभावित झाले. या सर्व गुणांची मी पुजा करते.


श्रमण हे आळशी नाहीत तर कष्टाळु आहेत.

ते उत्तम कार्य करतात. त्यांनी राग, लोभ, द्वेष, तृष्णा आदि गोष्टींचा त्याग केला आहे.
यामुळे मी श्रमणांचा आदरसत्कार करते.


ते वाईट विचारांपासुन मुक्त झाले आहेत, त्यांचे आचरण शुद्ध आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या वाईट विचारांचा त्याग केला आहे, त्यामुळेच मी श्रमणांचा आदर सत्कार करते.


त्यांच्या शारीरीक क्रिया किती शुद्ध आहेत, त्यांची वाणी किती शुद्ध आहे.. त्यांचे मन किती शुद्ध आहे. ते मोत्यांप्रमाणे निष्कलंक आहेत, त्यांचे गुण निर्दोष आहेत. त्यांची शिकवण उत्कृष्ट आहे, त्यांचा धम्ममार्ग उत्कृष्ट आहे, ते आम्हाला जीवनाचे ध्येय सांगतात, ते आर्य सदाचारी आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.ते धम्मामध्ये जगतात, ते धम्मामध्ये राहतात, त्या आर्यांचे मन एकरुप आहे, त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.


ते सावधतेने प्रवास करतात, श्रेष्ठ उपदेश करणारे, सत्य आणि असत्य यांच्यातील भेद जाणनारे ते आर्य दुःखमुक्त आहेत, आणि दुसऱ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत, म्हणुन मी त्यांचा आदर सत्कार करते.जेव्हा ते एखादा गाव सोडतात, त्यावेळी ते कशालाही मागे वळुन बघत नाही. किती चिंतामुक्त आहेत ते श्रमण.! यामुळे सुखी देवांचा मी आदर सत्कार करते.


ते कोठारात किंवा मडक्यात धान्य साठवुन ठेवत नाहीत, ते फक्त त्यांच्या पोटापुरतेच अन्न मागतात, यामुळे त्या आर्यांचा मी आदर सत्कार करते.


ते सोन्या चांदीची भेट स्वीकारत नाहीत, नाही कोणाकडे पैशांची मागणी करत. ते तृष्णामुक्त वर्तमानात जगतात, यामुळे त्या श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


ते वेगवेगळ्या कुटुंबातुन, वेगवेगळ्या जातीतुन, वेगवेगळ्या राष्ट्रांतुन संघात आले आहेत, परंतु तरीसुद्धा एकमेकांशी ते किती प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात, यामुळे त्यांच्यातील करूणेच्या नात्याला मी वंदन करते,, आणि त्या सदाचारी आर्य श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


रोहीणीचे वडील म्हणाले,,

रोहीणी बाळा, होय खरोखरचं... आमच्या सुखासाठी आणि हितासाठी तु आमच्या कुटुंबात जन्म घेतला आहेस. तु मला प्रभावित केलेस... माझ्या मनात भगवान बुद्धांबद्दल, त्यांच्या धम्माबद्दल आणि संघाबद्दल आदराची भावना वाढीला लावलीस त्याबद्दल तुझे खुप खुप आभार...


ते खऱ्या त्यागाचे मुर्तीमंत प्रतीक आहेत. ते दान देण्यास योग्य आहेत. हे श्रमण आम्ही भेट दिलेले दान स्वीकारतील,रोहीणी म्हणाली,,

जर आपण वेदनांना घाबरत असाल, तुम्हाला होणाऱ्या वेदना असहय्य झाल्या असतील. तेव्हा बुद्धाला शरण जा.. धम्माला शरण जा.. संघाला शरण जा.. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करा, जेव्हा तुम्ही श्रेष्ठ व सदाचारी पुरुष बनाल, तेव्हा संपुर्ण वेदनामुक्त आणि दुःखमुक्त व्हाल...


रोहीणीचे वडील म्हणाले,,


मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करतो.


पुर्वी मी एका ब्राह्मणाचा नातेवाईक होतो, आज स्वतः खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण बनलो..ज्याच्या ठाई पुर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवु लागतो, जो आपले पुर्वजीवन सद्गुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व जगाला प्रकाशीत करतो..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

वसल सुत्ताचा मराठी व इंग्रजी अनुवाद... (वृषल व्यक्तीचे गुण कोणते...?)

प्रस्तुत सुत्र हे सुत्तनिपातातील सातवे सुत्र आहे, यामधील गाथांद्वारे वृषल (नीच) व ब्राह्मण (विद्वान) कोणाला म्हणावे याबाबत भगवान बुद्ध आपले मत स्पष्ट करतात.

असे मी ऐकले आहे,,

एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडिकाच्या जेतवनात आराम करत असताना, एकदा भगवान सकाळच्या पहिल्या प्रहरी वस्त्रपरिधान करुन श्रावस्ती मध्ये भिक्षाटनासाठी गेले असता, त्यावेळी अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मणाने त्याच्या घरी अग्नी प्रज्वलीत केला होता. त्या यज्ञात विविध प्रकारच्या आहुती दिल्या जात होत्या. भगवान बुद्ध अनुक्रमे भारद्वाजाच्या घरी गेले असता तो भगवंतांना म्हणाला,, हे मुंडका, हे चांडाळा, तु तेथेच थांब... असे म्हटल्यावर भगवान म्हणाले,, हे ब्राह्मणा! निच कोण अथवा वृषल मनुष्याचे गुण कोणते..? किंवा मनुष्याला निच बनविणाऱ्या गोष्टी कोणत्या, हे तु जाणतोस काय.? नाही भगवान त्याविषयी मला काही माहिती नाही. आपण भगवंतांनी मला उपदेशना करावी, नीच कोण आहे, वृषल कोण आहे हे मला माहीत होईल.१. जो पुरुष दुसऱ्यांविषयी क्रोधी आहे. दुसर्याचा द्वेष करतो. पापी तसेच इर्षालु आहे. मिथ्यादृष्टीचा आणि धुर्त आहे — त्याला वृषल समजावे.


२. जो मनुष्य किंवा पशू योनीमध्ये असलेल्या प्राण्यांची किंवा पक्षांची हत्या करतो. ज्याला प्राणीमात्राविषयी दया येत नाही — त्याला वृषल समजावे.३. जो गावांआणि शहरांना लुटतो, मनुष्यांना धरतो आणि मारतो आणि अशा प्रकारे जो अत्याचाराच्या प्रति प्रसिद्ध होतो — त्याला वृषल समजावे.४. जो गावात आणि अरण्यात दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती हडपतो — त्याला वृषल समजावे.५. जो दुसऱ्याकडुन कर्ज घेतो आणि परत मागीतले असता, टाळाटाळ करतो — त्याला वृषल समजावे.६. जो दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तुकरीता रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला अडवुन मारुन घेतो — त्याला वृषल समजावे.७. जो आपल्यासाठी किंवा दुसऱ्याकरिता किंवा धन संपत्तीकरीता विचारले असता खोटी माहीती देतो — त्याला वृषल समजावे.८. जो बळजबरीने किंवा प्रेमाने भाऊबंदाच्या किंवा मित्रांच्या स्त्रीयांसोबत शारिरीक कामवासनेचे संबंध ठेवतो — त्याला वृषल समजावे.९. जो आई किंवा वडिलांचे म्हातारपणामध्ये सामर्थ्य असुन सुद्धा पालन पोषण करत नाही — त्याला वृषल समजावे.१०. जो आईवडीलांना, भावाला, बहिणीला मारतो, वाईट शब्दाने टोचुन बोलतो, त्यांचा राग करतो — त्याला वृषल समजावे.११. ज्याला फायद्याची गोष्ट विचारली तर अहिताची सांगतो. बरोबर सांगत नाही — त्याला वृषल समजावे.१२. जो पापकर्म करुन, लोकांनी मला जाणु नये अशी इच्छा करतो — त्याला वृषल समजावे.१३. जो दुसऱ्याच्या घरी जाऊन चांगले स्वादिष्ट भोजन घेतो, आणि आपल्या घरी परत आल्यावर त्यांचा सत्कार करीत नाही — त्याला वृषल समजावे.१४. जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला किंवा इतर कोणालाही खोटे बोलुन फसवितो — त्याला वृषल समजावे.१५. जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला भोजणाच्या वेळी आल्यावर क्रोधाने बोलतो — त्याला काहीच देत नाही, त्याला वृषल समजावे.१६. जो कोणी लाभाच्या अपेक्षेने, असत्य बोलतो — त्याला वृषल समजावे.१७. जो गर्विष्ठ, स्वतःवरच्या गर्वाने आंधळा झालेला असतो, आणि त्या अज्ञानानेच इतरांना हीन समजतो — त्याला वृषल समजावे.१८. जो स्वार्थी, कपटी, निर्लज्ज आणि क्रोधी आहे — त्याला वृषल समजावे.१९. जो कोणी सम्यक संबुद्धासोबत, त्याच्या शिष्यासोबत किंवा कोणत्याही गृहस्थासोबत बोलताना वाईट शब्द वापरेल — त्याला वृषल समजावे.२०. जो कोणी अरहंत - परिपुर्ण एक नाही, परंतु असे भासवतो तो विश्वातील सर्वात मोठा चोर आहे — त्याला वृषल समजावे.२१. जन्माने नीच होत नाही, जन्माने ब्राह्मण होत नाही,, कर्माने नीच होतो, आणि कर्मानेच ब्राह्मण होतो...


Thus have I heard:

On one occasion the Blessed One was living near Savatthi at Jetavana at Anathapindika's monastery. Then in the forenoon the Blessed One having dressed himself, took bowl and (double) robe, and entered the city of Savatthi for alms. Now at that time a fire was burning, and an offering was being prepared in the house of the brahman Aggikabharadvaja. Then the Blessed One, while on his alms round, came to the brahman's residence. The brahman seeing the Blessed One some way off, said this: "Stay there, you shaveling, stay there you wretched monk, stay there you outcast." When he spoke thus the Blessed One said to the brahman: "Do you know, brahman, who an outcast is and what the conditions are that make an outcast?" "No, indeed, Venerable Gotama, I do not know who an outcast is nor the conditions that make an outcast. It is good if Venerable Gotama were to explain the Dhamma to me so that I may know who an outcast is and what the conditions are that make an outcast."


"Listen then, brahman, and pay attention, I will speak."


"Yes, Venerable Sir," replied the brahman.
1. "Whosoever is angry, harbors hatred, and is reluctant to speak well of others (discredits the good of others), perverted in views, deceitful — know him as an outcast.2. "Whosoever in this world kills living beings, once born or twice born, in whom there is no sympathy for living beings — know him as an outcast.3. "Whosoever destroys and besieges villages and hamlets and becomes notorious as an oppressor — know him as an outcast.4. "Be it in the village, or in the forest, whosoever steals what belongs to others, what is not given to him — know him as an outcast.5. "Whosoever having actually incurred a debt runs away when he is pressed to pay, saying, 'I owe no debt to you' — know him as an outcast.6. "Whosoever coveting anything, kills a person going along the road, and grabs whatever that person has — know him as an outcast.7. "He who for his own sake or for the sake of others or for the sake of wealth, utters lies when questioned as a witness — know him as an outcast.8. "Whosoever by force or with consent associates with the wives of relatives or friends — know him as an outcast.9. "Whosoever being wealthy supports not his mother and father who have grown old — know him as an outcast.10. "Whosoever strikes and annoys by (harsh) speech, mother, father, brother, sister or mother-in-law or father-in-law — know him as an outcast.11. "Whosoever when questioned about what is good, says what is detrimental, and talks in an evasive manner- know him as an outcast.12. "Whosoever having committed an evil deed, wishes that it may not be known to others, and commits evil in secret — know him as an outcast.13. "Whosoever having gone to another's house, and partaken of choice food, does not honor that host by offering food when he repays the visit — know him as an outcast.14. "Whosoever deceives by uttering lies, a brahman or an ascetic, or any other mendicant — know him as an outcast.15. "Whosoever when a brahman or ascetic appears during mealtime angers him by harsh speech, and does not offer him (any alms) — know him as an outcast.16. "Whosoever in this world, shrouded in ignorance, speaks harsh words (asatam) or falsehood expecting to gain something — know him as an outcast.17. "Whosoever debased by his pride, exalts himself and belittles other — know him as an outcast.18. "Whosoever is given to anger, is miserly, has base desires, and is selfish, deceitful, shameless and fearless (in doing evil) — know him as an outcast.19. "Whosoever reviles the Enlightened One (the Buddha), or a disciple of the Buddha, recluse or a householder — know him as an outcast.20. "Whosoever not being an arahant, a Consummate One, pretends to be so, is a thief in the whole universe — he is the lowest of outcasts.21. "Not by birth is one an outcast; not by birth is one a brahman. By deed one becomes an outcast, by deed one becomes a brahman.सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...
Read :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग २ (ध्यान भावना)प्रश्न : बुद्धधम्मातील ध्यान भावना म्हणजे काय...?


उत्तर : भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे ध्यान भावना म्हणजे शांती होय. मनाला मुद्देसुद वळणावर आणुन ठेवणे म्हणजे ध्यान भावना होय. ध्यान भावना हा एक मार्ग आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवुन मनाची एकाग्रता वाढवितो. वाईट विचारापासुन शुद्धीकरण करण्याचा तो मार्ग होय. राग, लोभ, द्वेष, मत्सर, अज्ञान, ईत्यादी मारविचारांपासुन परावृत्त होण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे.Tप्रश्न : मनाला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता का आहे..?

उत्तर : भगवान बुद्धाच्या धम्माचे केंद्रबिंदु हे मानवाचे मन आहे. सर्व चांगल्या वाईट कार्य सुरुवातीला मनातुनच उत्पन्न होत असतात. मनच सर्व घटनांचे प्रमुख आहे, म्हणुन मन हे प्रथम प्रशिक्षित व शुद्ध असले पाहिजे. ध्यान भावना, मनाची शुद्धता बुद्धीसामर्थ्यासाठी आवश्यक आहे. जे ध्यान भावना करतात, त्यांना मनाच्या शुद्धतेविषयी लाभ प्राप्त होतात. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे गृहपाठ व अभ्यास करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची नितांत आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर ध्यान भावना हा सराव प्रत्येकाला त्याच्या जीवनात व कार्यात उपयुक्त आहे.प्रश्न : ध्यान भावना किती प्रकारची आहे..?


उत्तर : साधारणतः ध्यान भावनेचे दोन प्रकार आहेत. १. समाधी ध्यान भावना आणि २. विपश्यना ध्यान भावना.


समाधी : समाधी ध्यान भावनेचे उद्देश मन एका विशिष्ट बिंदुवर केंद्रित करण्यासाठी आहे. भगवान बुद्धांची प्रतीमा गोलाकार किंवा रंगीत तबकडीवर एका ठिकाणी मन केंद्रित करतात. ध्यान करणारा व्यक्ती वरीलपैकी एक घटक निवडुन त्यावर मन केंद्रित करतो. जोपर्यंत समोरील घटक बपल्याला स्पष्ट जाणतो तोपर्यंत मन त्या विशिष्ट बिंदुच्या ठिकाणी केंद्रित करावे व हळुहळु डोळे बंद करावे. मनात दुसरे कोणतेही विचार आणु नयेत. डोळे मिटुन असलेल्या अवस्थेत त्याच घटकावर मन केंद्रित ठेवावे. अशा प्रकारे मन तात्पुरते एकाग्र करता येते व राम्ग, चिंता, अस्वस्थता, अतितृष्णा, शंका ह्या बाबीचे तात्पुरत्या स्वरुपात दमन करता येते.


विपश्यना : विपश्यना म्हणजे सत्यास्वरुपात व पुर्णपणे परिश्रमपुर्वक, सर्व बाबींविषयी सुक्ष्मदृष्टी प्राप्त करणे होय. सर्व बाबींविषयी जाणीवपुर्वक आकलन, त्या वस्तु ज्या सत्यास्वरुपात आहेत त्याच स्थितीत जान ठेवणे म्हणजे विपश्यना होय. उदा. जेव्हा ध्यानभावना करणारा डोळे मिटुन ध्यान करतो तेव्हा तो श्वासोच्छवासाचे काळजीपुर्वक निरीक्षण करतो. तो आत जाताना व बाहेर येताना हळुहळु मनशांत व स्वच्छ बनते नंतर ध्यान भावना करणारा. आपल्या मनातील विचारांचे निरीक्षण करु लागतो, व भावनांविषयी स्वरुपाविषयी अनिच्च लक्षणाविषयी विचार करु लागतो. तो श्वास आत व श्वास बाहेर जाताना त्याचे निरीक्षण करतो. श्वासोच्छ्वासातील जढ उतार जाणतो. अशाप्रकारे जेव्हा ध्यान भावना करणारा मनाची नैसर्गीक अवस्था जाणतो तेव्हा त्याचे मन सर्व बाबीपासुन मुक्त व स्वतंत्र असते. हा विपश्यना करण्याचा योग्य मार्ग होय.


सध्या बरेच लोक श्वास आत जाणे व बाहेर येणे ह्या बाबी जाणतात म्हणजे परिपुर्ण विपश्यना ही अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही सामान्य तथा असामान्य कृतीसाठी एकाग्रता व बुद्धीसामर्थ्य आवश्यक आहे. ते विपश्यनेतुन प्राप्त होते. योग्य ध्यान भावनेसाठी अनुभवी चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते.प्रश्न : मनसामर्थ्य व एकाग्रते शिवाय जर काम केले तर काय परिणाम होतील..?


उत्तर : जर मनसामर्थ्या अभावी व एकाग्रतेशिवाय काम केले तर त्यातुन निश्चित स्वरुपाची प्राप्ती होणार नाही. उदा. एखाद्या विद्यार्थ्याने एकाग्रतेशिवाय व मनसामर्थ्या शिवाय अभ्यास केला तर त्याचे स्मरण पाहिजे त्या स्वरुपात होणार नाही. येथे अभ्यासासाठी एकाग्रतेची भुमीका अत्यंत महत्त्वाची आहे. आकलन व सुक्ष्मदृष्टी हे कोणतेही कामात उपयोगात येणारी साधने आहेत.प्रश्न : ध्यान भावनेचे फायदे कोणते...?


उत्तर : ध्यान भावनेचे अनेक फायदे आहेत. काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

मनाला शांती प्राप्त करण्यास मदत मिळते. ध्यान भावना मनाला बळकटी आणण्यासाठी मदत करते व मनाला समर्थ बनविते. दैनंदिन जीवनात आत्मविश्वासपुर्वक मन कोणत्याही प्रश्नावर व अडचणीवर मात करण्यासाठी समर्थ बनते. मनाचा मानसिक विभाग ध्यान भावनेतुन धारदार बनतो, दडपण, चिंता व उत्कंठा ह्यापासुन मुक्त होतो. ध्यान भावनेमुळे आपले शरीर व सुदृढ मन वाढीसाठी ध्यान भावनेची मदत होते. मन शुद्धीकरणासाठी ध्यान भावनेची मदत होते. ध्यान भावनेमुळे मनात करूणेची, शांतीची वाढ होते.


द्वेष, लोभ, उत्कट इच्छा, स्वार्थीपणा, मत्सर इत्यादी बाबींपासुन ध्यान भावना मनास परावृत्त करते. सामान्य जीवनासाठी व सांसारिक प्रयत्नासाठी ध्यान भावनेचे वरील फायदे आहेत. थोडक्यात ध्यान भावनेचे फायदे जाणुन घेण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण, आत्मविश्वास, सातत्य व नियमीत सराव हा आवश्यक आहे.

चांगले सराव प्राप्त मन शाश्वत आनंददायी असते आणि ते विश्वातील सर्वांसाठी चिरस्थायी शांती देणारे आहे.मंगल मैत्री.....

~ भंते डॉ. सी. फँनचँम


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...
Read Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

जयमंगल अष्टगाथा मधील पाचवी गाथा आपल्याला चिंचा नावाच्या स्त्री बद्दल माहीती सांगते,, या कथेत चिंचा नावाची स्त्री जैन तीर्थकांच्या सांगण्यावरुन भगवान बुद्धांवर अनैतिकतेचा आरोप करत असते.....
सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या.लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चरित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला. 


त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे. तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके.


जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.


एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....

स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!

जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.


नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.


चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले.


त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले.


अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,
कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे । सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।


ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)४. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)जयमंगल अष्टगाथामधील चौथी गाथा अंगुलीमालाच्या जीवनावर प्रकाश टाकते.... अंगुलीमाल नावाचा डाकु भगवान बुद्धाच्या प्रभावाने संघात सामील होतो... आणि अरहंत पदापर्यंत पोहोचतो...
उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावं तियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलान 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.
अंगुलीमालावर विजय

सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना,, एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न केला, कि आपण या वाटेने जाऊ नका पुढे अत्यंत क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमाल नावाचा हिंसाचारी दरोडेखोर रहातो. त्यामुळे त्या जंगलाजवळच्या गावातील लोकांनी आपल्या गावाचा त्याग करुन ते आता श्रावस्ती, साकेत आदी शहरात रहायला आले. तो त्याच्या दृष्टीस पडलेल्या कोणत्याही माणसाला जीवंतपणे जाऊ देत नाही. त्यावर भगवान बुद्ध म्हणत, अरे, पण तो सुद्धा माणुसच आहे ना? तो सध्या हिंसाचारी डाकु असला तरी भविष्यात एक चांगला पुरुष होणार नाही , असे कसे म्हणता येईल? असे बोलुन तथागत पुढे निघुन जात. तो एक राजमार्ग होता पुर्वी या मार्गाने अनेक लोक प्रवास करीत असत, परंतु अंगुलीमालामुळे त्या रस्त्याने कोणीच प्रवास करीत नव्हते. परंतु त्याच राजमार्गावर एक दृढ निश्चयी, मुखावर निर्भयता व अंतकरणातील करुणा मुखावरच दिसणारा तेजस्वी महमानव क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमालाच्या निवासस्थानाजवळ आला. तोच त्या महाकारुणीकाच्या पायाच्या आवाज त्याच्या कानी पडला. त्याने तिकडे बघितल्यावर त्याची दृष्टी भगवंतांवर पडली, विश्वातील सर्वश्रेष्ठ मानव रस्त्याने चालला होता. त्यांच्याकडे पाहुन अंगुलीमाल आश्चर्यचकीत झाला. त्याने असा दिव्य पुरुष कधीच बघितला नव्हता. त्याच्यावरुन नजर न हटावी, त्याच्याकडे पहातच रहावे असे अंगुलीमालाला वाटत होते. त्या महामानवाला पकडण्यासाठी अंगुलीमाल धावु लागला परंतु तो त्यांना पकडु शकत नव्हता.
तेव्हा तो बुद्धास म्हणाला, थांब श्रमणा थांब, त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, अंगुलीमाला मी तर केव्हाचाच स्थीर होऊन थांबलो आहे, तुच पळतो आहेस...


तेव्हा अंगुलीमाल स्वतःशीच म्हणाला हा श्रमण खोटे का बोलत आहे? मला कोणाची भिती आहे तर मी पळणार,, ज्याचे साधे नाव जरी ओठावर आले तरी सर्वांना थरकाप सुटतो, तो अंगुलीमाल पळत सुटणार असे तुला कसे वाटले? श्रमणा, आता मात्र तु खोटे बोलत आहेस, तु इतक्या जलद गतीने पळत आहेस मी घोड्याच्या गतीने तुझा पाठलाग करतो आहे तरी तु मला अजुनपर्यंत सापडला नाहीस..


श्रमण चालत असुन म्हणता मी थांबलो आहे, आणि मलाच थांबलेलो असता थांब म्हणता, श्रमण तुला ह्याचा अर्थ विचारतो, तु कसा थांबला आहेस आणि मी कसा थांबलो नाही.


भगवान म्हणाले,, मी सर्व प्राण्यांबद्दल हिंसा दंड भावना सोडुन दिल्यामुळे नेहमी करीता थांबलो आहे. तु मात्र प्राण्यांबद्दल असंयमी आहेस, म्हणुन मी थांबलेलो आहे, आणि तु थांबलेला नाहीस. तुझ्यातील साधुत्व अजुन मेलेले नाही, जर त्याला तु संधी देशील तर तुझ्यात बदल घडुन येतील.


भगवंतांच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावुन गेला होता.

अंगुलीमाल म्हणाला मी महर्षीची वंदना केली. चिरकाळानंतर श्रमणाचे महावनात आगमन झाले. आपण उपदेशिलेल्या धम्माचे श्रवण करुन त्या हजार पापाचा त्याग करुन मी त्याग करीन. असे म्हणत त्याने आपल्या गळ्यातील माळ व तलवार व धनुष्यबाण वगैरे फेकुन दिले आणि सुगताच्या पायाची वंदना केली. आणि प्रव्रज्जेची याचना केली.


देव व मनुष्यांचे शास्ता अशा महाकारुणीक भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला 'भिक्षु ये' असे म्हटले तेथेच त्याची उपसंपदा झाली. अशा प्रकारे महाहिंसक, महाक्रोधी अंगुलीमालास आपल्या अलौकीक ॠद्धीने जिंकले,.......
उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावंतियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)

जयमंगल अष्टगाथांमधील तिसरी गाथा आपल्याला भगवान बुद्धांनी नालागीरी हत्तीवर कशाप्रकारे विजय मिळविला याची कथा सांगीतली आहे....

नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...
देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ त्याच्यावर नेहमी जळत असे,,


एकदा जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तु मध्ये आले आणि शाक्यांना धम्मदेशना करु लागले, त्या देशनेने प्रभावित होऊन अनेक शाक्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश केला. त्यावेळेस देवदत्त ने सुद्धा भगवान बुद्धाच्या संघात प्रवेश केला. आणि फार थोड्या कालावधीतच त्याने असीम नैसर्गीक शक्ती मिळविल्या. तो आता ध्यान साधनेचा सराव करु लागला होता. पण तरी सुद्धा त्याच्या मनात बुद्धाच्या प्रती असलेला द्वेष कमी होत नव्हता.


एकदा तो राजा अजातशत्रुच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या शक्तीने राजाला प्रभावित केले. त्यामुळे अजातशत्रु देवदत्ताचा शिष्य बनला होता.


इकडे संघात,, आपण संघनायक बनलो पाहिजे यासाठी देवदत्त बुद्धासमोर नेहमीच बढाया मारायचा.


एकदा त्याने संघात मला मानाचे स्थान नाही असा बुद्धावर आणि संघावर आरोप केला. त्यानंतर तो मगध राष्ट्रांत आपला मित्र अजातशत्रुकडे मदतीसाठी गेला. (अजातशत्रु हा बिंबीसाराचा मुलगा होता,, आणि बिंबीसार हा बुद्धाच्या प्रमुख अनुयायांपैकी एक. अजातशत्रुने बिंबीसाराची हत्या केली होती. ) त्यामुळे अजातशत्रुने देवदत्ताला बुद्धाच्या विरोधात मदत करण्याची हमी दिली.


सर्वप्रथम अजातशत्रुने धनुर्विद्येत अतिशय पारंगत अशा सोळा धनुर्धरांची नियुक्ती बुद्धाची हत्या करण्यासाठी केली होती. परंतु भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्या धनुर्धरांचे ह्रदय परिवर्तन झाले.


या अपयशाने यापुढे देवदत्त स्वतः बुद्धाची हत्या करण्याचा प्रयत्न करु लागला. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या संघासोबत एका पर्वतशिखरा खालुन जात असताना. त्या पर्वतशिखराहुन एक मोठा दगड भगवान बुद्धांच्या दिशेने फेकला. परंतु तो दगड भगवान बुद्धांच्या समोर पडला आणि त्या दगडाचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायाला जखम झाली. देवदत्ताचा हा प्रयत्न फसला परंतु तरीही त्याने पराभव स्वीकारला नव्हता.


त्यानंतर तो एका नालागीरी नावाच्या हत्तीजवळ गेला, त्याने त्या हत्तीला दारु, आणि अन्य नशा येणारे पदार्थ खायला दिले, त्यामुळे तो हत्ती आपली शुद्ध हरवुन बसला होता. नशेच्या प्रभावामुळे नालागीरी आता अत्यंत क्रुर व भयानक बनला होता. वाटेत भेटेल त्याला पायाने चिरडत समोर तो चालला होता, लोक त्याच्या भितीमुळे सैरावैरा पळु लागले होते, संपुर्ण नगरीत त्याची दहशत माजली होती तरीसुद्धा अशा भयानक परिस्थीत भगवान बुद्ध आपल्या संघासोबत त्याच दिशेने चालले होते. तेव्हा एका स्त्रीने आपल्या बाळाला भगवान बुद्धांच्या पायाखाली आणुन ठेवले, तो नालागीरी हत्ती त्या बाळाला लाथ मारणार एवढ्यातच भगवान बुद्धांनी त्या हत्तीला स्पर्श केला आणि काय तो हत्ती शांत झाला आणि गुडघ्यावर बसला. तो आता भगवान बुद्धांचा मित्र बनला होता, सर्व नगरवासी भगवान बुद्धांचा हा पराक्रम बघत होते. भगवान बुद्धांनी त्या हत्तीला काही कोणत्या जादुई शक्तीने प्रभावित केले नव्हते तर भगवान बुद्धांकडे एक अलौकिक शक्ती होती त्यांच्या चेहऱ्यावार एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते, ज्याला बघुनच लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे....

नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)