शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

बुद्ध वंदना : मराठी

अरहंत सम्यक सम्बुद्ध भगवान अशा बुद्ध भगवंतास मी अभिवादन करतो.

त्या बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो.

सन्मार्गावर आरुढ झालेल्या भगवंतांच्या श्रावक संघास मी नमस्कार करतो.
त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.

त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.

त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.त्रिशरणमी बुद्धाला शरण जातो.

मी धमाला शरण जातो

मी संघाला शरण जातो.

दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.

दुसऱ्यांदा मी धमाला शरण जातो

दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.

तिसऱ्यांदा मी धमाला शरण जातो

तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.

पंचशील
मी जीवहिंसेपासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी चोरी करण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी कामवासनेच्या दुराचारापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी मद्य, तसेच इतर मादक पदार्थांच्या सेवनापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.

बुद्ध पुजा

वर्ण आणि गंध अशा गुणांनी युक्त पुष्पमालांनी
मी मुनिंद्राच्या श्रीपादकमलांची पुजा करतो


या कुसुमांनी मी बुद्धाची पुजा करतो.
 या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल.
 हे फुल ज्याप्रमाणे कोमेजुन जाते
त्याप्रमाणे माझे शरीर नाश पावणारे आहे.


अंधकाराचा नाश करणाऱ्या सर्वव्यापक प्रकाशमान
अशा या दीपाप्रमाणे विश्वातील अज्ञानरुपी अंधकाराचा
नाश करणाऱ्या त्रिलोकदिप सम्यक सम्बुद्धाची मी पुजा करतो.


सुगंधयुक्त शरीर आणि वदन व अनंतगुण सुगंधाने
परिपुर्ण अशा तथागतांची मी सुगंधाने पुजा करतो.


बुद्ध, धम्म, संघ लंका जम्बुद्वीप, नागलोक
आणि त्रिदशपुरांतील स्तुपांमधुन स्थापित
 बुद्ध शरीराचे अवशेष, धातु आहेत, सर्व दहा
दिशातील बुद्धांच्या केश, लोम आदी अवशेषांची
जितकी रुपे आहेत, त्या सर्वांना, सर्व बुद्ध, दशबलतनुज
 आणि बोधिचैत्य ह्या सर्वांना मी नमन करतो.सर्व ठिकाणी प्रतिष्ठित केलेल्या बुद्ध
शरीराच्या धातु अवशेषांना, महाबोधिवृक्ष
 व चैत्यांना मी वंदन करतो. कारण ही सदैव बुद्धाचीच रुपे आहेत...
बुद्ध वंदना
अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण) , सम्बुद्ध (जागृत) , विद्या व आचरण यांनी युक्त , सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे . असा लोकांना जाणणारा , सर्वश्रेष्ठ , दमनशील पुरुषांचा सारथि व आधार देणारे , देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.अशा या बुद्ध भगवन्ताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे ।।१।।मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांनाच मी सदैव वन्दन करतो ।।२।।मला दुसऱ्‍या कोणाचाही आधार नाही , केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे . ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ।।३।।बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वन्दन करतो . बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला क्षमा करो ।।४।।ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही . त्या (बुद्ध) रत्नाने माझे कल्याण होवो . (ज्ञान प्राप्त झालेल्या) ज्याने पुज्य बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला . अनन्त ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्व प्राप्त करुन घेतले . जो सर्व जगात श्रेष्ठ आहे . अशा बुद्धाला मी नमस्कार करतो ।।५।।

धम्म वंदना
भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला , ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते , जो धर्म आपले फळ ताबडतोप देतो , कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा , जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वता अनुभवून पहाता येतो , अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे . ।।१।।जो भूतकाळातील बुद्धां द्वारे उपदेशिला धम्म आहे जो भविष्यकाळात बुद्धा द्वारे उपदेशिला धम्म असेल , तसेच वर्तमान काळात बुद्धाद्वारे उपदेशिला धम्म आहे , त्या सर्व धम्माला मी सदैव वंदन करीतो . ।।२।।मी दुसऱ्‍या कोणाला शरण जाणार नाही . दुसऱ्‍या कोणाचा मी आधार घेणार नाही . बुद्ध धम्मच माझा एकमेल आधार आहे . ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो . ।।३।।सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करुन वन्दन करतो , धम्मा संबंधी माझ्या कडून काही दोष घडला असेल तर धम्म त्या बद्दल मला क्षमा करो ।।४।।
ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहेत , एकानेही बुद्धाच्या धम्माची बरोबरी केली नाही , ह्यामुळे माझे कल्याण होवो ।।५।।हा जो लोकांसाठी उपयुक्त , श्रेष्ठ अष्टांगीक मार्ग आहे , हा जो निर्वाण प्राप्तिसाठी सरळ मार्ग आहे जो सर्वश्रेष्ठ शान्तीदायक सधम्म आहे , मी त्या धम्माला वन्दन करतो ।।६।।

संघ वंदना
भगवन्ताचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरुढ आहे .भगवन्ताचा शिष्यसंघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे , हा संघ निमंत्रण देण्यास योग्य , स्वागत करण्यास योग्य , दक्षिणा देण्यास पात्र , तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे . असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे . मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे . ।।१।।
असा जो भूतकाळातील , भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे . त्या सर्वांना मी सदैव वन्दन करतो ।।२।।
मला दुसऱ्‍या कशाचाही आधार नाही . बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे , ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।३।।
तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो . संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो . ।।४।।
ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही . याच्यामुळे माझे कल्याण होवो . ।।५।।संघ विशुद्ध , श्रेष्ठ , दक्षिणा देण्यास योग्य , शान्त इन्द्रियांचा , सर्व प्रकारच्या अलिप्त , अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे . ह्या संघाला मी प्रणाम करतो .
त्रिरत्न वंदना
अनंत गुणांचे सागर अशा भगवान बुद्धाला मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.


भगवंताने उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.मुनिराज भगवान बुद्धच्या श्रावक संघाला मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.
संकल्प
मी ह्या धम्माचरणाने बुद्ध, धम्माचरणाने बुद्ध धम्म व संघाची पुजा करतो.


ह्या आचरणाने मला खचितच जन्म, जरा व मृत्य ह्यांपासुन मुक्ती मिळेल.


या पुण्याचरणाने निर्वाण प्राप्तीपर्यंत मला कधीही मुर्खांची संगत न घडो, सदैव सत्पुरुषांचाच सहवास घडो.


पिकांच्या वृद्धीकरिता वेळेवक़ पाऊस पडो, संसारातील प्राणीमात्राची वृद्धी होवो आणि शासनकर्ते धार्मिक होवोत.

धम्मध्वज वंदना
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।।वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।।वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।।वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्‍या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।।वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।।वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्‍या व सदैव मनोहर दिसणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।

विहार वंदना...

आम्ही हे क्षेत्र, त्रिरत्नास समर्पण करतो.


मानवाच्या संबोधीप्राप्तीचा आदर्श, अशा बुद्धास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


ज्या धम्ममार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत, त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो,


ज्यांचात परस्पर कल्याणमित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो, अशा संघास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत.


पंचशीलांच्या परिपालनासाठी, ध्यान-साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी, आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला,
तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले, तरी येथे मात्र आनंद नांदो.


पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचे पठण करुन नव्हे, किंवा पवित्र समजल्या जाणाऱ्या जलाचे सिंचन करुनही नव्हे. तर संबोधि प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनुन, आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.


या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती, परिशुद्धतेची कमलदले उमलोत.


या परिमंडला भोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रज्ञेचा वज्रतट उभा राहो.


या पवित्र क्षेत्राभोवती, संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत.


येथे बसुन, येथे आचरण करुन, आमची मने प्रबुद्ध बनोत. आमचे विचार धम्म बनो, आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनोत.


सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, काया, वाचा आणि मनाने आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो..
महामंगल सुत्त..
भगवान बुद्ध श्रावस्थी येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना,, एक देवता रात्र संपता, संपता आपल्या तेजाने सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवंताजवळ आली व भगवंताला वंदन करुन एका बाजुला उभी राहिली. आणी एक गाथा म्हटली..हे भगवान! स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देव आणी मणुष्यांनी मंगलाचा विचार करुनही ते त्यांना गवसले नाही. तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा


भगवान म्हणाले-


मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हेच उत्तम मंगल होय!!अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय!!अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, श्ष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हेच उत्तम मंगल होय!!आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे,हेच उत्तम मंगल होय!!दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर-
सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणेहेच उत्तम मंगल होय!!काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हेच उत्तम मंगल होय!!गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर
धर्मश्रवण करणे, हेच उत्तम मंगल होय!!क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक
चर्चा करणे,हेच उत्तम मंगल होय!!तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी
निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल होय!!ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...याप्रमाणे कार्य करुन जगात विजयी होऊन लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, हेच त्यांच्याकरीता उत्तम मंगल होय

करणीय सुत्तशांती पदाची प्राप्ती हिच्छिणाऱ्या , कल्याण साधनात प्रविण मनुष्यांनी प्रथम योग्य, ॠजु आणि अत्यंतु ॠअजु बनावे, त्याची वाणी मधुर, मृदु आणि विनीत असावीतो रंतोषी सहजासहजी जीवन चालवणारा आणि त्याची राहणी साधी असावी. तो इंद्रियाने शांत असावा. हुशार, प्रगल्भ आणि कुटुंबात अनासक्त असावा.जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत (अशी मैत्रीभावना करावी)जम असोत वा स्थावर, दीर्घ असोत वा महान मध्यम असोत वा ह्रस्व, लहान असोत वा मोठे, दृश्य असोत वा अदृश्य, दुर असोत वा जवळ, उत्पन्न झालेले असोत वा उत्पन्न न झालेले सर्व प्राणी सुखी असोत.कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवा विरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत.ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करावा.मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढवावा.उभे असता, बसले असता वा झोपले असता म्हणजे जोपर्यंत जागृत असेल, तोपर्यंत अशीच स्मृती ठेवावा, यालाच ब्रह्मविहार असे म्हणतात.असाच मनुष्य कधी मिथ्यादृष्टीत न पडता, शीलवाण होऊन, विशुद्ध दर्शनाने युक्त होऊन, कामतृष्णेचा नाश करुन गर्भशय्येतुन मुक्त होतो.

महामंङल गाथा
महाकारुणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्याच्या हितकरीता दहा पारमिता पुर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.शाक्य वंशाला आनंद देणाऱ्या भगवान बुद्धांनी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसुन मारेसेनेचा पराभव करुन विजय मिळवला, त्याचप्रमाणे तुमचे कल्याण होवो.राग, द्वेष व मोहादी विकारावर देव व मनुष्याच्या कल्याणासाठी बुद्धरत्न या उत्तम औषधाचे सत्कारपुर्वक ग्रहण करावे, जेणे करुन या तेजोमय बुद्धरत्नाच्या प्रभावाने तुमचे कल्याण होवो. आणि सर्व दुःख व उपद्रव नाश पावतील.चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम धर्मरत्न हे औषध आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्वभय शांत होवोत.आमंत्रण व पाहुणचार करण्यास पात्र असलेले संघरत्न हे उत्तम औषध आहे. अशा तेजोमय संघाच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्व उपद्रव व रोग नष्ट होवोत.विश्वात जी काही मौल्यवान रत्ने गणली जातातत्यात बुद्ध, धम्म व संघाची बरोबरी करणारे एकही अस्तित्वात नाही, ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.
बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याशिवाय अन्य दुसरे कोणतेही शरण-स्थान मला नाही. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.तुमचे सर्व भय, वैर, रोग नष्ट होवोत. सर्व विघ्नबंधन संपुन तुम्हाला सुख व दीर्घायुष्य प्राप्त होवो.सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने तुमचे मंगल होवो. सर्व देवता तुमचे रक्षण करोत आणि तुमचे कल्याण होवो.जे वाईट निमित्त, अपशकुन, अप्रिय शब्द, पापग्रह, वाईट स्वप्न, ते सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने नष्ट होवोत..
जयमंङगल अठ्ठगाथा
ज्या मुनींद्राने सुदृढ हत्यार धारण केलेल्या, सहस्रबाहु, गिरीमेख नावाच्या हत्तीवर आरूढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला व त्याच्या अफाट सेनेला आपल्या दान आदि धर्म बळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुक़ ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंअकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारझे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवादपरायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.ज्या मुनींद्राने, विविध महाॠद्धीसंपन्न, नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामोग्गलान शिष्या जडुन रिद्धि आणि उपदेशाच्या बलाने जिंकले, त्या तेजाने तुमचे कल्याण होवो...


ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्तिसंपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...
धम्मपालन गाथा
कोणतेही पाप न करणे, सद्धम्माचे पालन करणे, आणि आपल्या मनाला सन्मार्गावर लावणे हेच बुद्धाचे शासन आहे. सुचरित धम्माचे आचरण करावे, दुराचरणाचा त्याग करावा. धम्माचरण करणाऱ्यास, सर्व लोकांत सुखाचीच झोप लागते.साधु साधु साधु

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज३. Buddha Vandana : English

४ टिप्पण्या:

 1. खुप छान
  खुप छान
  अत्यंत सोप्या अशा मराठी भाषेत बुद्ध वंदना बौद्ध पुजा आपले खूप खूप अभिनंदन जय भीम

  उत्तर द्याहटवा
 2. प्रत्युत्तरे
  1. डॉ. प्रभात टंडन जी, मंगल मैत्री,, आपके अनुरोध पर हम ने बुद्ध वंदना का हिंदी अनुवाद पब्लिश किया है, इस लिंक पार आप जरूर पढ ले |

   http://buddhistsofindia.blogspot.in/2014/07/blog-post.html

   हटवा
 3. मराठी भाषेत बुद्ध वंदना बौद्ध पुजा आपले खूप खूप अभिनंदन जय भीम

  उत्तर द्याहटवा