मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन आणि निर्माण होणारे गैरसमज


इतिहासात डोकावुन बघितले तर असे आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळापासुन धर्माच्या विरोधकांनी बुद्ध, धम्म आणि संघाच्या बाबतीत अफवा पसरवायला सुरुवात केली होती. भगवान बुद्ध, धर्म आणि संघाबद्दल लोकांच्या मनात आकस निर्माण करण्यासाठी "जेणे करुन लोक बुद्ध, धर्म आणि संघाची निंदा करोत" या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवुन धर्माच्या विरोधकांनी लोकांची दिशाभुल करण्या करीता अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या, धर्माचा अपप्रचार केला.


पशू पेक्षाही रानटी जीवन जगणाऱ्या माणवाला मानवता शिकविणाऱ्या धर्ममार्गाला त्याच्याच मायदेशातुन हद्दपार करुन त्यांच्या अशा प्रयत्नामध्ये थोड्याफार प्रमाणात का म्हणता येईना पण ते यशस्वी झाले. शतकानुशतके आपल्या मातृभुमीपासुन दुर राहिलेल्या ह्या कल्याणकारी धर्माचे त्याच्या मायदेशात मोठ्या थाटामध्ये स्वागत झाले. परंपरेने चालत असलेल्या अपप्रचार अनेक माध्यमांद्वारे दुर होऊ लागले. असे असले तरी सुद्धा धर्माच्या संबंधी अपप्रचाराच्या द्वारे पेरण्यात आलेले अनेक चुकीचे समज आजही आपल्याला दिसुन येतात. एक धर्म अनुयायी म्हणुन अशा चुकीच्या प्रचारांना दुर करणे आपले एक कर्तव्य समजुन "भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन" या विषयावर एक लेख लिहित आहे. या लेखा द्वारे मिळणाऱ्या महत्वपुर्ण उपदेशाला ग्रहण करा....


भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन याबाबतीत प्रामुख्याने असे सांगीतले जाते की त्यांनी डुकरांचे मांस खाऊन आपली जीवनयात्रा संपविली. अलीकडेच काही बामसेफी विचारजंत असा प्रचार करताना आपल्याला दिसतात कि चुंद नावाच्या लोहाराने ब्राह्मणांच्या कडुन बुद्धांची हत्या करण्याची सुपारी घेतली होती. त्या अनुशंगाने त्याने अन्नामध्ये विष मिसळवुन ते अन्न भगवान बुद्धांना खायला दिले आणि अशा प्रकारे त्यांची हत्या केली गेली. माझ्यामते ही दोन्ही मते खोडसाळ आणि धर्म विरोधी आहेत...


त्यासाठी आपण पुढील गोष्टींचा विचार करु :

१. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्याचे 'चुंद' हे नाव डुकरांची कत्तल करणाऱ्या व्यक्तीच्या नावासोबत गोंधळात पडले. इथे लोक हे विसरतात की - तो डुकरांची कत्तल करुन त्यांचे मांस विकणारा 'चुंद' नावाचा व्यक्ती हा भगवान बुद्धांच्या महापरीनिर्वाणाच्या आधीच मरण पावलेला आहे.

२. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्यांचे नाव 'चुंद करमारपुत्र' होते, जो व्यवसायाने सोनार होता, दागीन्यांचा व्यापारी होता. कुशीनाऱ्याच्या वाटेवर पावा येथील ह्याच उपासकाच्या आरामांत भगवान बुद्धांनी रात्र घालविली.

३. तीन महिन्यांच्यापुर्वी भगवान बुद्धांनी सांगीतले होते कि येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला कुशीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण होणार आहे. कारण सहा महिन्यांपासुन भगवान बुद्धांचे प्रकृती खालाविली होती, पोटाच्या विकाराने ते अशक्त बनले होते. भगवान बुद्धांची बिघडलेल्या तब्येतीला पाहुन 'चुंद करमारपुत्त' ह्यांनी अतुल नावाच्या तत्कालीन प्रसीद्ध डॉक्टरांच्या सल्ल्याने एक औषधीयुक्त पदार्थ बनविला ज्यामध्ये स्वतः भगवान बुद्धांचा सुद्धा समावेश होता.

४. त्या औषधीयुक्त पदार्थाला पाली भाषेमध्ये 'सुकर मद्दव' असे म्हटले गेले. इथुनच सर्व गोची झाली.

५. सामान्यतः 'सुकर' या शब्दाचा अर्थ डुक्कर असा घेतला जातो. या शब्दसाधर्म्यामुळे धर्माच्या विरोधकांनी 'डुकराच्या भाजीची' दंतकथा रचली.


सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला जो पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे पचायला जड असल्यामुळे त्याला मांस खायला दिले जात नाही. दुसरीकडे उच्चवर्णीय भारतीय समाज (क्षत्रीय, ब्राह्मण, वैश्य) हे सर्व शाकाहारी होते. याच धर्तीवर निःशंक शाकाहारी असलेला 'चुंद करमारपुत्र' सारखा श्रीमंत व्यापारी मांस वाढणे शक्य नाही ते सुद्धा बुद्धांना जे त्यांच्या समाजात पाप समजले जाते.


नेपाळ आणि भारतातील गोरखपुर (पावा आणि कुशीनारा गोरखपुर जिल्ह्यामध्ये येतात) जिल्ह्यामध्ये राहणारे आत्तासुद्धा अशा अनेक प्रकारचे मश्रूम खातात.

१. सुकर मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही डुकरे चिखल करुन तिथे घाण करतात, अशा जमीनीवर जे मश्रूम उगविले जातात त्याला सुकर मद्दव असे म्हणतात.

त्याचप्रमाणे :

२. अजा मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही बकरे चिखल करुन घाण करतात आणि त्या जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना अजा मद्दव असे म्हणतात.


३. गोमद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर चिखल करुन गायी तिथे घाण करतात अशा जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना गोमद्दव असे म्हणतात.

४. बेलुवमद्दव : काही विशीष्ट मद्रव वेळु च्या झाडाखाली उगवतात त्यांना बेलुवमद्दव असे म्हणतात.


कुशीनाऱ्याचे आदरणीय महापंडीत अच्छुतानंद थेरो, बुद्धमित्त थेरो, काठमांडु चे अमृतानंद थेरो, लुंबीनी चे मैत्री थेरो आणि अनेकांच्या मते सुकर मद्दव हा अत्यंत पचनशील पदार्थ आहे जो पोटाच्या विकारग्रस्तांना दिला जातो. नेपाळ आणि परीसरात रुग्णांसाठी आजही औषधी म्हणुन ह्या पदार्थाचा वापर केला जातो.


सुकर मद्दव प्रमाणेच पोटाच्या विकारावर औषधीयुक्त असा पदार्थ अस्तित्वात आहे ज्याला सुकर बन असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये त्याला ‘Hog Mushrooms’ असे म्हणतात.


अशा प्रकारचे मद्रव अत्यंत दुर्मीळ आहेत. जे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, कमकुवत दृष्टी इत्यादी आजारांवर सहजपणे मात करु शकते.


वरील सर्व पुरावे आपल्याला सांगतात की भगवान बुद्धांनी आपल्या अंतीम जेवनामध्ये औषधीयुक्त सुकर मद्रवाचे सेवन केले होते., डुकराच्या मांसाचे नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या शेवटच्या जेवनामध्ये डुक्कराच्या मांसाचे सेवन केले नव्हते हा प्रश्न निकालात येतो.
तर जे कोणी बामसेफी विचारांचे लोकं हा प्रचार करतांना दिसतात की - चुंदाने ब्राह्मणांच्या सांगण्यावरुन बुद्धांची हत्या केली होती. त्यांचा हा अपप्रचार मला वरील प्रचारापेक्षा घातक वाटतो., माझ्यामते तर हा धर्मद्रोह आहे. अशा अपप्रचारकांनी सुद्धा लक्षात ठेवावे कि, स्वतः भगवान बुद्धांनी म्हटले आहे - ना कोणी मार किंवा ब्रह्मा, ना कोणी श्रमण किंवा ब्राह्मण, देवांच्या सहित मनुष्य सुद्धा बुद्धांची हत्या करु शकत नाही....

एवढेच नाही तर संबोधी प्राप्तीच्या वेळेस सुजाताने दिलेली खिर आणि चुंद कारमार पुत्र यांच्याद्वारे दिलेले सुकरमद्दव हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आहेत...

अशा अपप्रचारांना बळी पडलेले तसेच अपप्रचार करणारे या सर्व गोष्टींचा विचार करतील अशी आशा आहे....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...