शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

मनोगत : भगवान बुद्धांची धम्म देसना (पुस्तकाच्या निमित्ताने)

          तब्बल तीन वर्षापेक्षाही अधिक वर्षांच्या कालावधी नंतर हे पुस्तक आज सर्व सामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देतांना खरंच खूप आनंद होत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण प्रदर्शित करणारी बरीच पुस्तके आज अस्तित्वात आहेत. अगदी बुध्दकाळातील अनेक विद्वानांपासून ते पौर्वात्य आणि पाश्चात्य जगतातील अनेक विद्वानांनी बुध्द आणि धर्मावर बरेच लेखन केलेले आहे. पण ह्या महत्वाच्या पुस्तकांचे वाचन करून धर्माच्या साराला जाणता न आल्याने भगवान बुध्द आणि त्यांच्या धम्माच्या बाबत आजही अनेकांच्या मनात बरेच समज - गैरसमज आहेत. अनेकांना भगवान बुद्धांनी नेमके काय सांगितले, कशाचा उपदेश केला याची मुलभूत माहिती सुध्दा नाही. काहीन्च्यामते भगवानांनी केवळ आत्मा व ईश्वर यांच्या अस्तित्वाचा स्वीकार न करण्याचा उपदेश केला, तर काहींच्या मते त्यांनी जुनाट झालेल्या परंपरांचा त्याग करण्याचा उपदेश केला. पण वास्तवात त्यांचा धम्म विशुद्धीच्या मार्गाशिवाय अन्य काहीच वेगळे सांगत नाही.  पिटकांत व ८४,००० स्कंधांमध्ये विभागालेल्यां भगवानांच्या धम्म शिकवणीची आचार्य बुध्दघोषांनी "विशुद्धीमार्ग" ह्या ग्रंथात सुसूत्रपणे मांडणी केली, ज्यातून भगवान बुद्धांच्या धम्माचे शुध्द दर्शन आपल्याला होते व भगवान बुद्धांनी नेमके काय सांगितले त्याचे सार सुध्दा कळते. पण हे ग्रंथ वाचायला सुध्दा पूर्वतयारी असावी लागते, (कारण ह्या ग्रंथातील बऱ्याच गोष्टी सामान्यांना कळतीलच असे नाही.)


          सर्व सामान्यांना धम्माची मुलभूत माहिती व्हावी यासाठी मी काही वर्षांपूर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात लेलेली होती. पण त्या ब्लॉग लिखाणातून मीच बरेच काही शिकलो. यासाठी मला माझे मित्र विशाल वज्र यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनीच मला खरा धम्म शिकविला. मी स्वतःला पुण्यवान समजतो की, त्याच्या फळास्वरूप माझ्या जीवनात त्यांनी प्रवेश केला आणि मला खऱ्या अर्थाने धम्म समजाविला. त्यामुळे धम्माच्या बाबतीत मला ज्या काही नव्या गोष्टी माहित झाल्या आणि माझ्या विचारात ज्या प्रकारे परिवर्तन घडत गेले, त्या माझ्यासाठी केवळ माझ्या मनात साठवून ठेवणे अशक्य होते ते बाहेर पडावेत आणि लोकांनाही ते कळावेत यासाठी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. त्याला सुध्दा वाचकांचा फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्या लेखनाने माझ्या लेखन शैली मध्ये सुध्दा प्रगती होत गेली. आता वाचकांच्या द्वारे मागण्या वाढत गेल्यामुळे मी माझ्या संगणकामध्ये लेख लिहून ठेवायला सुरुवात केली होती. तेव्हा एकदा टाईप करीत असतांनाच मनामध्ये पुस्तक लिहिण्याचा विचार आला, पण ते पुस्तक प्रकाशित करून इतर कोणाला वाचण्यासाठी लिहिण्यापेक्षा माझ्यासाठीच जास्त असणार होते, हे मी जाणून होतो. निश्चितच हे पुस्तक लिहित असतांना मी वेगळाच जगात गेलो होतो. खरंतर पूर्वी न सांगितले गेलेले असे काहीही या पुस्तकामध्ये नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, धम्म शिकल्यावर माज्या मनामध्ये ज्या काही गोष्टी फिरत होत्या त्या सर्व मी या पुस्तकात जशाच्या तशा उतरविल्या. एका अर्थाने हे पुस्तक मी स्वतःसाठीच आणि माझ्यामध्ये निर्माण झालेल्या धार्मिक भावनेच्या वृद्धीसाठीच लिहिले आहे.

पुस्तकाचे कव्हर फोटो 


          भगवान बुद्धांनी उपदेश केलेला धम्म हे निसर्गाच्या प्रती तसेच आपल्या स्वतःच्या बाबतीत सत्य जाणण्याचे शिक्षण आहे. भगवान बुध्द हे आपले शिक्षक आहेत जे आपल्याला स्वठ्ला ओळखण्याचा मार्ग दाखवितात, तुमचे विचार कशा प्रकारचे असायला हवेत, तुमचे आचार, तुमची भाषा (इतरांशी बोलण्याची पध्दत) कशा प्रकारची असायला हवी याबाबतीत भगवान बुध्द आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, भगवान बुध्द आपल्याला सर्वोच्च प्रज्ञेच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात, ज्या प्रज्ञेच्या सहाय्याने विश्वातील .सर्व धर्माची (निसर्गाच्या नियमांची) अनुभूती करता येते. याद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या अंध विश्वासांपासून निवृत्त होतोत, त्याच्या सर्व मिथ्या मान्यता नष्ट होऊन त्याला सम्यक दृष्टीची प्राप्ती होते. परंतु मिथ्या दृष्टीमध्ये खितपत पडलेले जीव मात्र भगवान बुध्द, धम्म आणि संघ यांच्या साराला न जनता त्यांच्यां बाबतीत गैरसमज पसरविण्यातच धन्यता मानतात.


बुध्द, धम्म आणि संघाबद्दल समाजामध्ये बरेच समज - गैरसमज पसरविण्यात आले आहेत. इतिहासात डोकावून बघितले तर असे लक्षात येईल की, अगदी भगवान बुद्धांच्या काळापासूनच बुध्द, धम्म आणि संघाच्या विरोधकांनी त्यांच्याबद्दल सामाजात अफवा पसरवायला सुरुवात केली होती. बुध्द, धम्म आणि संघाच्या प्रती लोकांच्या मनात आकस निर्माण होवो, जेणेकरून लोक त्यांची निन्दाकारोत, ह्या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवून मिथ्या दृष्टीत खितपत पडलेल्या धर्माच्या विरोधकांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक प्रकारच्या अफवा पसरवून, धर्माचा अपप्रचार केला. भगवान बुध्द तसेच धर्माचे शुध्द स्वरूपात असे पर्यंत विरोधकांचे कार्य जास्त चालू शकले नाही. तेव्हा या धर्मालाच भारतातून हद्दपार करणे हे विरोधकांचे सर्वप्रथम ध्येय बनले. पशु पेक्षाहि रानटी जीवन जगणाऱ्या मानवाला मानवता शिकविणाऱ्या धम्म मार्गाला त्याच्याच मातृभूमीतून हद्दपार करून त्यांच्या अशा प्रयत्नामध्ये थोड्या फार प्रमाणात का होईना पण ते यशस्वी झाले. शतकानुशतके आपल्या मातृभूमीपासून दूर राहिलेल्या ह्या कल्याणकारी धर्माचे त्याच्याच मायदेशात मोठ्या थाटामध्ये स्वागत झाले. असे असले तरी धर्माच्या संबंधी पेरण्यात आलेले अनेक चुकीचे सामाज आजही समाजात ठाण मांडून बसलेले दिसून येतात. याबाबतीत सर्वात खेदजनक बाब म्हणजे, आज स्वतःला बुध्द आणि बाबासाहेबांचे अनुयायी समजणारे समाजातील आधुनिक समजले जाणारे लेखक हे शुध्द धर्माचा अभ्यास न करता त्यांच्या ठायी असलेल्या अर्धवट ज्ञानामुळे, तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे लिहिलेल्या लेखनाद्वारे समाजामध्ये इतर धम्म - संप्रदाय, व्यक्ती आणि समाजाच्या प्रती द्वेषाची भावना निर्माण करण्याचे पापकर्म करीत आहेत. जेव्हा भगवान बुद्द कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करायला सांगत नाहीत, तरआगी शत्रूवर सुध्दा प्रेम करायला शिकवितात, त्याच्या प्रती सुध्दा मंगल मैत्री आणि करुणेच्या भावानेनेच विहार करायला शिकवितात. अशा ह्या लेखक आणि संघटनांचे बौध्द बनण्याचे निकष सुध्दा शुध्द धर्माच्या विरोधीच असतात, त्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या लेखनापासून सावध रहायला हवे. कारण जे कोणत्याही जीवाचा, सामाजाचा द्वेश करायला शिकविते ती शिकवण बुद्धांची नव्हे, ते बुद्धांच्या शिकवणीच्याच विरोधी आहे. अशा लोकांमुळे भगवान बुध्द आणि धम्माच्या प्रती समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे.


          अशा ह्या चुकीच्या मान्यतामुळे जगामध्ये आज धम्म चार प्रकारच्या स्वरूपांमध्ये विभागाला आहे, ज्याचे विस्तृत वर्णन आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या पुस्तकामध्ये केले गेले आहे, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे :

 १. शुध्द धर्म : जो मनुष्याला निसर्गाच्या, सर्व विश्वाच्या आणि त्याच्या स्वठ्च्या प्रती असलेल्या सत्यांना जाणायला शिकवितो, तो कोणाशीही वैरभावनेने नाही तर मंगल मैत्री आणि करुणामय मनाने विहार करायला शिकवितो. जो सर्व जगाच्या कल्याणाचीच कामना करणारा धम्म आहे, त्या शुध्द धर्माचा भगवान बुद्धांनी स्वतः उपदेश केलेला आहे. दुर्दैवाने हा शुध्द धम्म जगामध्ये अत्यंत दुर्मिळ बनलेला आहे, कारण त्याच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण केलेले दिसून येते.

२. सांप्रदायिक बौध्द धर्म : प्रथमतः भगवान बुद्धांनी उपदेश केलेला धम्म हा कधीही सांप्रदायिक नव्हता, तो सर्वच जीवांसाठी आहे. पण आज तो धम्म एका संप्रदायाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, हे कटू सत्य आहे, आणि आपण त्याला नाकारू शकत नाही. भगवान बुद्धांच्या काळात धर्माचे स्वरूप अशा प्रकारचे नव्हते. त्यांच्या काळात विहारांमध्ये दररोज कमीत कमी आठ तास धर्माचे शिक्षण दिले जायचे, विहारांमधून सदाचारी, शीलवान आणि प्रज्ञावान जीव बाहेर पडत असत. पण या काळात मात्र विहारे एक भगवान बुद्धांच्या मूर्तीला दान देण्याचे तेसेच त्यांना स्वतःच्या कल्याणाकरिता आशीर्वाद मागण्याची साधने बनेलेली आहेत.

३. दार्शनिक तत्वज्ञान समजणे :  भगवान बुद्धांच्या धर्माच्या बदलेलेल्या स्वरूपांपैकी तिसरा प्रकार म्हणजे धर्माचा (निसर्गाच्या नियमांचा किंवा बुद्धांच्या शिकवणीचा) एखादे दार्शनिक तत्वज्ञान समजून केला जाणारा अभ्यास. आज जगातल्या अनेक विद्यापिठांमधून धम्माचा अभ्यास बौध्द तत्वज्ञान म्हणून अभ्यास केला जातो, ज्याद्वारे मिळणारी शिकवण केवळ पुस्तकातच राहते. वास्तवात बुद्धांच्या शिकवणीची व्यापकता म्हणजे हे ज्ञानाचे आणि प्रज्ञेचे एक स्वतंत आणि संपूर्ण विद्यापिठच आहे. बुद्धांच्या शिकवणीला केवळ एखादे दार्शनिक तत्वज्ञान समजून त्याचा अभ्यास करणे चुकीचे आहे, बुद्धांची शिकवण तुमच्या जीवनातील सर्व्वाच आव्हानांना पेलण्यास समर्थ आहे, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रश्नांना सोडविण्यास सक्षम आहे. बुद्धांची शिक्वान आपल्याला जीवनाच्या आणि सर्व विश्वाच्या अनंत रहस्यांना जाणण्यास मदत करते, त्यामुळे धर्माला केवळ एखादे तत्वज्ञान समाजाने चुकीचे आहे.

४. राजकीय बौध्द धर्म :  चौथा प्रकार हा अत्यंत विकृत आणि दुर्दैवी असा आहे. भवान बुद्धांनी सर्व जीवांच्या दुःखमुक्तीसाठी उपदेश केलेला हा मार्ग काही कट्टरपंथी लोकांचा कट्टर संप्रदायाच बनेलेला नाही तर अंतर्गत आणि बाह्य राजकारणासाठी सुध्दा त्याचा वापर होऊ लागलेला आहे. हि खरच दुर्दैवी गोष्ट आहे आहे, सर्व जीवांच्या दुःखमुक्तीसाठी सांगितलेल्या ह्या मार्गाचा वापर इतरांना दुख देण्यासच होऊ लागलेला आहे. धर्माचे अशा प्रकारे विकृतीकरण करणाऱ्या  - लोकांना त्याच्याशी वा त्या मार्गाशी काहीही देणे - घेणे नाही, त्यांना केवळ आपल्या वाईट आणि अधर्मी महत्वकांक्षेसाठी त्याचा वापर करायचा आहे, त्यासाठी ते बुध्द आणि धम्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करायला सुध्दा मागे पुढे पाहत नाहीत.


          आजच्या काळात आपल्या भारतात स्वतःला म्हणून मिरविणाऱ्या लोकांची काही कमी नाही, परंतु मूळ धम्माचे ज्ञान नसल्याने आणि धर्माची आवड नसल्या कारणाने सुध्दा आपल्याला देशात बौध्द (धार्मिक) संस्कृती वाढविता आली नाही, यामुळे लोक मूळ धर्माचा त्याग करून टोकाचे आस्तिक आणि टोकाचे नास्तिक बनत चालले आहेत. भगवानांनी शिकविलेल्या धर्माचे मूळ ज्ञान नसल्याने अनेक लोक अनैतिक बनत चालले आहे. समाजात कुसंस्कृतीचा उदय होत चालला आहे. अशा परिस्थितीत समाजात नितीमत्तेची बीजे रोवली जावीत, यासाठी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे खूप गरजेचे बनले आहे. पूर्वी मी सुध्दा एक टोकाचा नास्तिक होतो, धर्माला अगदी अफूची गोळीच समजायला लागलो होतो, दानाचे फळ नाही, चांगल्या - वाईट कर्मांचे फळ नाही, हे शरीर चार महाभूतांपासून बनलेले आहे, व्यक्ती मेल्यावर ते सर्व त्यांच्या महाभूतात विलीन होते ; अशा मताचा मी होतो. नास्तिक मताचा असल्याने मी अनेक संप्रदाय आणि त्यांच्या श्रद्धास्थानावर टीका करीत असे, या कारणाने इतरांची माने सुध्दा दुखविली जायची. अशा स्थितीत मला शुध्द धर्माचे दर्शन झाले. भगवान बुध्दांनी सांगितलेल्या पारंपारिक धर्माचा अभ्यास करायला मी सुरुवात केली आणि खरच एक विलक्षन सुखद अनुभव केला. संयुक्त निकायात एक उदान आले आहे, त्याप्रमाणे - मी माझ्या कानांनी सुर्योकुलोत्पन्न भगवान बुद्धांना सांगतांना ऐकले आहे की, निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग काय आहे. अशा प्रकारे विहार करीत असतांना जर पापी मार माझ्याजवळ आला तर मी असे काही करेन की तो माझ्या मार्गाला पाहू सुध्दा शकणार नाही.


          आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच सुख हवे आहे, सर्वांनाच शांती हवी आहे ; असा कोणीही नाही ज्याला शान्तता आणि सुख नको. परंतु भगवान बुध्दांनी उपदेश केलला मार्ग हा केवळ सांसारिक शांती प्राप्त करून घेण्याचा मार्ग नाही, जी स्वतःच अनित्य आहे. तर त्या लोकोत्तर निर्वाणाला प्राप्त करून घेण्याचा मार्ग आहे, जो सर्व सांसारिक बंधनांना नष्ट करतो. कारण संसारामध्ये शांती - अशांती आणि सुख - दुःख वेगवेगळ्या मार्गांनी येतच राहतात, तुमच्याकडे कितीही पैसा असल्याने तुम्ही अधिक सुखी होता असे नाही. मानवी जीवन हे लोकधर्मांनी प्रभावित होणारे आहे. त्या लोकधर्मावर विजय मिळविण्याचा मार्ग आपल्याला भगवान बुध्द सांगातात. अगदी संयुक्त निकायात उल्लेख केल्याप्रमाणे,

"जणू मोठे मोठे पर्वत सर्व बाजूंनी येत असावेत, दही दिशांना भरडत, अगदी त्याचप्रमाणे म्हातारपण आणि मरण सर्व जीवावर चढाई करून येत आहेत. स्वतःला कोणी काहीही म्हणवून घेवोत; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शुद्र ; कोणीही सुटणार नाही. सर्व समान रूपाने भरडले जात आहेत. येथे कशाचाही दरारा नाही, णा याला कोणत्या मंत्र -तंत्राने थांबविले जाऊ शकते, याला धनाने सुध्दा थांबविले जाऊ शकत नाही, म्हणून विद्वानांनी आपले कल्याण पाहून धर्माचा अभ्यास करावा, धर्माचे आचरण करावे. धर्माला धारण कारावे, नैतिकतेचे आचरण करावे. अशा प्रकारे आचरण करणारा सगळीकडे अगदी सुखाने विहार करतो."

          त्यासाठी सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाने धार्मिक बनणे गरजेचे आहे, कारण भगवान बुद्धांनी म्हटले आहे, "ज्याप्रमाणे अरण्यात पर्वत असावा आणि त्या पर्वातामुळे अरण्यातील वृक्ष वृद्धिंगत होत असतात, त्याचप्रमाणे जर कुटुंब प्रमुख सदाचारी आणि श्रध्दावान असेल तर त्याच्यामुळे कुटुंबातील इतर स्त्री - पुरुष सदाचारी बनतात. त्यांचे मित्र, नातेवाईक आणि आश्रयाने राहणारे जे लोक असतात, ते सर्व "विद्वान सदाचारी कुटुंब प्रमुखाचे" सदाचरण पाहून त्याचे अनुकरण करीत असतात, ते सुगती प्राप्त लोकांच्याच मार्गावरून चालून धर्माचे अनुसरण करून देवलोकात जन्म ग्रहण करीत असतात आणि तिथे सर्व कामनांच्या पूर्तीचा आनंद घेत प्रीतीपूर्वक विहार करीत असतात"

          संयुक्त निकायाच्या भिक्खुनी वग्गामध्ये एका भिक्खुनीने म्हटल्या प्रमाणे ह्या महान धर्माच्या प्रती मी बरेच काही सांगू शकेन, परंतु जोपर्यंत माझ्या बुद्धीची योग्यता आहे, तोपर्यंत ह्या धर्माचे सार सांगत आहे - "या जगात शरीर, वाणी आणि मनाने कोणतेही पाप न करणे कुशल कर्मांचे संपादन करणे, स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे हेच बुद्धाचे शासन आहे, हाच खरा धम्म आहे." ८४,००० स्कन्धामध्ये विभागलेली भगवान बुद्धांची शिकवण एका पुस्तकाद्वारे समजावून सांगणे अशक्य आहे, तरी या पुस्तकाद्वारे मी भगवान बुद्धांनी शिकविलेल्या धर्माची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे, "सर्व जगाला प्रकाशमान करणारे, श्रेष्ठ ध्यायाला पार करून, स्वतः अनुभव करून, साक्षात्कार करून सर्वांच्या आधी धर्माच्या गोष्टी सांगितल्या, अशा प्रकारचा धर्मोपदेश ऐकल्यावर धम्म जाणणाऱ्या मध्ये प्रमाद कसा येईल. म्हणून भगवानांच्या शासनात अप्रमत्त होऊन नम्रतापूर्ण अभ्यास करा." आपण सर्वांनी शुध्द आणि धार्मिक चित्ताने ह्या महत्वपूर्ण उपदेशाचे ग्रहण करावे...


                   - पियुष खोब्रागडे 




पुस्तकाचे नाव : भगवान बुद्धांची धम्मदेसना 
एकूण पृष्ठे : २२६
पुस्तकाची किंमत : १५०/-
लेखकाचे नाव : पियुष खोब्रागडेब्रम्हपुरी. ८०८०१८७१९६
प्रकाशक : संबोधी प्रकाशननागपूर..


सदर पुस्तक आपण सर्वांनी एकदा अवश्य वाचावे, आमच्याकडून घेतल्यास ते आपल्याला १५०/- ₹ मध्ये मिळेल. तसेच जर आपल्याला ते पुस्तक आवडले नाही तर आपले पैसे परत करण्याची लेखक हमी देतो. त्यासाठी आपण वर दिलेल्या लेखकाच्या मोबाईल नं वर संपर्क साधू शकता किंवा त्या संदर्भात ब्लॉगवर मेसेज पाठवू शकता.