गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...


शेकडो वर्षांपुर्वी या लोकात भविष्य काळातील बुद्ध अमरावती नावाच्या संपन्न शहरात जन्मला सुमेध असे त्याचे नाव होते. सुमेध हा अमरावती शहरातील एका श्रीमंत दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पालक हे पिढीजात श्रीमंत आणि सदाचारात शुद्ध होते.


सुमेध हा शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकाचे निधन झाले, त्यावेळेस तो सोळा वर्षांचा. वयात येईपर्यंत त्याच्या खजीनदाराने त्याच्या संपत्तीचे रक्षण केले.


जेव्हा त्याने पहिल्यांदा आपली संपत्ती बघितली तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, माझे पिता, माझे आजोबा, माझे पंजोबा आणि त्यांच्यापुर्वीच्या अनेक पिढ्या केवळ या संपत्तीची कमाई करु शकले, तिचे संवर्धन करु शकले परंतु मेल्यानंतर ते त्या संपत्तीला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकले नाही. हि सर्व संपत्ती मी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकणार काय..?


त्याचक्षणी त्याने यावर अतिशय खोल विचार केला. आणि त्याच्यात नवे चैतन्य संचारले. त्याने विचार केला कि जिथे उष्णता आहे तिथे शितलता नक्कीच आहे. त्याचप्रमाणे जिथे मरण आहे तिथे अमरता असायला हवी.


त्यानंतर त्याने आपल्या खजीन्याचे घर उघडले आणि आपली सर्व संपत्ती दान केली. आणि तो परिव्राजक बनला. केवळ सात दिवसांमध्येच त्याला श्रेष्ठ मानसीक शक्ती प्राप्त झाली....




भगवान दीपंकर बुद्धांचे आगमन



भगवान दीपंकर बुद्धांच्या आगमनाचा तो सोनेरी क्षण होता. शहरातील लोक बुद्धांच्या आगमनाची तयारी करत होते. रस्त्यांची सजावट दुरुस्ती चालली होती, सर्वजन भगवान दीपंकर बुद्धांची आतुरतेने वाट पाहत होते. श्रमण सुमेधाने बघितले कि नागरीक शहराच्या सजावटीमध्ये व्यस्त आहेत. हे सर्व पाहुन त्याला अश्चर्य वाटले. तो त्यांच्या जवळ आला आणि सुरु असलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगीतले कि आम्ही हे ऐकुन श्रमण सुमेधाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, बुद्ध हा शब्द ऐकणे खुप कठीण आणि दुर्मीळ आहे आणि बुद्धत्वाची प्राप्ती करणे अतिशय कठीण. श्रमण सुमेधाने विनंती केली कि मला सुद्धा तुमच्या या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊ द्या.


रस्ते दुरुस्तीचे आणि शहर सजावटीचे कार्य त्याला त्याच्या असामान्य कार्यक्षमतेने करावे लागणार होते. परंतु ते काम पुर्ण होण्यापुर्वीच भगवान दीपंकर बुद्धांचे त्यांच्या श्रावक संघासोबत शहरात आगमन झाले. भगवान बुद्धांच्या पवित्र पायांना धुळीने स्पर्श होऊ नये यासाठी श्रमण सुमेध एखाद्या पुलाप्रमाणे आडवा झाला.


भगवान बुद्धांची ती आर्य किर्ती पाहुन सुमेधला वाटले कि, माझी तर इच्छा आहे कि मी आजच अर्हंतपदाची प्राप्ती करावी. परंतु माझ्यासाठी चुकिच्या मार्गावर असलेल्यांना योग्य मार्गावर आणने हे सध्या योग्य नाही जेव्हा सर्व प्राण्यांचे जीवांचे संरक्षण करण्याची शक्ती माझ्याकडे आहे. मी भगवान दीपंकर बुद्धांप्रमाणे बुद्ध बनण्याचा प्रयत्न करेन..


त्यानंतर सुमेध म्हणाला,



• बुद्धो बोदेय्यम : मी चार आर्यसत्य जाणु शकेन जेणे करुन मी इतरांना त्यांच्याबद्दल सांगु शकेन.




• मुत्तो मोचेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाच्या बंधनातुन मुक्त झालो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या सर्व बंधनातुन मी सर्वांना मुक्त करेन.




•तिन्नो तरेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाचा अर्णव तरलो त्याचप्रमाणे इतरांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करेन..



त्या तेजस्वी सुमेधाला पाहुन भगवान दीपंकर बुद्ध म्हणाला, हा तरूण श्रमण आपल्या जीवाची पर्वा न करता पुलासारखा जमीनीवर लेटुन आहे, यात काही संशय नाही कि भविष्यामध्ये हा माझ्यासारखा सम्यक संबुद्ध बनेल.




भगवान बुद्धांच्या वाणीतुन हि गोष्ट कळताच नागरीकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सुमेधाचा आदर सत्कार केला.


भगवान बुद्ध त्याच्या अंगावर पाय ठेऊन समोर गेले नाही, भगवान बुद्धांप्रमाणेच त्याचा बाजुने समोर गेले. भगवान दीपंकर बुद्धांच्या या वक्तव्याचा श्रमण सुमेधाने अतिशय आदरपुर्वक स्वीकार केला. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला होता...


भगवान बुद्धांनी देव व मनुष्यांची एक परिषद बोलाविली ज्यामध्ये त्यांनी सांगीतले कि सुमेध हा बुद्धत्वाची प्राप्ती करणार. भगवान बुद्धांनी, अर्हंतांनी, देवांनी व मनुष्यांनी त्या सभेमध्ये सुमेधाला पुष्पगुच्छ भेट दिले आणि भगवान बुद्धांना त्याने नमस्कार केला आणि भगवान बुद्धांनी सुमेधाला दहा पारमितांची देशना केली.


त्या पुढीलप्रमाणे :



• दान
• शील
• नैष्कर्म
• विर्य
• क्षांती
• सत्य
• अधिष्ठान
• मैत्री
• उपेक्षा...


हे ऐकताच उपस्थीत सर्व जन उद्गारले साधू..! साधू..! साधू..!


बोधीसत्व बनल्यावर मनुष्य खालील व्याधींपासुन मुक्त होतो.


• आंधळेपणा
• बहिरेपणा
• वेडेपणा 
• मुकेपणा 
• लंगडे पणा
• तो रानटी राष्ट्रामध्ये जन्म घेत नाही.
• तो गुलामाच्या गर्भात जन्म घेत नाही.
• तो चुकिच्या श्रद्धांपासुन (अंधश्रद्धा) मुक्त होतो.
• तो पाच गुन्ह्यांपासुन मुक्त होतो. तो आपल्या माता पित्याचा आणि अर्हंताची हत्या करु शकत नाही. आणि बुद्धालाही कोणती हानी पोहोचवु शकत नाही. 
• तो कुष्ठरोगापासुन मुक्त होतो.. इत्यादी..


निरनिराळ्या बोधीसत्वांच्या काळात बोधीसत्वाने अनेक जन्म घेतले ते पुढीलप्रमाणे :

१. दीपंकर बुद्धां : सुमेध
२. कौण्डिण्य बुद्ध : विजितवी
३. मंगल बुद्ध : सुरुची
४. सुमन बुद्ध : अतुल
५. रेवत बुद्ध : अतिदेव
६. शोभीत बुद्ध : सुजाता
७. अनोमदस्सी बुद्ध : यक्ष
८. पदुम बुद्ध : सिंह
९. नारद बुद्ध : परिव्राजक
१०. पदुमुत्तरा बुद्ध : जटील
११. सुमेध बुद्ध : उत्तरा
१२. सुजाता बुद्ध : सम्राट
१३. पियदस्सी बुद्ध : कश्यप
१४. अत्तदस्से बुद्ध : सुशिम (परिव्राजक)
१५. धम्मदस्सी बुद्ध : शक्र (देवांचा राजा)
१६. सिद्धार्थ बुद्ध : मंगल (परिव्राजक)
१७. तिस्स बुद्ध : सुजीत (राजा)
१८. फुस्स बुद्ध : विजितवी (राजा)
१९. विपस्सी बुद्ध : ड्रॅगन
२०. सिखी बुद्ध : अरिंदम
२१. वेस्सभु बुद्ध : सुदर्शन (राजा)
२२. कुकुसंध बुद्ध : खेमा
२३. कोनागमन बुद्ध : पब्बत (राजा)
२४. काश्यप बुद्ध : ज्योतीपाल

खुप काळानंतर बोधीसत्वाने दहा पारमिता आचरणात आणल्या, आणि त्याने त्याचा शेवटचा जन्म शाक्य कुळातील राजा शुद्धोधनाची पत्नी महामाया हिच्या गर्भात घेतला, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला आणि सहा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर बुद्धत्त्वाची प्राप्ती करुन घेतली...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :


भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

वैशालीची आम्रपाली : नगरवधु ते अरहंत

आम्रपाली हि बुद्धाची समकालीन होती. तिचा जन्मानंतर ती वैशालीच्या आम्रवनातील एका आंब्याच्या झाडाखाली सापडली यावरुनच तिचे नाव आम्रपाली असे पडले. महानाम नावाच्या पहारेकऱ्याने आम्रपालीचे पालन पोषण केले.



आम्रपाली लहानपणापासुनच सौंदर्यवान होती.
जसे जसे तिचे वय वाढत गेले तसे तसे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत गेली. तिचे ते असामान्य सौंदर्य, लावण्य, भुरळ लावणारी मादकता, या सर्वांनी संपुर्ण वैशाली शहराला मोहीनी लावली होती. वैशाली हे लिच्छवींच्या राजधानीचे शहर होते.



आम्रपाली केवळ अकरा वर्षाचीच असताना राष्ट्रातील सर्वात सुंदर स्त्री असे घोषीत करण्यात आले होते. तिच्या सौंदर्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण होते. सौंदर्य, साहस, तेज इत्यादी गुणांचा तिच्यात समन्वय होता. वैशालीचे राजकुमार तिच्यावर मोहित झाले होते. सर्वच्या सर्वच तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक होती. वैशालीच्या कायद्यानुरार ती कोणाशीही लग्न करु शकत नव्हती. त्यामुळे तिला 'वैशालीची नगरवधू' घोषीत करण्यात आले. या घोषणेचा तिने खुप विरोध केला, त्याचा धिक्कार केला.....




भगवान बुद्धांसोबत भेट....



एकदा भगवान बुद्ध वैशाली मध्ये विहार करीत आहेत, हे वर्तमान कळताच ती भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला जेवनाचे आमंत्रण दिले आणि तथागतांनी ते स्वीकारले. हे ऐकुन ती आनंदाने तिथुन निघुन गेली वाटेत तिला लिच्छवी भेटले. त्यांनी आम्रपालीला याबद्दल विचारले असता ति म्हणाली, 'उद्या माझ्याकडे भगवान बुद्ध भिक्खुसंघा सोबत जेवन करण्यासाठी येत आहेत. हे ऐकुन राजकुमारांना सुद्धा आश्चर्य वाटले. ते म्हणाले, भगवंताचा भोजनाचा कार्यक्रम तुझ्या ऐवजी आमच्याकडे ठेव त्याच्या बदल्यात मी तुला एक लाह सुवर्ण मुद्रा देतो.





त्यावर आम्रपाली म्हणाली., हे आर्यपुत्रांनो..! तुम्ही मला या मोबदल्यात पुर्ण वैशालीचे राज्य दिले तरी या जेवनाचे यजमानपद मी तुम्हाला देणार नाही... यावरुन आम्रपालीची श्रद्धा दिसुन येते.



या मंगल प्रसंगी धम्मदेशना करताना भगवान म्हणाले,, सर्व प्राणिमात्रां विषयी मैत्री भाव ठेवणे, करूणेची भावना ठेवणे व जगातील सर्व प्राण्यांप्रती समता बाळगणे हाच खरा धर्म आहे....



भगवान बुद्धांनी आम्रपालीला अनित्यवादाचा उपदेश देताना सांगीतले,, हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौति व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.


या बहुमोल उपदेशाचा आम्रपालीच्या मनावर अतिशय खोलवर परीणाम झाला व तिच्या मनात भगवंताच्या धम्माविषयी खुप श्रद्धा निर्माण झाली व तिने त्यांच्या हस्ते परिव्रज्या धारण केली व ती भिक्खुणी संघात सामील झाली....



तिने आत्मचिंतन केल्यावर तिला समजले कि, आपले सौंदर्य, लावण, तारुण्य हे अस्थाई आहे, माझे शरीर दुर्गंधीचे केंद्र आहे. हे सौंदर्य नश्वर आहे, ते नष्ट होऊन वार्धक्य येणार आहे व शेवटी हे शरीर नष्ट होणार आहे...



या अनित्याच्या मुद्यावर ती थेरीगाथे मध्ये लिहिते... मी (पियुष खोब्रागडे) भाषांतरीत केलेल्या आम्रपालीच्या गाथा पुढीलप्रमाणे :



१. माझे केस काळे होते, अगदी मधमाशांच्या रंगाप्रमाणे, टोकावरुन निमुळते असे माझे केस वयानुसार तंतु देणाऱ्या वनस्पती प्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


२. आल्हाददायक, सुवासीक फुलांनी भरलेल्या टोपलीतुन वयानुसार (कालांतराने त्यामधुन) प्राण्यांच्या अंगावरील लोकरीप्रमाणे दुर्गंध येऊ लागला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


३. घनदाट आणि समृद्ध अशी वृक्षवाटिका, भव्य आणि उत्कृष्ट योजनेनी आखलेली अगदी मधाच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे ; वयानुसार (कालांतराने) असमृद्ध आणि विरळ बनला परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


४. सोन्याच्या दागिन्यांनी अलंकार करुन उत्कृष्ट दागिन्यांनी सजविलेली वेणी, वयानुसार तेथे टक्कल पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


५. अगदी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे उत्कृष्ट अशा माझ्या भुवया अतिशय सुंदर होत्या. वयानुसार त्या खचक्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


६. तेजस्वी, उज्वल आणि प्रखर रत्नाप्रमाणे माझे डोळे होते, वयानुसार ते तेजस्वी राहिले नाही ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


७. नाजुक शिखराप्रमाणे माझे नाजुक नाक अतिशय सुंदर आणि युवांमध्ये उत्कृष्ट होते. वयानुसार ते लांब मिरीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


८. अतिशय लोकप्रिय आणि अद्ययावत पद्धतीच्क्षा कंगणाप्रमाणे माझे कान अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते खाली खचले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


९. कळ्यांच्या शुभ्र रंगाप्रमाणे माझे दात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते पिवळसर पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


१०. घनदाट अरण्यातील कोकीळ पक्ष्याप्रमाणे माझ्या आवाजाचा स्वर होतो, वयानुसार तो बिघडला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


११. गुळगुळीत - शंखाप्रमाणे निर्दोष अशी माझी मान उत्कृष्ट होती, वयानुसार ती भ्रष्ट झाली ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१२. दरवाज्याच्या गोलाकार दांड्याप्रामाणे माझ्या दोन्ही भूजा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार त्या पाटली वृक्षाप्रमाणे वाळल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१३. सोन्याच्या अलंकाराने सजवलेले आणि अंगठी घातलेले माझे नाजुक हात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते कांद्याप्रमाणे बनले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१४. विस्तारलेले, गोलाकार, टणक, कणखर आणि उंच असे माझे दोन्ही स्तन एकेकाळी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, म्हातारपणाच्या अनावृष्टीमुळे रिकाम्या अशा जुन्या पाण्याच्या पिशव्याप्रमाणे लटकत आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१५. सोन्याच्या पत्र्याप्रमाणे असे (तेजस्वी) चकचकीत, सुंदर आणि उत्कृष्ट असे माझे शरीर, वयानुसार सुरकुत्यांनी झाकाळले गेले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१६. हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत मऊ व गुळगुळीत अशा माझ्या दोन्ही मांड्या अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार ते वेळूप्रमाणे झाले आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१७. सोन्याच्या अलंकाराने सजविलेले, सोन्याची साखळी घातलेले माझे नाजुक सांध अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते शिसमच्या काडीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१८. जणुकाही मऊ कापसाने बनलेल्याप्रमाणे माझी पाय अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार त्यात शुष्क होऊन भेगा पडल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....


१९. असे हे शरीर प्रत्यक्ष कचऱ्याचे ढीग होते :

घराच्या (शरीराच्या) बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट झाले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....


भगवान बुद्धांच्या धर्मावर श्रद्धा ठेऊन त्यानुसार आचरण केल्यामुळे आम्रपाली बुद्धांच्या धर्मात आणि बौद्ध इतिहासात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले... नगरवधू पासुन तिने अरहंतपद प्राप्त करुन घेतले...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

धम्म परिषदा सामाजीक भान हरविलेल्या आहेत का.....? (भाग - १ : वर्तमान पत्रातील लेखाला उत्तर )

दिनांक १०-१-२०१३ च्या दैनिक लोकमतच्या संपादकीय मध्ये आंबेडकरवादी विचारवंत बी. व्ही. जोंधळे यांनी लिहिलेला 'सामाजीक भान हरवलेल्या धम्म परिषदा' या सदराखाली एक लेख प्रकाशीत झाला, जो मला मुळीच पटला त्यावर माझी प्रतिक्रिया म्हणुन हा लेख लिहितो.


सदर लेखात लेखकाने मांडलेल्या मुद्यांवर प्रकाश टाकणारा (नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा.... ) माझा हा लेख काही दिवसांपुर्वीच इंटरनेटवर प्रकाशीत केला, आपण सर्वांनी तो सर्वप्रथम वाचुन घ्यावा....


बुद्धाच्या धम्मामध्ये शीलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध उपासक होण्याच्या पुर्वी काया, वाचा व मनाने दहा पापांचा त्याग करायला सांगीतले आहे. त्यामधुन मानसीक पापे म्हणजे १. परद्रव्याबद्दल आसक्ती, २. क्रोध आणि ३. नास्तिकता....


याठिकाणी नास्तीकता म्हणजे ईश्वर व आत्मा न मानणे नव्हे, तर शील पालन करण्यात काही अर्थ नाही, दान करण्यात काही अर्थ नाही, समाधीपासुन काही लाभ नाही असे ज्यांचे विचार आहेत ते नास्तिक... सदर लेखक भगवान बुद्धांच्या धर्मानुसार नास्तिकात मोडतो त्यांची बुद्धाच्या धर्मावर श्रद्धा नाही..... ते म्हणतात बुद्ध वंदना करणे हा बाबासाहेबांचा बौद्ध धर्म सांगत नाही..


मला वाटते लेखकांना माहीत नसावे कि श्रिलंकेत जाऊन सर्वप्रथम भारतीय बौद्धजन समितीच्या प्रकाशनाखाली बाबासाहेबांनी 'बौद्ध पुजा पाठ' नावाचे पुस्तक लिहिले...



प्रस्तावनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,, बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दल लोकांमध्ये ज्या दिवसापासुन आतुरतात उत्पन्न झाली आहे त्या दिवसापासुन बौद्ध धर्म म्हणजे काय व त्याचे वाङ्मय काय आहे..? या संबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय कुतुहल दिसुन येते.


काही वर्ग कुतुहलाच्या मर्यादेपलिकडे गेलेले दिसतात. त्यांना बौद्ध धर्मात पुजापाठ कशाप्रकारे होते, हे जाणून घेण्याचे एक वेडच लागले आहे. आम्हाला बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो, यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा सारखा तगादा लागुन राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थेमुळे त्यांची जिज्ञासा पुर्ण करणे आतापर्यंत मला शक्य झाले नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजा पद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाहीत. त्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळु शकतात.


१९५० साली मी सिलोनला गेलो असताना त्या काळात याच विषयावर भर देऊन या गाथा मी संग्रहित केल्या व माझे मित्र गुणतिलके यांना गावयास लावुन त्याचे रेकॉर्ड बनवले. येथे आल्यानंतर काही बौद्ध भिक्षुंच्या सहाय्याने या गाथांमध्ये भर टाकली. आज बहुतेक सर्व गाथा समजण्यास सुलभ जाव्या म्हणुन पाली गाथेचे मराठी भाषांतर एका बाजुस दिले आहे.....



- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 
दि. २४-०२-१९५६
२६, अलिपुर रोड, 
सिव्हील लाईन्स, दिल्ली






जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध पुजा पाठ नावाचे पुस्तक लिहिले तेव्हा, बाबासाहेबांचा बौद्ध धर्म बुद्ध वंदना सांगत नाही या दाव्याला काय आधार उरतो.....?


लेखक हे बौद्ध धर्मीय नसल्याने ते आपल्या धार्मिक जीवनामध्ये बुद्ध वंदनेचे काय महत्त्व असते ते समजु शकत नाही. त्यांच्या मते बुद्धाचा धर्म म्हणजे केवळ क्रांती, मग ती कोणत्याही मार्गाने का असेना...? लेखक म्हणतो त्रिशरण, पंचशील, बुद्धाचा अष्टांगिक मार्ग सर्व थोतांड आहे. लोक क्रांतीकारक बुद्ध विसरुन या सर्व कर्मकांडाच्या नादाला लागले आहेत हे कटु वास्तव आहे.


बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील, आर्य अष्टांगीक मार्ग, इत्यादी यांना नाकारले नाही तर हाच खरा बौद्ध जीवन मार्ग आहे असे बाबासाहेब म्हणतात.



जर प्रत्येकाने आर्य अष्टांगीक मार्गाचा अवलंब केला तर एक माणुस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दुर होईल. 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...




लेखक पुढे म्हणतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध धम्माने आत्मा, पुनर्जन्म नाकारला परंतु बौद्ध भिक्खु परित्राण पाठ (ज्याला लेखक मृतात्म्यांच्या नावे पितर घालण्याची प्रथा म्हणतो) यासारखे थोतांडी काम करुन घेत असतात.


आतातर हा लेखक मला मुळीच आंबेडकरवादी वाटत नाही जो खरा बौद्ध बनु शकला नाही, ज्याला बुद्धाचा धर्म काय तो कळलाच नाही. डॉ. बाबासाहेबांनी आत्मा नाकारला बरोबर आहे, पण भगवान गौतम बुद्धांनी तरी कोठे आत्म्याचा स्वीकार केला हे लेखकाने दाखवुन द्यावे. अनात्मवाद तर बौद्ध धर्माच्या मुळ शिकवणीपैकीच एक आहे. कोण म्हणते बाबासाहेबांनी पुनर्जन्म नाकारला...? बाबासाहेबांनी पुनर्जन्माचा स्वीकार केला आहे फक्त त्याला लागुन असलेला कर्मसिद्धांत त्यांना ब्राह्मणी कर्मसिद्धांता सारखा वाटला. (जो ब्राह्मणी कर्मसिद्धांता सारखा वाटत असला तरी त्यापेक्षा खुप वेगळा आहे...) त्याबाबत तुमची काहीही श्रद्धा वा मान्यता असो, परंतु त्यामुळे त्याने तुमच्या धार्मिक जीवनावर काहीही फरक पडणार नाही, कारण बुद्ध वंदना म्हणजे आत्म्याच्या शांतीसाठी केले जाणारे कर्मकांड नव्हे तर भगवान बुद्धांच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा वाढावी, आपल्या मनाला शांती मिळावी यासाठी केले जाणारे शरण होय... बुद्ध वंदना म्हणजे ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी केली जाणारी आरती नव्हे. (अधिक माहीती साठी वाचा : बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज )


या लेखकाने बौद्ध भिक्खुंची तुलना एखाद्या भोंदु बाबांसोबत केली आहे. बुद्ध वंदनेला कर्मकांड म्हटले आहे. या लेखकाने अशा सर्व टिका करण्यापुर्वी एखाद्या सुज्ञ व्यकीशी याबाबत चर्चा करायला हवी होती असे मला वाटते... अहो हि कर्मकांड नव्हेत, हिंदु धर्मातल्या कर्मकांडामध्ये आणि बुद्ध वंदनेमध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे....



आता लेखकाने भगवान बुद्धांवर त्यांच्या धर्मावर आणि संघावर केलेल्या आरोपाचे सरळपणे उत्तर देतो.... मी तुम्हाला संदर्भ देतो तुम्ही वाचा आणि योग्य काय तेच ठरवा....



लेखक : बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील, आर्य अष्टांगीक मार्ग, दान पारमिता वगैरे गोष्टी थोतांड कर्मकांड म्हणुन नाकारल्या..




उत्तर : वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बौद्ध पूजा पाठ वाचा (प्रकाशक : भारतीय बौद्धजन समीती), The Buddha & His Dhamma Book II, Section 4-6





लेखक : डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध धर्माने आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला..





उत्तर : जगातला कोणता बौद्ध धर्म आत्मा स्वीकारतो ते लेखकाने आधी सांगावे. पुनर्जन्म बाबासाहेबांनाही मान्य होता, वाचा : The Buddha & His Dhamma (Book IV, Section 2)






लेखक : परित्राण पाठ म्हणजे कर्मकांड, बौद्ध भिक्खु म्हणजे भोंदु बाबा...











लेखक : बुद्धांनी दुःख दुर झाले पाहिजे, म्हणजेच समाजाचे ऐहिक प्रश्न सुटले पाहिजेत बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गा सारख्या कर्मकांडात पडु नये...






उत्तर : मनुष्य ऐहिक प्रश्नाच्या बंधनातुन मुक्त व्हावा म्हणजेच तो दुःखमुक्त व्हावा असा भगवान बुद्धांच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे.


उदा : खुद्यकनिकायाच्या सुत्त निपात ग्रंथातील धनीय सुत्तामध्ये

पापी मार : पुत्रामुळे पुत्रवंताला आनंद होतो. तसेच गायीमुळे गवळी आनंदीत होतो. उपाधी हि मनुष्याच्या आनंदाचे कारण आहे, ज्याच्याकडे उपाधी नाही तो कधीच आनंदीत होत नाही.


भगवान म्हणाला : पुत्रामुळेच पुत्रवंताला दुःख होतो. तसेच गायीमुळे गवळयाला दुःख होतो. उपाधी हि मनुष्याच्या दुःखाचे कारण आहे. ज्याच्याकडे उपाधी नाही तो कधीच दुःखी होत नाही.


या उदाहरणावरुन भगवान बुद्धांचे दुःखासंबंधी खरे मत कळते.... आणि त्या दुःखातुन मुक्त होण्यासाठी भगवान बुद्ध आर्य अष्टांगिक मार्ग सांगतात...




लेखक : दर रविवारी बुद्ध विहारात जाऊ नये,





उत्तर : नवीन झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे कि त्यांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेले पाहिजे असे जर झाले नाही तर नवी बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजेत. विहारात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, थायलंड इत्यादी देशातील भिक्षुंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व भारतातील बौद्ध लोकांना मदत करावी.


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर




एकुणच काय तर हा स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणवणारा हा लेखक खरा आंबेडकर द्रोही विचारवंत वाटत आहे, ज्याला बुद्धाच्या धर्माबाबत कवडीचेही ज्ञान नाही आणि चालला आहे बुद्ध वंदनेला, आर्य अष्टांगिक मार्गाला कर्मकांडाचा मार्ग म्हणायला, बौद्ध भिक्खुंना भोंदु बाबा म्हणायला, बौद्ध धम्म परिषदांना सामाजीक भान हरविलेल्या म्हणायला.....





धम्म परिषदांचे कार्य उदात्त आहे...



धम्म परिषदांचे, धम्म प्रचार संघटनांचे कार्य महान आहे ते यांच्यासारख्यांना काय कळणार....? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दर एकाने, दर एकाला धम्म शिकवावा... तेव्हाच प्रत्येकाला बुद्धाचा धर्म समजेल.... भारत बुद्धमय करणे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते, त्याचा स्वप्न रथ ह्या धम्म परिषदा पुढे नेत आहेत याउलट धम्मावर श्रद्धा नसलेले तुमच्यासारखे नास्तिक सदाचाराची सीमा ओलांडुन दुष्कर्म करत आहेत. आणि त्यांच्या दुष्कर्मा मुळेच तो रथ मागे सरकत आहे.


धम्म प्रचार संघटना बिचाऱ्या खेड्यापाड्यात जाऊन धम्म परिषदा घेतात, लोकांना बुद्धाचा धम्म सांगतात, लोकांना सदाचाराचे जीवन कसे जगायचे ते सांगतात, डॉ. बाबासाहेबांचा धम्म रथ खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत....


मित्रहो असल्या लेखकांच्या लेखनाला बळी पडुन संभ्रमीत होऊ नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,,



• बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे शुद्ध आचरण करणारे पाचच अनुयायी मिळाले तरी पुष्कळ झाले.


• बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.


• माझा सर्व बौद्ध जनांना असा सल्ला आहे कि त्यांना जगात सन्मानाने जगावयाचे असेल तर बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा.


• भगवान बुद्धाने जगाला सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्त्व सांगितले असेल तर ते हे कि, मनाची स्वच्छता ठेवा. या द्येयाचे मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवाची सुद्धारणा होणार नाही. 


• बुद्धाच्या शिकवणीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व सामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील. बुद्ध धर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी समर्थ बनवणारा असाच धर्म आहे.
बुद्धाचा धम्म म्हणजे नैतिकतेशिवाय दुसरे काहीच नाही.


•बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.


• बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्यच होय. एवढी गोष्ट कोणत्याही देशातील लोकांनी लक्षात ठेवली म्हणजे पुरे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजे मानवसेवा करणे होय. हा विश्वास ठेवला म्हणजे कार्य यशस्वी होणार.


• माझे आयुष्य थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्याकडुन कदाचित पुर्ण झाली नसतील, पण मी निश्चय केला आहे. इतर कार्यातुन मी निवृत्त होणार आहे, मला आता बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे.  



- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...


बाबासाहेबांच्या ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार बौद्ध धम्म प्रचारक संघटना बौद्ध धम्म परिषदांच्या माध्यमातुन करतात आणि तुमच्यासारख्या आंबेडकरवादी (?) लेखकाला ती गोष्ट समजत नाही..


शेवटी एवढच म्हणेन ज्याला बुद्धाचा धर्म कळला नाही तो कसला आंबेडकरवादी...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See also :


नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

मूळ लेख इथे वाचा..

बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

बुधवार, ८ जानेवारी, २०१४

खरा ब्राह्मण कोण……?




आजकाल एखाद्या विशिष्ट जातीत, समाजात कोणी जन्म घेतला कि तो स्वतःला ब्राह्मण समजु लागतो, परंतु भगवान बुद्धांना त्यांचा हा अर्थ अभिप्रेत नव्हता... भगवान बुद्ध एखाद्याचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावरुन मानायचे जन्मावरुन नव्हे. यासाठी भगवान बुद्धांनी अश्वलायन ब्राह्मण कुमाराला अश्वलायन सुत्तामध्ये केलेला उपदेश, भारद्वाज ब्राह्मणाला वसल सुत्तामध्ये दिलेला उपदेश व आणखीही बरीच उदाहरणे देता येतील. परंतु या लेखामध्ये आपण धम्मपदातील सर्वात शेवटच्या ब्राह्मण वग्गाचा उपयोग संदर्भ म्हणुन घेऊया...


भगवान बुद्ध धम्मपदाच्या ब्राह्मण वग्गामध्ये ब्राह्मण कसा असावा..? कोणाला ब्राह्मण म्हणावे याबद्दल सांगतात परंतु काही अज्ञानी मात्र याकडे बोट दाखवुन म्हणतात कि बुद्ध ब्राह्मणांना किती धन्य मानायचा, ब्राह्मणांची किती स्तुती करायचा. असे बोलुन ते अज्ञानी आपण किती अज्ञानात आहोत याचा जणु पुरावाच देत असतात. परंतु त्यांच्या मुर्ख बडबडीकडे दुर्लक्ष करा, बौद्धांना धम्ममार्गावरुन हटविणे हेच त्यांचे ध्येय असते. अशा अज्ञानी लोकांना मी म्हणेन कि प्रत्येक गाथेतुन खरा अर्थ घ्यायला शिका.. ते आकलन करण्याची लायकी नसेल तर धम्मपदाच्या अट्ठकथा वाचा.... मी सुरुवातीलाच सांगीतल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे मानवाला त्याच्या कर्मानुसार लेखत असत जन्मानुसार नव्हे... बुद्ध ब्राह्मणावर कोपणाऱ्याचा धिक्कार करायचा...


अरे हो पण कोणते ब्राह्मण..? ब्राह्मण जात का...? नाही पुढील वर्गामध्ये सांगीतलेले गुण ज्याच्यामध्ये आहेत तोच खरा ब्राह्मण....

अशोक तपासे सरांनी अनुवादीत केलेला धम्मपदाचा ब्राह्मण वग्ग पुढील प्रमाणे :


ब्राह्मणवग्ग



• हे ब्राह्मणा.! स्त्रोत तोडुन टाक, प्रयत्नाने कामना दुर कर, भौतीकतेचा क्षय करुन अकृताचा जाणकार हो, ब्राह्मणा!

• जेव्हा ब्राह्मण दोन स्वभाव (चित्त संयम व विपश्यना) गुणात पारंगत होतो, त्या ज्ञानीची सर्व बंधने विनाशाकडे जातात.

• ज्याचा पार, अपार, पारापार असत नाही. जो निर्भय आहे, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो ध्यानी, निर्मळ, कृतकृत्य, स्त्रोतहीन आहे ज्याने उत्तम अर्थ प्राप्त केला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दिवसा सुर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो, सशस्त्र क्षत्रीय तळपतो, ध्यानमग्न ब्राह्मण तळपतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवसरात्र तळपत असतात.

• ज्याचे दुष्कर्म वाहुन गेले आहेत तो ब्राह्मण, ज्याचे आचरण सम्यक आहे तो श्रमण, ज्याचे चित्त-दोष दुर सारले आहेत तो प्रवज्जीत म्हणवीला जातो.

• ब्राह्मणावर प्रहार करु नये, ब्राह्मणांनी त्याच्यावर कोपु नये. ब्राह्मणांची हत्या करणाऱ्याचा धिक्कार, त्यापेक्षा त्याच्यावर कोपणाऱ्याचा धिक्कार.

• मनाला प्रिय असलेल्याचा निषेध, हि गोष्ट ब्राह्मणाला कमी श्रेष्ठ नाही, जसे मन हिंसा निवृत्त होते, तस तसे दुक्खाचे शमन होते.

• ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य केलेले नाही, या तिन्ही ठिकाणी जो संयमीत आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सम्यक संबुद्धाने उपदेशीलेला सिद्धांत ज्याच्याकडुन जाणुन घेतला त्याला तसाच दक्षतेने नमस्कार करावा.

• ना जटेने, ना गोत्राने, जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यता, सदाचार, शुचिता असतो तो ब्राह्मण.

• हे दुर्बुद्ध मानवा! या जटा कशाला? हे व्यघ्र वस्त्र कशाला? तु आतुन मळलेला आहेस. आणी बाहेरुन धुतो(गंगास्नान) आहेस.

• जो चिंध्या धारण केलेला जीव, ज्याच्या धमन्या दिसत आहेत, एकटा वनात ध्यानस्थ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ब्राह्मण मातेच्या योनीतुन उत्त्पन्न झालेला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. त्याला भो(सन्माननीय संबोध) सबोधतात. जो काहीही बाळगुण नाही काहीही घेत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सर्व बंधने तोडुन ज्याला चिंता वाटत नाही, ज्याने सर्व संगती विभक्त केले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दोऱ्या, पट्टे, साखळ्या तोडुन (गाडी जुंपतात ते) जु झिडकारुन जो बाधारहीत होऊन बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• शिव्या, दण्ड, बंधन यांना जो अदृष्टपणे (चांगुलपणाने) सहन करतो, क्षमा शक्ती हीच ज्याची प्रबळ सेना आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अक्रोधी, शिलवान, स्वल्प, जो संयमीत, अंतीम-शरीरी आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• कमळ पानावर जलबिंदु, वा सुईच्या टोकावर मोहोरी, तसा कामनांशी जो चिकटुन राहात नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो आपल्या दुःखाचा क्षय इथेच स्पष्ट जाणतो, जो भारमुक्त, बंधमुक्त आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गंभीर प्रज्ञ, सुजाण, मार्ग- अमार्गाचा सुज्ञ आहे ज्याला उत्तम अर्थ प्राप्त झालेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गृहस्थ, गृहहीन दोघांपासुन अलिप्त आहे, जो घरापासुन दुर निरिच्छ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चर अचर प्राण्यांना दंडापासुन अलिप्त असतो, जो ना मारतो ना घात करतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• विरोधकात अविरोधी, दण्डधारींमध्ये शांत, ग्रहणकर्त्यात अग्रहणकारी, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या चित्तातुन, मोह, द्वेष, मान, अहंकार, मत्सर निखळला आहे, जसे सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अप्रिय न बोलता, सत्य वचन बोलतो, ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• लांब वा आखुड, लहान वा मोठी, चांगली वा वाईट, जी जोवर कुणी दिलेली नाही, तोवर घेत नाही. (चोरी करत नाही) त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याला कुठेही कसलीच आशा असत नाही, जो निरिच्छ, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या मनात इतरांचा संशयाने काहीही निमीत्य असत नाही, ज्याला अगाध अमृताची प्राप्ती झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे सत्कर्म व दुष्कर्म दोहोंच्या इच्छा पार केल्या आहेत. जो शुद्ध व शोकरहीत आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चंद्रासारखा निर्मळ, स्वच्छ मनाचा आहे. ज्याचा मोह-भाव अतिक्षीण झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने हा धोकादायक दुर्गम संसार-मोह ओलांडला आहे. ध्यानधारणेत उत्तीर्ण. तृष्णेचा पार गेलेला नि:संशयी ज्याच्या निवृत्तीला कारण नाही. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो वासनांचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा वासना भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.


• जो तृष्णाचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा तृष्णा भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने मानवी संबंध सोडले आहेत, जो दिव्य संबंधांच्या पार गेलेला आहे, जो सर्व संबंधांपासुन परावृत्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो प्रीती आणी अप्रीती सोडुन शांत भावप्राप्त क्लेशहीन आहे. ज्या विराने सर्व लोकांना जिंकले त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणी अंत जाणतो, जो अनासक्त सन्मार्गावर आहे, सुज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याची गती देव, गंधर्व, मानव कुणीही जाणत नाही, ज्याचे स्त्रोत क्षीण झाले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे पुर्वी, आता, पुढेही काहीच नाही, जो काहीही बाळगुन नाही, काहीही घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो,

• जो प्रज्ञावंत आहे, ज्याला निर्वान पद प्राप्त झाले आहे. जो वृषभ, श्रेष्ठ, वीर, महर्षी, विजेता, तृष्णाहीन आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो पुर्व स्थान जाणतो, स्वर्ग व नरक पहातो, ज्याचे जीवन क्षीण झाले आहे, जो प्रज्ञावान मननी आहे, जो निर्वाण प्राप्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

ब्राह्मण वर्णाची थोरवी.. (अश्वलायन सुत्त...)

वसल सुत्त


रविवार, ५ जानेवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ होय....)

भगवान बुद्धांचा यज्ञसंस्थेला असलेला विरोध जगजाहीर आहे. प्राचीन काळी वैदिक लोक ईश्वराला व देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये अनेक प्राण्यांची आहुती द्यावी लागत असे, अशा प्रकारच्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता, परंतु ज्या यज्ञामध्ये हिंसा होत नाही अशा प्रकारच्या अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध नव्हता व अशा प्रकारचे यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांचा हा समज अगदी चुकीचा आहे.




१. हिंसक यज्ञ : हिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य नव्हते, प्राण्यांची आहुती देऊन केल्या जाणाऱ्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता. 


२. अहिंसक यज्ञ : अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांनी विरोध केला नव्हता कारण या यज्ञांपासुन कोणाचीही हानी होणार नव्हती.





भगवान बुद्धांनी अहिंसक यज्ञांना विरोध केला नव्हता., मगअहिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते काय...?


नाही...! भगवान बुद्धांनी जरी अहिंसक यज्ञांना विरोध केला नसला तरी ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता, याबद्दल आपल्याला धम्मपदातील पुढील गाथांमधुन समजते....




• मासे मासे सहस्सेन, यो यजेथ सतं समं। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥





→ महिनो महिने हजार यज्ञ, शंभर वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा, आणी एकच विषेश प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे पुजन श्रेष्ठ होते, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा..





• यो च वस्ससतं जन्तु, अग्गिं परिचरे वने। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥ 




→ शतवर्ष, वनात विहारणाऱ्या जीवांना यज्ञात आहुती, आणी एकच विशेष प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे सत्कार श्रेष्ठ आहे, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा.





• यं किञ्चि यिट्ठं व हुतं व लोके, संवच्छरं यजेथ पुञ्ञपेक्खो। सब्बम्पि तं न चतुभागमेति,अभिवादना उज्जुगतेसु सेय्यो॥





→ या लोकात पुण्याच्या अपेक्षेने वर्षभर यज्ञ करणे, काही आहुती देणे, हे सर्व उज्वल-श्रेष्ठाला अभिवादन करण्याच्या चौथ्या भागा इतकेही नाही.


(खुद्यकनिकाय १० : १०६-१०८)


वरील गाथांवरुन आपल्याला समजते कि यज्ञ हिंसक असोत कि अहिंसक भगवान बुद्धांना कोणत्याही प्रकारचे यज्ञ मान्य नव्हते...


मग भगवान बुद्धांची यज्ञाची संकल्पना कशी होती..? याचे उत्तर आपल्याला दिग्घ निकायाच्या कुटदंत सुत्तामध्ये सापडते...




बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ आहे....



एकदा कुटदंत नावाच्या ब्राह्मणाने यज्ञ करायचे ठरवले, त्या यज्ञासाठी विविध गावांमधुन निरनिराळे विद्वान ब्राह्मण आले होते, भगवान बुद्ध त्याच्या गावामध्ये विहार करत आहेत हे त्याला समजल्यावर तो ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांच्या भेटीला गेला. भगवंतांना भेटुन कुटदंतांनी त्याला नमस्कार केला. आणि म्हणाला, आपल्याला यज्ञाचा उत्तम विधी माहीत आहे, कृपया तो समजावुन सांगावा..

तेव्हा भगवंतांनी कुटदंताला पुढील कथा सांगीतली.


प्राचीन काळी एक राजा होता, एके दिवशी तो एकांतामध्ये बसला असताना त्याचा मनात असा विचार आला कि, माझ्याजवळ खुप संपत्ती आहे तिचा वापर मी महायज्ञात केला तर यामुळे मला पुण्य प्राप्त होईल आणि या पुण्याद्वारे मी चिरकाळापर्यंत सुखी बनेन. हि इच्छा त्याने त्याच्या राजपुरोहिताला सांगीतली.

पुरोहित म्हणाला, ठिक आहे महाराज, परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या अशांतता आहे, गावे आणि शहरे लुटली जात आहेत, वाटसरुंना लुटले जात आहे, अशा स्थितीत यज्ञामुळे खुप आर्थिक हानी होईल आणि लोकांवर कर बसवावा लागेल अशा स्थितीत लोकांवर कर बसवला तर राज्यात अराजकता निर्माण होईल.

सर्वप्रथम आपल्याला चोरांचा बंदोबस्त करावा लागेल, जे आपल्या राज्यात शेती करु इच्छितात त्यांना बी बियाणे पुरवा, जे व्यापार करु इच्छितात त्यांना भांडवर कमी पडु देऊ नका, जे सरकारी नौकरी करु इच्छितात त्यांना योग्य वेतन द्या, याच्यामुळे सर्व कामामध्ये जातीने लक्ष दिल्याने, वेळोवेळी भरगच्च कर वसुल होऊन राज्याच्या तिजोरीमध्ये धनाची वृद्धी होईल.


राजाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे केले, यामुळे खुप कमी काळातच त्याचे राष्ट्र एक समृद्ध राष्ट्र बनले, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे जास्तीत जास्त मिळणाऱ्या करामुळे तिजोरीतील धनाची वृद्धी झाली. राज्यात सगळीकडे सुखासमाधानाचे वातावरण निर्माण झाले.


काही दिवसांनंतर राजा पुरोहिताला म्हणाला,

तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी सर्व काही केले माझ्या तिजोरीतील संपत्ती खुप वाढली असुन राष्ट्रातील लोक निर्भयपणे व आनंदाने जीवन जगत आहेत. तेव्हा आत्ता मला महायज्ञ करायचा आहे.

पुरोहित म्हणाला, महाराज यद्न करण्यापुर्वी सर्वप्रथम आपण आपल्या प्रजेची परवानगी घ्यावी..

पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे राजाने प्रजेची परवानगी मिळवली.

आणि पुरोहिताने यज्ञाची तयारी केली. तो राजाला म्हणाला, या यज्ञामध्ये माझी अमाप संपत्ती नष्ट होणार आहे, असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये, यज्ञ सुरु असतानाही आपली संपत्ती नष्ट होत आहे असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये., यज्ञ संपल्यावर आपली संपत्ती यामध्ये नष्ट झाली असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये.


आपल्या यज्ञामध्ये अनेक चांगले वाईट लोक येतील पण तु चांगल्या लोकांकडे लक्ष ठेवुन आपले मन आनंदित ठेवावे.



त्याच्या यज्ञामध्ये गाय, बैल, बकरी, मेंढी, इत्यादिंची आहुती देण्यात आली नाही, झाडे तोडण्यात आली नाही, मजुरांना जबरदस्तीने काम करायला लावले गेले नाही. ज्यांना इच्छा होती त्यांनी स्वेच्छेने कामे केली, तेल, मध, लोणी, तुप आदी पदार्थांनी यज्ञ पुर्ण करण्यात आला.



यज्ञ संपल्यावर राज्यातील धनाढ्य लोक भेटवस्तु घेऊन आले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, मला तुमच्या भेटवस्तुंची मुळीच गरज नाही धार्मिक कराच्या रुपाने माझ्याजवळ भरपुर संपत्ती जमा झाली आहे. त्यापैकी तुम्हाला काही हवे असेल तर खुशाल घेऊन जा. आणि राजाने गोरगरीबांना आपली भरपुर संपत्ती दान देण्यात वाटली.



भगवान बुद्धांकडुन हि कथा ऐकल्यावर कुटदंत आणि त्याचे ब्राह्मण मित्र म्हणाले, फारच चांगला यज्ञ... असे म्हणत ते ब्राह्मण आणि कुटदंत भगवाम बुद्धांचे उपासक बनले, व यज्ञासाठी आणलेले सातशे बैल, सातशे गोरे, सातशे मेंढ्या, व सर्व प्राण्यांना त्याने मोकळे केले...



या कथेद्वारे भगवान बुद्धांचे दोन्ही हिंसक आणि अहिंसक यज्ञाबद्दलचे मत कळते. यज्ञात प्राण्यांची आहुती देणे हे भगवान बुद्धांना मान्य नव्हते, तर केवळ यज्ञ केल्याने राज्य सुख समृद्ध बनते हा सिद्धांतही त्यांना मान्य नव्हता. तर ते यज्ञ करण्याऐवजी लोकांची बेकारी दुर करणे हाच खरा यज्ञ होय हे या कथेवरुन समजते...



निष्कर्ष : जो धर्म सुखसमृद्धीच्या इच्छेने ईश्वराला व देवतांना संतुष्ट करण्यासाठी प्राण्यांची हत्या करुन त्यांची आहुती देण्याला यज्ञ मानतो त्याच्यापेक्षा राज्यातील बेकारी दुर करायला सांगणारा मानवधर्म केव्हाही श्रेष्ठच ठरणार..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

पूजेचा खरा अर्थ

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा...
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण)

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर शहरातील दीक्षाभुमीवर १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या मंगल दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह महास्थाविर चंद्रमणी यांच्याकडुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धम्मदीक्षेनंतर फार थोड्या कालावधीमध्येच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि स्वतःला बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी समजणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या सोयीचा आंबेडकरवाद निर्माण केला. काहींच्या मते देवधर्माला न मानने म्हणजे आंबेडकरवाद तर काहींच्या हिंदु धर्माला शिव्या देणे म्हणजे आंबेडकरवाद, इत्यादी इत्यादी.... अशाप्रकारेच या समाजाची वाटचाल सुरु आहे....


धम्मदीक्षेच्या इतक्या वर्षांनंतरही या समाजावर आपल्या जुन्या धर्माचा प्रभाव आहे तर काही टोकाचे नास्तीक बनले आहेत... त्यांच्या अशा वागणुकीमुळे इतर समाजातील लोकांचा बौद्ध धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोनच अगदी बदलुन गेला आहे....



त्यांच्या अशा वागणुकींच्या मुळात त्यांच्यावर असलेल्या अजीत केसकंबलच्या पंथाचा प्रभाव आहे.





कोण आहे हा अजीत केसकंबल...? त्याचा आणि नव-बौद्धांच्या वागणुकीचा संबंध काय....?



अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन होता. (त्याचा उल्लेख सुत्तपिटकात, दिग्घनिकायाच्या श्रमणफल सुत्तामध्ये, तर The Buddha and His Dhamma च्या Book 1 Section 6 मध्ये आला आहे.) तो पुर्ण नास्तीक होता.


तत्कालीन ब्राह्मणव्यवस्थेचा तो अत्यंत आणि कडवा विरोधक होता.... त्याला ब्राह्मणांचे यज्ञ आवडत नव्हते, तर श्रमणांची तपश्चर्या सुद्धा त्याला मान्य नव्हती. एकुणच तो श्रमण आणि ब्राह्मण अशा दोघांचाही विरोधक होता. परंतु त्याला श्रमणच समजले जात असे. अजीत केसकंबल म्हणतो,,


अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन पुरुषांची उपजिविका आहे.


यावरुन त्याचा ब्राह्मण आणि वेदविरोध कळतो, तो उच्छेदवादी होता...


उच्छेदवादी म्हणजे,, त्याचा असा सिद्धांत होता कि,, चार महाभुतांपासुन आपले शरीर निर्माण झालेले आहे. त्याच्या कर्मफळावर विश्वास नव्हता, तो म्हणायाचा चांगल्या वा वाईट कर्माचे फळ मिळते हि अत्यंत चुकीची आणि खोटी गोष्ट आहे, आपले शरीर हे चार महाभुतांपासुन बनलेले आहे मेल्यानंतर ते सर्व तत्त्व निसर्गात विलीन होतात. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी कल्पना - संकल्पना खोट्या आहेत. दानाची प्रशंसा मुर्ख करतात. असा हा नास्तिक अजीत केसकंबल आजच्या आधुनीक युगातील नास्तिकांचा किंवा फेसबुकवर धर्माला अफुची गोळी समजणाऱ्या, फेसबुकवर येशू ख्रिस्तांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या नास्तीकांचे गॉडफादर किंवा शास्ताच आहेत....


अशा या अजीत केसकंबलाचा पुनर्जन्मावर वा कर्मफळावर विश्वास नसल्यामुळे खा प्या मजा करा हा त्याचा सिद्धांत होता, सदाचाराला त्याच्या धर्मामध्ये जागा नव्हती.. त्याचा अर्थ दुराचाराला जागा होती असाही नव्हे...


आता अजीत केसकंबल आणि नव-बौद्धांच्या (बामसेफी वृत्तीच्या) धर्मामध्ये तुलना केली असता दोघांचा धर्म जवळपास सारखाच आहे असा आभास होतो.



डॉ. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या प्रसंगी आपल्या सविस्तर भाषणामध्ये म्हटले होते. सदाचारी बना, तुमचे आचरण शुद्ध असायला हवे, बुद्धाच्या धर्मानुसार आचरण करा, बुद्धाच्या धर्माविरुद्ध वागु नका नाहीतर लोक म्हणतील, 'महारांनी एवढा चांगला बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याला बाटवला' अशी पाळी तुमच्यावर येता कामा नये. परंतु त्यांच्यावरील वाढत चाललेल्या अजीत केसकंबलच्या प्रभावामुळे हे खरे होताना दिसत आहे.




बुद्ध हे नास्तिक नव्हते....



भगवान बुद्ध जरी निरिश्वरवादी असले तरी ते नास्तिक नव्हते, त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही परंतु धर्मावर विश्वास आहे, कर्मावर विश्वास आहे, पुनर्जन्मावर विश्वास आहे. मोक्षावर (निर्वाण!) विश्वास आहे. हा अंधविश्वास नव्हे, हे सर्व सम्यक संबुद्धाचे अनुभव आहेत. कोणीही ज्याचा स्वतः अनुभव घ्यावा...


परंतु हे नवबौद्ध भगवान बुद्धांचे मुळ सिद्धांत आणि शिकवणीला पायदळी तुडवुन, सदाचाराची सीमा ओलांडुन दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्यांच्या श्रद्धांवर अश्लाघ्य टीका करत असतात, हाच त्यांचा खरा धर्म बनलेला आहे, (ज्याचा संस्थापक अजीत केसकंबल होता..) अशा सर्वांनी स्वतःला बुद्धाचा शिष्य आहे असे सांगु नये....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धाचा धर्म म्हणजे नीति . बौद्ध धर्मात देवाची जागा नीतिने घेतली आहे. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराला महत्त्व नाही, तो निरिश्वरवादी आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे कि तो तुम्हाला अस्तित्व नसलेल्या ईश्वराला शिविगाळ करण्याची परवानगी देतो... भगवान बुद्ध आपल्याला निर्वाणप्राप्तीचा मध्यम मार्ग सांगतात. त्याला तुमच्याकडुन गौरव नको आहे, तुम्ही सदाचारी बनावे हिच त्याची अपेक्षा आहे. कोणत्या धर्माला शिविगाळ करण्यापेक्षा आपण निर्वाणप्राप्तीचे ध्येय समोर ठेऊन, मध्यम मार्गावरुन चालण्याचा प्रयत्न करावा हाच बुद्धाचा धर्म आहे.



इतर धर्मीयांवर टिका करणारे बामसेफी नवबौद्ध हे बौद्ध धर्मीय नसतात. मुळतः ते नास्तीक असल्या कारणाने त्यांच्या जीवनाचे कोणतेही ध्येय नसते त्यामुळे ते विशिष्ट समाजाला टारगेट करत असतात. आणि हाच बुद्धाचा धर्म असल्याचा प्रचार करत असतात आणि बुद्धाच्या सदाचारावरील प्रवचनांची उदाहरणे दिली असता भटांनी भेसळ केली असे सांगतात आणि The Buddha & His Dhamma मधील संदर्भ दिले असता भटांनी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ देऊ नकोस असे सांगतात, तेव्हा यांच्या मनोवृत्तीची खरच खुप कीव येते, अशा असुरांना आणि मारांना निर्वाण प्राप्तीसाठी आणखी किती जन्म घ्यावे लागणार याचा विचार येतो...


काही जण म्हणतात डॉ. बाबासाहेबांनी त्रिपिटक नाकारला., मग स्वीकारला काय...? त्रिपिटक नाकारणे म्हणजे बुद्धाचा धर्मच नाकारणे होते. काही लोक समजतात तसा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेला बौद्ध धर्म मुळ बौद्ध धर्मापेक्षा जराही वेगळा नाही आहे. डॉ. बाबासाहेबांनी थेरवादी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. (आपण चर्चा करु शकतो)




वाईट प्रथांचा विरोध करणे बुद्धाच्या धर्माच्या विरोधी आहे का....?



नाही..! वाईट प्रथा, परंपरा यांचा विरोध करावा. परंतु नैतिकतेच्या चौकटीत राहुन, सदाचाराच्या कक्षेत राहुनच... परंतु एखाद्या विशिष्ट समाजावर, जातीवर, धर्मावर सातत्याने गरळ ओकणे, शिविगाळ करणे, एखादा विशिष्ट समाजाचे असल्याने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे हा सिद्धांत कोणता बौद्ध धर्म सांगतो....? (असे तर अजीत केसकंबल सुद्धा सांगत नाही...)


बुद्धाने नव्हता केला का, जातीसंस्थेचा विरोध, यज्ञसंस्थेचा विरोध, जन्माधारीत व्यवस्थेच विरोध....? केला होता ना पण सदाचाराच्या, नैतिकतेच्या चौकटीत राहुनच....


आपल्या बौद्ध बांधवांना बामसेफी मार्गावरुन परत सम्यक संबुद्धाच्या निर्वाण प्राप्तीच्या, सदाचारी मार्गावर आणने व योग्य धर्माचा ज्ञान देणे हाच त्याच्यावर उपाय आहे....


सुचना : बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.


या लेखामध्ये नवबौद्ध हा शब्द नवदीक्षीत बौद्ध किंवा आंबेडकरी समाजाबद्दल वापरण्यात आला नसुन स्वतःला बौद्ध समजणाऱ्या बामसेफी लोकांबद्दल वापरण्यात आला आहे...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...