रविवार, १ डिसेंबर, २०१३

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)


पूर्वीच्या वैदिक धार्माप्रमाणे धर्माप्रमाणे वैदिक लोक सर्व दिशा, सुर्य, चंद्र, नद्या, मोठे ह्यांची सर्व आशीर्वाद किंवा प्राप्तीसाठी पुजा करतात. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टीची निर्मीती केली आहे, त्यामुळे सृष्टीतील अनेक गोष्टींना देवता मानुन त्याची ते पुजा करतात...


भगवान बुद्ध अशा प्रकारच्या ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांना मानत नव्हते. एकदा एक कुलपुत्र भगवंतांना सहा दिशांची प्रार्थना करताना दिसला, तेव्हा त्यांनी यापुढी अशाप्रकारची प्रार्थना न करण्याचा उपदेश केला. व पुजेचा खरा अर्थ समजावुन सांगीतला. अशा प्रकारची कथा दिग्घनिकायाच्या सिगलसुत्तात आलेली आहे.भगवान बुद्ध एकदा वेळु वनात राजगीरजवळ वास करीत असताना, सिगल नावाचा तरुण कुलपुत्र अशाप्रकारे सहाही दिशांची पुजा करताना दिसला. भगवंतांनी त्याला विचारले कि अशाप्रकारे तु कशाची पुजा करीत आहेस. तेव्हा सिगल म्हणाला, माझ्या वडीलाने मृत्युपुर्व सांगितलेल्या पवित्र शब्दांचा आदर करण्यासाठी मी अशाप्रकारे पुजा करीत आहे, त्यांनी मला सहा दिशांची पुजा करायला सांगितले..


त्यामुळे अशा प्रकारची पुजा केल्याने मला देवाचा आशिर्वाद प्राप्त होईल.


तेव्हा भगवान म्हणाले, ठीक आहे तु पुजा कर..! परंतु तुला तो विधी समजला नाही. तुथे पहिले कर्तव्य आहे कि तुझे घर सांभाळावे, तुझी पत्नी, तुझी मुले सांभाळावीत व त्यांना कोणतेही वाईट कृत्ये करण्यापासुन परावृत्त करावे. मी तुला ह्या सहा दिशांचा अर्थ सांगतो तो असा आहे.

•आई वडील हे पुर्व दिशा आहेत.
•शिक्षक हे दक्षिण दिशा आहेत.
•मुले, पत्नी हे पश्चिम दिशा आहेत..
•मित्र व नातेवाईक हे उत्तर दिशा आहेत.
•सहकारी व नौकर हे खालची दिशा आहेत.
•तर श्रमण व ब्राह्मण आणि इतर धार्मिक व्यक्ती हे वरची दिशा आहेत.
तेव्हा सिगल म्हणाला, भगवान मला याविषयावर सविस्तर माहिती सांगा...

पुजेचा खरा विधी

सिगल, मी तुला पुजेचा विधी समजावुन सांगतो,, पुजा करण्यापुर्वी तु आणि कोणताही गृहस्थ चार प्रकारच्या कर्मक्लेशांपासुन, पापांच्या चार कारणांपासुन तसेच विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग करायला हवा.•चार दुर्गुण•


माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त राहायला शिकविले पाहिजे.


•जीवहत्या करणे, 
•न दिलेले जबरदस्तीने घेणे, 
•व्यभिचार करणे आणि 
•असत्य बोलने, हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत.


सिगल, हे लक्षात ठेव की,•पक्षपातीपणा, 
•शत्रूत्व, 
•मुर्खपणा आणि 
•भय हि पापांची कारणे आहेत, यामुळे पापकर्म घडत असतात. यांपैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही...माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करु नये असे शिकविले पाहिजे .• सहा प्रकारची संकटे •
•मद्यपानाचे व्यसन, 
•अवेळी रस्त्यावरुन भटकत राहने, 
•जत्रांतून परिभ्रमण करणे, 
•जुगाराची सवय जडणे, 
•कुमित्रांची संगत धरने आणि 
•आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते.

१. मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उदभवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शील भ्रष्टता, अश्लील वर्तणुक आणि बुध्दीनाश ही ती सहा संकटे होत.


२. अवेळी रस्त्यावरुन भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. तो म्हणजे, तो स्वत: , त्याची बायकामुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात. आणि त्यांना त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो.


३. जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करत राहतो की, नाचणे, गाणे , बजावने, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का?


४. जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे म्हणजे,•खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेश करतात, 
•हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वत: शोक करतो. 
•त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, 
•न्यायालयासमोर त्यांच्या शब्दाला किंमत उरत नाही, 
•त्याचे मित्र आणि त्याचेसहकारी त्याचा तिरस्कार करतात. 
•लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. 
(कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालन पोषण कसे करता येणार?)
५. कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारुबाज, लबाड, पैसेखाउ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते.६. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे, तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गर्मी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो हातात फार काम आहे म्हणून मी काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी हौ लागते.
• व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे.•


मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुत शत्रु असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत.


•लोभी पुरुष, 
•बोलघेवडा परंतु कृतीने शून्य, 
•खुशामत्या पुरुष आणि 
•उधळ्या वृत्तीचा पुरुष...१. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरुन मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भितीने आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मुळ हेतू स्वार्थ साधने हा असतो.


२. जो बोलघेवडा आहे तो कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.


३. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करायला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो.


४. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाचतमाशा पाहतांना तो तुम्हाला सोबत करतो . तुम्ही द्युतक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो.५. मन:पूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात,


•सहाय्यक, 
•सुखादु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा,
•सदवर्तनाचा सल्ला देणारा आणि 
•सहानुभूती दाखविणारा सहाय्यक..हे खरे मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो.६. सुख - दु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हांला सांगतो. तुमची गुपितो तो गुप्त ठ्वतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग कतीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार होतो.७. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो. सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऎकले नाही अशा चार गॊष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो.८. तुमच्या बद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दु:खाने दु:खी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले.
चार कर्मक्लेशांचा, चार पापांच्या कारणांचा आणि विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग केल्यावर गृहस्थाने सहा दिशांचा आरंभ करावा...


१. पुर्व दिशा : आई वडील...पुजेची प्रथम दिशा आहे पुर्व दिशा म्हणजे आई वडील, त्यांच्या पुजेची पाच अंगे आहेत.

मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात.


२. दक्षिण दिशा : शिक्षकशिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरुन उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतात ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्यांच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व त-हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.


३. पश्चिम दिशा : पति-पत्नीसाठी विनय१. पतीने आपल्या पत्नीची सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करुन, तिच्याशी एकनिष्ठेने वागून, तिला सत्ता देउन, तिला लागणारे दागदागिने पुर्वून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर-माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करुन आपले कर्तव्य बजविते. ती पातिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.४. उत्तर दिशा : मित्र व नातेवाईक
कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.५. खालची दिशा : धनी व सेवक यांसाठी विनयधन्याने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे :•त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. 
•अन्न व मजुरी द्यावी. 
•ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रुषा करावी.
•असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. 
•वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी.कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यांत ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची किर्ती सर्वत्र वाढवितात.


६. वरची दिशा : धर्मगुरुकुलपुत्राने आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.
निष्कर्ष...


१. जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला सहा दिशांची पूजा करण्याऎवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरु यांचा मान राखायला शिकवितो......


भगवंतांनी सिगलला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर! फार सुंदर! एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुप्त होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाने भगवंतांनी मला सत्य विषद करुन सांगितले आहे.

मी भगवंतांना, त्यांनी सांगितलेल्य धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा.


आज अडीच हजार वर्षांनंतरही त्या महामानवाची शिकवण काळाशी किती सुसंगत वाटते.. कारण भगवान बुद्धांचा धम्म अकालिको आहे, त्याला काळाची काही सीमा नाही.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...See Also :


१. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

२. मराठी धम्मपद

३. रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा