बुधवार, १७ मे, २०१७

मैत्रेय आणि महायानाबाबत असलेले काही गैरसमज..

महायान आणि बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीत आज बरेच गैरसमज समाजामध्ये पसरले आहेत. काही लोक त्या गैरसमजुतींना सत्य मानून आपल्याच मनाच्या कथा रचतांना बोधीसत्वाच्या ह्या महान संकल्पनेचा संबध कोणी अवतारवादाशी तर कोणी त्यांच्या प्रेषितांशी जोडून पाहत आपल्याच मनाचे मनोरे रचण्याचा प्रयत्न करित आहेत. त्या सर्वांच्या गोड गैरसमजुतींचे खंडन करण्यासाठी सदर लेख लिहित आहे.


सर्वप्रथम काही लोक असा प्रचार करतांना दिसतात की, मैत्रेयाची संकल्पना ही महायान पंथाने जन्माला घातली असुन ती एक थोतांड पसरविणारी संकल्पना आहे. त्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की बोधीसत्त्व संकल्पना ही जरी महायानाची केंद्रीय संकल्पना असली तरी मैत्रेयाचे मुळ पारंपारिक पाली तिपिटकातच आहे. परंतु आपली समजूत महायानाला एक अंधश्रद्धेवर आधारलेला धर्म अशी झाल्यामुळे आपण त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो आणि प्रत्येक वेळी आपल्या श्रध्दांना न पटणाऱ्या किंवा अंधश्रध्देवर अाधारलेल्या गोष्टींचा संबंध आपण त्याच्याशी लावतांना दिसतो. जसे - काहींच्या मते पुनर्जन्माची संकल्पना ही महायानाची व्युत्पत्ती आहे, पण तसे नाही ती भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या श्रावकयानावरच आधारलेली आहे. ह्या सर्व गैरसमजुतींमुळे मी महायानाच्या बाबत थोडक्यात सांगू इच्छितो.


महायान जसा दिसतो तसा नाहीच, तुम्ही बाहेरून महायानाचा न्यायनिवाडा करु शकत नाहीत, त्यासाठी तुम्हाला त्याला बरोबर जाणून घेता आले पाहिजे, त्याचे योग्य प्रकारे आकलन करता आले पाहिजेत. तो एका नारळाच्या फळासारखा आहे, बाहेरून कठोर आणि खाण्यायोग्य न दिसणारा आतुन तितकाच सुयोग्य आहे. मी महायानाच्या बाबत जो काही अनुभव घेतलेला आहे, त्यानुसार सांगू शकतो की तो कर्मकांडावर आधारित धर्ममार्ग नाही, तर तो ज्या काही साधना सांगतो त्या सर्व फळ देणाऱ्याच आहेत. केवळ बाप्तिस्मा, सुंता, दीक्षा, इत्यादी प्रकारच्या विधींना संपन्न केल्याने तुम्ही महायानात प्रवेश मिळवू शकत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला तुमची योग्यता सिध्द करावी लागते, त्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रवेश परिक्षा द्यावी लागते, तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळतो. जगातला कोणताही धर्म ह्या प्रकारच्या कसोट्यांना पुर्ण करण्याचे आव्हान देत नाही. ते केवळ त्यांच्या धर्मसंस्थापकांची किंवा त्यांनी सांगितलेल्या ईश्वरांची भक्ती करायला सांगतात., त्यातूनच तुमचे पाप धुतले जातील सुगती प्राप्त होईल अन्यथा दूर्गति होईल असा सिध्दान्त सांगतात. याउलट महायानात सर्व कर्मावर आधारित आहे., कोणाच्या भक्तीवर नाही. हा मूलभूत फरक जरी समजला तरी सुध्दा आपण महायानाच्या महत्तेबद्दल समजून घेऊ शकतो. याविषयावर सांगण्यासारखे तर बरेच काही आहे, पण लेखाची लांबी लक्षात घेता मुख्य मुद्यावर येतो..


बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीतही बरेच गैरसमज पसरले आहेत, काहींच्या मते बोधीसत्त्व हा बुध्दांचा अवतारवाद प्रदर्शित करतो. त्यांच्या मते भगवान बुध्दांनी बोधीसत्वांच्या रुपांमध्ये अनेक अवतार घेतले आहेत. तर बाैध्द परंपरेमध्ये अनेक बुध्दांची जी काही संकल्पना मांडली जाते, त्यातील सर्व बुध्द हे एकाच बुध्दांचे अनेक रुप असुन धर्माचा विनाश झाल्यावर बुध्द स्वतः अवतार घेतो असा गोड गैरसमज अनेकांचा आहे. त्या सर्वांनी लक्षात घ्यावे की, बोधीसत्त्व हा काही स्वर्गातून पडलेला जीव नाही. तर "बुध्दो भवेयं जगतो हिताय" अर्थात सर्व जीवांच्या हितासाठी आणि सुखासाठी मी बुध्दत्वाची प्राप्ती करेन अशा प्रकारची अकृत्रिम अभिलाषा आपल्या चित्तामध्ये निर्माण करुन त्यासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्यागाची सुध्दा तयारी ठेवणारा आपल्यासारख्या सामान्य मनुष्याच्या चित्ताचेच विकसित रुप आहे. त्याच्या त्या साधनांमुळे त्याचे चित्त (बोधीचित्त) त्या स्तरावर पोहोचले आहे, जिथे इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाचे दान देतांना सुध्दा त्याला आनंद होतो. महायानात ज्या काही प्रार्थना (साधना) केल्या जातात त्या अशा मार्गावर चालण्यासाठी मन प्रगल्भ व्हावे यासाठीच .. अर्थात बोधीसत्त्व हा सामान्य मनुष्यच आहे, पण त्याचे चित्त सामान्य नसून बोधीचित्त आहे. असा हा बोधीसत्त्व अनेक पारमिता पूर्ण करुन शेवटी जगाच्या कल्याणासाठी  बुध्दत्वाची प्राप्ती करतो (ज्या कालावधी मध्ये धर्माचा नाश झालेला असतो, जेव्हा लोकांनी बुध्द हे नाव सुध्दा ऎकलेले नसते) अशी बोधीसत्त्व संकल्पना अाहे.


अनेक बुध्दांच्या संकल्पनेच्या विषयी सांगायचे झाले तर, प्रत्येक जीव हा बुध्द बनण्याची क्षमता राखतो. ह्या जगातील प्रत्येक जीव हा बुध्द बनू शकतो, त्यामुळे अनेक बुध्दांच्या संकल्पने विषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही. कारण गाैतम बुध्द हे प्रथम बुध्द नव्हतेच, त्यांच्यापुर्वी सुध्दा अनेक बुध्द होऊन गेले आणि नंतरही अनेक होतील. याचा अर्थ असा नव्हे की, एकच बुध्द अनेक वेळा अवतार घेतो. गाैतम बुध्दांच्या पूर्वी जे काही बुध्द होऊन गेलेत आणि नंतर जे कोणी होतील त्यांचा गाैतम बुध्दांशी संबंध नाही, ते वेगवेगळे व्यक्ती आहेत; ज्यांनी स्वयंप्रयत्नाने बुध्दत्वाला प्राप्त केले आहे.

त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की, " बुद्धाला जेव्हा विचारले गेले तुमच्या पश्चात आम्हास मार्गदर्शन कोण करेल तेव्हा बुद्ध म्हणाले मी मैत्रेय म्हणुन. जन्मास येइल वा मैत्रेय हा त्याकाळी बुद्ध असेल."  हा चुकीचा सिध्दांत आहे, भगवान बुध्दांनी असे कधीही सांगितलेले नाही. भगवान बुध्दांना जेव्हा विचारले गेले की, तुमच्या पश्चात आम्हाला मार्गदर्शन कोण करेल..? तर भगवानांनी उत्तर दिले धम्म..!! मी उपदेश केलेला धर्मच माझ्या पश्चात तुम्हाला मार्गदर्शन करेल. भगवान बुध्दांनी असे सांगितले नाही की, मी मैत्रेय म्हणून जन्मास येईल. असे होऊच शकत नाही, कारण ते धर्मविरोधी आहे. बुध्दांनी पुनर्जन्माचा क्षय केलेला आहे, त्यांनी मनाच्या सर्व बंधनांना तोडले आहे, त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. भगवान बुध्द ज्या मैत्रेयाच्या विषयी बोलत आहेत, ती बुध्दत्व प्राप्तीसाठी प्रयत्नरत दुसरी व्यक्ती आहे, स्वतः गाैतम बुध्द नाहीत. गाैतम बुध्दांच्या द्वारे उपदेश केलेला धर्म जेव्हा नष्ट होईल, अर्थात ह्या धर्माच्या बाबतीत कोणालाही काहीच माहिती नसेल तेव्हा मैत्रेय बोधीसत्त्व हा बुध्द बनणार. एका बुध्दांची शिकवण अस्तित्वात असल्यावर दुसरा कोणताही बुध्द जन्म घेऊ शकत नाही. ह्या सिद्धांताच्या मागे सुध्दा अनेक कारणे आहेत.

काही लोक ह्या बोधीसत्त्व संकल्पनेचा संबंध अवतार वादाशी लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात -

बोधीसत्वांच्या अनेक जन्मांचा किंवा जातकांचा हा सिध्दान्त ब्राह्मणांच्या अवतारवाद ह्या सिध्दांतासारखा वाटतो, अर्थात ईश्वराच्या अवतारासंबंधीचा सिध्दान्त. (पण तसे नाही, त्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे) जातक सिध्दान्त हा भगवान बुध्दांच्या सर्वश्रेष्ठ शुध्द अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. यामध्ये बोधीसत्वाचे जीवन शुध्द असलेच पाहिजे, बोधीसत्त्व आपल्या जीवनामध्ये जन्मोजन्मी पवित्र बनत जातो व त्याचे अनुकरण कराणार्याचे रक्षण करतो. परंतु अवतारवादामध्ये ईश्वराच्या अवताराची जडणघडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणी संकल्पनेचा अर्थ इतकाच की, ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. परंतु बोधीसत्वाच्या बाबतीत मात्र तसे नाही, बुध्द बनण्यासाठी बोधीसत्वाला (किमान) सलग दहा जन्मांपर्यंत सर्वोच्च शुध्द जीवनाचे बंधन घालण्यात अाले आहे. बोधीसत्वाने अनेक जन्मांपर्यंत, बुध्दत्वाच्या प्राप्तीसाठी आवश्यक अशा शुध्द जीवन अवस्थेतुनच गेले पाहिजे. ह्या सिध्दांताला दुसऱ्या कोणत्याही शासनामध्ये तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या शास्त्याला अशा प्रकारच्या कसोटीला पूर्ण करण्याचे आव्हान देत नाही.

- दि बुध्द अॅण्ड हिज धम्म

ह्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असतील अशी अपेक्षा करतो. तसेच जे लोक इस्लामी प्रेषितांना बुध्दांनी सांगितलेला मैत्रेय मानतात, त्या लोकांनी सुध्दा बोधीसत्त्व संकल्पनेचा योग्य प्रकारे अभ्यास करावा ही विनंती करतो. तसेच मला त्यांच्या विषयी एक पडलेला प्रशन म्हणजे, ते त्यांच्या प्रेषितांना मैत्रेय ह्या बोधीसत्व रुपात मानतात की, बुध्द रुपात...? त्यानंतर सुध्दा आणखी अनेक प्रश्न पडतात -

अ. बोधीसत्त्व रुपात पाहत असतील तर :

१. बुध्दांची शिकवण अस्तित्वात असतांना ते बुध्दांना शरण का बरं गेले नाहीत...?

२. एका बोधीसत्वांच्या शुध्द व नैतिक जीवनाच्या कसोटीप्रमाणे त्यांचे जीवन होते का...?


ब. बुध्द रुपात पाहत असतील तर :

१. त्यांनी धर्मचक्राचे प्रवर्तन कशा प्रकारे केले..?

२. धर्म अस्तित्वात असतांना त्याला शरण जायला सोडून ईश्वराला (जे एक बाह्य शरण आहे) त्याला शरण जायला का बरं सांगितले..?

३. ते सर्व विकारांच्या पासून मुक्त होते का..? वास्तविक पाहता त्यांनिओ ज्या ईश्वराची संकल्पना मांडली आहे, तो भेदभाव करणारा, लोकांना गटसमुहांमध्ये विभागणारा, त्याची न ऎकणार्या जीवांना नरकात पाठविणारा जीव आहे, ज्याच्यावर माराचे साम्राज्य अस्तित्वात अाहे, असा ईश्वर सुध्दा जेव्हा माराच्या बंधनातून मुक्त नाही तर त्यांच्या प्रेषितांच्या बाबतीत आपण काय अपेक्षा करावी..?


कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करतांना आपण नेहमीच ती नेमकॊ कशाशी करत आहोत, याचे भान ठेवावे...




हे सुध्दा वाचा :


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा