गुरुवार, २० एप्रिल, २०१७

धम्माच्या बाबतीत असलेले गैरसमज... - भाग ३

आमचे फेसबुक वरील मित्र संजय क्षीरसागर यांनी भगवान बुध्दांच्या धम्माच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सदर लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये संजय क्षीरसागर यांचे प्रश्न व त्यांना माझ्याद्वारे दिल्या गेलेली उत्तरे यांचा समावेश केला अाहे..



संजय क्षीरसागर- यांची पोस्ट
एक विनंती :- प्रथमतः पोस्ट पूर्ण वाचा आणि मगच like ऑप्शन युझ करा. तसेच काही सूचना असल्यास, चुकीची बाब असल्यास कॉमेंट मध्ये नोंदवा. पण केवळ काड्याच घालायच्या म्हणून उगवणार असला तर .. तर मग खैर नाही.
==================================================

गौतम बुद्धाची चार आर्यसत्ये :- (१) दुःख (२) तृष्णा (३) दुःखनिरोध (४) दुःखनिरोधगामिनी प्रतिपद् अष्टांग मार्ग

अष्टांग मार्ग :- (१)सम्यक दृष्टी, चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान (२) सम्यक संकल्प (३) सम्यक वाचा (४) सम्यक कर्मान्त (५) सम्यक आजीविका (६) सम्यक व्यायाम (७) सम्यक स्मृती (८) सम्यक समाधी  

पंचशील तत्वे :- (१) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे (२) चोरी न
करणे (३) व्यभिचार न करणे (४) असत्य न बोलणे (५) मादक पेय ग्रहण न करणे

डॉ. आंबेडकरांनी आपल्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथाच्या प्रास्ताविकात गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्यांवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्या अनुषंगाने हा चर्चेचा व्याप आरंभला आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, गौतम बुद्धापूर्वीपासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती. या श्रमणांचे सुमारे साठहून अधिक संघ असल्याचे श्री. धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ' भगवान बुद्ध ' या ग्रंथाच्या प्रथम खंडात नमूद केले असून खुद्द गौतमच्या काळात निर्ग्रंथ ( जैन ), पुरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन, संजय बेलठ्ठपुत्त हे सहा मोठे श्रमण संघ अस्तित्वात होते.

गौतमाने गृहस्थाश्रमाचा त्यागून संन्यास घेतला त्यावेळी आरंभीच्या काळात त्याने जी काही
तपश्चर्या आरंभली ती पूर्वपार परंपरेने चालत आलेल्या पद्धतींनुसार. ज्याचे वर्णन कित्येक बुद्ध चरित्रांत मिळते. परंतु इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे गौतम किंवा इतर श्रमणांना विरक्ती का यावी ? संन्यासाकडे त्यांचा ओढा का असावा ?

मानवी जीवन अस्तित्वात आल्यापासून आपल्या अस्तित्वाच्या कारणाचा शोध घेण्याची धडपड अव्याहतपणे सुरु आहे. आपण ज्या काळाचा विचार करत आहोत, त्या काळात या प्रश्नाचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संन्यास, तपश्चर्या. यामागे आत्मज्ञान वा इच्छित देवतेची भेट, दर्शनप्राप्ती वगैरे जी काही भावना असेल ती असेल.

 याच अनुषंगाने विवेचनातून सुटत असलेला दुसरा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील दुःख. जगातील प्रत्येक धर्माचे आध्यात्मिक अस्तित्व मानवी जीवनातील दुःखावरच अवलंबून आहे.
वास्तविक धर्माचे मुख्य प्रयोजन म्हणजे मानवी जीवनाचे, समूहाचे नियमन करणे. परंतु ऐहिक जीवनातील समस्यांच्या निवारणार्थ आध्यात्म वा दैवी घटकांचा आश्रय घ्यावाच लागतो कारण निव्वळ बुद्धिवाद हा वास्तव जीवनात उपयोगी पडत नाही. असो.

गौतम व त्याचे समकालीन तसेच पूर्वसुरी याच कारणांनी, मानवी जीवन अस्तित्वाचे प्रयोजन व मानवी जीवनातील दुःख, संन्यासाकडे वळले होते. प्रचलित मार्गांनी त्यांनी या प्रश्नांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले. पैकी येथे आपण चर्चा करणार आहोत गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग व पंशशील तत्वांची.

उपरोक्त तिन्ही घटकांचा बारकाईने विचार केला असता असे लक्षात येते कि, यातील चार आर्यसत्ये हि फक्त संन्यासी / श्रमणांना लागू होतात. गृहस्थाश्रमातील व्यक्तीस नाही. कारण हि चार आर्यसत्ये गृहस्थास लागू होतात असे मान्य केले तर मग गृह्स्थाश्रमाचा मुख्य आधारच तुटतो. किंबहुना या चार आर्यसत्यांत संन्यस्त वृत्तीचाच उघड पुरस्कार केल्याचे स्पष्ट होते. मग प्रश्न असा उपस्थित होतो कि, पंचशील तत्व व अष्टांग मार्गाची आवश्यकता का भासावी ?

गौतम हा श्रमण होता. त्यामुळे आर्यसत्यांवरच तो थांबला असता तरी ते पुरेसे होते. परंतु ज्या कारणांस्तव त्याने व त्याच्या समकालीन तसेच पूर्वसुरींनी श्रमणपरंपरेचा स्वीकार केला होता त्याचे निवारण करणे, निरसन करणेही त्यांस आवश्यक होते. यामुळेच पंचशील तत्वांची उभारणी करण्यात आली. ज्यान्वये गृह्स्थाश्रमी व्यक्तीचे जीवन व्यतीत होऊन उपरोक्त आर्यसत्यांनी ते बाधित न होता, संन्यस्त वृत्तीकडे न वळता गृहस्थाश्रमातच व्यतीत व्हावे.
इथे वादाचा मुद्दा हा होऊ शकतो कि, पंचशील तत्वे व अष्टांग मार्ग यातील प्रथम कोण ? याचे निर्णायक उत्तर माझ्याकडे तरी नाही परंतु अष्टांग मार्गांचे अध्ययन केले असता त्यातील विफलता लक्षात येऊन पंचशील तत्वेच मला आधारभूत वाटतात.

याचे मुख्य कारण म्हणजे अष्टांग मार्गांची उभारणीच मुळी चुकीच्या गृहितकावर झालेली आहे. अष्टांग तत्व सांगताना सर्व मनुष्य एकाच प्रवृत्तीने, एकाच विचाराने, बुद्धीने वागतील हे गृहीत धरण्यात आलेलं आहे जे मानवी स्वभाव वैविध्य, वैचित्र्य व वैशिष्ट्य लक्षात घेता अनैसर्गिक आहे.
त्याउलट पंचशील तत्वात काय करावे अन् काय करू नये याचे स्पष्ट निर्देश आहेत. असो.

गौतम बुद्ध व इतर श्रमणांनी जी काही तत्वे उभारली त्यांचा अंतिम हेतू मानवी जीवन सुखमय व्हावे हाच होता. त्यामुळे या तत्वांचा सर्त्व धर्मियांनी, विशेषतः जे हिंदू धर्मियांच्या निकट सानिध्यात आले त्यांनी, आपापल्या शक्तीनुसार स्वीकार केला. याबाबतीत वैदिक धर्मियांचे उदाहरण महत्वपूर्ण असून अभ्यासूंनी याकरता मनुस्मृतितील वानप्रस्थ तसेच संन्यासाश्रम प्रकरण वाचावे अशी मी सूचना करतो.

यास्थळी आणखी एक उद्भवणारा प्रश्न म्हणजे बौद्ध हा धर्म आहे का ? याचे उत्तर माझ्या मते नकारार्थीच ठरते. कारण -- (१) गौतमने याची स्वतंत्र धर्म म्हणून उभारणी केली नाही (२) गौतमने जी काही तत्वनिर्मिती केली ती श्रमणावस्थेत. त्यामुळे यास धर्म म्हणावे तर मग तो संन्याश्यांचा धर्म ठरतो, गृहस्थांचा नाही. व ज्या धर्मात गृह्स्थाश्रमास स्थान नाही तो मुळी धर्मच होऊ शकत नाही. (३) खेरीज गौतमच्या हयातीत प्रचलित पद्धतीनुसार श्रमणसंघ प्रवेश हेही एक कारण आहेच.
मग प्रश्न उपस्थित होतो, बौद्ध धर्म नाही तर काय आहे ? याचे उत्तर अनेकांनी अनेकवेळा दिलेलं आहे कि, बौद्ध हि एक जीवनपद्धती आहे. आपल्या नित्य परिचयाचे यासंबंधी दुसरे उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय. असो.

डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा मी माझ्या परीने उत्तर शोधण्याचा यत्न केला आहे. अर्थात हा परिपूर्ण नाही याची मला जाणीव आहे परंतु यानिमित्ताने एका दुर्लक्षित विषयावर किमान चर्चा तरी घडेल अशी निष्फळ अपेक्षा आहे.



माझ्याद्वारे दिले गेलेले उत्तर :


सर तुमचा लेख चुकीच्या आधारावर लिहिला आहे, माझ्या परीने  एक - एक मुद्दा पकडून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करित आहे...


पूर्वीच्या काळात स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ तर मोक्ष प्राप्तीसाठी तपश्चर्या केली जायची, यातील मोक्ष हि संकल्पना श्रमण परंपरेतील होती हे आपण जाणतोच. भगवान बुध्दांच्या काळात अस्तित्वात असलेल्या ६२ श्रमण परंपरांच्या द्वारे ह्या मोक्ष प्राप्तीसाठी विविध प्रकारच्या तपश्चर्या केल्या जायच्या, त्यांच्या मार्गामध्ये समानता नव्हती. जसे - कुक्कुर व्रतिक (कुत्र्याच्या खाण्यापिण्याचे व्रत करणारे) गोव्रतिक (गायी सारखे जीवन जगणारे) , अचेलक (नग्न राहणारे), विष्ठा खाऊन जगणारे अशा अनेक प्रकारच्या तपश्चर्या होत्या. सिध्दार्थ गाैतम बोधीसत्त्व अवस्थेत असतांना त्यांनी सुध्दा तिळाच्या एका दाण्यावर जीवन जगून, श्वास कोंडून विविध प्रकारच्या तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही, शेवटी वैराग्याच्या त्या मार्गाचा त्याग करुन सम्यक समाधी लावली. आणि त्याच मार्गाने सम्यक संबोधीची प्राप्ती केल्यानंतर आपल्या धर्माचा उपदेश करतांना त्यांनी अशा तपश्चर्यांना नाकारले आहे, त्यांना मिथ्या मार्ग संबोधले आहे. चित्त शुध्द नसतांना अशा तपश्चर्यांना काहीच अर्थ नाही.


भगवान बुध्दांनी धर्माचा शॊध घेण्यासाठी बोधीसत्त्व असतांना सन्यांस स्वीकारला होता. पण निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या ह्या धर्मयानावर आरुढ होण्यासाठी संन्यास स्वीकारण्याची गरज नाही. भगवान बुध्दांनी गृहस्थी जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी हा मार्ग शॊधला आहे, ज्याचा साक्षात्कार कोणी गृहस्थाश्रमात राहून सुध्दा करु शकतो.


दुःख : तुमच्या अर्थानुसार प्रत्येक धर्म हा मानवी जीवनात असलेल्या दुःखांवरच बोलतो आणि त्यातुन सुटण्याच्या मार्गावर. पण दुःखातून सुटण्यासाठी ते कोणत्या प्रकारचा मार्ग सांगतात त्यांची काही उदाहरणे :

१. भक्ती : हा मार्ग सामान्यतः ईश्वराच्या भक्तीवर आधारीत आहे, त्यांच्या धर्मानुसार ईश्वर हा भक्तीप्रिय आहे. जर तुम्ही त्याची भक्ती कराल तरच तो तुमच्या जीवनातील दुःख नष्ट करेल, पण जर तुम्ही त्याच्या भक्तीपासुन दुर जाण्याचा प्रयत्न कराल, तर तो तुमच्या जीवनाला विविध प्रकारच्या दुःखांनी भरवून टाकेल.

२. पाैराणिक तपश्चर्या : पाैराणिक कथांमधील तपश्चर्या जरा वेगळ्या अर्थाच्या होत्या, त्यांच्यानुसार तपस्वी ईश्वराला खुश करण्यासाठी तपश्चर्या करित असत.

३. श्रमणांची तपश्चर्या याहून वेगळी होती. त्यांच्यानुसार सामान्य मानव हा अगदी सामान्य जीवन जगतो, त्याचा त्याला काही विशेष लाभ नाही. जर सत्याची प्राप्ती करायची असेल तर मला त्याच्यापेक्षा वेगळे जीवन जगावे लागेल ह्या दृष्टिकोनातून श्रमण लोक तपश्चर्येकडे वळत असावेत.

४. यज्ञ : ऎहिक जीवनात उत्तम फळाची प्राप्ती तसेच मेल्यानंतर स्वर्गात जन्म या कामनेतुन यज्ञ केले जायचे.

 त्याचप्रमाणे असे अनेक मार्ग अस्तित्वात आहेत, पण भगवान बुध्दांचा धर्म मात्र दुःखातून मुक्तीसाठी वेगळ्या प्रकारचा मार्ग सांगतो. दुःखातून मुक्ती व्हावी या इच्छेने ईश्वराची भक्ती करणे, सर्व पापकर्मांना नष्ट करण्यासाठी नदी मध्ये स्नान करणे यामध्ये काही शाैर्य लागत नाही. पण दुःखमुक्तीसाठी भगवान ज्या मार्गाचा उपदेश करतात त्यावर चालण्यास शाैर्य लागते. आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्षा, कामवासना यांच्या सारख्या वाईट विचारांवर विजय मिळविण्यासाठी शाैर्य लागते, भगवान बुध्द आपल्याला हाच मार्ग सांगतात.


ना मांस माशांचा आहार ग्रहण केल्याने, ना नग्न राहिल्याने, ना मुंडण केल्याने, ना जटा वाढविल्याने, ना चिंध्या परिधान केल्याने, ना शरीरावर धुळ माखल्याने, ना वेदांचे अध्ययन केल्याने, ना अग्नीहोत्रात आहुती दिल्याने अंधकारात डूबलेल्या मानवाचे मन अंधकारातुन बाहेर पडेल.. - भगवान बुध्द


चार आर्यसत्ये हे सर्वकालीन व सर्व प्रकारच्या जीवांच्या जीवनातील सत्ये आहेत, त्यांच्यामुळे गृहस्थ जीवनाचा गाभा तुटतो असे नाही. भगवान बुध्दांनी उपदेश केलेले आर्यसत्ये हे शाश्वत सत्ये तर आहेतच पण गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांसाठी त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे नाही (तरीसुध्दा ते त्यांच्या जीवनासाठी सत्येच आहेत) दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये केलेली तुलना चुकीची आहे, त्यांचा एकमेकांशी संबंध येत नाही.  प्रज्ञा,  शील आणि समाधी यांना धर्मामध्ये अधिक महत्व आहे. यातील प्रज्ञा आणि शील ह्या पारमिता आहेत तर समाधी आर्य अष्टांगिक मार्गातील आठवे अंग. त्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांची तुलना होऊ शकत नाही. केवळ सदाचाराने (शीलाने) निर्वाणाची प्राप्ती होऊ शकत नाही, आर्य अष्टांगिक मार्ग हा महत्वाचा आहे, जो केवळ परिव्राजकांच्या साठी नसून सर्वच जीवांच्या साठी आहे. गृहस्थांसाठीच्या पंचशीलांची तुलना श्रामणेरांच्या १० शीलांशी व भिक्खुंच्या २२७ विनयांशी करता येईल. ते शील निर्वाणाच्या प्राप्तीसाठी नसून सदाचारी जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहेत. भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा केवळ परिव्राजकांच्या साठी नसून तो गृहस्थांच्या साठी सुध्दा आहे कोणी गृहस्थी जीवनात सुध्दा आर्य अष्टांगिक मार्गावर चालून निर्वाणा पर्यंत पोहोचू शकतो. भगवान बुध्दांनी गृहस्थांना सुद्धा अनेक सुत्तांमधून  मार्गदर्शन केले आहे.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे :

१. बोधीसत्वाने सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये धर्मचक्राचे प्रवर्तन केले, आपल्या द्वारे जाणल्या गेलेल्या धर्माचा सर्व जगाच्या कल्याणासाठी संघाची निर्मिती केली तरी सुध्दा त्यांनी धर्माची स्थापना केली नाही असे म्हणता..

२. भगवान बुध्दांनी जे काही उपदेश केले ते सामान्य श्रमण अवस्थेत नसून सम्यक संबुध्द अवस्थेत केले, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या जीवांसाठी केले - मग ते परिव्राजक असोत किंवा गृहस्थ..

अ) आर्यसत्ये तर शाश्वत सत्ये आहेत, पण त्यांचे आकलन करण्याचा गृहस्थांचा आणि परिव्राजकांचा मार्ग वेगळा आहे. त्यांचे उपदेश हे केवळ परिव्राजकांसाठी नसून गृहस्थांच्या साठी सुध्दा होतेच.

ब) भगवान बुध्दांच्या द्वारे केल्या गेलेल्या  कित्येक गृहस्थांना केलेल्या उपदेशातुन त्यांच्या धर्मात गृहस्थी जीवनाचे असलेले महत्व अधोरेखीत होते.

३. तिसरा प्रश्न बरोबर समजला नाही, कृपया स्पष्ट करा...


मला वाटते तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर सुध्दा वर सापडले असेल, भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म केवळ विशिष्ट आचार पद्धतींचे आचरण करणाऱ्या लोकांचा पंथ किंवा संप्रदाय  नव्हे तर सम्यक संबुध्दांनी (संपुर्ण जागृत) अनुभव केलेले निसर्गाचे नियम आहेत, मानवाच्या कल्याणासाठी उपदेश केलेला तो मार्ग अाहे, ज्याचे प्रवर्तन त्यांनी सारनाथ येथे केले, ज्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.


सर्व जीव सुखी होवोत.।
सर्वांना हिताचा मार्ग सापडो....

- पियुष खोब्रागडे..




सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा