शुक्रवार, १९ मे, २०१७

महायानाची मूलभूत ओळख : २


 सदर लेख हा बुध्द पाैर्णिमेच्या दिवशी लिहिलेला असुन आज प्रकाशित करण्यात येत आहे..



महायानाबाबत सुरूवातीला माझा दृष्टिकोन कधीही अनुकूल नव्हता, माझ्या ठायी असलेल्या अज्ञानामुळे मी सतत टीका करीत असे. (धर्म त्याबद्दल क्षमा करो) पण जेव्हा अनुभुतीने जाणले की महायान नेमके काय आहे, तेव्हा मनातून ध्वनी निर्माण झाला (कोणी काहीही म्हणो पण)  महायानासारखा श्रेष्ठ धर्ममार्ग जगात दुसरा नाही  (ही माझी अनुभूती आहे इतरांची वेगळी असू शकते याचा अर्थ असा नव्हे की इतर धर्म - संप्रदायांना मी कमी लेखतो, पण इतके मात्र म्हणेन की कोणाचीही महायानाशी तुलना होऊ शकत नाही even जो श्रावकयानी पारंपारिक प्रचलित बाैध्द धर्म आहे, तो महायान बाैध्द धर्माच्या तुलनेत मागे आहे असे माझी अनुभुती सांगते.) अनेकांना महायान म्हणजे नेमके काय हे माहित नसेल तर काहींनी ते नाव यापुर्वी ऎकले असेल. त्या सर्वांसाठी सांगतो,  भगवान बुध्दांची शिकवण हि तीन  भागात विभागली आहे : 

१. श्रावकयान, 
२. प्रत्येक बुध्दयान तसेच 
३. बोधीसत्त्वयान.. 

यातील बोधीसत्त्वयान हे महायान आहे आणि महायान हे बोधीसत्त्वयान.. ज्याचा उपदेश भगवान बुध्दांनी सामान्य मानवांच्या साठी नाही, तर बोधीसत्वांच्या साठी केला आहे. (अर्थात कोणीही बोधीसत्त्वत्व प्राप्त करु शकते) असा हा धर्ममार्ग अनेक पैलुंनी श्रेष्ठ ठरतो, त्यांच्यातील मुख्य म्हणजे त्यामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग. 


इतर धर्म संप्रदायामध्ये तुम्हाला सामील करुन घेण्यासाठी विशेष प्रकारची प्रलोभने दाखवितात, नरकाची भीती दाखवितात आणि त्यानुसार एखादे निरुपयोगी कर्म कांड करुन धर्म परिवर्तन केले जाते. अनेकदा मनुष्याला ते त्याच्या जन्मासहच प्राप्त होते. अर्थात तथाकथित धर्म - संप्रदाय मानणाऱ्या माता पित्याच्या पोटी जन्म झाला की, तो विशिष्ट धर्म - संप्रदायाचा म्हणून ओळखला जातो, मग त्याच्याद्वारे धर्माचे आचरण केले जाते किंवा नाही याला विशेष महत्व नाही.. पण महायानाच्या बाबतीत मात्र तसे नाही, इथे प्रवेश मिळवून घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागते. त्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला सिध्द करुन दाखवावे लागते की ह्या मार्गावर चालण्यासाठी मी सक्षम आहे, तेव्हाच महायानात प्रवेश मिळतो. त्या प्रवेश परीक्षेचे नाव आहे बोधीचित्तोत्पाद अर्थात बोधीचित्ताची प्राप्ती. बोधीचित्ताची  निर्मिती. बोधीचित्त हे महायानाचे प्रवेशद्वार आहे, तुमच्याकडे बोधीचित्त असेल तर तुम्ही महायानात आहात, आणि तुमचे बोधीचित्त नष्ट झाले तर तुम्ही महायानातुन भ्रष्ट झालेत. असा त्याचा अर्थ आहे..


आपल्या सामान्य मानवांच्या चित्तामध्ये आणि बोधिचित्तामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. आसक्तीच्या महासागरात बुडालेले आपले मन बोधीचित्तासारखा उदात्त विचार करु शकत नाही. सामान्य चित्त आणि बोधीचित्त यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी महायानात केल्या जाणाऱ्या बोधीसत्त्वांच्या प्रार्थनांचे मी केलेले मराठी भाषांतर येथे देत आहे.


पण ह्या प्रार्थनांना वाचण्यापुर्वी काही गोष्टी जाणून घ्या :
 
१. महायान हा केवळ प्रार्थनांवर आधारित धर्म नसून एक प्रयत्नवादी धर्ममार्ग आहे- भक्तीमार्ग नाही. ह्यामध्ये कोणत्याही ईश्वराची किंवा भगवान बुध्दांची भक्ती केली जात नसुन ज्या काही प्रार्थना केल्या जातात त्या धर्ममार्गावर चालतांना किंवा चालण्यासाठी  आपल्या चित्ताचा विकास व्हावा यासाठी..

२. ह्या प्रार्थना काही पोकळ शब्द नसून तो बोधीचित्त प्राप्त जीवांच्या हृदयातुन निघालेला ध्वनी अाहे. त्या प्रार्थना त्या सर्वांच्या चित्ताची मानसिक अवस्था प्रदर्शित करतात.

३. सामान्य मानवी चित्त प्राप्त जीवांना कदाचिर वाटेलही, असे होऊ शकणार नाही. ह्या प्रार्थना केवळ म्हणण्यापुरता मर्यादित आहेत. पण तुम्ही चुकत आहात. कारण ह्या मार्गावर चालण्यास सिध्द अशा प्रत्येक जीवांना ह्या प्रार्थना उर्जा प्रदान करतात, हे मी स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे सांगत आहे..

४. ह्या प्रार्थना केवळ महायानात प्रवेश केलेल्या बोधीचित्त प्राप्त जीवांसाठी आहेत, सामान्य व्यक्तीचे चित्त त्यांचा भार पेलण्यासाठी सक्षम नाही.
 


महायानाच्या काही प्रार्थनांचे मराठीत केलेले भाषांतर पुढीलप्रमाणे :

🌷 चतुर्ब्रह्मविहार 🌷


१. सर्व जीवांना सुख लाभो, सुखाची कारणे लाभोत...

२. सर्व जीव दुःखापासून आणि दुःखाच्या कारणापासुन मुक्त होवोत.

३. सर्व जीव सुखापासुन दुर न होवोत, ज्याला दुःखमुक्तीचा म्हणतात..

४. सर्व जीव समतोल वृत्तीमध्ये विहार करीत, तृष्णा व तिटकारा यांच्यापासून मुक्त होवोत.

🌷 चार प्रतिज्ञा 🌷


१. जीवसृष्टी अनंत आहे, तिला भवसागर नेण्याची प्रतिज्ञा करुया..

२. आपणांत असंख्य दोष आहेत, त्यांना नष्ट करण्याची प्रतिज्ञा करुया..

३. धर्माचे द्वार अनंत आहेत, त्या सर्वांचे आकलन करण्याची प्रतिज्ञा करुया...

४. जागृती (बोधी) अतुल्य आहे, ती साध्य करण्याची प्रतिज्ञा करुया..

🌷 बोधीसत्वाच्या आचारसहिंता 🌷


ज्याप्रमाणे श्रावकयानामध्ये गृहस्थांना पंचशीलांची आचारसहिंता भगवान बुध्दांनी सांगीतली आहे, अगदी त्याचप्रमाणे महायानात बोधीसत्त्वांसाठी ३७ आचारसहिंता सांगितलेल्या आहेत. आपल्या बोधीचित्ताचे रक्षण करण्यासाठी व महायानावर आरुढ राहण्यासाठी ह्या आचारसहिंतांचे पालन अत्यंर आवश्यक आहे. लेखाची वाढती लांबी पाहता मी त्यांच्यापैकी काहीच इथे देतो.

💐 प्रिय व्यक्तींच्या बद्दल असलेली आसक्ती पुराच्या प्रवाहाप्रमाणे चिरडून टाकते तर शत्रूंच्या बद्दल असलेला द्वेष अग्नीप्रमाणे जाळून टाकतो. या गोंधळामध्ये काय स्वीकारायला पाहिजे हे आपण विसरतो, गृहभुमी सोडणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 कोणत्या देवांना शरण जात आहात...? जे स्वतःच बंधनात (संसारचक्रात)  अडकले असतांना ऎहिक देव तुमचे रक्षण करण्यास समर्थ आहेत का ..? त्यांच्याद्वारे रक्षित केल्या गेलेल्यांचे रक्षण करण्यास जे कधीच चुकत नाहीत अशा त्रिरत्नांना शरण जाणे - हि बोधीसत्त्वांची साधना आहे.

💐 अनादि काळापासुन तुमच्या माता तुमच्यावर प्रेम करीत आल्या आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः आनंदित असण्याला अर्थ काय..? अनंत लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी बोधीचित्ताची प्राप्ती करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सर्व दुःख तुमच्या आत्मसुखाच्या कामनेतुनच उत्पन्न झाले आहेत. सर्व जीवांना मदत करण्याच्या विचारातूनच सम्यक संबुध्दांची निर्मिती झाली आहे. दुसऱ्यांच्या दुःखासोबत स्वतःच्या सुखाची अदलाबदली करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखाद्याने जरी तीव्र इच्छाशक्तीने तुमची सर्व संपत्ती लुटली, त्याला तुमचे शरीर संपत्ती किंवा जे काही पुण्य कर्म केलेले आहेत किंवा करणार अाहात, ते सर्व समर्पित करा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुम्ही काहीच चुकीचे केले नसतांना सुध्दा जर कोणी तुमचे डोके उठविण्याच्या प्रयत्नात असेल तेव्हा करुणायुक्त चित्ताने त्याची सर्व पापकर्म स्वतःच्या अंगावर घ्या - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अत्यंत वाईट आणि चुकीच्या किंवा खोट्या गोष्टींचा प्रचार अगदी तीन हजार लोकांमध्ये  करीत असेल., तरीसुध्दा प्रितीयुक्त चित्ताने त्याच्या कार्यक्षमतेची स्तुती करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जर तुमचा कोणी उपहास करीत सार्वजनीक ठिकाणी तुम्हाला वाईट किंवा टोचून बोलत असेल, त्याला तुमचा कल्याणमित्र समजुन नम्रतेने अभिवादन करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमच्या समान किंवा कनिष्ठ असलेला (त्यांच्या आंधळ्या) गर्वामुळे तुच्छतापुर्वक बोलत असेल, तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे त्याच्यापुढे नतमस्तक व्हा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जरी तुम्हाला कोणाचाही आधार नसेल, सर्वजण तुमचा तिरस्कार करीत असतील. भयंकर आजाराने ग्रस्त आणि वाईट शक्तींनी तुमच्यावर अतिक्रमण केला असेल तरी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या निराशेने व्यथित न होता सर्व जीवांची दुःखे आणि पापकर्मे अंगावर घेणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमची किर्ती दुरवर पसरलेली असेल आणि अनेक लोक तुमचा गाैरव. करत असतील, धनाची देवता कुबेरा इतके जरी तुम्ही धन प्राप्त केले असेल . तरी ऎहिक लाभांना कसलेही सार नाही हे जाणा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुमचा खरा शत्रू असलेल्या रागावरच तुम्ही विजय मिळवू शकले नाहीत, तर बाह्य शक्तींवर विजय मिळविल्यावर सुध्दा त्याची वृध्दीच होईल. प्रेम आणि करूणेच्या सत्तेखाली मनाला आणणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 दुःखाचे सर्व प्रकार हे तुमच्या मुलाच्या मृत्यूचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. , ह्या गोंधळाला सत्य समजल्यावर तुमचे अश्रु गळतीला.  जेव्हा तुम्हाला वाईट प्रसंगाला सामोरे  जावे लागेल तेव्हा त्यांचा स्वप्नातील गोंधळ समजून त्याग करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सम्यक संबोधी प्राप्तीची कामना करणाऱ्यांना त्यांच्या शरीराला सुध्दा दान करावे लागते. तेव्हा तुमच्या सामान्य गोष्टींच्या  विषयी बोलण्याची आवश्यकताच काय..?  कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची कामना न करता दान देणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  नैतिक आचारसंहिते शिवाय तुम्ही स्वतःचे सुध्दा कल्याण करु शकत नाही, तर इतरांच्या कल्याणाची कामना करणे हा विनोदच आहे. ऎहिक आकांक्षांचा त्याग करुन आपल्या नैतिक आचारसंहितेचे रक्षण करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 शीलांच्या वृध्दीची कामना करणाऱ्या बोधीसत्वांसाठी, तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करणारा जीव हा एक अमूल्य खजीनाच आहे, सर्वांच्या बाबतीत सहनशिलतेची वृध्दी करणे, चिडचिड आणि संतापापासुन सदैव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  स्तुती आणि आदराची कामना हे भांडसे निर्माण करण्यासाठी कारणीभुत असतात; अभ्यास , स्मृती आणि ध्यान त्याने नष्ट होते. यामुळे मित्र, नातेवाईक आणि मदत करणाऱ्यांच्या प्रति असलेल्या आसक्तीला नष्ट करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 वाईट शब्द इतरांच्या चित्तांची शांती भंग करातात ; जे बोधीसत्वांच्या आचरणाला निकृष्ट करण्यासाठी कारणीभूत होतात. त्यामुळे इतरांना वाईट वाटणाऱ्या असह्य शब्दांचा वापर न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देता किंवा इतर बोधीसत्वांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार करता , तेव्हा तुम्ही स्वतःलाच ढासळवत आहात. महायानामध्ये प्रवेश केलेल्यांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार न करणे  - ही बोधीसत्वांची साधना आहे.

💐 अनंत जीवांच्या दुःखांना नष्ट करणे, तिन्ही लोकांच्या शुध्दतेला जाणे, सम्यक संबोधीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतांना प्राप्त झालेल्या पुण्यांना समर्पित करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

- 37 Practices of Bodhisattva (मराठी अनुवाद : पियुष खोब्रागडे)



🌷 बोधीचित्त 🌷


१. ज्याप्रमाणे बुध्द आणि महाबोधीसत्वांनी महासंबोधीच्या चित्ताला निर्माण केले, अगदी त्याचप्रमाणे मी सुध्दा आतापासुन जेव्हापर्यंत सम्यक संबोधीच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हापर्यंत बोधीचित्ताची निर्मिती करेन. रक्षित नसलेल्यांचे रक्षण करण्यासाठी, बंधिस्तांना मुक्त करण्यासाठी,  थकलेल्यांना आराम देण्यासाठी आणि दुःखाच्या पार न गेलेल्यांना दुःखाच्या पार नेण्यासाठी ...

२. जेव्हा जगामध्ये अस्वस्थता वाढायला लागेल तेव्हा अनंत जीवांच्या शोकांना नष्ट करण्यासाठी, वाईट मार्गावर जाण्यापासून अडविण्यासाठी, दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि दुःखाच्या अनेक कारणांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी निःस्वार्थी अशा बोधीचित्ताची निर्मिती करेन..

३. सर्व निराधार जीवांसाठी मी शरण व्हावे, ज्यांचा कोणीही रक्षण करणारा नाही, असामचा रक्षणकर्ता व्हाचे. ज्यांचा कोणी आधार नाही त्यांचा आधार व्हावे. आरक्षित, दुःखी, कष्टी जीवांसाठी शरण व्हावे, शांतीचे कारण व्हावे..

४. ह्या अथवा पूर्वीच्या जीवनात माझ्याद्वारे जे काही कुशल कर्म केले गेले आहेत, इत्यादी (अशा सर्व पैलुंचा संग्रह जो मला प्राप्त झाला आहे) ज्याला पुण्य आणि प्रज्ञा म्हटले जाते. तसेच सहा पारमितांची भावना करित असतांना माझ्याद्वारे जे काही प्रयत्न कुशल कर्म) केले गेले असेल, त्यांचा लाभ जगातील सर्व जीवांना होवो. त्यांच्याद्वारे अनंत लोकांच्या शोकाचे नाश होऊन तते मुक्त होवोत. 

५. दुर्गतीच्या दुःखापासून मुक्ती आणि सर्व जीवांच्या द्वारे करण्यात आलेल्या पुण्याचे मी अानंदाने  अनुमोदन करतो. सर्व दुःखी जीव सुखी होवोत, जेवढे शरीरधारी जीव आहेत, त्यांच्या सांसारिक दुःखापासून मुक्तीचे अनुमोदन करतो..

६. सर्व जीवांना सुख देणारे व सर्व जीवांच्या कल्याण करणाऱ्या बोधीसत्वांच्या चित्तोत्पाद सागराचे अनुमोदन करतो. सर्व दिशांना विद्यमान असलेल्या बुध्दांना हात जोडून प्रार्थना करतो की त्यांनी  दुःखाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या प्रती मोहभावनेने धर्मदीप प्रज्वलित करावा.

७. निर्वाण मार्गावर आरुढ असलेल्या बुध्दांना हात जोडून वंदना करतो की, त्यांनी अनंत काळापर्यंत मरणाला स्वीकारु नये. त्यामुळे जगात अंधकार पसरणार नाही. अशाप्रकारे हे सर्व कर्म करून मी जे काही पुण्य प्राप्त केले आहे, त्याद्वारे सर्व प्राण्या दुःखाला नष्ट करणारा मी होऊ शकेन. 

८.  दुःखीतांचे जीवन पूर्णपणे नष्ट होईपर्यंत मी रोगी लोकांच्या करिता आैषध व्हावे, वैद्य व्हावे, परिचारक सुध्दा व्हावे. भुकेने व्याकुळलेले व तहाणलेले असतील त्यांचे दुःख ; भोजन व पाण्याचा वर्षाव करुन दुर करावे आणि ह्या दुष्काळा नंतर अनेक कल्पांपर्यंत त्यांचे भोजन व्हावे. 

९. दरिद्री लोकांच्या करिता मी कधीही न ससंपणारे साधन व्हावे आणि विविध प्रकारच्या साधनांनी त्यांच्यासमोर हजर रहावे. मी माझ्या शरीराचे भोग व तिन्ही काळातील सर्व पुण्याचे अासक्तिविरहीत भावनेने सर्व जीवांच्या अर्थसिध्दी करीता त्यांच्या कल्याणासाठी दान करायला तयार आहे. 

१०. संपुर्ण त्याग म्हणजेच निर्वाण आहे आणि माझे मन निर्वाण प्राप्त करण्यास इच्छुक आहे. जर मला संपुर्ण त्याग करायचाच आहे तर या शरीरालाच ; जीवांना दान देणे हेच उत्तम आहे. सर्व जीवांना सुखाची प्राप्ती होईल, त्याप्रमाणे मी माझ्या शरीराला दान केले आहे., तेव्हा त्यांना जेव्हा वाटेल ते याला मारून शकतात, याची निंदा करु शकतात किंवा यावर धुळ फेकु शकतात. 

११. ते माझ्या शरीराशी खेळलेही किंवा विलास सुध्दा केला तरी मला त्याची काय पर्वा..? कारण मी त्यांना आपले शरीर दान दिले आहे. त्यांना माझ्या शरीराच्या ज्या - ज्या कार्यापासुन सुख प्राप्त होत असेल, ते ते कार्य ह्या शरीरापासुन घेऊ शकतात, कारण माझ्यामुळे कोणाचेही अहित होऊ नये.

१२. जे कोणी माझे निंदक असतील आणि जे कोणी अपकारक असतील आणि अाणखीही जे कोणी उपहास करणारे असतील ते सर्व बोधीला प्राप्त व्हावेत. जे अनाथ आहेत, त्यांचा मी नाथ व्हावे, तसेच पार जाणाऱ्यांची नाव सेतु व वाहक व्हावे. जीवांसाठी मी चिंतामणी रुपी उत्तम घर व्हावे, सिध्द व्हावे महान आैषधी व्हावे, तसेच कल्पतरु आणि कामधेनु व्हावे. 

१३. ज्याप्रमाणे पृथ्वी इत्यादी चार महाभुत हे अनंत आकाशापर्यंत व्याप्त अप्रमेय जीवांकरीता मी तोपर्यंत विविध प्रकारे आधार व्हावे, जोपर्यंत सर्व जीव मुक्त होत नाहीत. जसे आधी बनुन गेलेल्या सुगतांनी बोधीचित्ताला प्राप्त केले तसेच त्यांनी बोधीसत्वांच्या आचारसहिंतेचे पालन केले, त्याचप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी मी बोधीचित्ताला उत्पन्न करुन त्या शिकवणीला त्याच क्रमाने स्वीकार करेन.  

- बोधीसत्त्वचर्यावतार (आर्य शांतीदेव)

Do even fathers and mothers Have such a benevolent intention as this? Do the gods and sages? Does even Brahma have it?

इतक्या महान प्रार्थना कोणत्या धर्ममार्गात केल्या जातात का..? जिथे प्रत्येक जीव केवळ स्वतःच्याच हितासाठी प्रार्थना करतात आणि त्याद्वारे इतरांना हानी होत आहे किंवा नाही ह्या साध्या गोष्टींकडे सुध्दा त्यांचे लक्ष जात नाही. पण बोधीसत्त्व मात्र सर्व विश्वाच्या कल्याणासाठी स्वतः समर्थ बनण्यासाठी साधना करतात त्यासाठी ते त्यांच्या जीवनाचे दान देण्यासाठी सुध्दा मागे पुढे पाहत नाही.
वरील सर्व गोष्टी सांगण्यासाठी आज काही महायानाचा दिवस नाही परंतु बोधीसत्त्व सिध्दार्थाच्या सम्यक संबोधी प्राप्तीचा दिन मात्र आहे. ज्या दिवशी अनंत लोकांच्या कल्याणाच्या अकृत्रिम अभिलाषेसह अनेक पारमिता पूर्ण करुन बोधीसत्त्व सिध्दार्थाने सम्यक संबोधीची प्राप्ती केली. त्या ध्येयापर्यंत पोहोचतांना बोधीसत्त्व ह्याच मार्गावरून गेले, त्याबद्दल सामान्य माहिती होण्यासाठी ह्या लेखाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
 सर्व जीव सुखी होवोत, सर्वांना हिताचा मार्ग सापडो* 🙏🏻🙏🏻

-  © पियुष खोब्रागडे

      १०.०५.२०१७




www.buddhistsofindia.blogspot.in 

® सदर लेख कोणत्याही माध्यमांच्या द्वारे शेयर करतांना ह्या Blog चा URL सोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सर्व हक्क सुरक्षित...



+++

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा