गुरुवार, २५ जून, २०१५

स्त्रीयांच्या बाबतीत बुद्धांची वचने

 बुध्द, धर्म आणि संघ ह्या त्रिरत्नांच्या प्रती अनेक लोकांमध्ये बरेच समज - गैरसमज आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे अनेक स्त्री - वादी लोक भगवान बुध्दांना भारतीय स्त्रियांच्या अवनतीचे कारण मानतात. त्यांच्यामते भगवान बुद्धांनी आपल्या संघातील भिक्खुणी साठी जे काही नियम केले होते, त्याने भारतीय स्त्रीया ह्या गुलामगिरी मध्ये तर ढकलल्या गेल्याच, पण त्यातून बुद्धांची स्त्री विषयक मान्यता समजते ति म्हणजे, भगवान बुद्धांना स्त्री - पुरुष समानतेचा गंध मुळीच नव्हता, यावर स्त्री जन्म वाईट असतो, स्त्रीया पुरुषांच्या गुलाम असतात. वास्तवात धर्म कसल्याही प्रकारची विषमता शिकवीत नाही, मग ति जाति - आधारित असो किंवा लिंग - आधारित.  स्त्रीचा जन्म वाईट असतो किंवा स्त्रीया पुरुषांची गुलाम असतात असे त्रिपिटकात बुध्दांचे एकही वचन नाही, याउलट स्त्री जन्माची बुध्द स्तुती करतात, स्त्रीया ह्या श्रेष्ठ असतात, असे सांगणारी अनेक बुध्दवचने आहेत.

विरोधक ज्या आठ गुरुधर्मांच्या बद्दल बोलतात, त्याबद्दल काहीही बोलण्यापूर्वी त्यांनी त्या आठ गुरुधार्मांची चिकित्सा करावी. कारण बुध्द चिकित्सा नाकारत नाहीत, जेव्हा त्यांनी स्वतःची सुध्दा चिकित्सा करण्याचा उपदेश केलेला आहे. तथागतांची (शास्त्याची) चिकित्सा करा... (ते सुध्दा सर्व अंगांनी, स्वतः धर्मसुत्तांचा आणि धर्मविनयांचा अभ्यास करून, कारण धर्म इतका व्यापक आहे कि, केवळ इतरांची पुस्तके वाचून तो समजणार नाही, त्यासाठी स्वतः अध्ययन करावे लागेल.) आठ गुरुधर्मांची चिकित्सा करीत असतांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कि, जेव्हा भगवान बुध्द कोणताही विनय (भिक्खू - भिक्खुणीचे पातिमोक्ख नियम) बनवीत असतांना, ते केव्हा आणि कशाप्रकारे बनवावे, याचाही त्यांचा स्वतःच एक नियम आहे. तो नियम भगवान बुद्धांनी भद्दाली नावाच्या भिक्षुला सांगितला तो याप्रमाणे :

          भद्दाली, जोपर्यंत संघामध्ये धम्म दोष निर्माण होत नाहीत, तोपर्यंत शास्ता श्रावकांसाठी शिक्षापदे (नियम) घालुन देत नाही. भद्दाली, जेव्हा अशा प्रकारचे काही दोष निर्माण होतात, तेव्हा त्या दोषांना दुर करण्यासाठी शास्ता श्रावकांसाठी नियम घालुन देतो..

भगवान बुध्दांनी भिक्षुंसाठी २२७ तर भिक्षुणीसाठी ३३१ विनय सांगितलेले आहेत, आणि ते सर्व विनय पूर्वी बनविलेले नव्हते तर त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण झाला होता म्हणुन बनविले. कोणता विनय कोणत्या कारणासाठी बनविला गेला, याच्या अर्थकथा अस्तित्वात आहेत. ह्या आठ गुरुधर्मांपैकी पहिल्या गुरुधर्माची जन्मकथा अस्तित्वात नाही किंवा भिक्षुणी पातिमोक्खामध्ये सुध्दा त्याला स्थान नाही. त्यामुळे हे गुरुधर्म भगवान बुद्धांच्या नंतर निर्माण झाले असावेत असे डॉ. धर्मानंद कोसंबी तसेच स्थाविरवादी देशातल्या अनेक विद्वानांचे मत आहे. असो...

१. उपसंपदा होऊन  १०० वर्षे झालेल्या भिक्खुणीने उपसंपदा होऊन १ दिवस झालेल्या भिक्खुला वंदन करावे.  हा प्रथम गुरुधर्म आहे. याबाबीत धम्माच्या विश्वकोशा मध्ये लिहिले आहे, Many Buddhists, especially from the modern Theravada views have found evidence that the 8 Gurudharmas are not really from the teaching of Buddha. The Vinaya recounts the story of six monks who lifted up their robes to show their thighs to the nuns. When the Buddha learned about this, he made an exception to that rule and told the nuns not to pay respect to these monks. A nun then, does not have to bow to every monk but only to a monk who is worthy of respect.

बुध्दांच्या काळात आणि नंतरही भिक्षुणी ह्या आठ गुरुधर्मांचे पालन करीत होते याचे संदर्भ सापडत  नाही. याउलट अनेक विद्वान भिक्षुणींनी भिक्षुंच्या पुढे धम्मपरिषदे मध्ये उपदेश केल्याचे उल्लेख मात्र जागोजागी सापडतात. जर बुद्धांच्या काळात तो गुरुधर्म अस्तित्वात असता तर असे संदर्भ आपल्याला सापडणे अशक्य असते. बुध्दकाळापासून ते अगदी आजच्या आधुनिक युगामध्ये सुध्दा भिक्षुणी आठ गुरु धर्मांचे पालन करतांना दिसत नाहीत. (जगातील एकमेव बौध्द राष्ट्र असलेल्या थायलंड चे भिक्षु - भिक्षुणी जेव्हा धम्मदीक्षा दिनी दीक्षाभुमी, नागपुर येथे आले होते, तेव्हा एक भिक्षुणी थायलंड आणि भारताच्या भिक्षु संघाला धम्माचा उपदेश करीत होत्या, आणि सर्व भिक्षु तिच्या पाया पडत होते, हे मी स्वतः बघितले आहे. )


स्त्रीयांच्या बाबतीत काही बुध्दवचन :

१. मुलीच्या जन्माने उदास होऊ नका, एखादी स्त्री देखील पुरुषा पेक्षा श्रेष्ठ असते. (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथ वग्ग, कोसल संयुत्त - मल्लिका सुत्त)

२. धम्म महत्त्वाचा, स्त्रीत्व अथवा पुरुषत्व नव्हे. स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरुपातील यान असते, ती व्यक्ती या यानाद्वारे निर्वानाजवळ पोहोचते. (यस्स एतादिसं यानं, इत्थिया पुरिसस्स वा ! स वे यानेन, निब्बानस्सेव संतिके'ति !!) (संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त, आदित्तवग्ग, अच्छरासुत्त)

३. पत्नी हि सखी आहे, दासी नाही. (संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त, जरावग्ग, वत्थुसुत्त)

 ४. गुणसंपन्न, बहुश्रुत, धम्मधर भिक्खुनी व उपासिका म्हणजे संघाची शोभा.. (संदर्भ : अंगुत्तर निकाय, चतुक्कनिपात, भंडगाम वग्ग, सोभन सुत्त)

५. निर्वाण मार्गावर चालत असतांना माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय ... ? माराचा नाश करण्यासाठी माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय..? (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथवग्ग, भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा..)

६. धम्मामुळे आत्मविश्वास वाढला, समाजामध्ये इतरांकडुन घाबरविल्या जाणाऱ्या स्त्रीयांनी, समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविले. (संदर्भ : उपरोक्त)

७. शुक्रा नावाची भिक्षुनी मोठ्या धम्मपरिषदेमध्ये (हजारो भिक्षु - भिक्षुनीं समोर) धम्माचा उपदेश करीत होती, तो उपदेश अमृतासारखा आहे. (संदर्भ : यक्षसंयुत्त, पठमसुक्का सुत्त)

८. खेमा भिक्षुणी बद्दल, 'ती अत्यंत विद्वान, सुस्पष्ट भुमीका असलेली, बहुश्रुत, उत्तम वक्तृत्व असलेली आणि समंजस आहे, अशी तिची कीर्ती आहे. महाराजांनी तिच्या सेवेत उपस्थित रहावे.' (संदर्भ : संयुक्त निकाय, अव्याकृत संयुत्त, खेमा सुत्त)

९. "कंजगलिका भिक्षुणी उपासकांना उपदेश करते..." तथागत म्हणाले, साधु, साधु, गृहपतींनो, भिक्षुणी कंजगलिका अत्यंत विद्वान आहे, महाप्रज्ञावान आहे. तुम्ही माझ्याकडे येऊन मला विचारले असते तरी मी सुध्दा हेच सांगीतले असते, (संदर्भ : अंगुत्तर निकाय, दस्सक निपात, महावग्ग, दुतिय महापञ्हा सुत्त)

१०. प्रतिष्ठित लिच्छवींसाठी आम्रपालीचे भोजन नाकारले नाही. त्यांनी आम्रपाली गणिकेच्या जीवनाला स्वर्ग बनविले. भगवानांनी तिच्यासाठी किती अमुल्य कार्य केले हे तिच्या थेरीगाथां शिवाय कसे समजणार ... ? (संदर्भ : दिघनिकाय, महापरिनिब्बाण सुत्त/ थेरीगाथा)

११. भगवानांनी गणिकेला परिव्राजिका बनविले, तर विरोधकांनी परिव्राजिकांना गणिका बनविले. तथागतांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी कारस्थाने केली गेली. (उदा. - चिंचा आणि सुंदरी परिव्राजीका, धम्मपद अट्ठकथा, १३- लोकवग्ग, गाथा क्रं. १७६ ) (उदानपाळी, मेघिय वग्ग, सुंदरी सुत्त...)

१२. पापी मार : जे स्थान ऋषींना सुध्दा प्राप्त करता आले नाही, जे इतरांच्याद्वारे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण आहे, ते तुझ्यासाखी दोन बोटांएवढे प्रज्ञा असणारी स्त्री कसे प्राप्त करेल..?
सोमा भिक्षुणी : चित्त सुस्थीतीत असतांना, ज्ञान उपस्थित झाले असतांना, धर्माची सम्यक विपश्यना घडली असतांना, माझे स्त्रीत्व काय करेल..? भगवान बुध्दांनी भिक्षुणींमध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळे सोमा भिक्षुणी पापी माराला असे बोलु शकली. (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथवग्ग, सोमासुत्त)

१३. भगवान बुध्द धम्मदिनेची स्तुती करतात. (मज्झीम निकाय ४४)

          वरील वचनांवरून ठरवा भगवान बुध्दांचा धम्म हा स्त्रीयांच्या विकासासाठी कारणीभुत ठरला कि, त्यांच्या खच्चीकरणासाठी..? बुध्दांच्या धर्मामुळे तत्कालीन भारतीय समाजामध्ये स्त्रीया ह्या गुलामगिरीत ढकलल्या गेल्या असे तुम्हाला वाटते का..? ज्या काळात पुरुष प्रधान व्यवस्थेने स्त्रीयांचे जीवन अत्यंत किळसवाणे केले होते, त्या काळात भगवान बुध्दांनी स्त्रीयांना आपली प्रतिभा प्रकट करण्यासाठी वाटा उपलब्ध करुन दिल्या. ज्या समाजामध्ये आपल्या गर्भात जन्मलेली मुलगी सुध्दा शाप मानले जायचे, त्याच काळात मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. पती हि दासी नव्हे, तर तुमची मैत्रीण आहे, तिला सखीप्रमाणेच वागवा, तिच्यावर अन्याय अत्याचार करु नका, हे भगवान बुध्दांनी त्या काळात सांगीतले. ज्या समाजात भात शिजला कि नाही, याद्वारे स्त्रीयांच्या प्रज्ञेचे दोन बोटांमध्ये वर्गीकरण केले जायचे. तिच स्त्री भगवान बुध्दांच्या पासुन मिळालेल्या आत्मविश्वासा मुळे संपुर्ण समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविणारी ठरली.

          वास्तवात, स्त्री पुरुष समतेचा आधुनिकतेला तरी गंध आहे का ...? आजच्या आधुमिक युगापेक्षा बुध्दकाळ हा भारतभुमीचा स्वर्गकाळ होता. तो काळ आजच्या पेक्षा किती तरी पुरोगामी आणि श्रेष्ठ होता. त्यांच्या काळात बुध्दांनी एका वेश्येला आपल्या संघात मानाचे स्थान दिले, या काळात तो मिळतो का..? भगवान बुध्दांनी एका विधवेला आपल्या संघात मानाचे स्थान दिले., पण आमच्या (आधुनिक.?) काळात त्या मानाच्या स्थानाची गोष्टच सोडा, इथे हजारो वर्षांच्या नंतर सुध्दा विधवेला सती जावे लागत असे., केसं कापावी लागत होती. इथे ह्या आधुनिक काळात नवरा त्याच्या बायकोला दारु पिऊन मारहाण करतो, तिची तिला दासीप्रमाणे वागवितो, पत्नी सुध्दा काही कमी नाही. ती तिच्या पतीवर खोट्या केसेस लावते., पण बुध्दांनी मात्र पती पत्नीला मित्र - मैत्रीणींसारखा राहण्याचा उपदेश केला होता. मग कोणता काळ पुढारलेला, आणि कोण खरे पुरोगामी..

          निश्चितच आजच्या समाजापेक्षा त्याकाळचे लोक अधिक सुसंस्कृत होते. मनुष्य फार आळशी प्राणी आहे, त्याला प्रगतीचा तिटकारा आहे, ह्यामुळेच तो प्रगती कडुन अधोगतीकडे जातो...
.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...हे सुध्दा वाचा : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा