शुक्रवार, ८ मे, २०१५

धर्माची व्याख्या.....


धर्म हा आपल्या भारतीयांचा सर्वात जवळचा शब्द आहे. आज कित्येक लोक स्वतःला धार्मिक समजणारे आहेत, तसेच धर्माला शिव्या देणारे सुध्दा भरपूर आहेत. परंतु वास्तविक पाहता यांच्यापैकी कित्येक लोकांना धर्माचा खरा अर्थच माहित नाही. त्यांच्यातही जे स्वतःला धार्मिक आणि महाधर्माभिमानी सांगतात ते अज्ञानामुळे त्यांच्या अधर्माला सुध्दा धर्म असे म्हणतात, खरंतर स्वतःला धर्माभिमानी समजणारे लोक धर्माच्या सांप्रदायिक भावना जोपासत असतात कारण धर्म द्वेष करायला शिकवित नाही, धर्म जगावर प्रेम करायला शिकवितो.

साधारणतः 'धर्म' ह्या शब्दाचा अर्थ आपण रिलीजन किंवा संप्रदाय असा घेतो. संप्रदाय म्हणजे धर्म नव्हे. प्रत्येक व्यक्तीचा हा स्वतःचा असा एक वैयक्तीक धर्म असतो, जो त्याच्या जन्मावरून नव्हे तर शरीर, वाणी आणि मनाने केल्या जाणाऱ्या कर्मावरून ठरत असतो. याउलट रिलीजन किंवा संप्रदाय हा जन्माधारीत असतो, जो व्यक्ती कोणत्या कुटुंबात जन्मला यावरुन ठरतो, जसे मुस्लीम मातापित्यांचा मुलगा मुस्लीम, ख्रिश्चन मातापित्यांचा मुलगा ख्रिश्चन, इत्यादी, फार तर एखादे कर्मकांड करुन आपल्याला आपला रिलीजन (संप्रदाय) बदलवता येतो. त्याला आपण बाप्तिस्मा, दीक्षा, सुंता, इत्यादी नावे देतो. परंतु धर्माचे तसे नाही, तो कर्माधारीत आहे जन्माधारीत नाही. तुम्ही अधर्मी की सध्दर्मी हे तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार ठरत असते.

धर्म : भगवान बुध्द आणि सम्राट अशोकाची व्याख्या

बुध्द शासनाप्रमाणे धम्म किंवा धर्म ह्या शब्दाचा अर्थ रिलीजन किंवा संप्रदाय असा होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणीला कधीही बौध्द धर्म म्हटले नाही, त्यांनी केवळ धम्म (धर्म) असे म्हटले, आणि आपल्या अनुयानांना धम्मिक (धार्मिक). अर्थात जो धर्माचे (निसर्ग नियमाचे/ नीतीचे) आचरण करतो तो धार्मिक , मग तो कोणत्याही जाती, संप्रदाय किंवा वर्णाचे अथवा देशाचा का असेना. धर्म विश्वव्यापी आहे, सनातन आहे, त्याला काळाची, प्रदेशाची मर्यादा नाही, तो वैश्विक आहे. तसे नसते तर तो संप्रदाय बनला असता. धम्म किंवा धर्म म्हणजे निसर्गाचे नियम, धर्म म्हणजे विश्वाचे सत्य, जे सम्यक संबुध्दांनी (संपुर्ण जागृतांनी) आपल्या अनुभुतीने जाणले, आणि तेच जगाला सांगितले. त्यामुळे बुध्दांच्या शिकवणीला धर्म म्हटल्या गेले कारण बुध्द निसर्गाचे नियमच सांगतात.
जसे -
न हि वेरेन वेरानि समंतिध कुदाचनं
अवेरेन च समंति एस धम्मो सनंतनो

अर्थात, वैराने वैर शांत होत नाही, ते अवैरांच शांत होते हाच सनातन धर्म (निसर्गाचा नियम) आहे.

धर्माचा दुसरा पैलु म्हणजे हा वैयक्तीक असतो, संप्रदायाप्रमाणे सार्वजनीक नाही. जसे - अग्नीचा धर्म जळणे किंवा जाळणे, पाण्याचा धर्म तहान भागविने, इत्यादी.. तसेच मनुष्याचा सुध्दा एक विशिष्ट धर्म असतो. जो मनुष्याच्या कर्मावर आधारित असतो, त्यावरूनच एखादी व्यक्ती सद्धार्मिक की अधर्मी आहे हे समजते. त्याची विभागणी दोन प्रकारांमध्ये केली गेली.
  • अधर्म
  • सध्दर्म

मनुष्याच्या धर्माची व्याख्या करतांना सम्राट अशोक म्हणतात - देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो कि, माझा पुत्र, पौत्र आणि प्रपौत्रांनी धर्माची वाढ करण्यात कार्यरत राहावे, व याची अवनती करू नये, धर्म हा श्रेष्ठ आहे. पण धर्म म्हणजे काय..? पापांपासून दूर राहणे म्हणजे धर्म होय, दान, दया, सत्य व पावित्र्य यांचे पालन करणे म्हणजे धर्म होय.

अर्थात ज्याप्रमाणे भगवान बुध्द धम्मपदामध्ये म्हणतात त्याप्रमाणे, कोणतेही पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे स्वचित्ताची शुद्धी करणे हेच शास्त्याचे शासन आहे, अर्थात हाच भगवानांचा धर्म (शिकवण) आहे.

सम्राट अशोकाच्या या शिलालेखावरून आपल्याला समजते की, सम्राट अशोक हे धर्मदूत होते, त्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वेचले. पण धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे नेमके काय...? धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे दुसऱ्या संप्रदायातील लोकांना एखाद्या कर्मकांडाद्वारे आपल्या संप्रदायात सामील करून घेणे (Religious Conversion) नव्हे. तर प्रजाजनांमध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार करणे, बुद्धांच्या शिकवणीचा (अर्थात सद्धर्माचा) प्रचार करणे, हा खऱ्या धर्माचा प्रचार होय.

धर्माचे प्रकार :

. अधर्म : अधर्म म्हणजे वाईट धर्म किंवा वाईट गोष्टी.. जसे हत्या करणे, चोरी करणे, मद्यपान करणे, खोटे बोलणे, वासनेच्या आहारी जाणे, इत्यादी हे वाईट धर्म आहेत, अधर्म आहेत, हे मनुष्यत्वाचे धर्म नाहीत, हे धर्म माणसाला मनुष्यत्वाकडून दूर नेतात. जी व्यक्ती आपल्या शरीर, वाणी आणि मनाने अशा प्रकारचे कर्म करते, ती त्याच्या कर्मानुसार अधर्मी ठरते.
. सध्दर्म : सध्दर्म म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा चांगले धर्म. बुध्दांची शिकवण हा सध्दर्म आहे असे आम्ही म्हणतो, कारण ते चांगलेच धर्म (गोष्टी) शिकवितात वाईट धर्म नाही. जसे जीवनात शुध्दता राखणे, जगाला धर्मराज्य बनविने (धर्मराज्य म्हणजे अशा समाजाची निर्मीती करणे जिथे प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्या शी न्यायाने, मैत्रीने, बंधुत्वाने वागतो, ज्या राज्यात स्वातंत्र्य, समता व बंधुता विहार करीत असते, जिथे कोणीही कोणाची वंचना करीत नाही, कोणीही कोणाला दुःख देण्याची इच्छा करीत नाहीत, सर्व जीव एक दुसऱ्यांच्या काल्याणाचीच कामना करीत असतात, त्याला धर्मराज्य असे म्हणतात. जेव्हा अशा समाजाची निर्मिती होईल तेव्हा भारत खऱ्या अर्थाने बुद्धमय होईल. कारण केवळ विशिष्ट कर्मकांड करून लोकांना केवळ नावाचे बौध्द बनवून काहीही साध्य होणार नाही.) इत्यादी सधर्म आहेत... जी व्यक्ती काया, वाचा आणि मनाने वरील धर्मांचे आचरण करते ती व्यक्ती त्याच्या कर्मानुसार सध्दर्मी बनते..
यातील महत्वाचे उदाहरण पुढीलप्रमाणे :

  • मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, शष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर - सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर धर्मश्रवण करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक चर्चा करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी निर्वाणाचा साक्षात्कार करणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...

हा भगवानांचा धर्म (शिकवण) अर्थात सध्दर्म होय :

  • जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत (अशी मैत्रीभावना करावी)
  • जम असोत वा स्थावर, दीर्घ असोत वा महान मध्यम असोत वा ह्रस्व, लहान असोत वा मोठे, दृश्य असोत वा अदृश्य, दुर असोत वा जवळ, उत्पन्न झालेले असोत वा उत्पन्न न झालेले सर्व प्राणी सुखी असोत.
  • कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवा विरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत.
  • ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करावा.
  • मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढवावा.


भगवान बुद्धांनी आम्हाला वरील धर्मांचे आचरण करून धार्मिक बनायला शिकविले, त्यामुळे एखादे विशिष्ट कर्मकांड करून केवळ नावाचे बौध्द झाल्याने कोणी बुध्दांचा अनुयायी बनत नाहीत तर वरील धर्मांचे आचरण केल्यानेच कोणी धार्मिक अर्थात बुध्दांचा अनुयायी बनतो.
डॉ. बाबासाहेबांनी धर्माचे तीन प्रकार सांगीतले आहेत :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म (धर्म) आणि रिलीजन यांच्यातील भेद स्पष्टपणे सांगितलेला आहे. जर आपण त्या ग्रंथाची मूळ इंग्रजी प्रत वाचली तर आपल्याला समजेल की, बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये धम्म आणि धर्म यांच्यातील भेद सांगितला नाहीतर (Religion and Dhamma) ह्या मथळ्याखाली धम्म आणि रिलीजन किंवा संप्रदाय असा फरक सांगितलेला आहे. परंतु अनुवादकांनी मराठीमध्ये अनुवाद करतांना रिलीजन ह्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी अर्थ धर्म असा घेतलेला आहे. हि अनुवादकांची चूक आहे, कारण बाबासाहेबांना धम्म आणि धर्म असा भेद करायचा असता तर ते रिलीजन ह्या शब्दाचा पर्यायी भारतीय शब्द म्हणून धर्म ह्या शब्दाचा वापर करू शकले असते, पण त्यांनी तसे न करता धम्म हा एक शब्द भारतीय आणि रिलीजन हा दुसरा पाश्च्यात्य शब्दाचा वापर केला. यावरून बाबासाहेबांना धर्माची पाश्चात्य संकल्पना आणि भारतीय संकल्पना यांच्यातील भेद स्पष्ट करायचा होता. परंतु अनुवादकांनी केलेल्या चुकीमुळे अर्थाचा पूर्ण विचका झाला आणि अनेकांच्या मनात अनेक गैर समाज निर्माण झालेत.


यामुळे काही लोक व्यवहारामध्ये धर्म ऐवजी धम्म ह्या शब्दांचा वापर करण्याच्या सुचना देत असतात. पण त्यांना धम्म आणि धर्म यांच्यामध्ये असणारा स्पेलिंग मधील फरक यांच्या पेक्षा काहीच माहित असत नाहीत. त्यांना विचारले तर ते सांगतात – हिंदू, ख्रिस्ती, शीख, इत्यादी हे सर्व धर्म आहेत तर बुध्द हा धम्म आहे. मग धम्म आणि धर्म एकमेकांच्या पासून वेगळे कसे हे विचारल्यावर सांगतात, पूजा करणे, देवाला माणने हा धर्म आहे तर, देवाला नाकारणे हा धम्म आहे., इत्यादी अनेक स्पष्टीकरणे ते देत असतात. खरंतर त्यांचे हे स्पष्टीकरणे खूप हास्यास्पद आहेत. कारण बुद्धप्रणीत धर्माला बुध्द धम्म संबोधल्याने तो त्यांच्यापासून भिन्न कसा, किंवा त्यांच्या मान्यता इतर धर्म - संप्रदायाच्या विरुध्द असल्याने त्यांच्यापासून तात्त्विकदृष्ट्या भिन्न होत नाही.


वास्तविक पाहता धर्माला (बुध्द शिकवणीला) जे बुध्द धम्म असे म्हणतात खरंतर तेच ह्याच्या विरुध्द वागतात. बुध्द आणि त्यांच्या धम्म ह्या ग्रंथाच्या अनुवादकांनी जरी रिलीजन ह्या शब्दाचा पर्यायी शब्द धर्म हा घेतला असला तरी तो अर्थ रिलीजन किंवा संप्रदाय म्हणूनच घेण्यात आला आहे, हे लक्षात ठेवावे. आणि याबाबतीत जरा सखोल चिंतन करावे की, बाबासाहेबांनी रिलीजन आणि धम्म हा भेद कोणत्या आधारावर केला..? त्यामागे त्यांच्या कोणत्या संकल्पना असाव्यात..? ज्याप्रमाणे काही लोक भेद करतात बुध्द धर्म विरुध्द बुध्द धम्म, काय केवळ स्पेलिंग मधीलच फरक जाणणार कि त्यांच्यामध्ये काही तात्त्विकदृष्ट्या फरक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. मी सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे बाबासाहेबांना सुध्दा संप्रदाय विरुध्द निसर्गाचे नियम (बुद्धांची शिकवण) ह्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठीच रिलीजन विरुद्ध धम्म हा लेख लिहावा लागला. याबाबतीत मी पुढे संदर्भ देणारच आहे. पण धम्म आणि धर्म ह्यांच्यातील फरक केवळ स्पेलिंग नुसार जाणणाऱ्या लोकांनी जेव्हा तुम्ही बुध्द धम्म अशा प्रकारे वाक्यप्रयोग करता तेव्हा एका गोष्टीचा विचार करावा कि "बुध्द" हा धम्म कसा होऊ शकतो..? कारण बुध्द तर शास्ते आहेत, आपले अतुल्य शिक्षक आहेत. आणि धम्म म्हणजे त्या शास्त्याची शिकवण. तेव्हा आपण बुध्द धम्म हा शब्दप्रयोग बुध्दाचा संप्रदाय (Religion of Buddha) असा अर्थ काढण्यासाठी तर घेत नाही आहोत ना याचे चिंतन करावे. जेव्हा आपणच स्वतः बुद्धांच्या धर्माला (बुद्धांच्या शिकवणीला) बुध्द धम्म म्हणत संप्रदायाच्या कक्षेत बांधत असू तर मग धम्म हा संप्रदाय (तुमच्या अर्थानुसार धर्म) ह्या संकल्पने पेक्षा वेगळा कसा आहे हे सांगण्याचा आपला अधिकार काय....? कारण धम्म हा संप्रदाया पेक्षा ज्या अर्थाने वेगळा आहे तो (बुध्द धम्म हा शब्दप्रयोग ज्या अर्थासाठी केला जातो तो वापरूनच) त्याचा मुळ अर्थ नाहीसा होतो.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म किंवा धर्माचे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये केले आहे.

. धम्म भगवान बुद्धांनी धर्माचे वर्गीकरण तीन प्रकारामध्ये केलेले आहे त्यातील पहिला प्रकार म्हणजे धम्म होय. धम्म म्हणजे असे कर्म जे भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अंग आहेत. भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला तो बाबासाहेब पुढील मुद्यांचे स्पष्टीकरण देऊन सांगतात : जीवनात शुचिता राखणे म्हणजे धर्म होय., जीवनात पूर्णता साधने म्हणजे धर्म होय., निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धर्म होय., तृष्णा त्याग म्हणजे धर्म होय., सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय., कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचे आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म होय.


. अधम्म : अधम्म म्हणजे वाईट कर्म, असे कर्म जे भगवान बुद्धांच्या शिकवणीच्या विरुध्द आहेत. ज्या कर्मापासून भगवान बुद्धांनी दूर राहण्याचा आपल्याला उपदेश केला आहे, त्यांना अधम्म असे म्हणतात. याबातातीत बाबासाहेब खालील मुद्यांचे स्पष्टीकरण करून सांगतात. दैवी चमत्कृतींवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय., ग्रंथप्रामाण्य वाद हा अधम्म आहे, इत्यादी कर्म हे अधम्म आहेत. अर्थात ह्या कर्मांपासून भगवान बुध्दांनी दूर राहण्याचा उपदेश केला आहे.


. सधम्म :  सधम्म म्हणजे चांगले धर्म. मनाची मलीनता दूर करणे, जगाला धर्मराज्य बनविणे इत्यादी साधाम्माचे उदाहरण आहेत. सधम्माच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात, जेव्हा धर्म माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर ठसवितो तेव्हा तो धर्म सध्दर्म बनतो. धर्माला सध्दर्म रूप धारण करण्यासाठी धर्माने माणसाला आचरण करण्यास कोणते वाईट धर्म (वाईट कर्म) व कोणते कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकविले पाहिजे.

आपण काय शिकलो :

. धम्म आणि धर्म हे एकाच अर्थाचे दोन वेगळ्या भाषेतील पर्यायी शब्द आहेत.
. धम्म हा धर्मापासून भिन्न नसून रिलीजन (संप्रदाय) पासून भिन्न आहे.
. धम्म किंवा धर्म ह्या शब्दाचा अर्थ साधारण पणे निसर्गाचे नियम, सत्य, बुद्धांची शिकवण, इत्यादी असा आहे.
. धम्म किंवा धर्म हि कर्म आधारीत संकल्पना असून ति मनुष्याच्या कर्मावरून ओळखली जाते अर्थात चांगले कर्म करणारा मनुष्य धार्मिक तर वाईट कर्म करणारा मनुष्य अधर्मी..
. याउलट संप्रदाय हि जन्माधारीत संकल्पना आहे, जी मनुष्य कोणत्या कुटुंबात जन्माला यावरून ठरत असते. जसे हिंदू कुटुंबात जन्मलेला मनुष्य हिंदू, ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला कुटुंब ख्रिश्चन, इत्यादी...

. (लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख हे आठ लोकस्वभाव (लोकधर्म) आहेत... वरील प्रमाणे सध्दर्माचे आचरण करणार्या सध्दर्मी व्यक्तीचा ह्या आठ प्रकारच्या लोकधर्माशी (लोकस्वभावा) शी प्रसंग आला असता त्याचे चित्त अस्थिर होत नाही, पण शोकरहीत, निर्मळ व सुखरुप राहते. - हे शास्त्याचे वचन आहे..)
सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....

हे सुध्दा वाचा :





५ टिप्पण्या:

  1. jaibhim sir,

    Mi ek telegram var group chalavato "Chalo buddh ki our" ya madhe mi bhagwan Buddh aani dr. Babasaheb ambedkar yanchyashi nigdit mahiti aani post takat asto, jar apli parvanagi asel tar mi aplya blog varil mahiti majhya group var prasarit karu shakato ka???

    aani jar apli kahi harkat nasel tar mi aplyala majhya eka whatsapp group la add karu icchito,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही माहिती प्रसारित करु शकता, परंतु जिथून माहिती घेतली आहे, त्याची लिंक सोबत अवश्य जोडावी...

      हटवा
  2. majhya telegram group chi link mi ithe prasarit karit aahe https://t.me/chalobuddhkiour

    उत्तर द्याहटवा
  3. दोन गोष्टी आहेत.
    1. तुमी बुद्धला शस्ता म्हटले पण बुद्ध म्हणतात
    मि मार्गदात आहे.
    2. सधमा बद्दल जे तुमी बुद्ध आनि तयाचा धमा मधील उतारा घेतला,त्यामध्ये करुणा,मैत्री,pradhanya ह्या गोष्टीचा उल्लेख केला नाही.त्या नंतर
    धम्म : म्हणजे स्वतःच्या अनुभुतिना आधार मानुन् दोष मुक्त जीवन जगणे होय.
    धर्म: म्हणजे विवेक शुन्न्य् जीवन.बाकी लिखाण खूप छान आहे.

    उत्तर द्याहटवा