गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

तथागतांची (शास्त्याची) चिकित्सा करा - भगवान बुध्द

          शास्त्याची चिकित्सा करावी कि करू नये..? याबाबतीत भगवान बुद्धांचे मत फार महत्वाचे आहे. याबाबतीत मज्झीम निकायातील ४७ व्या विमंसक सुत्तामध्ये बरीच माहिती सापडते.


एकदा भगवान बुध्द श्रावस्ती शहरातील अनाथपिंडीकाच्या जेतवनामध्ये विहार करीत असताना त्यांनी भिक्षुंना जवळ बोलाविले आणि त्यांना म्हटले - भिक्खुंनो, ज्या भिक्खुकडे दुसऱ्याचे चित्त जाणण्याचे अलौकिक ज्ञान असेल त्याने चिकित्सक बनावे आणि तथागत सम्यक संबुद्ध (संपूर्ण जागृत) आहे कि नाही याची चिकित्सा करावी. भगवानांच्या या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याची भिक्खुंकडून विनंती केली गेल्यावर भगवान म्हणाले :

     डोळ्यांनी पाहण्याच्या आणि कानांनी ऐकण्याच्या या दोन गोष्टींच्या बाबतीत तथागतांची चिकित्सा करावी. कानांनी ऐकता येणारे आणि डोळ्यांनी बघता येणारे जे काही मलीन धर्म आहेत (दुर्गुण/वाईट गोष्टी) अस्तित्वात आहेत, ते त्यांच्या ठायी आहेत किंवा नाहीत याची शहानिशा करून ते (मलीन धर्म) त्यांच्या ठायी नसल्याची खात्री करून घ्यावी. यानंतर चिकित्सा करणाऱ्या व्यक्तीने तथागतांच्या ठायी कुशल धर्म (चांगल्या गोष्टी/सद्गुण) आहेत का याची खात्री करून घ्यावी. जर त्याला तथागतांच्या ठायी कुशल धर्म आहेत याची खात्री झाली तर त्यांच्याकडे हे कुशल धर्म दीर्घकाळापासून आहेत कि तात्पुरते आलेले आहेत याची शहानिशा करावी. ते कुशल धर्म दीर्घकाळापासून आहेत याची खात्री झाल्यावर (त्यांची) कीर्ती पसरल्यावर, प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काही दोष आले आहेत का याची शहानिशा करावी. कीर्ती पसरल्यावर कोणतेही त्यांच्या ठायी आलेले नाहीत याची निश्चिती झाल्यावर तो भयापोटी विरागी झालेला नसून निर्भय विरागी झाला आहे, हे तपासून पहावे, त्याची आसक्ती नष्ट झाली आहे म्हणून तो कामोपोभोगाचे सेवन करीत नाही, हे निश्चित करून घ्यावे. त्यांच्या गुण दोषांची चिकित्सा करून झाल्यावर चिकित्सा करणारा त्यांच्या या वैशिष्ट्यांचे वर्णन करून लागेल. जर चिकित्सा करणाऱ्याला कोणी विचारले त्याच्या ठायी असलेल्या कोणत्या सुसंगतीमुळे तू या वैशिष्ट्यांचे वर्णन करीत आहेस, तेव्हा त्याने पुढीलप्रमाणे खुलासा करावा : 

जे लोक चांगल्या मार्गाने चालले असतात, जे लोक वाईट मार्गाने चालले असतात, जे गणाचे अनुशासन करीत असतात. जे कुठल्या ना कुठल्या आमिषामध्ये गुंतले असतात, जे कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत. अशा लोकांपैकी हे आयुष्यमान कोणाचीही निंदा करीत नाही.- एकटे असताना किंवा संघामध्ये वावरत असताना सुद्धा हे तसे करीत नाहीत.


यानंतर डोळ्यांनी बघता येणारे आणि कानांनी ऐकता येणारे जे काही मलीन धर्म त्यांच्या ठायी आहेत किंवा नाही हे तथागतांनाच विचारावे. त्यांच्या ठायी मलीन धर्म नाहीत याची खात्री केल्यावर कुशल धर्म आहेत कि नाहीत हे त्यांनाच विचारावे. आपण कुशल धर्माच्या मार्गानेच जाणारे आहोत, कुशल धर्माचाच अनुभव करणारे आहोत अशी खात्री देतो का ते बघावे. जो शास्ता असे सांगेल त्याच्याकडे धर्म ऐकण्यासाठी जाणे, हे श्रावकाच्या दृष्टीने योग्य होय. श्रावक शास्त्याच्या शासनात जसा जसा रमतो त्याप्रमाणे तो त्याला उत्तमोत्तम धर्माचा उपदेश करतो. अशुद्ध आणि शुद्ध गोष्टी वेगळ्या करून सांगतो. तो त्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे तो उपदेश केलेली धर्मांपैकी (गोष्टींपैकी) एक एक गोष्ट जाणून घेऊन तिच्यावर निष्ठा ठेवतो तथागत सम्यक संबुद्ध (संपूर्ण जागृत) आहेत, त्यांनी धर्माचा उपदेश योग्य रीतीने केला आहे, त्यांचा संघ सन्मार्गावर चालला आहे. हे जाणून त्याच्या मनात शास्त्याविषयी प्रसन्नता निर्माण होते. त्याला (चिकित्सा करणाऱ्याला) कोणी दुसऱ्याने तथागतांच्या बाबतीत प्रश्न विचारले तर तो आपला हा अनुभव नित रीतीने त्यांच्यापुढे मांडतो.अशाप्रकारे चिकित्सा केल्यानंतर ज्या कोणाच्या मनात तथागताविषयी श्रद्धा उत्पन्न होते, ती श्रद्धा अत्यंत दृढ असते व ती जगामध्ये कोणत्याही श्रमणाकडून, ब्राह्मणाकडून, देवांकडून, माराकडून, ब्रह्म्याकडून अथवा अन्य कोणाकडून सुद्धा नष्ट होऊ शकत नाही.
         सत्याचा शोध घेत असताना भगवान बुद्धांनी अनुभवाला सर्वोच्च स्थान दिले आहे, हे आपल्याला कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी केलेली उपदेशावरून समजतेच. त्या सुत्तामध्ये भगवान म्हणतात कि एखादी व्यक्ती तुमच्याकरिता पूज्य आहे केवळ एवढ्यानेच त्याने सांगितलेल्या गोष्टी (धर्म) खऱ्या असतील असे मानु नका. भगवानांच्या याच वाचनाचे प्रतिबिंब आपल्याला या सुत्तामध्ये देखील दिसते. भगवान बुध्द म्हणतात एखाद्या शास्त्याच्या शासनामध्ये रममाण होण्याच्या पूर्वी त्या शास्त्याची अगोदर चिकित्सा करा कि तो शास्ता सम्यक संबुद्ध (संपूर्ण जागृत) आहे किंवा नाही. आणि हि चिकित्सा करण्याचा मार्ग सुद्धा त्यांनी सांगितला आहे. चिकित्सा करण्याचा मार्ग सांगताना ते पुढे म्हणतात शास्त्याच्या (गुरूच्या) ठायी मलीन धर्म आहेत किंवा नाहीत याची शहानिशा करा, त्याच्या ठायी मलीन धर्म नाहीत याची खात्री झाल्यावर त्याच्या ठायी कुशल धर्म आहेत कि नाही हे तपासून बघावे. (कारण केवळ नकारात्मक पद्धतीने चिकित्सा होऊ नये अशी भगवानांची अपेक्षा होती.) शास्त्याच्या ठायी कुशल धर्म आहेत याची खात्री झाल्यावर तेवढ्यावरच थांबू नये तर हा चांगुलपणाचा मुखवटा तर नाही ना. किंवा शिष्याला ओढण्यासाठी हा तात्पुरता चांगुलपणाचा देखावा तर नाही ना याची सुद्धा शहानिशा करावी. आणि ते कुशल धर्म दीर्घकाळापासून शास्त्याच्या ठायी आहेत याची खात्री झाल्यावर शास्त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर त्याच्या ठायी मलीन धर्मानी प्रवेश तर केला नाही ना हे तपासून बघावे कारण एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी जोपर्यंत मिळाली नसते तेव्हापर्यंत तो सर्वांच्या सोबत चांगुलपणाने वागतो. परंतु जसा जसा तो प्रगतीच्या/यशाच्या/कीर्तीच्या शिखरावर जातो तस तसा त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत असते तो घमंडी बनत जातो. त्यामुळे अशा प्रकारे त्याची चिकित्सा करणे आवश्यक आहे. अशा चिकित्सेनंतर कीर्तीच्या शिखरावर असताना देखील शास्त्याच्या ठायी मलीन धर्मांनी प्रवेश केला नसेल आणि तो कुशल धर्माचाच अनुभव करणारा असे तर तो कोणाच्या भीतीमुळे, दडपणाखाली तर कुशल धर्मी (सद्गुणी) बनला नसेल ना याची सुद्धा शहानिशा करावी असे भगवान म्हणाले. यानंतर शास्ता कोणत्याच जीवाची संघाच्या (जनसमुदायाच्या समोर) किंवा खासगी मध्ये निंदा करतो हे सुद्धा तपासून पहावे, तो शास्ता संघाच्या समोर किंवा एकट्यामध्ये कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचा तिरस्कार तर करीत नाही ना हे तपासून बघावे. जो शास्ता कोणत्याच जीवासोबत दुष्टतेची भावना बाळगत नाही तोच या कसोटीमध्ये उतरू शकतो.     यानंतर भगवान बुध्द चकित्सा करणाऱ्याला एक सूत्र सांगतात कि आपल्या ठायी मलीन धर्म (दुर्गुण) किंवा कुशल धर्म (सद्गुण) आहेत हे त्या शास्त्यालाच विचारावे आणि त्या शास्त्याने तो कुशल धर्मी आहे, कुशल धर्माचाच अनुभव करणारा आहे याची खात्री करून दिली पाहिजे.अशाप्रकारे चिकित्सा करून, विविध अंगांनी खात्री करून घेतल्यावर वरील सर्व कसोट्यांवर जो शास्ता उतरेल त्याच्याकडेच उपदेशासाठी जाणे योग्य होय. कारण चिकित्सा केल्यानंतर जी श्रद्धा उत्पन्न होते ति अभेद्य असते जी या जगामध्ये कोणत्याहि जीवाच्या द्वारे नष्ट होऊ शकत नाही.     जगामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय अस्तित्वात आहेत ज्यांच्यानुसार जे पवित्र समजल्या जाणाऱ्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे तेच सर्व गोष्टींच्या साठी प्रमाण आहे, बाकी त्याविरुद्ध जे काही सांगितले जाते ते सर्व चुकीचे आहे आणि जो कोणी या ग्रंथांची आणि  संस्थापकांची चिकित्सा करेल तो नरकात जाईल हि भीती दाखविली जाते. यामुळे भयभीत झालेला मनुष्य विशिष्ट ग्रंथावर अंधपणे विश्वास ठेवतो यामुळे तो गुलाम बनून त्याची बौध्दिक प्रगती खुंटते. परंतु भगवान बुद्धांनी आपल्या शासनामध्ये कोणत्याही धर्मग्रंथांना प्रमाण मानण्याचा उपदेश केला नाही एवढेच नाही तर त्यांच्या स्वतःवर सुद्धा कोणी अंधपणे विश्वास ठेवू नये असे त्यांचे मत होते. तर त्यांनी तथागतांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची चिकित्सा करण्याचा सल्ला दिला आहे, एवढे धाडस जगातील कोणत्याही संप्रदाय संस्थापकांनी केले नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ह्या शास्त्याची चिकित्सा करण्याच्या मार्गावरून प्रत्येक व्यक्तीने विविध प्रकारचे दावे करणाऱ्या जगातील प्रत्येक संप्रदाय संस्थापकाची चिकित्सा करावी.

सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....

 हे सुध्दा वाचा :

३ टिप्पण्या:

 1. एकदा कोणी तरी लोक भगवान बुद्धांच्या कडे आलेत आणि त्यांना सांगू लागलेत की अमुक एक राजा वज्जी लोकांच्या राज्यावर आक्रमण करणार आहेत, तशी योजना ते करीत आहेत. तेव्हा भगवान बुद्ध आयुष्मान आनंद यांना उद्देशून वज्जींचे राज्य कसे अजित आहे ते सांगितले. ते ऐकून आक्रमणाची बातमी देणारे निघून गेले.. त्यानंतर मात्र वज्जींचे राज्य आक्रमण करून जिंकण्यात आले. ते कसे? ते कृपया आपल्या ब्लॉगवर किंवा मानवता धर्म या ग्रुपमध्ये लिहावे.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद प्रल्हाद मिस्त्री साहेब,,, आपल्या मागणी प्रमाणे वज्जीचे राज्य अजातशत्रू ने कशाप्रकारे जिंकले याबाबत ब्लॉगवर लिहिलेले आहे, आपण तो लेख अवश्य वाचावा.. तुम्ही खालील लिंकवर तो लेख वाचू शकता...

   http://buddhistsofindia.blogspot.in/2015/05/blog-post_14.html

   हटवा