गुरुवार, १४ मे, २०१५

राष्ट्राची एकता आणि एकात्मताच राष्ट्राचे संरक्षण करते....

          आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाति, संप्रदाय आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. अशा विविधतेमध्ये सुध्दा आपल्या देशाच्या नागरीकांमध्ये असणारी एकात्मतेची आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या ज्योतीला अखंडपणे तेवत ठेऊन आहे. परंतु असे असतांना देखील, आपल्या देशातील काही समाज कंटक जाति - संप्रदायाच्या नावाखाली, भाषा - प्रदेशाच्या नावाखाली, एका भारतीयाला दुसऱ्या भारतीया पासून वेगळे करीत आहेत, दोन व्यक्तींमध्ये निरर्थक भांडणे लावली जात आहेत. वास्तवात हा एक देशद्रोह आहे. समाज कंटकांच्या ह्या दुष्कृत्यांमुळे देशाच्या सार्वभौमिकतेला धोका पोहोचलेला आहे. अशा घटनांमुळे शेकडो राज्ये उध्वस्त झालेली आहेत, याचे प्रमाण इतिहासात बरेच आहे, भारताच्या गुलामगिरीचा इतिहास तर अशाच गोष्टींमुळे रंगलेला आहे, याबाबतीत एक महत्वाचे उदाहरण म्हणजे वज्जींचे राज्य.

          भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळी वज्जी नावाचे लोक अस्तित्वात होते, वैशाली हे  वज्जींच्या राजाधांचे शहर होते. वज्जीना लिच्छवी असे म्हणत. लिच्छवी हे भगवान बुद्धांचे अनुयायी होते, त्यामुळे त्यांचा युध्दामध्ये पराभव होऊ नये यासाठी भगवान बुद्धांनी त्यांना सात वृध्दिकारक धर्मांचा उपदेश केला, याचा संदर्भ अंगुत्तर निकायातील सारन्दद सुत्तामध्ये मिळतो. ते सात वृध्दिकारक धर्म खालीलप्रमाणे :

१. जेव्हापर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.

२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही..

३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

४. जेव्हापर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

        वरील वृध्दिकारक धर्मांचे पालन जेव्हापर्यंत वाज्जिंकडून केले जाईल तेव्हापर्यंत त्यांचा ऱ्हास होणार नाही, याउलट भरभराटच होईल. परंतु जर वज्जी या नियमांच्या पासून भरकटले, दुसऱ्या मार्गावर गेले तर त्यांचा नाश होईल, असे भगवान बुध्दांनी त्यांना सांगितले.

          यातील पहिला धर्म आपल्याला एकात्मतेची शिकवण देतो, वज्जी लोक जेव्हापर्यंत राष्ट्राच्या संबंधित कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमतील, आणि आपल्यामध्ये ऐक्य राखतील तर त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. कारण एकतेची शक्ती भव्य आहे, जरी शत्रू कितीही शक्तिमान असला तरी एकात्मतेची भावना असलेल्या समाजा विरुध्द युध्द करणे आहे त्याला जिंकणे कठीण असते. परंतु याउलट जर समाजामध्ये ऐक्याची भावना नसेल, दोन व्यक्तींमध्ये जाती - संप्रदाया वरून, भाषा - प्रदेशावरून किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणावरून तेढ असेल तर त्या समाजाला, त्यां राष्ट्राला बाहेरच्या शत्रूंची गरजच काय..? राष्ट्रातील नागरिकांचे ऐक्य राष्ट्राच्या रक्षणासाठी महत्वाचे आहे. म्हणून राष्ट्राच्या हिताची कामना करणाऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या हितासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करावी असे भगवान बुध्द आपल्याला सुचवितात. आणि केवळ चर्चा करण्यासाठी एकत्र येणे महत्वाचे नाही तर चर्चा करतांना जरी मतभेद निर्माण झाले तरी त्याचा राष्ट्राच्या एकात्मतेवर आणि प्रजेच्या हितावर विपरीत परिणाम होता कामा नये, तर प्रजेच्या प्रती असलेली सर्व कर्तव्ये त्यांनी पार पाडावी, त्यासाठी आपापसांमध्ये नेहमी ऐक्य राखावे आणि त्या ऐक्यामध्ये मतभेदांना आणू नये असे भगवान बुध्द दुसऱ्या धर्माद्वारे सूचित करतात.

          तिसरा धर्म कायद्या प्रमाणे वागायला शिकवितो, कायद्याचे पालन करायला शिकवितो. कायदे हे प्रजेचे कल्याण लक्षात ठेऊन देशाच्या हितासाठीच निर्माण केले असतात, जेव्हापर्यंत ह्या कायद्यांचे प्रजेद्वारे पालन होत राहील, यात कोणावरही अन्याय  होता कामा नये. प्रजा आणि राजा दोघेही वडिलधाऱ्या लोकांचा मान राखतील, पूर्व परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींबाबत कृतज्ञ राहतील. त्यांच्या अनुभवांचा योग्य तो वापर करतील तर त्यांची नेहमी भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही, असे भगवान बुध्द तिसऱ्या आणि चौथ्या धर्माद्वारे सांगतात.

          पाचवा धर्म स्त्रियांच्या बाबतीत असणाऱ्या पुरुषी मानसिकतेचा आहे, ज्या समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान नाही, स्त्रिया उपभोगाची वस्तूच समजली जाते, त्या समाजाचा नेहमी ऱ्हासच होत असतो. स्त्रीया मग त्या कोणत्याही पक्षातल्या का असेनात, जो समाज स्त्रियांचे चारीत्र्य जपतो, त्या समाजाची सदैव भरभराटच होत असते. तर सहावा धर्म प्रजेच्या चारित्र्याबाबतचा आहे, प्रजेने नेहमी धार्मिकच असावे अधर्मी असता कामा नये, तो जाती - संप्रदायाच्या, भाषा - प्रदेशाच्या, वर्ण - वंशाच्या निरर्थक वादा मध्ये पडून एका माणसाला दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ समजून त्याचा अपमान करता कामा नये. त्याने सर्वांना समान समजले पाहिजे, सर्वांशी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायानेच वागले पाहिजे अर्थात धार्मिक कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत, प्रत्येकाच्या मनामध्ये धर्म वसला पाहिजे, अधर्म वसता कामा नये, असे भगवान म्हणतात. अर्हन्तांचे रक्षण करावे, अरहन्त निर्माण होतील, अर्हन्तांना विहार करण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण करावे असे सातवा धर्म सांगतो. कारण अर्हंत अशाच प्रदेशां मध्ये विहार करतात, ज्या प्रदेशातील नागरिकांच्या मनामध्ये धर्म वसतो, त्या प्रदेशामध्ये धर्म वसतो, जो प्रदेश धर्म राज्य असतो. अशा धर्म राज्यातील नागरिक नैतिक आचार विचारांचेच असतील, त्यांच्या मनामध्ये अधर्म येणार नाही. ते लोक स्वार्थासाठी एक दुसऱ्यांचा द्वेष करणार नाहीत, राष्ट्राबद्दल फितुरी करणार नाहीत.  त्यामुळे हे सर्व घटक राष्ट्राच्या समृध्दीसाठी कारणीभूत ठरणारे आहेत.  ह्या सर्व वृध्दिकारक धर्मांचे पालन केल्याने राष्ट्राचे अखंडत्व अबाधित राहित, शत्रू आपल्याला पराजित करू शकणार नाहीत आणि आपल्या देशाची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. याउलट जर कोणी ह्या नियमांचे पालन करणार नाहीत तर राष्ट्राचा ऱ्हास निश्चितच होईल.

          वज्जींचे राष्ट्र ह्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे त्यामुळे त्यांचे सार्वभौमत्व टिकून होते, बलाढ्य राज्ये त्यांचा पराभव करू शकत नव्हती. हि गोष्ट जेव्हा मगधचा राजा अजातशत्रूला समजली तेव्हा त्याच्या मनामध्ये वज्जींचे वैभवशाली राष्ट्र जिंकण्याच्या महत्वकांक्षेने जन्म घेतला. वैशालीवर आक्रमण करण्याची हि योग्य वेळ आहे का..? याबाबतीत विचारणा करण्यासाठी अजातशत्रूने आपला अमात्य वस्सकार नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांकडे पाठवितो. भगवान बुध्दांना भेटल्यावर वस्सकार ब्राह्मण त्यांना याबाबतीत विचारतो तेव्हा भगवान वस्सकाराला म्हणतात, "एकदा मी वैशाली शहरातील सारदद चैत्यामध्ये विहार करीत असतांना वज्जीना सात वृद्धीकारक धर्मांचा उपदेश केला होता. जेव्हापर्यंत ब्राह्मणा, हे वृध्दिकारक धर्मांचे ते पालन करतील तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही." भगवानांनी असे सांगितल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, "वज्जींच्या ठिकाणी यातील एकेकच धर्म जरी असला तरी त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. तर मग सातही धर्म असल्यावर कसली शंका..? लाच दिल्याशिवाय किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडल्याशिवाय अजातशत्रू राजाला त्यांचा पराभव करणे शक्य नाही..."  याबाबतीतील संदर्भ अंगुत्तर निकायातील वस्सकार सुत्तामध्ये सापडतो, हाच उतारा दिघ निकायाच्या महापरीनिब्बान सुत्ताच्या पहिल्या भागामध्ये आलेला आहे.

          भगवान बुध्दांशी चर्चा केल्यानंतर सध्या वज्जींवर आक्रमण करण्यात काहीही फायदा नाही, वज्जी जोपर्यंत सात वृध्दिकारक धर्मांचे पालन करत राहतील तेव्हापर्यंत त्यांचे राज्य जिंकणे अशक्य आहे, तेव्हा त्यांना सरळ मार्गाने जिंकता येणार नाही, एकतर लाच देऊन किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडून, त्यांच्यामध्ये असणारी एकात्मता नष्ट करूनच वज्जींना जिंकता येईल, हे वस्सकार आणि अजातशत्रू ने जाणले होते. तेव्हा त्यांनी यावर चर्चा करून वज्जींना लाच देण्यापेक्षा त्यांच्या मध्ये फुट पाडण्याचा मार्ग निवडला.

          राजाने सभेमध्ये वैशालीवर आक्रमण करण्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या ठरलेल्या प्रमाणे, वस्सकार त्यांना म्हणाला वज्जी लोकांना शांततेने शेती, व्यापार करू द्या. तुम्ही त्यांना त्रास कशाला देता..? तेव्हा हा ब्राह्मण वज्जींची बाजू घेत आहे असे म्हणून त्याच्यावर आरोप केला. त्यानंतर ब्राह्मणाने वज्जीना काहीतरी नजराणा पाठविला. आणी तो राजाने पकडला. हा ब्राह्मण देशद्रोही आहे असा आरोप ठेऊन राजाने ठरल्या प्रमाणे ब्राह्मणाला कैद किंवा मारहाण न करता राज्यातून हाकलून दिले. यावर ब्राह्मण म्हणाला, "मी तुझी सर्व बलस्थाने आणि दुर्बलस्थाने जाणतो, लवकरच मी याचा प्रतिशोध घेईन..." असे म्हणत तो निघून गेला.

          हि गोष्ट जेव्हा वैशालीच्या लिच्छविंना माहित झाली तेव्हा ते म्हणाले, "ह्या लबाड ब्राह्मणाला गंगा पार करू देऊ नका." परंतु त्यांच्यातील काही म्हणाले, "अरे आपल्या बाजूने बोलल्यामुळेच ह्या ब्राह्मणावर आज हि पाळी आलेली आहे. तेव्हा त्याला येऊ द्या.." ब्राह्मण जवळ आल्यावर लिच्छविंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "अजातशत्रूच्या राज सभेमध्ये तुमची बाजू घेतली म्हणून राजाने मला त्याच्या राज्यातून हाकलून लावले आहे." ब्राह्मणाच्या गोष्टींमध्ये फसून भोळ्या लिच्छविंनी त्याला आपल्या राज्यातील अमात्य पद देऊ केले.

          त्यानंतर त्याने लिच्छवीमध्ये फुट पाडण्याचे कार्य सुरु केले. त्याने हे कार्य कशाप्रकारे केले ह्याबाबतीत अठ्ठकथांमध्ये विस्तृत वर्णन केले आहे, ते आपण वाचून घ्यावे. तीन वर्षांच्या कालावधी मध्ये ब्राह्मणाने फुट पाडण्याचे कार्य पूर्ण केले आणि अजातशत्रूला निरोप पाठविला कि, वज्जींवर आक्रमण करण्याची हीच योग्य वेळ आहे. वैशालीच्या लिच्छविंना जेव्हा समजले कि अजातशत्रू आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे, तेव्हा त्याला अडविण्यासाठी नगारा वाजविण्यात आला. परंतु एकतेमध्ये झालेल्या भंगामुळे वैशालीचे राजे एकत्र जमले नाही. राजाला शहरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, त्यासाठी त्याचा एकत्रितपणे प्रतिकार करू असे म्हणून सुध्दा नगारा वाजविण्यात आला, परंतु तसेही घडले नाही. त्यामुळे अजातशत्रूने नगरामध्ये प्रवेश केला आणि वज्जींचे राज्य जिंकून घेतले. अशाप्रकारे वरील सात वृध्दि कारक धर्मांचे पालन न केल्यामुळे वज्जींच्या राज्याचा ऱ्हास झाला.

          अशा प्रकारच्या पराभवाचा हा केवळ वज्जींचा इतिहास नव्हता, संपूर्ण भारत वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास सुध्दा अशाच प्रकारे रंगलेला आहे. वस्सकार ब्राह्मणाने ज्याप्रमाणे वज्जींचा मित्र म्हणवून घात केला, त्यांच्या एकात्मतेमध्ये फुट पाडली, त्यांच्या मध्ये विविध कारणांनी भांडणे लावून दिली. त्याचप्रमाणे आज आपल्या देशा मध्ये सुध्दा विविध कारणांनी भांडणे लावून आपल्या राष्ट्राची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्नच काही समाज कंटाकांच्या द्वारे केला जात आहे, त्यामुळे सर्व राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींना माझे असे निवेदन आहे कि, अशा समाज कंटाकांच्या पासून नेहमी सावध राहावे. कोणी जात, संप्रदाय, प्रांत, वंश, भाषा, इत्यादींच्या नावावर कितीही भेद निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्यातील एकात्मतेची भावना लोप पावता कामा नये, आपण एक राष्ट्र आहोत आणि एक राष्ट्र म्हणूनच जगले पाहिजे....

आपण सर्वप्रथम भारतीय आहोत

आणि अंतिमतः भारतीयाच आहोत


          भगवान बुध्दांचा हा उपदेश त्यांच्या श्रावकांच्या साठी सुद्धा आहे.  जेव्हापर्यंत त्यांनी सांगितलेल्या धर्माचे त्यांच्याद्वारे आचारण केल्या जाईल, तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. पण जर त्यांचे चित्त धर्मापासून ढळले आणि अधर्माच्या मार्गावर लागले तर त्यांचा सुध्दा वज्जींसारखा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....


हे सुध्दा वाचा : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा