बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (भाग २ : अजीत केसकंबल विरुद्ध भगवान बुद्ध आणि यज्ञाचा खरा विधी..)



भगवान बुद्धांचे यज्ञांच्या संबंधी काय मत होते हे आपण मागच्या भागात बघितलेच आहे, त्यांनी हिंसक यज्ञाचा खुप विरोध केला होता, तर अहिंसक यज्ञांची प्रशंसा केली होती. (कारण त्यात कोणत्याही प्राण्यांची हिंसा होणार नव्हती..) सविस्तर लेख येथे वाचा.


या भागामध्ये आपण तत्काळातील यज्ञांच्या विरोध करणाऱ्यांच्या विरोध मार्गातील फरक पाहणार आहोत.


वैदिकांच्या यज्ञांचा विरोध करणाऱ्यांमध्ये भगवान बुद्ध आणि निर्गंथ नाथपुत्र महावीर स्वामी, इत्यादी श्रमण अग्रणी होते. परंतु यज्ञ विरोधकांच्या यादीतील एक महत्त्वपुर्ण नाव म्हणजे अजीत केसकंबल.


माझ्या मागील लेखामध्ये मी अजीत केसकंबलाच्या नास्तिकवादावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उच्छेदवादी अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन आणि नास्तिक होता. तत्कालील श्रमण आणि ब्राह्मण हे दोन मतांचे होते : १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.


शाश्वतवादी मतांचे लोक समजत होते कि आत्मा हा नित्य आहे, तर उच्छेदवादी मतांचे म्हणायचे कि पंचमहाभुतांपासुन (काही चार महाभुत मानायचे) बनलेला हा आत्मा, शरीरनाशानंतर निसर्गात आपापल्या तत्वांना जाऊन मिळतो. तो उच्छेदवादी होता.


असा हा अजीत केसकंबल उच्छेदवादी असल्या कारणाने त्याचा पाप पुण्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्याच्या पंथात नैतिकता नावाची गोष्ट नव्हती. म्हणुन तो मनाला वाटेल तसा (नैतिकतेची सीमा ओलांडुन) इतरांवर टिका करीत असे. तत्कालीन ब्राह्मणांचा, ब्राह्मण व्यवस्थेचा आणि वेदांचा तो अत्यंत कडवा विरोध होता.



अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन (नपुसंक) पुरुषांची उपजिविका आहे.



यज्ञातील अग्नीहोत्रामध्ये मारलेला प्राणी जर स्वर्गात जात असेल, तर यज्ञाचे आयोजन करणारा आपल्या पित्याची आहुती त्यामध्ये का देत नाही... यज्ञयागांवर अशा प्रकारच्या टिका करणाऱयांमध्ये अजीत केसकंबल अग्रणी होता.


परंतु भगवान बुद्ध मात्र यज्ञ विरोधात आंधळे होऊन आपली नैतिकता विसरत नव्हते (तर दुसऱ्यांच्या श्रद्धांना ठेस न पोहोचवता) त्या यज्ञांमधुनच ते आपल्या धर्माचा प्रचार करीत होते, लोकांना सदाचार शिकवित होते. ते कसे काय...?

भगवान बुद्ध म्हणतात, यज्ञात प्राण्यांची आहुती दिल्याने यज्ञाचा आयोजक काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्मांचे आयोजन करतो. त्यामुळे यज्ञ हे अमंगल कार्य आहे असे भगवान म्हणतात.

एकदा भगवान बुद्ध एका ब्राह्मणाला यज्ञाचा खरा विधी समजावुन सांगतात अशा प्रकारची एक कथा अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातातील महायान्नवग्गातील अग्गीसुत्तामध्ये सांगतात (अ.नि. ७:५:४)


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनात्थपिंडिकाच्या जेतवनामध्ये राहत असताना उन्मत्त शरीराच्या ब्राह्मणाने एक महायज्ञ आयोजीत केला होता. त्या यज्ञांमध्ये पाचशे बैल, पाचशे गाई, पाचशे बकऱ्यां, पाचशे मेंढरी, इ. यज्ञामध्ये आहुती दिली जाणार होती. तेव्हा तो भगवान बुद्धांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करुन बाजुला बसला.

ब्राह्मण म्हणाला,, हे श्रमण गौतम यज्ञासाठी अग्नीहोत्र उभारणे आणि अग्नी पेटविणे हे खुप फलदायक आहे असे मी ऐकले आहे.

भगवान म्हणाला, होय ब्राह्मणा मी सुद्धा तसेच ऐकले आहे.

दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ब्राह्मण हे वाक्य बोलला आणि भगवंतांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले...


ब्राह्मण म्हणाला, छान गौतमा! आपले विचार किती जुळतात.

त्यावर आनंद म्हणाला, हे ब्राह्मणा तुझे वाक्य बरोबर नाही. मी असे ऐकले आहे च्या ऐवजी तु असे म्हण कि यज्ञासाठी व अग्नीहोत्र पेटविण्याची मला इच्छा आहे आणि ती पुर्ण करण्याच्या मी प्रयत्नात आहे, तेव्हा भगवंतांनी मला उपदेश करावा कि त्याच्या प्रतापाने माझे चिरकाळापर्यंत कल्याण होईल.

आनंदाच्या म्हणण्या प्रमाणे ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न विचारल्यावर भगवान म्हणाला,, हे ब्राह्मणा,, यज्ञासाठी जो अग्नीहोत्र उभारतो आणि त्यात अग्नी पेटवितो तो त्या यज्ञापुर्वी तीन प्रकारची शस्त्रे उगारतो. जे दुर्गुण, दुःखाची उत्पत्ती आणि इतर अनेक प्रकारच्या दुःखाच्या उत्पन्नाला कारणीभूत असतात.

कायाशस्त्र, वाचाशस्त्र आणि मनशस्त्र...



• जो यज्ञाला सुरुवात करतो त्याच्या मनात इतके, बैल, बकरे, मेंढरे मारले जाणार इत्यादी दुःख उत्पन्न करणारे अकुशल विचार जन्म घेतात, याप्रमाणे तो सर्वप्रथम चित्त (मन) शस्त्र उगारतो. त्यानंतर त्या सर्व जीवांना आहुती देण्याला तो स्वतःच्या तोंडाने आज्ञा देतो. अशाप्रकारे तो दुःख उत्पन्न करणारे वाचाशस्त्र उगारतो.

• त्यानंतर जीवांना आहुती देण्यासाठी सर्वप्रथम तो स्वतःच त्यांचा बळी घेतो. आणि त्याप्रमाणे दुःख उत्पन्न करणारे तो कायाशस्त्र उगारतो.

• हे सर्व करताना तो समजतो कि मी पुण्यकर्म करीत आहे, या पुण्यकर्माने खचीतच मला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु तो पापकर्म करतो, तो नरकाच्या मार्गावरुन चालत असतो.




हे ब्राह्मणा, तीन अग्नीचा त्याग करावा,, 
१. कामाग्नी, 
२. द्वेषाग्नी, 
३. मोहाग्नी




• कामाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती कामाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा कामाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.







• द्वेषाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती द्वेषाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते ज्यामुळे ती दुर्गतीला जाते, नरकात जाते, म्हणुन हे ब्राह्मणा द्वेषाग्नी पासुन नेहमीच दुर राहायला हवे.




• मोहाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती मोहाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा मोहाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.




भगवान पुढे म्हणाला, हे ब्राह्मणा कामाग्नी, मोहाग्नी आणि द्वेषाग्नी या तीन अग्नींचा त्याग केल्यानंतर तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांची पुजा करावी. कोणते आहे ते तीन अग्नी. 
१. आहुनेय्यग्गि, 
२. गहपतग्गि, 
३. दक्खिनेय्यग्गि...





•आहुनेय्यग्गी : माता आणि पिता हे आहुनेय्यग्गी आहेत, मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात. म्हणुन त्यांचा आदरसत्कार करावा, त्यांची पूजा करावी.





• गहपग्गि : बायको, मुलंबाळं, मित्र व नौकरचाकर हे गहपतग्गि आहेत म्हणुन त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा, औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.





• दक्खिनेय्यग्गि : हे ब्राह्मणा,, श्रमण आणि ब्राह्मण हे दक्खिनेय्यग्गि आहेत, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा.. आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.



हे ब्राह्मणा हा लाकडाचा अग्नी आहे कधी पेटवावा लागतो तर कधी विझवावा लागतो....

हे सर्व उपदेश ऐकुन तो ब्राह्मण खुप प्रभावीत झाला, त्याने सर्व प्राण्यांना मोकळे सोडले व तो भगवान बुद्धांचा उपासक झाला..

यातुन तुमचा निष्कर्ष काय...?

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


संबंधीत लेख :

यज्ञाचा खरा अर्थ भाग : १

अजीत केसकंबलाचा नास्तिकवादा

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा