सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)जयमंगल अष्टगाथामधील चौथी गाथा अंगुलीमालाच्या जीवनावर प्रकाश टाकते.... अंगुलीमाल नावाचा डाकु भगवान बुद्धाच्या प्रभावाने संघात सामील होतो... आणि अरहंत पदापर्यंत पोहोचतो...
उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावं तियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलान 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.
अंगुलीमालावर विजय

सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना,, एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न केला, कि आपण या वाटेने जाऊ नका पुढे अत्यंत क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमाल नावाचा हिंसाचारी दरोडेखोर रहातो. त्यामुळे त्या जंगलाजवळच्या गावातील लोकांनी आपल्या गावाचा त्याग करुन ते आता श्रावस्ती, साकेत आदी शहरात रहायला आले. तो त्याच्या दृष्टीस पडलेल्या कोणत्याही माणसाला जीवंतपणे जाऊ देत नाही. त्यावर भगवान बुद्ध म्हणत, अरे, पण तो सुद्धा माणुसच आहे ना? तो सध्या हिंसाचारी डाकु असला तरी भविष्यात एक चांगला पुरुष होणार नाही , असे कसे म्हणता येईल? असे बोलुन तथागत पुढे निघुन जात. तो एक राजमार्ग होता पुर्वी या मार्गाने अनेक लोक प्रवास करीत असत, परंतु अंगुलीमालामुळे त्या रस्त्याने कोणीच प्रवास करीत नव्हते. परंतु त्याच राजमार्गावर एक दृढ निश्चयी, मुखावर निर्भयता व अंतकरणातील करुणा मुखावरच दिसणारा तेजस्वी महमानव क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमालाच्या निवासस्थानाजवळ आला. तोच त्या महाकारुणीकाच्या पायाच्या आवाज त्याच्या कानी पडला. त्याने तिकडे बघितल्यावर त्याची दृष्टी भगवंतांवर पडली, विश्वातील सर्वश्रेष्ठ मानव रस्त्याने चालला होता. त्यांच्याकडे पाहुन अंगुलीमाल आश्चर्यचकीत झाला. त्याने असा दिव्य पुरुष कधीच बघितला नव्हता. त्याच्यावरुन नजर न हटावी, त्याच्याकडे पहातच रहावे असे अंगुलीमालाला वाटत होते. त्या महामानवाला पकडण्यासाठी अंगुलीमाल धावु लागला परंतु तो त्यांना पकडु शकत नव्हता.
तेव्हा तो बुद्धास म्हणाला, थांब श्रमणा थांब, त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, अंगुलीमाला मी तर केव्हाचाच स्थीर होऊन थांबलो आहे, तुच पळतो आहेस...


तेव्हा अंगुलीमाल स्वतःशीच म्हणाला हा श्रमण खोटे का बोलत आहे? मला कोणाची भिती आहे तर मी पळणार,, ज्याचे साधे नाव जरी ओठावर आले तरी सर्वांना थरकाप सुटतो, तो अंगुलीमाल पळत सुटणार असे तुला कसे वाटले? श्रमणा, आता मात्र तु खोटे बोलत आहेस, तु इतक्या जलद गतीने पळत आहेस मी घोड्याच्या गतीने तुझा पाठलाग करतो आहे तरी तु मला अजुनपर्यंत सापडला नाहीस..


श्रमण चालत असुन म्हणता मी थांबलो आहे, आणि मलाच थांबलेलो असता थांब म्हणता, श्रमण तुला ह्याचा अर्थ विचारतो, तु कसा थांबला आहेस आणि मी कसा थांबलो नाही.


भगवान म्हणाले,, मी सर्व प्राण्यांबद्दल हिंसा दंड भावना सोडुन दिल्यामुळे नेहमी करीता थांबलो आहे. तु मात्र प्राण्यांबद्दल असंयमी आहेस, म्हणुन मी थांबलेलो आहे, आणि तु थांबलेला नाहीस. तुझ्यातील साधुत्व अजुन मेलेले नाही, जर त्याला तु संधी देशील तर तुझ्यात बदल घडुन येतील.


भगवंतांच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावुन गेला होता.

अंगुलीमाल म्हणाला मी महर्षीची वंदना केली. चिरकाळानंतर श्रमणाचे महावनात आगमन झाले. आपण उपदेशिलेल्या धम्माचे श्रवण करुन त्या हजार पापाचा त्याग करुन मी त्याग करीन. असे म्हणत त्याने आपल्या गळ्यातील माळ व तलवार व धनुष्यबाण वगैरे फेकुन दिले आणि सुगताच्या पायाची वंदना केली. आणि प्रव्रज्जेची याचना केली.


देव व मनुष्यांचे शास्ता अशा महाकारुणीक भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला 'भिक्षु ये' असे म्हटले तेथेच त्याची उपसंपदा झाली. अशा प्रकारे महाहिंसक, महाक्रोधी अंगुलीमालास आपल्या अलौकीक ॠद्धीने जिंकले,.......
उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावंतियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)1 टिप्पणी:

  1. माझ्या मते जो काही संग्रह आपणाकडुन प्रकाशित होतात तो अमुल्य् ठेव आहे. त्याची प्रत्येकाने आपल्या ज्ञानात भर टाकावी व या सदध्म्मचा मार्गावर चालण्याच्या प्रर्यंन केला पाहिजे. भवतु सब्ब् मंगलम

    उत्तर द्याहटवा