शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)



प्रस्तुत लेख हा त्रिपिटकाच्या सुत्त पिटकातील ग्रंथ दीग्घ निकायातील श्रमणफळ सुत्ताचा आहे... येथे राजा अजातशत्रु भगवान बुद्धाला श्रामण्याच्या फळाबद्दल विचारतो....




पौर्णिमेच्या रात्री राजा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह राजवाड्याच्या गच्चीवर बसला होता. त्या वेळी चंद्रप्रकाशाने सर्व प्रदेशाला अत्यंत रमणीयता आली होती.राजा आपल्या अमात्यांकडे पाहून उद्गारला "आजची रात्र कितीतरी रमणीय आहे! किती तरी सुंदर आहे! या वेळी एखाद्या प्रसिद्ध श्रमणाची किंवा ब्राह्मणाची भेट घेतली असता आमचे मन प्रसन्न होईल. असा श्रमण किंवा ब्राह्मण या राजगृहामध्ये सध्या कोण आहे?''


त्या अमात्यांतील एकजण म्हणाला "महाराज, पूरण काश्यप हा सध्या येथे रहात आहे. पुष्कळ लोकांचा तो गुरू आहे, हे आपण जाणताच.''


दुसरा अमात्य म्हणाला "मक्खलि गोसाल हा फार प्रिसद्ध धर्मप्रवर्तक सध्या येथे आहे. त्याच्या दर्शनाला महाराज गेल्यास तो महाराजांच्या चित्ताचे समाधान करील, असे मला वाटते!''

तिसऱ्या अमात्यानें अजित केसकंबलाच्या दर्शनाला जाण्याविषयीं अजातशत्रूला विनंती केली.

चौथ्याने पकुध कात्यायनाची स्तुती करून राजानें त्याच्या दर्शनाला जावे असे म्हटले.

पाचव्याने संजय बेलठ्ठपुत्राची थोरवी गाऊन त्याच्या भेटीला जाण्याविषयी राजाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

सहाव्याने निर्ग्रंथ नाथपुत्राच्या दर्शनाला जाण्याविषयी राजाला विनंती केली. पण राजा अजातशत्रुने याबद्दल कोणालाही उत्तर दिले नाही. जीवक कौमारभृत्य नावाचा प्रसिद्ध वैद्य मगधराजाच्या दरबारी होता. तो या वेळी अजातशत्रूच्याजवळ बसला होता. अजातशत्रु त्याला म्हणाला "सौम्य जीवक, याबद्दल तु काहीच का बोलत नाहीस?



जीवक म्हणाला "महाराज, सध्या बुद्ध भगवान् माझ्या आम्रवनांत रहात आहेत.जर आपली मर्जी असेल तर आपण त्या भगवंताच्या दर्शनाला जाऊ.''

अजातशत्रु म्हणाला "तर मग हत्ती सज्ज करावयास सांग.''

राजाच्या हुकुमाप्रमाणें जीवकानें पुष्कळ हत्ती आणि हत्तिणी सज्ज करून सगळी तयारी झाली असल्याचे राजाला सांगीतले. राजा प्रत्येक हत्तिणीवर आपल्या अंत:पुरांतील एकेका स्त्रीला बसवून आपण एका उत्तम गजावर आरूढ होऊन आपल्या जीवकादि अमात्यांसहवर्तमान मोठ्या थाटाने बुद्धदर्शनाला निघाला.


आम्रवनाच्या जवळ आल्यावर अजातशत्रु घाबरून गेला, आणि जीवकाला म्हणाला सौम्य जीवक! मला तू फसवीत तर नाहीसना? माझ्या शत्रूच्या हाती देण्यासाठी मला येथे आणले नाहीसना? साडेबाराशे भिक्षूंचा संघ येथें रहात असता एकाचा देखील बोलण्या चालण्याचा शब्द ऐकू येत नाही, हे मोठें आश्चर्य नव्हे काय?''


जीवक म्हणाला "महाराज! भिऊ नका. तुम्हाला फसवून शत्रुच्या ताब्यात देण्यासाठी मी येथे आणले नाही. आपण पुढे व्हा. हे समोरच्या ओसरीवर दिवे जळत आहेत.'' जीवकाच्या आम्रवनाबाहेर आपले हत्ती उभे करून राजा सर्व मंडळीसह भगवान बुद्ध जेथे बसले होते त्या ठिकाणी गेले... जीवकाने राजाला बुद्धाची ओळख करून दिली. परंतु त्याची भेट घेण्यापूर्वीच भिक्षुसंघाची शांत आणि गंभीर चर्या पाहून तो उद्गारला "माझ्या उदायिभद्र कुमार अशा प्रकारच्या शांतीने संपन्न होवो!''


हे राजाचे उद्गार ऐकून बुद्ध म्हणाला "महाराज! तू आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोललास.'' "होय भगवन्, उदायिभद्र माझा आवडता मुलगा आहे,'' अजातशत्रूने उत्तर दिले, व बुद्धाला आणि भिक्षुसंघाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला.


एका बाजूला बसल्यावर अजातशत्रु म्हणाला "भगवन्, निरनिराळे योद्धे, न्हावी, स्वयंपाकी, माळी, धोबी, बुरूड, कुंभार, कारकून वगैरे लोक आपापल्या कलेचें इहलोकीचे फळ मिळवत असतात. आपल्या कलेच्या बळावर द्रव्यार्जन करून ते आपला उदरनिर्वाह करतात, आपल्या आईबापांचा सांभाळ करतात. आणि श्रमणब्राह्मणांनां दक्षिणा देऊन परलोकी स्वर्गाचा मार्ग खुला करतात.

पण भगवन्, या लोकांच्या शिल्पाचे जसे प्रत्यक्ष फळ दाखवता येते, तसे श्रामण्याचे प्रत्यक्ष फळ दाखवता येईल काय?''

बुद्ध म्हणाला ''हा प्रश्न तू दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांनां विचारून पाहिला आहेस काय?''


राजा म्हणाला "होय. एकदा मी पूरण कश्यपाला भेटून हा प्रश्न विचारला. तेव्हा पूरण मला म्हणाला `करणाऱ्याला किंवा करविणाऱ्याला, मारणाऱ्याला किंवा मारविणाऱ्याला, परदारागमन करणाऱ्याला, खोटे बोलणाऱ्याला, किंवा अन्य कोणतेही कर्म करणाऱ्याला त्या कर्मापासून पाप जडत नाही. त्याचप्रमाणें कोणतेंही चांगले कृत्य केले असता पुण्यप्राप्ती होते, ही दृष्टिदेखील खोटी आहे.' याप्रमाणे भगवन्, पूरणकश्यपाला श्रामण्याचे प्रत्यक्ष फळ विचारले असता त्याने आपला अक्रियावाद सांगितला.


''पुन: एकदा मीं हा प्रश्न मक्खलिगोसालाला विचारला होता. तेव्हा तो म्हणाला `प्राण्याच्या शुद्धीला किंवा संक्लेशाला काही कारण लागत नाही. आपल्या प्रयत्नाने मनुष्य मोक्ष मिळत नसतो. मूर्ख किंवा शहाण्या मनुष्याला सर्व योनीत जन्म घेतल्यावर आपोआप मोक्ष मिळणार आहे.'


याप्रमाणे मक्खलिगोसालाला मी श्रामण्य फळासंबंधाने प्रश्न विचारला असता त्याने आपला संसारशुद्धिवाद पुढें केला.


"दुसऱ्या एका प्रसंगी अजित केसकंबालाला मी हा प्रश्न विचारला असता तो मला म्हणाला `बऱ्यावाईट कर्माचे फळ भोगावे लागते, ही गोष्ट खोटी आहे. चार महाभूतांपासून हा देह बनलेला आहे. मनुष्य मृत्यु पावल्यावर पृथ्वीचा अंश पृथ्वींत जातो, वायूचा अंश वायूंत, उदकाचा अंश उदकांत, आणि अग्नीचा अंश अग्नींत जातो; मनुष्याच्या मरणोत्तर काही एक शिल्लक रहात नाही. दानाची प्रशंसा केवळ मूर्ख मनुष्ये करीत असतात; त्यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नसतो.' याप्रमाणे अजित केसकंबालाला मी श्रामण्य फलासंबंधानें प्रश्न केला असता त्याने आपला उच्छेदवाद प्रतिपादिला.



"भगवन् एकदा पकुध कात्यायनाला मी हा प्रश्न विचारला असता तो मला म्हणाला `पृथ्वि, उदक, तेज, वायु, सुख, दु:ख आणि जीव, हे सात पदार्थ नित्य आहेत. ते कोणींच उत्पन्न केले नाहीत. अर्थात् एकाला दुसरा मारतो किंवा मारवितो, ही गोष्ट खोटी आहे.' याप्रमाणे एकुध कात्यायनाला मी श्रामण्यासंबंधाने प्रश्न केला असता त्याने आपला सप्तपदार्थवाद किंवा अन्योन्यवाद सांगितला.


"नंतर एकदा मी निर्ग्रंथ (जैन) नाथपुत्राला भेटलो व त्याला प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला `निर्ग्रंथ कोणत्याच पापाला शिवत नसतो; सगळ्या पापाचा नाश करण्याचा तो प्रयत्न करतो; सर्व पाप धुऊन टाकतो आणि पापावरणापासून मुक्त राहतो. याला मी चातुर्यामसंवरसंवृत्त असे म्हणतो.' याप्रमाणे निर्ग्रंथ नाथपुत्राला मी श्रामण्य फलासंबंधाने विचारले असता त्यानें आपला चातुर्यामसंवर सांगितला.



संजय बेलठ्ठपुत्राला जेव्हा मी हा प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला `तुम्ही जर परलोक आहे काय असे विचाराल, तर ते मला ठाऊक नाही. परलोक नाही हे देखील मला ठाऊक नाही. प्राण्याला कर्मा प्रमाणे फळ मिळते किंवा नाही, हे मला सांगता येत नाही. तथागत मरणानंतर उत्पन्न होतो किंवा नाही, हेही मी सांगू शकणार नाही. याप्रमाणे बेलठ्ठपुत्राला श्रामण्य फला संबंधाने प्रश्न विचारला असता त्याने आपला विक्षेपवाद (अज्ञेयवाद) सांगितला.


भगवन्, यांच्यापैकी कोणीही माझ्या मनाचे समाधान करु शकला नाही; पण माझ्यासारख्या राजाला श्रमणांचा कोणत्याही रीतीने अपमान करणे प्रशस्त नाही, असा विचार करून या आचार्यांविरुद्ध काही एक न बोलता मी मुकाट्याने माघारा आलो.''



बुद्ध म्हणाला "महाराज, तुझा एखादा दास आपल्या दुर्गत स्थितीला कंटाळून भिक्षु होईल, व मोठ्या साधुत्वाने वागेल. अशा मनुष्याला तू पकडून पुन: दासकर्म करावयाला लावशील काय?''


अजातशत्रु म्हणाला "नाही. अशा मनुष्याला मी माझ्यासमोर आसन देईन; आणि वस्त्रान्नाची त्याला ददात पडू नये, अशी व्यवस्था करीन.''


"तर मग महाराज, श्रामण्याचे हे प्रत्यक्ष फल म्हणता येणार नाही काय?''

"भगवन्, नि:संशय याला श्रमण्याचे प्रत्यक्ष फल म्हणता येईल.''

बुद्ध म्हणाला "एखादा दरिद्री मनुष्य आपल्या अल्प संपत्तीचा त्याग करून भिक्षु होईल, व भिक्षूला पाळावयाचे जे नियम असतात ते सर्व पाळील. पोटापुरत्या अन्नाने आणि देहआच्छादनापुरत्या वस्त्राने तो संतुष्ट होईल, व लोभ, क्रोध, आळस, चंचलता आणि कुशंका या पाच आवरणांपासून आपले चित्त मुक्त करून तो सावधगिरीनें वागेल.


जसा एखादा मनुष्य ऋणांतून मुक्त व्हावा, किंवा भयंकर व्याधींतून मुक्त व्हावा, बंधनागारांतून मुक्त व्हावा, दास्यांतून मुक्त व्हावा, अथवा जंगलांतून सुरक्षितपणे पार पडावा, तसा हा भिक्षु या चित्ताच्या पाच आवरणांपासून मुक्त होऊन सर्व ध्यानाचा लाभ करून घेईल; तेव्हा त्याला प्रत्यक्ष श्रामण्यफल मिळाले, असे म्हणण्यास हरकत राहील काय?''


अजातशत्रु म्हणाला "भगवन्, त्याला नि:संशय श्रामण्याचे फल मिळते, असे म्हणावे लागेल.''


आणखीही निरनिराळ्या मार्गानें बुद्धानें श्रामण्याचे प्रत्यक्ष फल कसे मिळते हे सांगितल्यावर अजातशत्रु बुद्धाला, धर्माला आणि संघाला शरण जाऊन बुद्धोपासक झाला,

आणि म्हणाला "भगवन्, मी मोठा अपराध केला आहे. मी अत्यंत मूर्खपणाने माझ्या धार्मिक पित्याच्या मरणाला कारण झालो, याबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. भगवन्, या अपराधाची मला क्षमा करा.


''

बुद्ध म्हणाला "महाराज, हा तुझा अपराध झाला, यात संशय नाही; पण या अपराधाबद्दल तुला पश्चात्ताप होत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. समाधानाची गोष्ट आहे. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल पश्चात्ताप होणे, आणि पुन: तसा अपराध होऊ न देणे, हे आर्यश्रावकाचे कर्तव्य होय.




अजातशत्रु म्हणाला "भगवन्, मी आता जातो. माझ्यामागे पुष्कळ कामे आहेत.''

"ठीक आहे,'' बुद्धाने उत्तर दिले.


अजातशत्रु निघून गेल्यावर बुद्ध भिक्षूंना म्हणाला "या राजाच्या हातून जर पितृहत्येचे पाप घडले नसते, तर येथल्या येथेच याला सोतापत्तिफलाचा लाभ झाला असता!''

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

1 टिप्पणी: