मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

आर्य अष्टांगिक मार्ग (मज्झिमा पटिपदा - मध्यम मार्ग)

इतर धर्माप्रमाणे बौद्धधर्माला ईश्वराची कल्पना मान्य नाही. इतर धर्म सृष्टीचा कर्ता करविता परमेश्वर मानतात आणि तोच आपल्या दुःखाचा नाश करतो, अशी त्याची समजुत आहे, परंतु या धर्माला ईश्वराची कल्पनाच मान्य नाही आणि जग हे दुःखमय आहे. असे भगवान म्हणतात, तेव्हा प्रश्न पडतो कि जर ईश्वर अस्तित्वात नाही तर मग मानवाचे दुःख कोण नष्ट करणार? याचे उत्तर बुद्ध भगवंतांनी सांगितले आहे. ज्याचे दुःख त्याने स्वतःनेच दुर करायचे असते. त्यासाठी भगवंतांनी जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गाचे पालन केल्यास आपण दुःखाचा नाश करु शकतो असे भगवान बुद्ध म्हणतात. तेव्हा दुःख मुक्तीचा जो मार्ग आहे, तो आठ अंगांनी युक्त असल्यामुळे त्याला 'अष्टांगिक मार्ग' असे म्हणतात. अतिशय चैनीचे जीवन आणि अतिशय कष्टाचे जीवन या दोन्हीच्या मधला मार्ग आहे, यालाच 'मध्यम मार्ग' असे म्हणतात. हाच मार्ग निर्वाणाकडे नेणारा आहे.सहा वर्षे सतत घोर तपश्चर्येनंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधीसत्व सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले. त्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणापर्यंत सतत पंचेचाळीस वर्षे धम्माची शिकवण सांगण्यासाठी खर्च केले. त्यांच्या शिकवणुकीस बुद्ध धम्म म्हणतात. आज आशियायी राष्ट्रांमध्ये बुद्ध धम्म हा प्रमुख धम्म म्हणुन बर्याच ठिकाणी आहे. हा धम्ममार्ग सामान्यांच्या विचारांना विशिष्ट धार देणारा धम्म आहे. अयोग्य व हानिकारक विचारांना थांबविणारा मध्यम मार्ग. मध्यम मार्गाचा स्वीकार केल्याने, आचरण केल्याने, आपण दुःखमुक्त होवु शकतो. मध्यम मार्गाचा अवलंब केल्याने आपण आपले निश्चित ध्येय गाठु शकतो, जीवनाचा खरा आनंद प्राप्त करु शकतो.

१.सम्यक दृष्टी :आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील...सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही.

खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते.


मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल.


मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय.


सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..?

अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.

मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे.

अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.

ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत.

स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत.२.सम्यक संकल्प :कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे.


व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात.


३.सम्यक वाचा :सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात.सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि,

१. माणसाने सत्य तेच बोलावे.
२. असत्य बोलु नये
३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये.
४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे.
५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये.
६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.
७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..


४.सम्यक कर्मांत :सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे.

.सम्यक आजीविका :
प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय.


६.सम्यक व्यायाम :सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे.

७.सम्यक स्मृती :सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागृअकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे.

८.सम्यक समाधी :सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :


१. भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम
शिक्षक......


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

४.मराठी धम्मपद

५. बुद्ध वंदना : मराठी

1 टिप्पणी: