शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...

भगवान बुद्ध स्त्री द्वेष्टे होते, त्यांच्यामुळे भारतीय स्त्रीची अशी दुर्दशा झाली, त्यांनी आपल्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले असे विविध आरोप त्यांच्यावर केले जातात.


भगवान बुद्धांच्या शिकवणीसंबंधी जे खोडसाळ आरोप करण्यात येतात ते खोडुन काढणे हे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे.


एखाद्या वेळी असल्या आरोपांचे खंडन करण्याची गोष्ट असती तर काही हरकत नाही,, पण आपल्या ठायी असलेल्या अज्ञानाच्या वा अर्धवट ज्ञानाच्या बळावर कितीतरी धर्ममार्तंड आणी त्यांची थुंकी झेलणारे असल्या प्रकारचे आरोप करतात. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीवर हल्ले करणे व आरोप लावणे हे त्यांच्या विरोधकांचे व टीकाकारांचे आवडते काम, अगदी बुद्धकाळापासुन त्यांचा वारसा चालवणारी त्यांची पिल्लावळ आजही आपल्या समाजात वावरत आहेत, पण लवकरच त्यांचेही ह्रदय परिवर्तन होवुन ते सुद्धा भगवान बुद्धांनी सांगीतलेल्या सन्मार्गावर चालायला लागतील अशी खात्री आहे.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेख लिहिला होता त्यातील काही भाग :
भगवान बुद्धांच्या धम्मावर जे काही आरोप होतात ते टीकाकाराच्या ठायी असलेल्या अज्ञानामुळेच!

भगवान बुद्ध हे स्त्री द्वेष्टे होते हे सिद्ध करण्यासाठी प्रामुख्याने एक पुरावा (खोटा?) दिला जातो.

भगवान बुद्धांनी प्रथम स्त्रीयांना संघात प्रवेश नाकारला, पण त्यांचे शिष्य आनंदाच्या सांगण्यावरुन त्यांनी स्त्रीयांना संघात प्रवेश दिला खरा, पण आठ अटींवर, आणी त्या आठ अटींमुळे त्यांच्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान प्राप्त झाले.

अशा सर्व धर्ममार्तंड टीकाकारांना हा लेख एक सडेतोड उत्तर आहे...

स्त्रियांनी संघात येऊ नये, असे बुद्धांचे प्रथम मत होते. ते मत बदलुन त्यांनी स्त्रियांना संघात येऊ दिले, पण त्यांनी स्त्रियांचा वेगळा संघ निर्माण केला, तो भिक्खुणी संघ, भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे. यासंबंधीचे नियम भगवान बुद्धांनी तयार केले. या सर्व घटनांकडे बोट दाखवुन टीकाकार म्हणतात की, भगवान बुद्धांचे स्त्रियांसंबंधीचे मत चांगले नव्हते. या घटनांचा थोडा जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे.


१. महाप्रजापती परिव्रजा घेण्यास बुद्धांकडे आली तेव्हा, त्यांनी विरोध का केला? स्त्रियां जात्याच चंचल वृत्तीच्या असतात. त्या आपल्या संघात आल्या तर आपल्या संघाचे समाजातील स्थान कमी दर्जाचे होईल. आपला संघ समाजाला आदरणीय वाटणार नाही, असे बुद्धांना वाटले काय? किंवा


२. स्त्रियां ह्या बौद्धिक आणि नैतिक दृष्टीने आपल्या धर्मातील आणि संघातील पवित्र तत्वे जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यास असमर्थ आहेत असे बुद्धांना का वाटले. म्हणुन त्यांनी महाप्रजापतीच्या तसेच 500 शाक्य स्त्रियांच्या परिव्रजेला विरोध केला काय?

वरील दोन प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न एकदा आनंदाने भगवान बुद्धांना विचारला होता. भगवान बुद्धांच्या संघातील स्त्री प्रवेशाला विरोध पाहुन त्यावेळी आनंदाच्या सर्व शंकाचे निरसन भगवान बुद्धांनी केलेले होते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले होते की, स्त्रिया आपला धम्म आणि धम्मशिक्षा जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास सर्वस्वी समर्थ आहेत. पण या कारणामुळे बुद्धाचा स्त्रियांना विरोध नव्हता.

स्त्री बुद्धिमता आणि नीतीमता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाची आहे, असे बुद्ध समजत नव्हता. स्त्रिया चंचल वृत्तीच्या आहेत, असे बुद्ध समजत होता; आणि संघात स्त्रियांना प्रवेश करु दिला तर संघाची समाजातील पत नाहीशी होईल , अशी बुद्धाला भिती वाटत होती. अशाप्रकारचे मत ज्या टीकाकारांचे आहे ते कवडीमोल किंमतीचे आहेत; कारण बुद्धाचे स्त्रियांबद्दल जर तसे मत असते तर त्याने स्त्रियांना संघात कधीही घेतले नसते. भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या खालच्या दर्जाचा ठरविण्यात बुद्धाची स्त्रीविषयक दृष्टी कलुषित होती असे जे टीकाकार म्हणतात, त्यांना हे उत्तर :

स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक शारीरिक श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा या गोष्टी लक्षात घेऊनच बुद्धाने, ही दोन संघाची योजना केली नव्हती. ती योजना करण्यात त्याचा केवळ व्यवहारी दृष्टीकोन होता. स्त्रियांना संघात घेण्याचा जेव्हा प्रश्न निघाला तेव्हा, बुद्धांच्या पुढे दोन प्रश्न उत्पन्न झाले.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी संघ एक असावा कि दोन वेगवेगळे संघ असावेत? खुप विचार केल्यानंतर त्यांनी ठरवले की, दोन वेगवेगळे संघ असावेत. परिव्रजा घेतल्यानंतर ब्रह्मचर्यावस्थेत राहणे याबद्दल भिक्खु आणि भिक्खुणी शपथबद्ध झालेले होते. परंतु ते हेकत्र राहिले तर, ही शपथब्द्धता अभंग ठेवणे शक्य नव्हते, म्हणुन भगवान बुद्धांनी ठरवले कि भिक्खु आणि भिक्खुणी यांचे संघ वेगवेगळे ठेवणे योग्य आहे. हे सर्व त्यांनी व्यवहारी दृष्टी ठेऊनच ठरविले. स्त्रियांना कमी लेखण्याची त्यांची मुळीच दृष्टी नव्हती. भिक्खुणींसाठी स्वतंत्र संघ निर्माण करण्याच्या वेळी बुद्धाला प्रश्न पडला कि, हे दोन्ही संघ समसमान पातळीवर ठेऊन त्यांत स्त्री-पुरुषांना निःशंक आणि निर्मळ मनाने मिसळता यीएल, अशी योजना करायची की, दोन्ही संघ एकमेकांपासुन अगदी वेगळे ठेवावेत.

भिक्खुणी संघ भिक्खु संघापासुन वेगळा ठेवणे आहे. हा निर्णय बुद्धाने घेतला होताच. भिक्खु आणि भिक्खुणी याण्ना कडक ब्रह्मचर्येचे व्रत पाळावयाचे होते, म्हणुन हा निर्णय ते व्रत पाळण्यास सहाय्यक ठरत होता. स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात वैषयिक भावनेला फार महत्व आहे याची भगवंताला जाणीव होती. 'वासना स्त्रीला पुरुषाची दासी बनवते तर पुरुषाला स्त्रीचा गुलाम' अशा प्रकारचे उद्गार बुद्धांनी एकदा काढले होते. ही वासना अनियंत्रित स्वरुपात राहिली तर, ती ब्रह्मचर्येला बळी न पडतील अशी व्यवहारी योजना त्यांनी केली, ती स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करुनच.

स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भगवंतांनी वेगवेगळे संघ काढल. याशिवाय त्यांना दुसरा निर्णय घेत आला असता काय?ते आठ नियम...


ज्या स्त्रिया संघात आल्या त्या व्यवहारात न पडलेल्या अशा किशोरावस्थेतील होत्या. धम्माची तत्वे आणि आचरणाचे नियम याबद्दल त्यांना उपदेश देऊन तयार करावयाचे होते. हे काम कोणी करावे? संघातील भिक्खुंशिवाय हे काम करण्यास दुसरे कोण योग्य होते? भिक्खु धम्म आणि आचराणाचे नियम पाळण्यात तरबेज झाले होते. म्हणुन बुद्धांनी कोणती सावधानता स्वीकारली? भिक्खु भिक्खुणींना शिकविताना गुरु शिष्यांचे पवित्र संबंध राखले पाहिजे, असा बुद्धांनी नियम केला होता, भिक्खु हे शिक्षक व भिक्खुणी ह्या शिष्या असत. शिक्षक म्हणुन भिक्खुचा दर्जा भिक्खुणींपेक्षा जास्त म्हत्वाचा होता. शिष्या म्हणुन भिक्खुणींचा दर्जा भिक्खुंपेक्षा कमी होतात, आज्ञाधारकपणाचा होता, भिक्खुसंघ हा भिक्खुणी संघावर शिक्षकाप्रमाणे अधिकार गाजवत होता, शासकाप्रमाणे त्यांच्यावर सत्ता गाजवत नव्हता. त्यांना गुलामांची वागणुक देत नव्हता. येथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे आठ नियम भिक्खुणींच्या ३३१ नियमांपेक्षा वेगळे का ठेवले गेले? या नियमांचा अंतर्भाव त्यांच्या ३३१ विनयांमध्ये का होत नाही. हे ज्या आठ नियमांच्या भरवशावर तुम्ही भगवान बुद्धांना स्त्री द्वेष्टे ठरवत आहात, तुमच्यापैकी कितीजन जाणतात कि, हे नियम श्रामणेरांसाठीसुद्धा लागु होतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक नवा भिक्खु जो दीक्षा घेतो त्याच्यासाठी सुद्धा हे नियम असतात... प्रत्येक भिक्खुने त्याच्यापेक्षा महान भिक्खुला अथवा भिक्खुणीला वंदन केले पाहिजेत असा नियम आहे. स्थाविर, महास्थाविर, इत्यादींद्वारे बौद्ध भिक्खुंचा स्तर कळत असतो,,, स्थाविराने महास्थाविराशी संपर्क करताना हे नियम पाळावे लागतात... स्त्री महास्थाविर बनु शकत नाही अशातला भाग नाही. मग स्थाविर अथा त्याच्यापेक्षा लहान भिक्खुने महास्थाविर थेरीला वंदन केलेच पाहिजेत...... हे तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे?

भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे, हा नियम चुकीचा ठरतो कायआजच्या आधुनिक युगातही एखादी विद्यार्थीनी आपल्या शिक्षकाचा आदर सत्कार करत असेल तर ती हीन ठरते काय?

भिक्खु आणि भिक्खुणी यांच्यामधील संबंध नियमबद्ध करण्यासाठी बुद्धाने जी योजना आखली ती, स्त्रियांना कमी दर्जा देणारी होती, असा निराळा अर्थ कोणी का लावावा? असा अर्थ लावणे हे तर्कशुद्ध नाही काय? केवळ मुर्खच असा अर्थ काढु शकतात.

भिक्खुंच्या अधिपत्याखाली भिक्खुणींना बुद्धाने ठेवले हा त्याने एक मोठा सामाजिक गुन्हा केला असे जे मानतात, त्यांना बुद्धांनी स्त्रीवर्गाला संन्यासदीक्षा घेण्याची मुभा दिली याबबत जाणीव झाली नसावी. त्या काळात ब्राह्मणी धर्म स्त्रीवर्गाला ज्ञानार्जन करण्यास मुभा देत नव्हता. स्त्रियांनी संन्यास घ्यावा हा एक प्रश्न त्या काळी उपस्थित झाला तेव्हा, ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर एक दुसरा अन्याय केला. ब्राह्मण हे वेदांची पुजा करत असत. वेदांना संन्यास मान्य नाही, हे जाणकारांना माहीत असेल, पण त्याकाळेद उपनिषद नावाची धार्मिक ग्रंथ अस्तित्वात होती. पण उपनिषद हि पवित्र धार्मिक ग्रंथ होते असे वैदिकांनी पुष्कळ काळापर्यंत मान्य केले नव्हते. हि ऐतिहासिक घटना आहे. तर्क नव्हे. उपनिषदे संन्यासाला आदर्श समजत होती. आत्मा हा ब्रह्म होय. ही उपनिषदातील प्रमुख शिकवण होय. ती शिकवण आत्मसात करणे हे संन्यासवृत्तीचे ध्येय होते, पण ब्राह्मण लोक संन्यासी जीवनाचे कट्टर विरोधक होते. संन्यासी वृत्तीबद्दल जे कडाक्याचे वादविवाद झाले, त्यांत शेवटी ब्राह्मणांनी संन्यास वृत्तीला मान्यता दिली, ती मान्यता काही अटींवर दिली होती. त्यापैकी एक अट अशी होती की, स्त्रिया व शुद्र यांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा.

स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा अशी अट वैदिकांनी घातली. याचे कारण काय, हे समजावुन घेतले म्हणजे बुद्ध आणि ब्राह्मण यांची स्त्रियांसंबंधी जी मते होती, त्यांच्यातील दक्षिणोत्तर फरक लक्षात येईल. हे कारण मनुने सांगीतले ते असे-

स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही, म्हणुन त्यांचे संस्कार वैदिक मंत्रांशिवाय करावयाचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नव्हते. कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता. वैदिक मंत्र उच्चारले तर पाप नष्ट होते. ज्याअर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चार शकत नव्हत्या म्हणुन त्या असतय, पापी स्थितीत राहणाऱ्याच होत...

भारताचा इतिहास आपल्याला हे सांगतो की, प्राचीन काळात ब्राह्मणी धर्माने बंधनांची जी गुलामगिरीची जालीम साखळी निर्माण केलेली होती ती बौद्ध धर्माने खिळखिळी केली आणि शेवटी ताडकन तोडली. हे कसे घडले? वैयक्तिक स्वांतंत्र्य, सामाजिक विषमतेच्या कर्दनकाळातुन पददलित मानवाची प्रबळ इच्छा, आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी वनात जाऊन राहण्याची इच्छा उत्पन्न होताच कोणालाही वनात जाण्याचे स्वांतत्र्य असणे याबाबत जे नैसर्गिक मानवी हक्क होते, त्यांना बौद्ध धर्माने पाठिंबा दिला. ते आपले हक्क समाजात प्रस्थापित करु शकले. बौद्ध धर्माचे हे महान ऐतिहासिक कार्य आपल्याला नाकारता येणार नाही.

भगवान बुद्धांनी भारतातील स्त्रियांना हे जे स्वांतत्र्य दिले त्याचे महत्व न मोजता येण्यासारखे आहे. भिक्खुणी संघाला भिक्खु संघाच्या सामित्वाखाली ठेवहे ज्यांना चुकीचे वाटते, त्यांनी भगवान बुद्धांनी स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य लक्षात घेतले, तर ते आपला आरोप चुकीचा आहे हे मान्य करतील. भगवान बुद्धांनी स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिले ते तकलुपी नव्हते. स्त्रियांनी त्या स्वातंत्र्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांनी त्यांचे पोवाडे गाईले.

ब्राह्मण कन्या मेत्तिका भिक्खुणी झाल्यानंतर तिने एकदा असे उद्गार काढले. 'मी या शिळेवर दररोज ध्यानस्त बसते,तेव्हा स्वातंत्र्याचे श्वासोच्छवास माझ्या आध्यात्मिक साधनेवरुन एकसारखे वाहत असता.

दुसरी ब्राह्मण कन्या मुक्ता, भिक्खुणी झाल्यावर तिने, एकदा असे उद्गार काढले, अहाहा! मी खरोखरच स्वंतत्र आहे. माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही.

स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा हक्क देवुन भगवंतांनी त्यांना स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर लिंगभेदाबद्दल यत्किंचितही अढी न बाळगता त्यांनी स्त्रियांना थोर पदाला पोहोचण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर, पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

तांत्रिक दृष्टीने भिक्खुणी भिक्खुंच्या हाताखाली राहत होत्या हे खरे आणि तितकेच स्पष्ट आहे. भिक्खु संघात जो पुरुष ज्ञान आणि श्रेष्ठत्व यामुळे उच्च पदावर विराजमान झालेला होता, त्याच्या बरोबरेचा भिक्खुणी संघातील थेरो हक्काने मिळवु शकत होती.

कश्यप (महाकश्यप) हा आध्यात्मिक बाबतीत श्रेष्ठ होता. तो संघात प्रमुख होता. त्याचा दर्जा संघसंस्थापक भगवान बुद्ध यांच्या खालोखाल होता. अध्यात्मिक बाबतीत ह्या अशा महान कश्यपाबरोबरीभा समान दर्जा भद्दा या थेरीने मिळविलेला होता. (वाचा : धम्मसुत्त ३७)... याबाबतीत हे स्पष्ट केले पाहिजे, असा दंडक घातलेला नव्हता, विवाहित, अविवाहित, विध्वा आणि वेश्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना परिव्रजा घेण्यास भगवंतांनी संघाचा दरवाजा खुला ठेवला होता. यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य, समता, आत्मविकास, इत्यादी ही मानवी जीवणाची सर्व अंगे प्राप्त करुन घेता येत होती.

हे सुध्दा वाचा :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा