बुधवार, ४ मे, २०१६

मांसाहारी असणे हे हिंसक असण्याचे निकष नव्हे...

काही दिवसांपुर्वी सारंगधर नावाच्या आयडी वरुन माझ्या ब्लॉग वर एक संदेश पाठविण्यात आला. त्यांच्या अर्थानुसार मांसाहारी असणे हे हिंसक असण्याचे आणि अर्थातच शाकाहारी असणे हे अहिंसक असण्याचे निकष आहेत. (वास्तवात कोण आपल्या आहारात काय खातो किंवा पितो यावरुन त्याला हिंसक किंवा अहिंसकाचे प्रमाणपत्र दिले जावे, हे संकुचित मानसिकतेचे व विचारधारेचे लक्षण आहे.) असो.. त्यांच्या लांबलचक प्रतिक्रियेला मी थोडक्यात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिक्रिया लिहितांना ती एखाद्या लेखापेक्षाही मोठी झाली. त्यामुळे त्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर म्हणुन एक वेगळा लेख लिहित आहे. लेखाचा आवाका कमी करण्यासाठी तो थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे अनेक गोष्टी त्यातुन सुटल्या असतील तर क्षमा असावी. सर्वप्रथम हा लेख वाचण्यापुर्वी सारंगधर याची प्रतिक्रिया वाचुन घ्यावी.१. जर तुम्हीं मांसाहार करीत असाल किंवा बुध्दांनी सांगीतलेल्या धर्माच्या मार्गावर चालत नसाल, तर त्यात बुध्दांचा अपमान कसा काय...? वास्तवात बुध्द तर त्यांनाच म्हटले जाते ज्यांनी मान - अपमानाच्या सर्व बंधनांना नष्ट केले आहे.

२. केवळ मांसाहार केल्याने तुम्ही बुध्दांनी सांगीतलेल्या धर्मापासुन परावृत्त होत आहात, हि अत्यंत चुकीची संकल्पना तुम्ही लावुन धरत आहात. कारण भगवान बुध्दांनी जीवाला मांसाहार करण्यास कुठेही प्रतिबंध केलेला नाही, शिवाय मांसाहारी असणे हे हिंसक असण्याचे व शाकाहारी असणे हे अहिंसक असण्याचे निकष सुध्दा नव्हेत. वास्तवात कोण आपल्या आहारात काय खातो किंवा पितो यावरुन त्याला हिंसक किंवा अहिंसकाचे प्रमाणपत्र दिले जावे, हे संकुचित मानसिकतेचे व विचारधारेचे लक्षण आहे.

३. भगवान बुध्दांच्या अनुसार अहिंसेचा अर्थ खुप व्यापक आहे. हिंसा हि तीन प्रकारे केली जाते : काया, वाचा आणि मनाद्वारे.. या अर्थानुसार केवळ एखाद्या जीवाची हत्या करणे हाच हिंसेचा प्रकार नव्हे, तर एखाद्याला शिव्या देणे, कोणाच्या प्रती वाईट विचार करणे, कोणाच्या अकल्याणाची कामना करणे, इत्यादी सुध्दा हिंसेचेच प्रकार आहेत. अर्थात शरीर, वाणी आणि मनाने जाणीवपुर्वक घडली जाणारी अशी गोष्ट जी दुसऱ्या जीवाच्या अकल्याणाशी संबंधीत आही किंवा ज्या गोष्टीमुळे इतरांना दुःख होऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट म्हणजे हिंसा होय. अशा सर्व गोष्टींपासुन दुर राहण्याचा उपदेश भगवानांनी आपल्याला केलेला आहे.

४. आपल्या समाजात हिंसेच्या घेतलेल्या चुकिच्या अर्थामुळे अहिंसेच्या नावाखाली समाज अधिक हिंसक बनलेला आपल्याला दिसुन येतो. आपल्या समाजातील लोक शाकाहारी असणे हे अहिंसक तसेच मांसाहारी असणे हे हिंसकतेचे निकष मानतात, पण वास्तविक पाहता शाकाहाराचा आणि अहिंसेचा संबंधच काय..? खरंतर, शाकाहारी जीवच मांसाहारी लोकांपेक्षा अधिक हिंसक असतात. कारण ते आपला शाकाहारी धर्म पाळण्यासाठी कमालीचे हिंसक होतात, याची बरीच उदाहरणे मुंबईच्या अनेक शाकाहारी सोसायट्यांमध्ये आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतात. मांसाहार करण्याचा केवळ संशय आला म्हणुन, माणसांना स्वतःला अहिंसक समजणांऱ्या शाकाहारी लोकांकडुन बेदम मारहाण केली जाते. त्यांच्या अशा कृत्यामागे मुळात शाकाहार का स्वीकारला गेला हा प्रश्न केव्हाच मागे पडला आहे. तर मांसाचा वास जरी आला तरी पाप घडते अशी मिथ्या मान्यता लोकांची बनलेली आहे, त्यामुळे समाजात अंधविश्वासाचे आणि अधर्माचे साम्राज्य पसरण्यास मदत होते.

५. शाकाहाराचा व अहिंसेचा संबंध नाही. तुम्हाला माहित आहे का कि, लाखो जीवांचा संहार करणारा हिटलर हा स्वतः शाकाहारी होता. कोणी व्यक्ती शाकाहारी आहे किंवा नाही यावरुन ती हिंसक किंवा अहिंसक ठरत नाही, याउलट जर शाकाहार त्या व्यक्तीचा परम धर्म असेल तर तो तिला त्याचे रक्षण करण्यासाठी हिंसक बनण्यास प्रवृत्त करीत असतो. यामागील मुळ कारण म्हणजे, त्यावरील असलेला पराकोटीचा अंधविश्वास होय. जसे त्यांच्या अर्थानुसार, आमच्या शास्त्यांनी सांगीतले आहे की शाकाहारी बना, ते पुण्याचे कार्य आहे, मांसाहार करु नका ते पापकर्म आहे. पण शाकाहार का करावा यामागील मुळ कारणाला मुठमाती देऊन शाकाहारी धर्माचे पालन करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाण्यासाठी सक्षम असतात.

६. शाकाहार करण्याची प्रथा का सुरु करण्यात आली, याचे कारण जाणुन न घेता त्याच्या झालेल्या विकृतीकरणाचे पालण करणे आज सुरु आहे. वास्तवात कोणाचीही हत्या होऊ नये या तथाकथीत कारणाला पुढे ठेवुन शाकाहाराची सुरुवात करण्यात आली असावी आणि हा शाकाहार जणु अनेक लोकांचा परम धर्मच बनलेला आहे. शाकाहारी असणे चुकीचे नाही, पण तो कोणाचा परम धर्म नसावा की, ज्याचे पालन करायला लोक शुध्द धर्माचा त्याग करण्यासाठी सुध्दा तयार होतील, मैत्री आणि करुणा जे खंऱ्या आणि वास्तविक अहिंसेचे आधारस्तंभ आहेत. शाकाहारी लोक, मांसाहार करणांऱ्यांना अत्यंत वाईट दृष्टीकोनातुन पाहतात.

७. शाकाहाराचा आणि अहिंसेचा जवळचाच काय, तर अगदी दुर - दुरवरचा संबंध नाही. अगदी त्याचप्रमाणे मांसाहाराचा आणि हिंसेचा सुध्दा काहीच संबंध नाही. भगवान बुध्दांच्या धर्मानुसार मात्र तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करीत आहात, यावरुन तुमचे पावित्र्य ठरत नाही, यावरुन कोणत्याही जीवाची शुध्दी ठरविली जाऊ शकत नाही. विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ल्याने कोणी पवित्र किंवा अपवित्र बनतो हा चुकिचा सिध्दांत आहे, अगदी त्याच पशुहिंसेवर आधारीत यज्ञासारखा आणि मैत्री व करुणा विरहित कायादंड देणारा तपश्चर्यासारखा किंवा अनेक पापकर्म करुन चित्त शुध्द नसतांना पवित्र समजल्या जाणाऱ्या नदीमध्ये स्नान केल्यावर पापातुन मुक्ती मिळेल या समजुती प्रमाणे तो अधर्म आहे. जर तुमच्या मनामध्ये कोणत्याही जीवाच्या प्रती मैत्री आणि करुणेची भावना नसेल आणि जरी तुम्ही शाकाहारी असले तरी तुम्ही हिटलर प्रमाणेच हिंसक ठरता. याउलट जर तुम्ही आहारामध्ये मांस ग्रहण करणारे असले, पण तुमच्या मनात सर्व जीवांच्या प्रती मैत्री आणि करुणेची भावना वसत असेल तर तुम्ही अहिंसकच ठरता.

८. इतर अनेक संप्रदायां प्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात काय ग्रहण करता यावरुन तुमची शुध्दी ठरविली आते, तुम्ही किती सज्जन आहात किंवा अहिंसक आहात हे ठरविले जाते. भगवान बुध्दांच्या धर्मामध्ये अशा प्रकारचा सिद्धांत नाही. त्यानुसार, जीवांची शुध्दता, त्यांची पवित्रता, तो सज्जन आहे कि दुर्जन, हिंसक आहे कि अहिंसक हे त्याच्या आहारावरुन ठरविले जाणे हा एक दुष्ट सिध्दांत आहे.

९. भगवान बुध्दांनी कुठेही मांसाहार न करण्याचा उपदेश केलेला नाही, याउलट त्यांना वेळोवेळी मांसाचे दान देण्यात आले आहे. एकदा बोधीसत्त्व आपल्या अजीत नावाच्या मित्रासोबत अरण्यात गेलेला असतांना, त्याने भुकेने व्याकुळ असलेल्या एका वाघीणीला बघितले, जी आपल्या बछड्यांना खाण्याचा प्रयत्न करीत होती, हा प्रसंग पाहुन बोधीसत्त्वाचे कारुणिक अंतःकरण पिळवटुन आले. त्याने आपल्या मित्राला वाघीणीसाठी अन्नाची व्यवस्था करायला पाठविले, पण बराच उशीर झाला तरी अजीत परत येत नाही, हे पाहुन बोधीसत्त्व वाघीणी समोर गेला आणि त्याने आपल्या शरीराचे दान त्या वाघिणीला दिले. अर्थात जर तुमच्या अर्थानुसार मांस खाणे हे पापकर्म असेल आणि ते केल्याने जीव अपवित्र होत असेल तर त्यासाठी बोधीसत्त्वाने त्या वाघीणीला का मदत करावी....? हा अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आहे.


मुळात स्वतः भगवान बुध्दांनी अनेकदा आपल्या आहारात मांस ग्रहण केल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे, पण केवळ या गोष्टीने ते अहिंसक नाहीत किंवा हिंसेचे समर्थन करणारे आहेत, असा अर्थ एखाद्या मुर्खाशिवाय दुसरा कोण काढु शकतो..? एकदा भगवान बुध्दांनी आपल्या आहारात, पक्ष्यांचे मांस ग्रहण केले होते, त्यावेळी एक तपस्वी त्यांना म्हणतो कि, तुम्ही जे पक्ष्यांचे मांस ग्रहण केले आहे, ते आमगंध नव्हे का..? त्यावर भगवान काय म्हणतात याचे विस्तृत वर्णन सुत्त निपाताच्या आमगंध सुत्तामध्ये दिलेले आहे.


आमगंध सुत्तामध्ये तर तिष्य नावाचा तपस्वी भगवान बुध्दांना म्हणतो,

२४३-२४४. ‘‘यदस्नमानो सुकतं सुनिट्ठितं, परेहि दिन्‍नं पयतं पणीतं। सालीनमन्‍नं परिभुञ्‍जमानो, सो भुञ्‍जसी कस्सप आमगन्धं॥
 ‘‘न आमगन्धो मम कप्पतीति, इच्‍चेव त्वं भाससि ब्रह्मबन्धु। सालीनमन्‍नं परिभुञ्‍जमानो, सकुन्तमंसेहि सुसङ्खतेहि। पुच्छामि तं कस्सप एतमत्थं, कथं पकारो तव आमगन्धो’’॥


परक्यांनी दिलेले निवडक व चांगल्या प्रकारे शिजविलेले तांदळाचे सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तु आमगंध खातोस. हे ब्रह्मबंधु, पक्ष्यांच्या मांसाने सुमिश्रित असे तांदुळाचे अन्न खात असता, तु 'आपणाला आमगंध योग्य नाही' असेच म्हणतोस, तेव्हा मी ही गोष्ट तुला विचारतो की, तुझा आमगंध कशा प्रकारचा आहे...?
यावर भगवान बुध्द म्हणतात :


२४५. ‘‘पाणातिपातो वधछेदबन्धनं, थेय्यं मुसावादो निकतिवञ्‍चनानि च। अज्झेनकुत्तं परदारसेवना, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

प्राणघात, वध, छेद, बंधन, चोरी, असत्य भाषण, ठकविणे, जरा मरणादिकांचा अभ्यास आणि परस्त्री गमन हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे.


२४६. ‘‘ये इध कामेसु असञ्‍ञता जना, रसेसु गिद्धा असुचिभावमस्सिता। नत्थिकदिट्ठी विसमा दुरन्‍नया, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

ज्यांना स्त्रीयांच्या बाबतीत संयम नाही, जे जिव्हालोलुप, अशुचि - कर्ममिश्रित, नास्तिक दृष्टीचे, विषम आणि दुर्विनीत, अशांचे कर्म हा आमगंध होय, मांसभोजन नव्हे.


२४७. ‘‘ये लूखसा दारुणा पिट्ठिमंसिका, मित्तद्दुनो निक्‍करुणातिमानिनो। अदानसीला न च देन्ति कस्सचि, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

जे रुक्ष, दारुण, पाठीमागे निंदा करणारे, मित्रद्रोगी, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणाला काहीही देत नाहीत, अशांचे कर्म - हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे.


२४८. ‘‘कोधो मदो थम्भो पच्‍चुपट्ठापना, माया उसूया भस्ससमुस्सयो च। मानातिमानो च असब्भि सन्थवो, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

क्रोध, मद, कठोरता, विरोध, माया, ईर्ष्या, व्यर्थ बडबड, मानातिमान आणि खळांची संगती - हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे.


२४९. ‘‘ये पापसीला इणघातसूचका, वोहारकूटा इध पाटिरूपिका। नराधमा येध करोन्ति किब्बिसं, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

जे पापी, ऋण बुडविणारे, सुचक शब्दांनी कुचेष्टा करणारे, बाहेरुन खऱ्याचा आव आणणारे पण खोटा व्यवहार करणारे, जे नराधम इहलोकी किल्मीष उत्पन्न करतात, अशांचे कर्म - हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे.


२५०. ‘‘ये इध पाणेसु असञ्‍ञता जना, परेसमादाय विहेसमुय्युता। दुस्सीललुद्दा फरुसा अनादरा, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

ज्यांना प्राण्यांविषयी दया नाही, जे इतरांना लुटून उपद्रव देतात, दुःशील, भेसुर, शिविगाळ देणारे व अनादर करणारे, (अशांचे कर्म) - हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे..


२५१. ‘‘एतेसु गिद्धा विरुद्धातिपातिनो, निच्‍चुय्युता पेच्‍च तमं वजन्ति ये। पतन्ति सत्ता निरयं अवंसिरा, एसामगन्धो न हि मंसभोजनं॥

अशा कर्मात आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मा गुंतलेले, जे परलोकी अंधकारात शिरतात व वर पाय खाली डोके होऊन निरयांत पडतात, अशांचे कर्म - हा आमगंध होय, मांसभोजन हा नव्हे.


२५२. ‘‘न मच्छमंसानमनासकत्तं, न नग्गियं न मुण्डियं जटाजल्‍लं। खराजिनानि नाग्गिहुत्तस्सुपसेवना, ये वापि लोके अमरा बहू तपा। मन्ताहुती यञ्‍ञमुतूपसेवना, सोधेन्ति मच्‍चं अवितिण्णकङ्खं॥

मत्स्यमांसाचा आहार वर्ज्य करणे, नागवेपणा, मुंडन, जटा, राख फांसणे, खरखरीत अजिनचर्म, अग्नीहोत्राची उपासना किंवा इहलोकींच्या अमरादि विविध तपश्चर्या, मंत्राहुति, यज्ञ आणि शीतोष्ण सेवनाने तप करणे - या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्याला पावन करु शकत नाही.

                                         -    सुत्त निपात : २:१४:२
बऱ्याच लोकांची अशी मिथ्या मान्यता आहे की, मांसाहार करणे म्हणजे हिंसेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारणी भुत ठरता. पण वास्तवात तुम्ही तुमच्या आहारामध्ये मांसाहार करता यावरुन तुम्ही हिंसक ठरविले जाऊ शकत नाही. एकदा कुठेतरी वाचले होते की, 'मेलेली कोंबडी खातांना जीवहत्येचं पाप लागतं, तर जीवंत भाज्या खातांना मृतहत्येचं पुण्य मिळायला हवं.' खरंतर एखाद्याने आधीच मारलेली कोंबडी खाल्ल्यावर किंवा अगदी गंध सुध्दा आल्यावर जीवहत्येचं पाप लागत असेल तर मग, सजीव असलेली भाजी खाल्ल्यावर पाप का लागत नाही..? त्या सजीव भाजीपाल्यावर किटकनाशकांची फवारणी केल्यावर कित्येक सुक्ष्म जीवांची हत्या होते, मग त्यांच्या मृत्युला तुम्ही जवाबदार ठरता का..? तुमच्या घरी फर्निचर्स इत्यादी अनेक लाकडाच्या वस्तु कित्येक सजीव असलेल्या झाडांच्या कत्तली करुन तुमच्या साठी त्या बनविलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही हत्यारे किंवा हिंसक ठरता..? तुमची हिंसेची किंवा अहिंसेची व्याख्या इतकी संकुचीत कशी काय असु शकते..? 


वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आपला निष्कर्ष निघतो कि, भगवान बुध्दांच्या धर्मात आहाराचे पावित्र्य नाही. कोण आपल्या आहारात काय खातो आणि काय नाही, यावरुन कोणीही पवित्र किंवा अपवित्र बनत नाही, तर तो ठरतो त्याच्या कर्माने, त्याच्या मनाच्या शुध्दतेने...


भगवान बुध्द आपल्याला हाच संदेश देतात कि, धर्माचे कार्य हे माणसाच्या आहारावरुन त्याची पवित्रता ठरविणे हे नव्हे तर त्याचा जगाच्या प्रती व्यवहार कसा आहे, यावरुन ठरविणे आहे. कारण माणसाची खरी अहिंसा हि त्याच्या आहारावरुन नव्हे तर त्याच्या शुध्द असलेल्या मनावरुन ठरविली जाते.1 टिप्पणी:

  1. हिंस्र प्रवृत्तीतून झालेली हिंसा (केलेली जास्त यातनादायक असली पाहिजे, स्वतःसाठी आणि ज्याची केली त्याच्यासाठी) आणि अहिंसक प्रवृत्तीतून झालेली हिंसा (अपवाद वगळता अहिंसक प्रवृत्ती ही मुद्दाम हिंसा करण्यापासून अलिप्त असते हे नक्की) यातील अहिंसक प्रवृत्तीतून होणारी हिंसा हिंस्र प्रवृत्तीइतकी भयंकर नसते, कारण त्यात हिंसेची इच्छा नसते. आणि त्यात स्मृती, भान अर्थात जागृतीचा समावेश असतो.

    उत्तर द्याहटवा