प्राचीन बौद्ध राजे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राचीन बौद्ध राजे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा...


देवांच्या प्रिय अशा प्रियदर्शी सम्राट अशोक यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या मंगल स्मृतीस विनम्र अभिवादन. सम्राट अशोक हे महान धर्मसम्राट होते, त्यांच्या जीवन कार्याबद्दल जाणून घेण्याच्या जरासा प्रयत्न जरी केला तरी आपल्याला समजून येईल कि, त्यांच्यासारखा राजा दुसरा कोणी होऊन गेला असेल. पण जगाच्या ह्या महान धर्मसम्राटाच्या कार्याचा आणि त्याने भारतभुमीला प्राप्त करुन दिलेल्या गौरवाचा विसर आपल्याला पडलेला आहे. परंतु उशिरा का होईना पण यावर्षी काही मंडळींनी पुढाकार घेऊन ह्या धर्मराजाची जयंती यावर्षी पासून नियमितपणे साजरी करण्याचा तसेच त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सामान्य जनतेला माहिती व्हावी, त्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक सर्वसामान्य विचार सुध्दा अभिनंदनास आणि साधुवादास पात्र आहे..


सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्य त्यांनी मार्गदर्शक म्हणुन लिहून ठेवलेल्या अनेक अभिलेखांच्या बाबत थोडक्यात माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या नावावर काही अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणुन सदर लेख लिहित आहे (काही दिवसांच्या पुर्वी एका वेबसाईटवर एक लेख वाचण्यात आला होता, ज्यामध्ये सम्राट अशोकांच्या बाबतीत असा अपप्रचार करण्यात आला होता कि, त्यांनी आपल्या लेखांमध्ये आपण बौध्द असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, एवढेच काय तर त्यांनी बौध्द धर्माचा सुध्दा उल्लेख केलेला नाही. अशाप्रकारे चुकीच्या माहितीच्या आधारे लिहिला गेलेला तो लेख सर्वसामान्य लोकांची दिशाभुल करणारा आहे. याशिवाय जगामध्ये असे अनेक लेखक अस्तित्वात आहेत, ज्यांना कदाचित सत्य माहित असतांना सुध्दा त्यांच्या बाबतीत सामान्य लोकामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी ते लिखाण करीत असतात, ज्यामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना कशाचाही आधार राहत नाही.  त्यामुळे अशा लेखांपासुन सावध रहावे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यात लिहिल्या गेलेल्या मजकुराची योग्य प्रकारे पडताळणी करावी.) आपण याप्रमाणे लेख वाचून यातुन मिळणारा संदेश ग्रहण करावा, जेणेकरून आपल्या जीवन - प्रवासामध्ये याचा उपयोग होऊ शकेल...

आपण सम्राट अशोकांना महान सम्राट म्हणतो, त्याचप्रमाणे जगामध्ये असे इतरही अनेक राजे होऊन गेले आहेत त्यांच्या संबंधी वर्णन करतांना त्यांचे भक्त असे म्हणतात कि, शंभर - दीडशे लढाया जिंकणारा व त्यातील एकही लढाई न घेणारा आमचा राजा पराक्रमी आणि महान आहे. पण वास्तविक पाहता, बाह्य युध्दामध्ये जिंकण्याचा त्याच्या महत्तेशी कसा काय संबंध लावता येईल. बाह्य युध्दात जिंकल्यामुळे तो महान होणार नाही, किंवा हरल्याने तो लहान होणार नाही; फार तर त्याचा संबंध त्याच्या युध्दकलेत असलेल्या नैपुण्यतेशी लावता येईल. कारण भगवान बुध्दांनी म्हटले आहे, युध्दामध्ये सहस्त्र योध्दांना जिंकण्यापेक्षा जो एक स्वतःला जिंकतो, तो खरा युध्दजेता होय...  त्यामुळे सम्राट अशोक महान यासाठी ठरतात कि, प्रकृती धर्माचरणाची वाढ व्हावी, यासाठी त्यांनी धर्मयुध्द केले. हे युध्द समाजातील वाईट चालीरीती विरूद्ध होते, अंधश्रध्दा आणि अधर्माविरुध्द होते. या कालखंडात त्यांनी कोणाशी युध्द न करता सुध्दा आपल्या साम्राज्यात धर्मराज्य प्रस्थापित केले, जे दिडशे लढाया जिंकणाऱ्यांसाठी सुध्दा त्याची कणभर बरोबरी साधणे शक्य झाले नाही. तुम्ही युध्द कशासाठी करत आहात..? आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी का. ? पण या सर्वांचा तुमच्या प्रजेच्या जीवनात काय फरक पडणार आहे, ते यातुन दुःखमुक्त होतील असे आपल्याला वाटते का..? एक राजा म्हणून तुमच्या प्रजेच्या प्रती तुमची काय कर्तव्ये आहेत किंवा प्रजेला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे...? प्रजा सुखी व्हावी असे तुम्हा वाटते, पण ती सुखी कशी होणार याचा आपण कधी विचार केला आहे का...? केवळ बाह्य आणि ऎहिक गोष्टींचा पुरवठा केल्याने ते सुखी होणार नाहीत, त्यांच्या नित्य सुखासाठी धर्माचाच आधार घ्यावा लागेल. सम्राट अशोकांनी आपल्या जगामध्ये धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी केलेला त्याग आणि दिलेले दान निःसंशय अतुल्य आहे, ज्याची तुलना करता येणे शक्य नाही.


१. अशोकांचे धर्मांतर

सम्राट अशोकांच्या बाबतीत घडलेला सर्व सामान्य इतिहास आपल्याला माहित आहेच, कि सर्व जग जिंकायला निघालेल्या राजाचे मन एका युध्दात झालेल्या रक्तपाताला पाहून पिळवटते. रक्तपाताचा हा मार्ग सोडून तो धर्माचा मार्ग निवडतो. याविषयावर लिहितांना सम्राट म्हणतात कि,

"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या आठ वर्षांनंतर कलिंग विजय संपादन केला. ह्या युध्दामध्ये दीड लाख लोकांना बंदी बनवून कारागृहात टाकण्यात आले, एक लाख लोक मारल्या गेले आणि अनेक लोक मृत्यू पावले. कलिंग राष्ट्रावर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाचे धर्म अनुशीलन, धर्माप्रती लालसा आसि धर्मानुशासन तीव्र झाले." कलिंगवर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय राजाला पश्चात्ताप झाला.  यासाठी त्यांनी धर्माचा स्वीकार केला हे स्पष्टपणे आपल्याला या लेखावरुन समजते. त्यामुळे याविषयावर टिका करणाऱ्या लोकांनी वास्तवतेचे भान ठेवून पुढील लेख लिहावेत.

२. धर्मयात्रा

भगवान बुध्दांनी महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आपल्याला धर्मयात्रा करण्याचा उपदेश केला आहे, बुध्दधम्म आणि संघाच्या प्रती श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक जीवाने ती धर्मयात्रा अवश्य करावी यासाठी सम्राट अशोकांनीच आपल्या पुढे एक आदर्श प्रस्थापित केला अाहे.

अ) बोधीवृक्षाची यात्रा : पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक केवळ शिकारीला जाण्यासाठीच राजवाड्यातून बाहेर पडत असत, तीच त्यांची एकमेव यात्रा राहत असे. पण सम्राट अशोकांनी या प्रथेच्या विरुध्द जात, अशाप्रकारच्या अधर्मी यात्रांचा त्याग केला जिथे जनावरांची हत्या होते. तर नव्या धर्मायात्रेची सुरुवात त्यांनी केली. अशा यात्रेची सुरुवात बोधीसत्वाला ज्या वृक्षाखाली बसून सम्यक संबोधीची प्राप्ती झाली बोधीवृक्षापासूनच केली. आपल्या धर्मलेखामध्ये ते म्हणतात,

"प्राचीन काळापासून विहार यात्रेला जाण्याची राजे लोकांची प्रथा होती. अर्थात या यात्रांमध्ये शिकारीसारखे कर्म पूर्ण होत असत. परंतु देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या दहाव्या वर्षी बोधीवृक्षाची यात्रा केली तेव्हापासून ह्या धर्मयात्रेची प्रथा सुरु झाली. ह्या धर्मयात्रेत श्रमण आणि ब्राह्मणांचे दर्शन घेतले जाते आणि त्यांना सुवर्ण दान दिले जाते. वृध्दांचे दर्शन घेतले जाते अाणि त्यांना सुध्दा सुवर्ण दान दिले जाते. प्रजेच्या भेटीगाठी होऊन त्यांना जन्मवासी व ग्रामवासी होऊन त्यांना धर्माबाबत उपदेश किंवा अनुशासन देणे आणि धर्मासंबंधी विचारपूस करण्याची संधी मिळत असते. धर्माचा प्रिय प्रियदर्शी राजा विहार यात्रां ऎवजी धर्मयात्रांमध्ये पर्याप्त आनंद मिळवितो..."

यावरून आपल्याला समजते कि सम्राट प्रियदर्शी अशोक यांना शिकारीला जाण्यासारख्या विहार यात्रांमध्ये जराही रस नव्हता, तर धर्मयात्रा करण्यात त्यांना आनंद मिळायचा. पण येथे हे लक्षात घ्यावे कि, धर्मयात्रा म्हणजे तीर्थ जत्रा वगैरे किंवा नव्हती ज्यांचे विकृत स्वरूप आपल्याला बघायला मिळतात, तर ती एक धर्मयात्रा होती. जिथे लोक धर्म शिकायला, धर्माच्या बाबतीत कोणत्या शंका असतील तर त्या दुर करायला, आपले धार्मिक अनुभव एकमेकांशी वाटायला जात होते.

त्याचप्रमाणे "आपल्या राज्यभिषेकाच्या २० वर्षांनंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने ह्या भुमीला भेट देऊन त्याची पूजा केली, जिथे शाक्यमुनी बुध्दांचा जन्म झाला होता. त्यांनी त्या ठिकाणी एक शिलालेख लिहिला तसेच एक स्तंभ उभारला आणि या ठिकाणी भगवानांचा जन्म झाला असल्याने मुख्य करातुन मुक्त करीत केवळ त्याचा आठवा भाग जमा करण्याचा आदेश दिला.."

३. धर्मप्रचार 

भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या - ज्याचे अस्तित्व अत्यंत दुर्मिळ आहे अशा लोक कल्याणकारी धर्माला केवळ त्यांच्या साम्राज्या पुरताच नाही, तर अगदी विदेशातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या धर्मदुतांना पाठविले, यामध्ये त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांचा सुध्दा समावेश होता. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या भावी पिढ्यांना सुध्दा धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून जाण्याची आज्ञा केली होती. आपल्या एका शिलालेखात ते म्हणतात कि, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा प्रकृती वाढलेले धर्माचरण अधिक वाढावेत यासाठी सर प्रयत्न करतात. त्यांचे पुत्र, पाैत्र आणि प्रपाैत्र सुध्दा ह्या सृष्टीच्या अंतापर्यत ह्या धर्माचरणाची ववाढ व्हावी म्हणुन प्रयत्न करतील आणि धर्म तथा शीलांच्या माध्यमातून धर्मानुशासनाचा प्रसार करतील. कारण धर्माचे शासन हे श्रेष्ठ आहे आणि शील रहित व्यक्ती हे धर्माचरण करु शकर नाही. धर्म अाहे म्हणून ह्या गुणांची वाढ होणे व त्यात खंड न पडू देणे हे श्रेयस्कर आहे. याच हेतूने हा धर्मलेख लिहविला गेला आहे. माझ्या पुत्र, पाैत्र आणि प्रपाैत्रांनी ह्या गुणांची वाढ होण्यासाठी कार्यरत रहावे व याची अवनती करू नये. राज्यभिषेकाच्या १३ व्या वर्षांनंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने हा धर्मलेख लिहविला आहे."

अशा ह्या महान सम्राटाने धर्मप्रसारासाठी आपल्या पुत्रांना दान दिले, सृष्टीच्या अंतापर्यंत आपल्या पुत्र आणि प्रपाैत्रांना कार्यरत राहण्याची अाज्ञा केली त्याशिवाय धर्मप्रसारासाठी त्यांनी अधिकारी नेमले होते. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही धर्माची (नैतिकतेची) वृद्धी करण्यासाठी आपल्या अधिकार्यांना नेमले होते. याविषयावर ते लिहितात, "देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या १३ वर्षांनंतर आपल्या अधिकार्यांची नियुक्ती केली , सर्व संप्रदायातील लोकांच्या दरम्यान धर्माला प्रोत्साहित करण्यासाठी आणि धर्माला शरण गेलेल्या लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी ते कार्य करतात." 

४. धर्म म्हणजे काय..? 

आतापर्यंत आपण बघितले आहे
की, सम्राट अशोकांनी धर्मप्रसारासाठी आपल्या मुला मुलींना संघाला दान दिले तर सृष्टीच्या अंतापर्यत आपल्या पाैत्र - प्रपाैत्रांना कार्य करित राहण्याची आज्ञा दिली. धर्मप्रसारासाठी विविध अधिकार्यांच्या नेमणुका केल्या. पण यामध्ये काय विशेष...? अशाप्रकारचा प्रशन काही लोकांना पडणे सहाजिकच आहे. काही लोक म्हणतील कि, धर्म प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी आमच्या अमुक महाराजांनी विविध कार्यक्रम राबविले दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना कापून काढले, इत्यादी. मग यातुन सम्राट अशोक कसे काय वेगळे ठरतात..? याचे उत्तर आपल्याला पुढील लेखातुन सापडते, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो कि, धर्म हा उत्तम आहे, पण धर्म म्हणजे काय..धर्म म्हणजे पापांपासुन दुर रहावे, पुष्कळ चांगली कृत्ये करावीत. दान, दया, सुत्त व पावित्य यांचे पालन करावे. मी अनेक प्रकारे चक्षूदान केले आहे. द्विपाद, चतुष्पाद, पक्षी व जलचर प्राण्यांवर मी अनेक प्रकारे कृपा केली आहे. इतकी कि, मी त्यांना प्राणदान सुध्दा दिले आहे. अजूनही चांगली कामे मी केलेली अाहेत. हा लेख अशासाठी लिहिविला गेला आगे कि, लोकांनी ह्या उदाहरणा प्रमाणे वागावे व चिरकाल रहावे, याप्रमाणे वागेल तो पुण्यकृत्य करील"

सम्राट अशोकांनी अत्यंत महत्वाचा उपदेश या लेखाद्वारे आपल्याला केलेला आहे. आज आपण स्वतःला सम्राट अशोकांचे पाईक म्हणून स्वतःला घोषित करतो, परंतु त्या काळच्या इतिहासातच आपण स्वतःला गुंतवून ठेवतो.    ह्या काळामध्ये असलेल्या अनेक गोष्टींची सुरुवात सम्राट अशोकांच्या द्वारे सर्वप्रथम कशी काय केली गेली होती., ह्या सर्व गोष्टी आपण गर्वाने इतरांना सांगण्याचा प्रयत्न करित असतो. पण असे करतांना त्यांनी आपल्याला ज्या शिकवणीचा उपदेश आपल्या लेखाद्वारे तसेच आपल्या अायुष्यातुन दिला आहे, त्याचे अनुसरण करण्यापासुन किंवा त्या गोष्टींचा प्रसार करण्यापासून मात्र आपण जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करित असतो. कारण काही लोक एखाद्या गाथेतील किंवा शीलालेखातील वाक्य आपल्याला सांगतात, त्याचे मराठी भाषेतील भाषांतरही सांगतात, आणि त्याच्यातील एखादा शब्द किंवा चिन्ह सांगुन आजच्यावकाळत तिला किती महत्व प्राप्त झालेला आहे, इत्यादी गोष्टी सांगतात, पण त्या गाथेचा किंवा चिन्हाचा योग्य अर्थ समजावून सांगुन त्याचा बुध्दांनी किंवा सम्राट अशोकांनी कशाप्रकारे आपले कल्याण साधून घेण्यासाठी उपदेश केकेलावहोता, ह्या सर्व गोष्टींचा मात्र त्यांच्या दृष्टीकोनातुन काहिच महत्व राहत नाही, असे वाटते. सम्राट अशिलांचा गाैरवशाली इतिहास आपल्याला जगापुढे मांडायचा असतो, पण त्यांच्या शिकवणीचे आपल्याला अनुसरण करायचे नसते, हि फार मोठी शोकांतिका आहे. केवळ त्यांचा गाैरवशाली इतिहास सांगितल्याने नाही, तर त्यांनी आपल्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या होत्या त्या पुर्णत्वास नेण्याच्या प्रयत्न केल्यावरच आपण त्यांच्यासारख्या धम्मराज्याची स्थापना करु शकू.

अगदी भगवान बुध्दांनी धम्मपदामध्ये उपदेश केलेल्या धम्माच्या साराप्रमाणे, सर्व प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे, स्वचित्ताची शुध्दी करणे, हेच बुध्दांचे शासन आहे. अर्थात धर्म म्हणजेच बुध्दांची शिकवण व धर्मराज्य म्हणजेच बुध्दांचे शासन. अशा ह्या बुध्दांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी आपके अायुष्य वाहून घेतले. लोकांमध्ये बुध्दांच्या शिकवणी नुसार आचरण करण्याची अर्थात धर्माचरणाची वृद्धी व्हावी जेणे करुन सर्व जीव सुखी व्हावेत ह्या मंगळ कामनेने विविध प्रकारच्या संप्रदायातील लोकांमध्ये धर्मप्रचार करण्याचे कार्य केले.  अर्थात विविध प्रकारची कर्मकांड करुन त्यांना बळजबरीने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यांचे धर्मांतर करुन केवळ नावाचे बाैध्द बनविले नाही. तर त्यांच्या शिकवणीला त्यांच्यात प्रस्थापित करूनत्यांच्या आचरणातुन शिकवण प्रदर्शित करुन सम्राट अशोकांनी धर्मराज्याची प्रस्थापना केली.

 ५. धर्मराज्यात सर्व समान आहेत...

अशा ह्या धम्मराज्यामध्ये कसल्याही आणि कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. त्या धम्मराज्यामध्ये सर्व जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी महाकारुणिक भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या धर्माची प्रस्थापना झाली होती., त्यांचे राज्य हे धर्मराज्य बनले होते. धर्मराज्य म्हणजे अशाप्रकारचे राज्य जिथे कोणीही कोणाची वंचना करीत नाहीत, कोणीही कोणाचा अपमान करित नाहीत, सर्व जीव एकमेकांच्या कल्याणाचीच कामना करित असतात. त्यांच्या राज्यामध्ये जातीभेदअंधश्रध्दा, निरूपयोगी कर्मकांड किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. त्याला समजण्यासाठी खालील धर्मलेखाची मदत होईल, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, सर्व संप्रदायाच्या लोकांनी त्याच्या साम्राज्यात सर्वत्र रहावे. कारण ते त्यांच्यासाठी संयम व भावशुध्दी यांची इच्छा करतात."

यावरून आपल्याला समजते कि, इतर संप्रदायातील लोकांच्या प्रती सुध्दा त्यांना आपल्या मुला - बाळाप्रमाणेच काळजी होती. त्यांच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा भेद करत नव्हते. तर सर्व संप्रदायातील लोकांनी एकमेकांच्या संप्रदाय आणि शिकवणीचा आदर करित त्यांच्यातून जे काही चांगले आहे, ते स्वीकारायला पाहिजे. याबाबतीत ते लिहितात, "सर्व संप्रदायातील लोकांचा एकमेकांशी चांगला संबंध असायला हवा. त्यांनी दुसऱ्यांच्या शिकवणीला ऎकले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. देवांच्या प्रि प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, इतर संप्रदायातील चांगल्या शिकवणीला सर्वांनी समजून घेतले पाहिजे " यावरून आपल्याला त्यांचा इतर संप्रदायाच्या आणि संप्रदायीक लोकांच्या प्रती असलेला दृष्टिकोन समजतो. ते सांप्रदायिक भेदभाव पाळणारे कोणत्याही प्रकारचे सांप्रदायिक नव्हते. तर सर्व जीव सुखी व्हावेत, त्यांच्यातील सर्व प्रकारची (सामाजिक/सांप्रदायिक)  बंधने नष्ट व्हावीत व एक मानव जात म्हणून त्यांनी सदाचारी जीवन जगावे ह्या ध्येयाला पुढे करुन धर्मसचा प्रचार आणि प्रसार करणारे ते धार्मिक होते..

६. धर्मराज्यात अंधश्रध्दा - कर्मकांड यांचे नाही, तर धर्माचे अस्तित्व आहे..

आपल्या देशामध्ये सध्या आपल्या अनेक प्रकारच्या श्रध्दा अंधश्रध्दा बघायला मिळतात. ह्या केवळ आजच तयार झालेल्या नाहीत, तर फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. जसे समुद्राचा प्रवास करु नये, शुभ मुहूर्त पाहुनच मंगल कार्ये करावीत. इत्यादी अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांचे अस्तित्व फार पूर्व काळापासून सुध्दा आपल्या समाजामध्ये होतेच. त्यांच्या ह्या अस्तित्वाला कदाचित अधर्माची शिकवणच कारणीभूत असावी.  पण सम्राट प्रियदर्शी अशोकांचे साम्राज्य हे धर्मराज्य होते. ते आपल्या ससाम्राज्याचा कारभार धम्माप्रमाणे करित असल्यानेत्यांच्या राज्यात अशा अंधश्रध्दांवर प्रहार होणे निश्चितच होते. त्यासाठी ते लिहितात, 

"देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे अाहे की, लोक संकटात असतांना, पुत्र किंवा मुलीच्या जन्माच्या वेळी, लग्नप्रसंगी आणि याप्रकारच्या अन्य प्रसंगी  शुभ किंवा अशुभ समयी पुष्कळ प्रकारच्या चांगल्या - वाईट कर्मांचे संपादन करतात. यावेळी स्त्रीया अनेक प्रकारचे शुद् व निरर्थक विधी करतात. मंगल कार्य अवश्य करावीत पण याप्रकारचे मंगल कार्य अल्पफळ देणारे असतात. धर्माच्या द्वारे केले जाणारे धर्मकार्य महाफलदायज असते. (धर्माचे मंगल कार्य म्हणजे दास आणि सेवक यांच्याशी योग्य व्यवहार, शास्त्यांचा आदर , प्राण्यांची अहिंसा, श्रमण किंवा ब्राह्मणांना दान, प्राण्यांच्या सोबत आत्मसंयमाचा व्यवहार, तथा याप्रकारचे अन्य मंगलकार्य केले जावे म्हणुन पिता पुत्र बंधू आणि स्वामी यांनी सांगावे कि, हे धम्ममंगल चांगले आहे, आणि ह्याला तोपर्यंत संपन्न करावे, जोपर्यंत लक्ष्याची पूर्ती होत नाही. याशिवाय दान देणे चांगले आहे, हे एक श्रेष्ठ कार्य अाहे. पण धम्मदाना सारखे दुसरे दान, उपकार किंवा अनुभव नाहीत..) याशिवाय अन्य पप्रकारच्या मंगल कार्यांनी कार्यसिद्धी होईल असे नाही. त्यांच्या आचरणाने कार्यसिद्धी होवो अथवा न होवो. ते पृथ्वीवरील लोकांसाठीच असते परंतु धर्ममंगल सदासर्वकाळ पुण्यकारकच असतो. जरी ह्या लोकी कार्यसिद्धी झाली नाही, तरी परलोकी मात्र बरीच फलप्राप्ती होते. आणि ह्या लोकांमध्ये त्यांची उद्देश पूर्ती झाली तर धर्ममंगल कार्यामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो  ह्या लोकी कार्यसिध्दी होते, तसेच परलोकी सुध्दा अनंत पुण्य प्राप्त होते.  "

६. मनुष्यांच्या इतके प्राणी सुध्दा समान आहेत...

यावरून आपल्याला हि शिकवण मिळते कि, पुण्य प्राप्ती च्या इच्छेने निरनिराळ्या प्रकारचे पुण्य कर्म करून जास्त काही प्राप्त होणार नाही, जरी त्यापासून काही लाभ झाला तर तो अल्पकाळच राहिल. परंतुधर्माच्या अाचरणाद्वारे मिळणारे फळ हे महान असते.  आपण बुध्दवंदना करित असतांना एएक गाथा म्हणतो, 
राजा भवतु धम्मिको ।

अर्थात राजा धार्मिक होवो ह्या तारेच्या अर्थाप्रमाणे सम्राट अशोक हे धार्मिक होते. त्यांनी आपल्या राज्याचा कार्यभार हा धर्माप्रमाणेच चालविला. त्यामुळे ते जगातील एक यशस्वी सम्राट झाले. ते एक बोधीसत्त्व होते, त्यांच्या हृदयामध्ये मानवांसाठी नाहीतर सर्व जीवांसाठी मंगल मैत्री आणि महाकरुणा वसत होती. त्यांच्या राज्यात प्राण्यांना सुध्दा मनुष्यांच्या बरोबरीने सन्मान मिळत असे. फार पूर्वीपासून यज्ञामध्ये विविध प्रकारच्या पशूंचे बळी दिले जायचे, त्यांना सम्राट अशोकांनी थांबविले. 

"हा धर्मलेख देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने लिहविला आहे. कोणत्याही प्राण्यांना ममारून हवन जरी नये. कारण देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या दृष्टीने ह्या समाजात बरेच अनिष्ट प्रकार घडत असतात. तथापि असे काही समाज आहेत, ते देवांच्या पप्रिय राजाच्या दृष्टीने हितावह आहेत. पूर्वी प्रियदर्शी राजाच्या पाकशाळेत सुप बनविण्यासाठी हजारो प्राण्यांचे बळी दिले जायचे. परंतु आता हा धर्नकेख लिहविण्यात येत आहे, त्यावेळी सूप बनविण्यासाठी ककेवळ ३ च प्राणी मारल्या जात आहेत, एक हरिण आणि दोन मोर, त्यातही हरिण रोज मारल्या जात नाही. आता यापुढे एकाही राजाची इच्छा होत नाही., प्राणी देखील मारता येणार नाही. "

सम्राट अशोकांनी केवळ लेखच लिहिले नाहीत, तर त्याप्रमाणे उपक्रम सुध्दा राबविले आणि त्यांना यशस्वी सुद्धा करुन दाखविले.  एका लेखातुन ते म्हणतात,  "आज बरीच वर्षे झाली आहेत, शेकडो वर्षांच्या पासून प्राणी हत्या वाढर होत्या, नातेवाईकश्रमण आणि ब्राह्मणांना वाईट वागणुन दिली जात होती. परंतु आज देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्मानुसार लोकांच्या वर्तणुकीमुळे  युध्दात वाजविली जाणारी घंटा धर्मांततेची घोषणा म्हणून वाजविली जात आहे. लोकांना चिमान, हत्ती, दिव्य क्रांती रुपी देव इत्यादींचे देखावे बघण्यासाठी मिळावे म्हणून वाजविली जात आहे. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने दिलेल्या धर्मशिक्षणाने असा परिणाम झाला की, शेकडो वर्षांत दिसून आले नव्हते, इतके प्राणीहत्येचे प्रमाण कमी झाले. तसेच प्राण्यांच्या सोबत अहिंसा, नातेवाईक, ब्राम्हण व श्रमण यांचा आदर सत्कारमाता पित्यांची व वयोवृध्दांची सेवा वाढलेली दिसत आहे. आई वडील व वयोवृध्दांची सेवा लोक अधिकाधिक करत आहेत. व यासमान इतर अनेक प्रकारांनी धर्माचरण वाढलेले दिसत आहे. "

याशिवाय मनुष्यांच्या सह सर्व प्राण्यांना सुध्दा आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा यासाठी अनेक दवाखाने सुरु केले. एका लेखात ते लिहितात, 

"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या राज्यात सर्वत्र तसेच त्याच्या शेजारी असलेल्या  गोल, पांडव, सतियपुत्र, केरलपुत्र तथा तांब्रपर्णी तसेच यवंतवराजा अंतियो व त्याच्या शेजारी असलेल्या इतर राज्यांच्या राज्यात प्रियदर्शी राजाने दोन प्रकारच्या चिकित्सेची व्यवस्था केली अाहे. १. मनुष्यांच्या चिकित्सेची, २. प्राण्यांच्या चिकित्सेची. मनुष्य व जजनावरांच्या उपयोगी पडतील अशा आैषधी वनस्पती होत नाही, तिथे तिथे त्या बाहेरून आणुन लावलेल्या आहेत. आणि मुळ जिथे जिथे नाहीत, ते सगळीकडून आणुन लावलेल्या अाहेत. मानवांना व पशुंना उपयोगी पडतील त्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी विहिरी खोदविल्या आहेत व वृक्ष लावलेले आहेत."

 ७. धर्मराजा यश आणि कीर्तीसाठी कार्य करीत नाहीत...

ह्या लोककल्याणकारी राजाने दवाखाने सुरु करुन त्यात केवळ वविविध प्रकारच्या आैषधांचाच पुरवठा केलेला नाही, तर मनुष्य व जनावरांच्या गरजा लक्षात घेता, त्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वविहिरी खोदल्या ततसेच रस्त्याच्या ददुतर्फा वृक्षांची लागवड सुध्दा केली.. असे महान कल्याणकारी सम्राट जगामध्ये क्वचितच बघायला मिळतील पण सदर लेख त्यांची महनरा प्रदर्शित करण्यासाठी केला गेलेला खटाटोप नव्हे. कारण सम्राट अशोक हे बोधीसत्त्व होते. त्यांनी जे काही कार्य केले ते सर्व जीवांच्या हितासाठी व सुखासाठी. आणि असे करित असतांना, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या यशाची, कीर्तीची किंवा लाभाची इच्छा केली नव्हती. 

याविषयावर ते लिहितात, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा यश किंवा किर्ती यांना सर्वश्रेष्ठ मानीत नाही. ते जे काही यश आणि किर्ती  यांची अपेक्षा करतात ते फक्त याकरिता कि, वर्तमान आणि भविष्यातील लोकांनी देखील धर्मवाक्य लक्षपूर्वक ऎकावेत आणि त्याप्रमाणे वागण्याची इच्छा उत्पन्न व्हावी म्हणुन देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा जे काही कार्य करीत आहे, ते सर्व परलोकसाठी आहे.  असे का...? अशाकरिता कि प्रत्येकाची शत्रुपासुन सुटका व्हावी आणि हा शत्रु म्हणजे आपण ज्याला पाप म्हणतो तो होय. हि गोष्ट सिध्द करणे लहान मोठ्यांना महान परिश्रम केल्याशिवायकेवळ त्याच्या मागे लागल्याशिवाय , ह्या सर्व गोष्टींचा त्याग केल्याशिवाय करणे कठीण आहे."

सम्राट प्रियदर्शी अशोकांच्या लेखांपैकी हा लेख सामान्य वाचकांसाठी समजायला कठिण आहे. सम्राट अशोक याठिकाणी म्हणतात किते यश आणि किर्ती यांना श्रेष्ठ मानत नाहीत, ते जे काही कार्य करित अाहेत ते यश आणि किर्तीसाठी नाहीत तर परलोकासाठी आहेत. त्यामुळे काही लोकांना असे वाटेल कि, मृत्यूनंतर स्वर्गामध्ये चांगले लाभ मिळावे यासाठी ते पुण्यकर्म करित आहेत. आणि भगवान बुध्दांनी तर स्वर्गापेक्षाही निर्वाणाला श्रेष्ठ मानले आहे. मग सम्राट अशोकांची महत्वाकांक्षा परलोकात क्षणिक किंवा सांसारीक आनंद प्राप्ती यासारखी लहान कशी काय असू शकेल...? पण येथे आपण हे विसरतो कि, जर सम्राट अशोकांना ऎहिक आनंदप्राप्तीची इच्छा असती तर ह्या जन्मामध्ये त्यांना ते सहज प्राप्त झाले असते. पण त्यांनी त्या सर्व ऎहिक गोष्टींचा त्याग करुन धर्माचा स्वीकार केला, जो संसाराकडुन निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. यश आणि किर्ती हे सांसारिक आणि क्षणिक आनंद आहेत. धर्माच्या मार्गावर चालत असतांना त्यांचे काहीच मुल्य नाही  तर संसारातुन निर्वाणाकडे जाण्यासाठी ज्या शत्रुंचा नाश करावा लागतो ते पाप आहे. अशा पापाला नष्ट करण्यासाठीच सम्राट अशोक कार्य करीत असतात, जेणे करन सर्व जीव सुखी व्हावेत.




हे सुध्दा वाचा :




रविवार, २२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे (भाग २ : राजा प्रसेनजीत आणि भगवान बुद्ध - २)

मागील प्रकरण वाचण्यासाठी क्लिक करा....



राजा अजातशत्रु आणि प्रसेनजीतमधील युद्ध


मागील लेखामध्ये सांगीतल्याप्रमाणे अजातशत्रु हा प्रसेनजीतचा भाचा होता. अजातशत्रु हा देवदत्ताचा प्रभावाखाली होता, आणि अजातशत्रुचा पिता राजा बिंबीसार हा बुद्धाचा उपासक असल्यामुळे देवदत्ताने अजातशत्रुचे कान भरले व अजातशत्रुने बिंबीसाराला बंदी बनवले तिथेच त्याचे निधम झाले हि बातमी कळताच बिंबीसाराची पत्नी व प्रसेनजीतची बहीण हिनेसुद्धा प्राण सोडले. पुढे अजातशत्रुने प्रसेनजीत विरुद्ध दोघांचेही युद्ध सुरु झाले आणि प्रसेनजीतचा पराभव झाला आणि तो आपली राजधानी श्रावस्ती येथे परतला. हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,,



भिक्खुहो, मगध राजा अजातशत्रु म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे, याउलट राजा प्रसेनजीत हा जगातील चांगुलपणाचा मित्र. सध्यातरी प्रसेनजीतला पराभुत मनुष्य म्हणुन दुःखामध्ये रात्र काढावी लागणार आहे.





• विजयातुन द्वेष जन्मास येतो., जिंकणाऱ्याला दुःखात काळ कंठावा लागतो.

• परंतु जो शांत व क्रोधविरहीत आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय पराजयाची वार्ताच नसते...




आपला पराभव लक्षात ठेऊन प्रसेनजीतने अजातशत्रुवर स्वारी केली आणि त्याचा पराभव करुन त्याला जीवंत पकडले, तेव्हा प्रसेनजीतने स्वतःशीच विचार केला कि, मी याच्या वाटेला गेलो नव्हतो, हा माझा नातेवाएक असुनसुद्धा मला त्रास देतो, आता मी याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ आदि ताब्यात घेऊन त्याला सोडुन दिले तर ..? आणि प्रसेनजीतने तसेच केले.


हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,


• माणुस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांदा लुटण्याची इर्षा धरतो.


• हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच. जेत्याला कोणीतरी हरवतोच. निंदकाला निंदक सापडतो.

• अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्यांना लुटतो त्यावरही स्वतःला लुटल्या जाण्याची पाळी हि येतेच...


• पुढे प्रसेनजीतने आपली मुलगी वजीरा हिचे लग्न अजातशत्रुसोबत लावुन दिले. आणि त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले...



मुलापेक्षा मुलगी बरी..!


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात राहत असताना कोसलराजा प्रसेनजीत धम्म जाणुन घेण्यासाठी भगवंतांजवळ आला. राजा भगवंतांसोबत बोलत असताना, राजवाड्यातुन एक दूत आला आणि राजाजवळ जाऊन त्याची राणी प्रसुत होऊन तिला मुलगी झाल्याचे त्याला कळले. हि बातमी ऐकुन राजा खुप दुःखी झाला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले असता प्रसेनजीत म्हणाला,, आत्ताच माझी पत्नी मल्लिका प्रसुत झाली, आणि मला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे कळले त्यामुळे मी दुःखी आहे.

यावर भगवंत म्हणाले,, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली आहे, ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी आणि माता अशा विविध भुमीका करणारी आहे. तिच्यापासुन अनेक बोधीसत्त्व आणि चक्रवती जन्म घेतात. त्यामुळे तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करेल, मोठे राज्य करेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल...



चार प्रकारचे मनुष्य


एकदा कोसलराजा प्रसेनजीतने भगवंतांना विचारले कि भगवान चार प्रकारचे मनुष्य कोणते..?


भगवान म्हणाले..


१. अंधारातुन अंधाराकडे जाणारा
२. अंधारातुन प्रकाशाकडे जाणारा
३. प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा 
४. प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा





१. हीन कुळामध्ये जन्मलेला मनुष्य जन्मभर दुष्कृत्ये करतो त्याला मी अंधारातुन अंधाराकडे जाणारा मनुष्य म्हणतो.


२. एखादा मनुष्य हीन कुळामध्ये जन्मतो, खाण्यापिण्याची त्याला टंचाई असते. परंतु काया, वाचा आणि मनाने तो सत्कर्म करतो अशा माणसाला मी अंधाराकडुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.


३. तिसऱ्या प्रकारात एखादा थोर कुळात जन्मतो, त्याला खाण्यापिण्याची टंचाई नसते परंतु काया, वाचा आणि मनाने दुष्कर्म करतो, अशा माणसाला मी प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा म्हणतो.


४. जो चांगल्या कुळामध्ये जन्म घेतो आणि सर्वकाळ सदाचारी राहतो त्याला मी प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.






गेल्याचा शोक करणे व्यर्थच....



एकदा प्रसेनजीतची सर्वात आवडती राणी मल्लीका मरण पावली हि बातमी कळताच राजा खुप शोकाकुळ झाला.


हे वर्तमान भगवंतांना समजताच भगवान म्हणाले,, महाराज, जरा धर्मी पदार्थाला जरा येतोच. मरणधर्मी पदार्थाला मरण येतोच, व्याधीधर्मी पदार्थाला व्याधी येतेच., नाशधर्मी पदार्थाचा नाश हा अटळ आहे, त्याला त्याच्यापासुन कोणी अडवु शकणार नाही.


परंतु हे महाराज, अज्ञानी असा विचार करत नाही कि, माझ्याच प्रियजनांना व्याधी, मरण येत नाही, हा सर्व जगाचा धर्म आहे. अज्ञ मनुष्याला असा विचार करता येत नाही त्यामुळे तो शोकाकुळ होतो. त्याचे कामात लक्ष लागत नाही, त्याचे जेवन बरोबर होत नाही., त्यामुळे त्याचे शत्रु आनंदीत होतात. असा मुर्ख मनुष्य आपलीच हानी करुन घेतो परंतु अशावेळेस आर्यश्रावक निर्वाणमार्गाचा लाभ करुन घेतो.






शाक्यांद्वारे फसवणुक....


प्रसेनजीत राजा हा भगवान बुद्धांचा फार मोठा उपासक होता, त्यामुळे त्याने शाक्यकुळातील एखाद्या राजकन्ये सोबत लग्न करण्याची योजना आखली. परंतु शाक्यराजे कोसल राष्ट्राला आणि प्रसेनजीत राजाला नीच मानत होते, त्यामुळे आपली कन्या कोसल राजाला देणे हे शाक्यांना योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसल राजाचीच सत्ता असल्यामुळे ते प्रसेनजीत राजाच्या या मागणीला ते नाकारु शकत नव्हते. तेव्हा शाक्यांनी युक्ती केली कि, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया हिला महानामाची स्वतःची कन्या म्हणुन प्रसेनजीतला द्यावी. नंतर कोसल राजा प्रसेनजीतच्या अमात्यांना महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया खुप आवडली. जेवनाच्या वेळेस महानाम हा वासभखत्तीयाच्या बाजुला बसल्यामुळे अमात्यांची अशी खात्री झाल्यामुळे त्यांनी कोसल राजा प्रसेनजीतचे लग्न ठरविले. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले. आणि त्याला एक मुलगा झाला. तिचा मुलगा सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळी शाक्यांकडे गेला. शाक्यांनी त्याचे आपल्या नागमंदिरात योग्य सन्मान केला. परंतु तो तिथुन निघुन गेल्यावर त्याचे आसन धुतले गेले ; आणि आपण दासीपुत्र आहोत हि गोष्ट समजताच तो रागाने लालबुंद झाला. वयात आल्यावर त्याने जबरदस्तीने कोसल देशाचे राज्य बळकावले व वृद्ध प्रसेनजीतला राजवाड्यातुन हाकलुन लावले. त्यामुळे प्रसेनजीत आपला भाचा मगध राजा अजातशत्रुच्या आश्रयाला वेशांतर करुन जाण्यास निघाला परंतु राजगृहाच्या बाहेरील एका धर्मशाळेत तो मरण पावला......


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्रसेनजीत हा कोसल देशाचा राजा होता, कोसल हे राष्ट्र मगध देशाच्या उत्तरेला वसलेले होते, त्यावेळी बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. श्रावस्ती हे कोसल देशाच्या राजधानीचे शहर होते. बिंबीसार हा प्रसेनजीतच्या बहिणीचा नवरा होता, प्रसेनजीतची बहिण हि बिंबीसार राजाची मुख्य पत्नी होती. प्रसेनजीत हा वैदिक धर्माचा अनुयायी होता, तो खुप मोठे मोठे यज्ञ करायचा. तरीसुद्धा तो श्रमणांचा मान ठेवायचा. त्याच्या राजधानी मध्ये अनाथपिंडिक ज्याचे खरे नाव सुदत्त होते त्याने भगवान बुद्ध व भिक्षुसंघासाठी जेतवन नावाचा मोठा विहार बांधुन दिला, भगवान बुद्धांनी आपले उपदेश सर्वात जास्त उपदेश श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनातच केला.



प्रसेनजीतची धम्मदीक्षा...



एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करत होते, हे जेव्हा प्रसेनजीत राजाला समजले तेव्हा तो राजेशाही इतमामासह जेतवन विहारामध्ये गेला, आणि भगवंतांना हात जोडुन वंदन करीत तो म्हणाला,,

भगवान माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य आज खोरोखर भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा शिक्षक, धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील...? ज्या अर्थी आपल्या पवित्र चरणांचे मला दर्शन झाले त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करु द्या.

भगवान म्हणाले,, ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामन्य माणसालाही मनःशांती लाभते.


सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाची स्थीती ओळखुन भगवान म्हणाले,,


हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य बघितला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो ; मग राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल..? आणि म्हणुन मी माझा धम्म थोडक्यात सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपुर्वक ऐकावे व आत्मसात करावे.


• आपली बरी वाईट कृत्ये नेहमी सावलीप्रमाणे आपला पाठलाग करतात.

• सर्वात अधिक गरज करुणामय ह्रदयाची आहे.

• आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे समजा., त्यांच्यावर जुलुम करु नका.

• आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा.

• कुमार्मागाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा.

• दुसऱ्यांना पायदळी तुडवुन स्वतः उच्चपदी चढू नका.

• दुःखीताना सुख द्या आणि त्याला आपला मित्र बनवा.

• तोंडपुजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकु नका.

• तपश्चर्येने स्वतःला क्लेश करुन घेण्यात काहीही लाभ नसते, म्हणुन धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा.

• दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातुन आपली सुटका होऊ शकेल...

• सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते काम-वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनांचा अवलंब करतात.

• झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहु शकतील..? जिथे वासना असते तिथे सत्य राहु शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही त्या मनुष्याची विद्वान म्हणुन कितीही त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे.

• ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करुन घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.

• हे सत्य केवळ ॠषींसाठीच नसुन प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. ॠषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ॠषीपदाला पोहोचु शकततात.

• कामवासनेच्या भरतीपासुन सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहुन जाते, जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणु. धम्म तुम्हाला असा आदेश देतो कि, तुमच्या या शत्रूंपासुन तुम्ही आपले संरक्षण करा.

• आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणुन आपण सत्कर्मेच करावीत.

• आपल्या हातुन दुष्कृत्ये होऊ नये म्हणुन बपण आपले विचार तपासुन पहावे, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.

• प्रकाशातुन अंधाराकडे आणि अंधारातुन प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातुन दाट अंधाराकडे आणि संधि प्रकाशातुन उज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुद्य मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणुन तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करत राहील.

• सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करुन आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा.

• मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असु द्या. सद्वर्तनाच्या धर्म नियमांचे उल्लंघन करुन नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तुंवर अवलंबुन न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबुन ठेवा.


भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली, आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला...


क्रमशः


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे...

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)






बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचा राज्यभिषेक झाला. बिंबीसार राजाची राजधानी राजगृह होती तर त्याच्या पित्याचे नाव महापद्म असे होते. बिंबीसार हा शिशुनाग वंशाचा पाचवा राजा होता. त्याने कोसल देशाची राजकन्या (प्रसेनजीतची बहीण) कोसल्यादेवी सोबत लग्न केले होते.



मगधचे राज्य हे पुर्वीपासुनच संपन्न राज्य होते. येते वाहणाऱ्या बारमाही नद्यांमुळे शेतील योग्य पाणीपुरवठा झाल्याने धनधान्याची मुबलकता राहत असे. मगध राष्ट्राच्या शेजारी कोसल, अंग आणि वज्जी ही बलवान राज्ये होते., त्याचप्रमाणे मगधसुद्धा बलवान व्हावे अशी बिंबीसाराची महत्त्वकांक्षा होती.


बिंबीसाराने लिच्छवी राजकन्येशी विवाह केला आणि तिच्यापासुन हल आणि विहल हि दोन मुले झाली. लिच्छवी राजकन्येशी लग्न करताना त्याने चेटक राजाला सयेनाग नावाचा हत्ती व अठरा पदरी सोन्याची माळ दिली. त्यानंतर भद्र देशाच्या खेत्रा आणि चौथी राणी विदेह देशाची राजकन्या होती.



बिंबीसार राजाची प्रशासन व्यवस्था अतिशय चोख होती. तो एक शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट प्रशासक होता, गुन्हेगारांना तो कधीच क्षमा करीत नसे. बिंबीसाराच्या कारकिर्दीत कलेचा खुप प्रसार झाला होता, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही प्रसार झाला होता. मगध साम्राज्याचा खरा पाया घालणारा बिंबीसार राजा होता.





बोधीसत्त्वासोबत भेट


एकदा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तुवरुन राजगृह येथे आले होते, त्यावेळी सिद्धार्थ पांडव टेकडीच्या पायथ्याशी लहानशी झोपडी तयार करुन निवास करीत होतात, एकदा बिंबीसाराने सिद्धार्थाला शहरातुन फिरताना बघितले. सिद्धार्थ पांडव टेकडीवर गेला जायला निघाला होता, सिद्धार्थाला बघुन अति आदराने आणि मोजक्याच लवाजम्यासह तो सिद्धार्थाकडे जायला निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असलेला राजा टेकडी चढुन गेला. त्याठिकाणी आसनस्थ असलेला तेजस्वी सिद्धार्थ गौतम त्याच्या दृष्टीस पडला. सिद्धार्थाचे शारिरीक सौंदर्य आणि चेहऱ्यावरील झळकणारी शांती पाहुन राजा बिंबीसार प्रेमपुर्वक आदरभावाने त्याच्याजवळ गेला आणि मोठ्या आदराने विचारपुस केली, मग राजा सिद्धार्थाजवळ बसला. आणि म्हणाला,,

माझी तुझ्या कुटुंबाशी फार मैत्री आहे, राज्यसत्तेचा उपभोग घेण्यापेक्षा संन्यासी जीवन जगण्याचा निश्चय तुझ्या मनात कसा आला.? दुसऱ्याने दिलेले अन्न ग्रहण करावे हे तुला शोभत नाही. तुला जर तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर तु माझे अर्धे राज्य घे. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमाला अनुसरुन वाग यामुळे मानवी जीवनाचा हेतु पुर्ण होतो. हे सर्व ऐकुन झाल्यावर सिद्धार्थाने आपल्या गृहत्यागाचे कारण सांगीतले त्यावर बिंबीसार म्हणाला, तुझे ध्येय पुर्ण झाल्यावर मला भेटण्याची कृपा कर...



सम्यक संबुद्धासोबत भेट


सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त होऊन सम्यक संबुद्ध झाल्यावर राजगृहात आला होता. त्याने आपल्या धर्माचा उपदेश हजार जटील साधुंना दिला होता. ही सुवार्ता ऐकुन बुद्धाविषयी लोक चर्चा करु लागले होते. बिंबीसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे समजले. बिंबीसाराने विचार केला कि, अत्यंत दुराग्रही अशा जटीलांना दीक्षा देणे हि साधी गोष्ट नव्हती. तो विद्वान सर्वज्ञानी लोकांना मार्गदर्शन करणारा देव व मनुष्यांचा गुरूच असला पाहिजे आणि सत्याचाच उपदेश करीत असला पाहिजे. अशा या माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे असे बिंबीसार राजाला वाटले. बिंबीसार भगवान बुद्धांकडे गेला, अभिवादन करुन त्यांच्या जवळ बसला, भगवंतांनी त्याला उपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकुन मगध राजा बिंबीसार म्हणाला,,

भगवंत पुर्वी राजपुत्र असताना माझ्या पाच इच्छा होत्या आता त्या पुर्ण झाल्या आहेत.



१. पुर्वी मी राजपुत्र असताना मला राज्यभिषेक केला तर फार चांगले होईल, ती माझी इच्छा पुर्ण झाली.

. एखादा सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगले होईल. ती देखील इच्छा पुर्ण झाली आहे.

३. मला त्या भगवंताची सेवा करायला मिळाली तर चांगले होईल.

४. भगवंतांनी आपला धर्म शिकवावा

५. भगवंताचा धर्म मला कळावा.





अशा माझ्या पाच इच्छा होत्या व त्या पुर्ण झाल्या आहेत. भगवंतांनी मला आपला आजन्म शरण आलेलाउपासक म्हणुन स्वीकार करावा. भगवान बुद्धाने बिंबीसाराला बौद्ध उपासक बनविले. बिंबीसाराने बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला... राजा बिंबीसार भगवान बुद्धाचा श्रेष्ठ उपासक आणि धम्माचा प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबीसाराने भगवंतांना भिक्षु संघासोबत जेवनाचे आमंत्रण दिले व स्वतःच्या हाताने जेवन वाढले व त्याचे वेळूवन भगवान बुद्धांना व भिक्षुसंघाला दान दिले. 


बिंबीसार राजा हा बौद्ध धर्माचा निष्ठावान उपासक होता. त्याने बौद्ध धर्माचे धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. तेव्हापासुन उपोसध पर्व सुरु झाले. भिक्षु संघ निरोगी राहावा म्हणुन त्याने अनेक उपाययोजना केल्या. बिंबीसार राजाचा डॉ. जीवक नावाचा राजवैद्य बौद्ध उपासक होता. तो अतिशय विद्वाण असा डॉक्टर होता.


एके दिवशी राजा बिंबीसाराने भगवान बुद्धाला पायाच्या नखाचा तुकडा मागितला व त्या नखाच्या तुकड्यावर राजाने एक स्तुप बांधला. राजघराण्यातील स्त्रीया दररोज संध्याकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करुन त्या स्तुपावर फुले चढवित आणि दीप प्रज्वलीत करीत.



अशाप्रकारे धर्मप्रचाराची सुरुवात राजा बिंबीसाराने स्वतःच्या घरातुन केली त्यामुळे बिक्षु संघाला आणि धर्म प्रचाराच्या कार्याला अनुकुलता प्राप्त झाली. बुद्धाच्या काळातच बिंबीसार राजाने धर्मप्रचाराकरिता चांगलीच मदत केली........


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

ब्राह्मण वर्णाची थोरवी (मज्झिम निकाय : अश्वलायन सुत्त)

चारही वर्णांमध्ये ब्राह्मणच सर्वश्रेष्ठ बाकिचे सर्व वर्ण हीन अशी ब्राह्मणांची समजुत होती परंतु भगवान बुद्धांनी त्यांचा हा सिद्धांत नाकारला. व मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावरुन ठरत नसते हे ब्राह्मणांना पटवुन देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची कथा मज्झिमनिकायाच्या अश्वलायन सुत्तामध्ये आली आहे, प्रस्तुत सुत्तामध्ये भगवान बुद्ध आणि अश्वलायन ब्राह्मण कुमारामध्ये झालेली चर्चा सांगीतलेली आहे..


एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवनात आराम करत असताना त्यावेळी निरनिराळ्या राष्ट्रांतुन पाचशे ब्राह्मण श्रावस्तीला आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये असा मुद्दा निघाला कि, हा श्रमण गौतम चारही वर्णांना मोक्ष आहे असे म्हणतो. त्याच्याशी या मुद्द्यावर वादविवाद करुन त्याला वादविवादात हरविण्याला कोणी समर्थ आहे का.?


खुप वेळ झाल्यावर निष्कर्ष निघाला कि,, अश्वलायन नावाच्या ब्राह्मणकुमाराने श्रमण गौतमाशी वाद करावा.



अश्वलायन कुमाराचे अध्ययन नुकतेच पुर्ण झाले होते. तो खुप हुशार होता, त्याला सर्व वेद तोंडपाठ येत होते. तथापि, भगवान बुद्धांसोबत वाद करणे कठीण आहे, हे तो जाणुन होता. जेव्हा त्याला वादविवादात पुढे जाण्याची ब्राह्मणांनी विनंती केली तेव्हा अश्वलायन ब्राह्मणांना म्हणाला,, 'श्रमण गौतम हा धर्मवादी आहे, आणि धर्मवादी लोकांशी वाद करणे खुप कठीण आहे. जरी मी सर्व वेदांमध्ये पारंगत असलो, तरी श्रमण गौतमासोबत वाद करायला समर्थ नाही.


यावर ब्राह्मण अश्वलायन कुमाराला म्हणाले, हे अश्वलायन, तुझ्याएवढा धर्मज्ञानी आमच्यामध्ये दुसरा कोणीही नाही. तु परिव्राजक धर्माचा अभ्यासक आहेस, आणि युद्ध न करता पराभव स्वीकारणे तुला योग्य नाही.


अश्वलायन म्हणाला, गौतमासोबत वाद करणे खुप कठीण काम आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी गौतमाशी वादविवाद करायला तयार आहे....


नंतर त्या सर्व ब्राह्मणांसोबत अश्वलायन भगवान बुद्धांजवळ गेला, आणि बाजुला बसला आणि बुद्धाला म्हणाला,,


हे गौतमा ब्राह्मणांचे म्हणने आहे कि ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे, बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत. ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातुन उत्पन्न झाल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत, इतर सर्व हीन आहेत. या मुद्याबद्दल आपले काय म्हणने आहे..?


यावर भगवान म्हणाले,, हे अश्वलायन कुमार, ब्राह्मणांच्या बायका गरोदर होतात, प्रसुत होतात, बाळांना जन्म देतात. याचप्रमाणे ब्राह्मणांची संतती इतर वर्णियांप्रमाणेच आईच्या उदरातुन जन्मली असताना, ब्राह्मणांना आपण ब्रह्मदेवाच्या मुखातुन जन्मलो असा समज आहे.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन यौन, कंबोज व इतर सरहद्दीवरील प्रदेशात आर्य आणि दास असे दोनच वर्ग असुन कधी कधी आर्याचा दास होतो आणि दासाचा आर्य होतो हि गोष्ट तुला माहीत आहे काय..?

यावर अश्वलायन म्हणाला, होय गौतमा मी याबद्दल ऐकले आहे..

भगवान म्हणाले,, जर असे आहे तर ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातुन झाली, आपल्या या म्हणण्याला आधार काय.?


यावर अश्वलायन म्हणाला, हे गौतमा याबाबत आपले म्हणने काही असो, परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि, ब्राह्मणच सर्व वर्णात श्रेष्ठ आहेत, आणि बाकिचे इतर सर्व वर्ण हीन आहेत.


भगवान म्हणाले, क्षत्रीयाने, वैश्याने किंवा शुद्राने चोरी केली, व्यभिचार केला, चहाडी केली, व्यर्थ बडबड केली, द्वेषबुद्धी वाढविली, नास्तिकपणा अंगिकारला, तर तो नरकात जाईल, परंतु ब्राह्मणांनी हि पापकर्मे केली तर तो नरकात जाणार नाही, असे म्हणायचे आहे का तुला..?



अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने हि पापकर्मे केली असता तो नरकातच जाईल.


भगवान म्हणाले, एखादा ब्राह्मण प्राणघातापासुन निवृत्त झाला, शिवीगाळ करण्यापासुन निवृत्त झाला., चोरी करण्यापासुन निवृत्त झाला., द्वेषापासुन निवृत्त झाला., तर तो स्वर्गात जाईल परंतु इतर वर्णाच्या लोकांनी हि चांगले कर्म केले असता ते स्वर्गात जाणार नाहीत असे म्हणायचे आहे का तुला...?


अश्वलायन म्हणाला, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने ही चांगली कर्मे केली असता तो स्वर्गातच जाईल. पुण्यकर्माचे फळ ब्राह्मणाला आणि ब्राह्मणेत्तरांना सारखेच मिळेल.


भगवान म्हणाले, या प्रदेशात केवळ ब्राह्मणच द्वेषविरहित मैत्रीभावनेने विहार करु शकतो काय.? क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र वर्णाच्या लोकांना हे जमणार नाही असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, चारही वर्णाच्या लोकांना मैत्रीभावनेने विहार करता येईल.


भगवान म्हणाले, मग चारही वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आणि बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत या म्हणण्याला आधार काय आहे.?


अश्वलायन म्हणाला, आपण काहीही म्हणा परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि चारही वर्णात ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत आणि बाकिचे हीन.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन समज एखाद्या राजाने विविध जातीच्या शंभर लोकांना एकत्रीत केले, त्यांच्यापैकी क्षत्रीय, ब्राह्मण कुळात जन्मलेल्यांना म्हणेल कि, चंदन वृक्षांच्या लाकडांना जाळुन अग्नी उत्पन्न करावी, आणि हीन कुळात जन्मलेल्या लोकांना सांगेल कि, कुत्र्याच्या खाण्याच्या भांड्यात एरंडाचे उत्तरारणी करुन अग्नी उत्पन्न करावी. हे अश्वलायन, क्षत्रीय व ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी अधिक तेजस्वी होईल. व हीन वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी होणार नाही, त्या अग्नीची कार्ये होणार नाहीत असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, कोणत्याही जातीच्या माणसांनी पेटविलेला अग्नी सारखाच तेजस्वी होईल.


भगवान म्हणाले, एखाद्या क्षत्रीयाने ब्राह्मण कन्येसोबत शरीरसंबंध ठेवले, आणि त्या संबंधापासुन त्यांना मुलगा झाला, तर तो आपल्या आईसारखा किंवा वडिलांसारखा होईल असे तुला वाटते..? त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मण कुमाराने क्षत्रीय कन्येसोबत केलेल्या शरीरसंबंधाने त्यांना मुलगा झाला असता होणारा मुलगा त्या दोघांसारखा न होता वेगळ्या जातीचा होईल असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, अशा प्रकारच्या संबंधामुळे झालेला मुलगा त्याच्या आईवडीलांप्रमाणेच होईल. त्याला क्षत्रीय किंवा ब्राह्मणही म्हणता येईल.


भगवान पुढे म्हणाले, पण अश्वलायन एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधातुन निर्माण झालेल्या शिंगरुला त्याच्या आईसारखे किंवा वडिलासारखे म्हणता येईल काय.?

अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा तो तिसऱ्याच जातीचा बनेल., त्याला घोडा किंवा गाढव म्हणता येणार नाही. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रीया यांच्या संबधातुन झालेल्या मुलाबद्दल असे म्हणता येणार नाही.



भगवान म्हणाले. हे अश्वलायन दोघा ब्राह्मण भावांपैकी एक वेदपठन केलेला चांगला सुशिक्षीत असेल आणि दुसरा अशिक्षीत. तर ब्राह्मण त्यांच्यापैकी कोणाला यज्ञामध्ये आमंत्रीत करतील..?


अश्वलायन म्हणाला, जो सुशिक्षीत असेल आणि वयाने लहान जरी असला तरी त्यालाच यज्ञामध्ये प्रथम आमंत्रीत केले जाईल.


भगवान म्हणाले, जर दोन भावांपैकी एक मोठा विद्वान आहे, पण अत्यंत दुराचारी आहे ; दुसरा फारसा विद्वान नाही परंतु शीलवान आहे, तेव्हा या दोघांपैकी प्रथम कोणाला आमंत्रीत करण्यात येईल..?


अश्वलायन म्हणाला, जो शीलवान आहे त्यालाच प्रथम आमंत्रीत केले जाईल, दुराचारी मनुष्याला दिलेल्या दानापासुन काय लाभ मिळणार..?



भगवान म्हणाले, हे अश्वलायन प्रथम तु जातीला महत्त्व दिलेस, नंतर वेदपठणाला आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात मी जी चातुर्वर्णाची शुद्धी सांगतोय तिचा तु अंगीकार केला आहेस.


भगवान बुद्धांचे हे भाषण ऐकुन अश्वलायनाला काही सुचतच नव्हते,


भगवान म्हणाले, हे अश्वलायना प्राचीन काळी सात ब्रह्मर्षी अरण्यात राहत असताना, त्यांची एक अशी पापी समजुत झाली होती कि, ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे बाकिचे इतर वर्ण हीन आहेत, असीत ॠषीला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा आपली हजामत करुन घेऊन त्या सात ब्राहण ॠषींच्या निवसाजवळ आला, व त्यांच्यासमोर चंक्रमण करत म्हणाला, हे ब्रह्मॠषी कोठे दिसत नाही बरे..?


असीत ॠषींचे हे उद्धटपणाचे वागणे ऐकुन त्या ब्राह्मणांना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, हे चांडाळा तु भस्म हो.. परंतु त्या शापाचा असीत ॠषींवर काहीएक परीणाम न होता तो अधिकच तेजस्वी दिसु लागला.



तेव्हा ते ब्रह्मॠषी एकमेकांनाच म्हणाले,, अरेरे आमचे तप व्यर्थ आहे, आमचे ब्रह्मचर्य निष्फळ आहे, आमच्या शापाचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.


असीत ॠषी म्हणाला, तुमचे तप व्यर्थ नाही, तुमचे ब्रह्मचर्य निष्फळ नाही, तुम्ही विनाकारण रागावणे सोडले पाहिजे.


असीत ॠषी म्हणाला, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे व इतर वर्ण अशी तुमची समजुत झाली आहे, असे मी ऐकले आहे, पण तुमच्या पुर्वजांनी ब्राह्मण स्त्रीसोबतच लग्न केले आहे, याची तुम्हाला खात्री आहे काय..? तुमच्या आज्यांनी पणज्यांनी व इतर पुर्वज स्त्रीयांनी ब्राह्मण पुरुषांशीच संबंध ठेवला होता याची तुम्हाला खात्री आहे काय..?


ब्रह्मॠषी म्हणाले, नाही आम्हाला याबद्दल काहीच सांगता येणार नाही.


असीतॠषी म्हणाला, तर मग ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ व इतर वर्ण हीन आहेत याला अर्थ काय..? या प्रश्नाने ते सात ब्रह्मॠषी निरुत्तर झाले.


हे ऐकुन अश्वलायन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने खुप प्रभावित झाला, आणि भगवान बुद्धांचा उपासक झाला.....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)