बोधिसत्त्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधिसत्त्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ मे, २०१७

महायानाची मूलभूत ओळख : २


 सदर लेख हा बुध्द पाैर्णिमेच्या दिवशी लिहिलेला असुन आज प्रकाशित करण्यात येत आहे..



महायानाबाबत सुरूवातीला माझा दृष्टिकोन कधीही अनुकूल नव्हता, माझ्या ठायी असलेल्या अज्ञानामुळे मी सतत टीका करीत असे. (धर्म त्याबद्दल क्षमा करो) पण जेव्हा अनुभुतीने जाणले की महायान नेमके काय आहे, तेव्हा मनातून ध्वनी निर्माण झाला (कोणी काहीही म्हणो पण)  महायानासारखा श्रेष्ठ धर्ममार्ग जगात दुसरा नाही  (ही माझी अनुभूती आहे इतरांची वेगळी असू शकते याचा अर्थ असा नव्हे की इतर धर्म - संप्रदायांना मी कमी लेखतो, पण इतके मात्र म्हणेन की कोणाचीही महायानाशी तुलना होऊ शकत नाही even जो श्रावकयानी पारंपारिक प्रचलित बाैध्द धर्म आहे, तो महायान बाैध्द धर्माच्या तुलनेत मागे आहे असे माझी अनुभुती सांगते.) अनेकांना महायान म्हणजे नेमके काय हे माहित नसेल तर काहींनी ते नाव यापुर्वी ऎकले असेल. त्या सर्वांसाठी सांगतो,  भगवान बुध्दांची शिकवण हि तीन  भागात विभागली आहे : 

१. श्रावकयान, 
२. प्रत्येक बुध्दयान तसेच 
३. बोधीसत्त्वयान.. 

यातील बोधीसत्त्वयान हे महायान आहे आणि महायान हे बोधीसत्त्वयान.. ज्याचा उपदेश भगवान बुध्दांनी सामान्य मानवांच्या साठी नाही, तर बोधीसत्वांच्या साठी केला आहे. (अर्थात कोणीही बोधीसत्त्वत्व प्राप्त करु शकते) असा हा धर्ममार्ग अनेक पैलुंनी श्रेष्ठ ठरतो, त्यांच्यातील मुख्य म्हणजे त्यामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग. 


इतर धर्म संप्रदायामध्ये तुम्हाला सामील करुन घेण्यासाठी विशेष प्रकारची प्रलोभने दाखवितात, नरकाची भीती दाखवितात आणि त्यानुसार एखादे निरुपयोगी कर्म कांड करुन धर्म परिवर्तन केले जाते. अनेकदा मनुष्याला ते त्याच्या जन्मासहच प्राप्त होते. अर्थात तथाकथित धर्म - संप्रदाय मानणाऱ्या माता पित्याच्या पोटी जन्म झाला की, तो विशिष्ट धर्म - संप्रदायाचा म्हणून ओळखला जातो, मग त्याच्याद्वारे धर्माचे आचरण केले जाते किंवा नाही याला विशेष महत्व नाही.. पण महायानाच्या बाबतीत मात्र तसे नाही, इथे प्रवेश मिळवून घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागते. त्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला सिध्द करुन दाखवावे लागते की ह्या मार्गावर चालण्यासाठी मी सक्षम आहे, तेव्हाच महायानात प्रवेश मिळतो. त्या प्रवेश परीक्षेचे नाव आहे बोधीचित्तोत्पाद अर्थात बोधीचित्ताची प्राप्ती. बोधीचित्ताची  निर्मिती. बोधीचित्त हे महायानाचे प्रवेशद्वार आहे, तुमच्याकडे बोधीचित्त असेल तर तुम्ही महायानात आहात, आणि तुमचे बोधीचित्त नष्ट झाले तर तुम्ही महायानातुन भ्रष्ट झालेत. असा त्याचा अर्थ आहे..


आपल्या सामान्य मानवांच्या चित्तामध्ये आणि बोधिचित्तामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. आसक्तीच्या महासागरात बुडालेले आपले मन बोधीचित्तासारखा उदात्त विचार करु शकत नाही. सामान्य चित्त आणि बोधीचित्त यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी महायानात केल्या जाणाऱ्या बोधीसत्त्वांच्या प्रार्थनांचे मी केलेले मराठी भाषांतर येथे देत आहे.


पण ह्या प्रार्थनांना वाचण्यापुर्वी काही गोष्टी जाणून घ्या :
 
१. महायान हा केवळ प्रार्थनांवर आधारित धर्म नसून एक प्रयत्नवादी धर्ममार्ग आहे- भक्तीमार्ग नाही. ह्यामध्ये कोणत्याही ईश्वराची किंवा भगवान बुध्दांची भक्ती केली जात नसुन ज्या काही प्रार्थना केल्या जातात त्या धर्ममार्गावर चालतांना किंवा चालण्यासाठी  आपल्या चित्ताचा विकास व्हावा यासाठी..

२. ह्या प्रार्थना काही पोकळ शब्द नसून तो बोधीचित्त प्राप्त जीवांच्या हृदयातुन निघालेला ध्वनी अाहे. त्या प्रार्थना त्या सर्वांच्या चित्ताची मानसिक अवस्था प्रदर्शित करतात.

३. सामान्य मानवी चित्त प्राप्त जीवांना कदाचिर वाटेलही, असे होऊ शकणार नाही. ह्या प्रार्थना केवळ म्हणण्यापुरता मर्यादित आहेत. पण तुम्ही चुकत आहात. कारण ह्या मार्गावर चालण्यास सिध्द अशा प्रत्येक जीवांना ह्या प्रार्थना उर्जा प्रदान करतात, हे मी स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे सांगत आहे..

४. ह्या प्रार्थना केवळ महायानात प्रवेश केलेल्या बोधीचित्त प्राप्त जीवांसाठी आहेत, सामान्य व्यक्तीचे चित्त त्यांचा भार पेलण्यासाठी सक्षम नाही.
 


महायानाच्या काही प्रार्थनांचे मराठीत केलेले भाषांतर पुढीलप्रमाणे :

🌷 चतुर्ब्रह्मविहार 🌷


१. सर्व जीवांना सुख लाभो, सुखाची कारणे लाभोत...

२. सर्व जीव दुःखापासून आणि दुःखाच्या कारणापासुन मुक्त होवोत.

३. सर्व जीव सुखापासुन दुर न होवोत, ज्याला दुःखमुक्तीचा म्हणतात..

४. सर्व जीव समतोल वृत्तीमध्ये विहार करीत, तृष्णा व तिटकारा यांच्यापासून मुक्त होवोत.

🌷 चार प्रतिज्ञा 🌷


१. जीवसृष्टी अनंत आहे, तिला भवसागर नेण्याची प्रतिज्ञा करुया..

२. आपणांत असंख्य दोष आहेत, त्यांना नष्ट करण्याची प्रतिज्ञा करुया..

३. धर्माचे द्वार अनंत आहेत, त्या सर्वांचे आकलन करण्याची प्रतिज्ञा करुया...

४. जागृती (बोधी) अतुल्य आहे, ती साध्य करण्याची प्रतिज्ञा करुया..

🌷 बोधीसत्वाच्या आचारसहिंता 🌷


ज्याप्रमाणे श्रावकयानामध्ये गृहस्थांना पंचशीलांची आचारसहिंता भगवान बुध्दांनी सांगीतली आहे, अगदी त्याचप्रमाणे महायानात बोधीसत्त्वांसाठी ३७ आचारसहिंता सांगितलेल्या आहेत. आपल्या बोधीचित्ताचे रक्षण करण्यासाठी व महायानावर आरुढ राहण्यासाठी ह्या आचारसहिंतांचे पालन अत्यंर आवश्यक आहे. लेखाची वाढती लांबी पाहता मी त्यांच्यापैकी काहीच इथे देतो.

💐 प्रिय व्यक्तींच्या बद्दल असलेली आसक्ती पुराच्या प्रवाहाप्रमाणे चिरडून टाकते तर शत्रूंच्या बद्दल असलेला द्वेष अग्नीप्रमाणे जाळून टाकतो. या गोंधळामध्ये काय स्वीकारायला पाहिजे हे आपण विसरतो, गृहभुमी सोडणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 कोणत्या देवांना शरण जात आहात...? जे स्वतःच बंधनात (संसारचक्रात)  अडकले असतांना ऎहिक देव तुमचे रक्षण करण्यास समर्थ आहेत का ..? त्यांच्याद्वारे रक्षित केल्या गेलेल्यांचे रक्षण करण्यास जे कधीच चुकत नाहीत अशा त्रिरत्नांना शरण जाणे - हि बोधीसत्त्वांची साधना आहे.

💐 अनादि काळापासुन तुमच्या माता तुमच्यावर प्रेम करीत आल्या आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः आनंदित असण्याला अर्थ काय..? अनंत लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी बोधीचित्ताची प्राप्ती करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सर्व दुःख तुमच्या आत्मसुखाच्या कामनेतुनच उत्पन्न झाले आहेत. सर्व जीवांना मदत करण्याच्या विचारातूनच सम्यक संबुध्दांची निर्मिती झाली आहे. दुसऱ्यांच्या दुःखासोबत स्वतःच्या सुखाची अदलाबदली करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखाद्याने जरी तीव्र इच्छाशक्तीने तुमची सर्व संपत्ती लुटली, त्याला तुमचे शरीर संपत्ती किंवा जे काही पुण्य कर्म केलेले आहेत किंवा करणार अाहात, ते सर्व समर्पित करा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुम्ही काहीच चुकीचे केले नसतांना सुध्दा जर कोणी तुमचे डोके उठविण्याच्या प्रयत्नात असेल तेव्हा करुणायुक्त चित्ताने त्याची सर्व पापकर्म स्वतःच्या अंगावर घ्या - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अत्यंत वाईट आणि चुकीच्या किंवा खोट्या गोष्टींचा प्रचार अगदी तीन हजार लोकांमध्ये  करीत असेल., तरीसुध्दा प्रितीयुक्त चित्ताने त्याच्या कार्यक्षमतेची स्तुती करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जर तुमचा कोणी उपहास करीत सार्वजनीक ठिकाणी तुम्हाला वाईट किंवा टोचून बोलत असेल, त्याला तुमचा कल्याणमित्र समजुन नम्रतेने अभिवादन करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमच्या समान किंवा कनिष्ठ असलेला (त्यांच्या आंधळ्या) गर्वामुळे तुच्छतापुर्वक बोलत असेल, तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे त्याच्यापुढे नतमस्तक व्हा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जरी तुम्हाला कोणाचाही आधार नसेल, सर्वजण तुमचा तिरस्कार करीत असतील. भयंकर आजाराने ग्रस्त आणि वाईट शक्तींनी तुमच्यावर अतिक्रमण केला असेल तरी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या निराशेने व्यथित न होता सर्व जीवांची दुःखे आणि पापकर्मे अंगावर घेणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमची किर्ती दुरवर पसरलेली असेल आणि अनेक लोक तुमचा गाैरव. करत असतील, धनाची देवता कुबेरा इतके जरी तुम्ही धन प्राप्त केले असेल . तरी ऎहिक लाभांना कसलेही सार नाही हे जाणा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुमचा खरा शत्रू असलेल्या रागावरच तुम्ही विजय मिळवू शकले नाहीत, तर बाह्य शक्तींवर विजय मिळविल्यावर सुध्दा त्याची वृध्दीच होईल. प्रेम आणि करूणेच्या सत्तेखाली मनाला आणणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 दुःखाचे सर्व प्रकार हे तुमच्या मुलाच्या मृत्यूचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. , ह्या गोंधळाला सत्य समजल्यावर तुमचे अश्रु गळतीला.  जेव्हा तुम्हाला वाईट प्रसंगाला सामोरे  जावे लागेल तेव्हा त्यांचा स्वप्नातील गोंधळ समजून त्याग करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सम्यक संबोधी प्राप्तीची कामना करणाऱ्यांना त्यांच्या शरीराला सुध्दा दान करावे लागते. तेव्हा तुमच्या सामान्य गोष्टींच्या  विषयी बोलण्याची आवश्यकताच काय..?  कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची कामना न करता दान देणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  नैतिक आचारसंहिते शिवाय तुम्ही स्वतःचे सुध्दा कल्याण करु शकत नाही, तर इतरांच्या कल्याणाची कामना करणे हा विनोदच आहे. ऎहिक आकांक्षांचा त्याग करुन आपल्या नैतिक आचारसंहितेचे रक्षण करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 शीलांच्या वृध्दीची कामना करणाऱ्या बोधीसत्वांसाठी, तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करणारा जीव हा एक अमूल्य खजीनाच आहे, सर्वांच्या बाबतीत सहनशिलतेची वृध्दी करणे, चिडचिड आणि संतापापासुन सदैव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  स्तुती आणि आदराची कामना हे भांडसे निर्माण करण्यासाठी कारणीभुत असतात; अभ्यास , स्मृती आणि ध्यान त्याने नष्ट होते. यामुळे मित्र, नातेवाईक आणि मदत करणाऱ्यांच्या प्रति असलेल्या आसक्तीला नष्ट करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 वाईट शब्द इतरांच्या चित्तांची शांती भंग करातात ; जे बोधीसत्वांच्या आचरणाला निकृष्ट करण्यासाठी कारणीभूत होतात. त्यामुळे इतरांना वाईट वाटणाऱ्या असह्य शब्दांचा वापर न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देता किंवा इतर बोधीसत्वांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार करता , तेव्हा तुम्ही स्वतःलाच ढासळवत आहात. महायानामध्ये प्रवेश केलेल्यांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार न करणे  - ही बोधीसत्वांची साधना आहे.

💐 अनंत जीवांच्या दुःखांना नष्ट करणे, तिन्ही लोकांच्या शुध्दतेला जाणे, सम्यक संबोधीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतांना प्राप्त झालेल्या पुण्यांना समर्पित करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

- 37 Practices of Bodhisattva (मराठी अनुवाद : पियुष खोब्रागडे)



🌷 बोधीचित्त 🌷


१. ज्याप्रमाणे बुध्द आणि महाबोधीसत्वांनी महासंबोधीच्या चित्ताला निर्माण केले, अगदी त्याचप्रमाणे मी सुध्दा आतापासुन जेव्हापर्यंत सम्यक संबोधीच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हापर्यंत बोधीचित्ताची निर्मिती करेन. रक्षित नसलेल्यांचे रक्षण करण्यासाठी, बंधिस्तांना मुक्त करण्यासाठी,  थकलेल्यांना आराम देण्यासाठी आणि दुःखाच्या पार न गेलेल्यांना दुःखाच्या पार नेण्यासाठी ...

२. जेव्हा जगामध्ये अस्वस्थता वाढायला लागेल तेव्हा अनंत जीवांच्या शोकांना नष्ट करण्यासाठी, वाईट मार्गावर जाण्यापासून अडविण्यासाठी, दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि दुःखाच्या अनेक कारणांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी निःस्वार्थी अशा बोधीचित्ताची निर्मिती करेन..

३. सर्व निराधार जीवांसाठी मी शरण व्हावे, ज्यांचा कोणीही रक्षण करणारा नाही, असामचा रक्षणकर्ता व्हाचे. ज्यांचा कोणी आधार नाही त्यांचा आधार व्हावे. आरक्षित, दुःखी, कष्टी जीवांसाठी शरण व्हावे, शांतीचे कारण व्हावे..

४. ह्या अथवा पूर्वीच्या जीवनात माझ्याद्वारे जे काही कुशल कर्म केले गेले आहेत, इत्यादी (अशा सर्व पैलुंचा संग्रह जो मला प्राप्त झाला आहे) ज्याला पुण्य आणि प्रज्ञा म्हटले जाते. तसेच सहा पारमितांची भावना करित असतांना माझ्याद्वारे जे काही प्रयत्न कुशल कर्म) केले गेले असेल, त्यांचा लाभ जगातील सर्व जीवांना होवो. त्यांच्याद्वारे अनंत लोकांच्या शोकाचे नाश होऊन तते मुक्त होवोत. 

५. दुर्गतीच्या दुःखापासून मुक्ती आणि सर्व जीवांच्या द्वारे करण्यात आलेल्या पुण्याचे मी अानंदाने  अनुमोदन करतो. सर्व दुःखी जीव सुखी होवोत, जेवढे शरीरधारी जीव आहेत, त्यांच्या सांसारिक दुःखापासून मुक्तीचे अनुमोदन करतो..

६. सर्व जीवांना सुख देणारे व सर्व जीवांच्या कल्याण करणाऱ्या बोधीसत्वांच्या चित्तोत्पाद सागराचे अनुमोदन करतो. सर्व दिशांना विद्यमान असलेल्या बुध्दांना हात जोडून प्रार्थना करतो की त्यांनी  दुःखाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या प्रती मोहभावनेने धर्मदीप प्रज्वलित करावा.

७. निर्वाण मार्गावर आरुढ असलेल्या बुध्दांना हात जोडून वंदना करतो की, त्यांनी अनंत काळापर्यंत मरणाला स्वीकारु नये. त्यामुळे जगात अंधकार पसरणार नाही. अशाप्रकारे हे सर्व कर्म करून मी जे काही पुण्य प्राप्त केले आहे, त्याद्वारे सर्व प्राण्या दुःखाला नष्ट करणारा मी होऊ शकेन. 

८.  दुःखीतांचे जीवन पूर्णपणे नष्ट होईपर्यंत मी रोगी लोकांच्या करिता आैषध व्हावे, वैद्य व्हावे, परिचारक सुध्दा व्हावे. भुकेने व्याकुळलेले व तहाणलेले असतील त्यांचे दुःख ; भोजन व पाण्याचा वर्षाव करुन दुर करावे आणि ह्या दुष्काळा नंतर अनेक कल्पांपर्यंत त्यांचे भोजन व्हावे. 

९. दरिद्री लोकांच्या करिता मी कधीही न ससंपणारे साधन व्हावे आणि विविध प्रकारच्या साधनांनी त्यांच्यासमोर हजर रहावे. मी माझ्या शरीराचे भोग व तिन्ही काळातील सर्व पुण्याचे अासक्तिविरहीत भावनेने सर्व जीवांच्या अर्थसिध्दी करीता त्यांच्या कल्याणासाठी दान करायला तयार आहे. 

१०. संपुर्ण त्याग म्हणजेच निर्वाण आहे आणि माझे मन निर्वाण प्राप्त करण्यास इच्छुक आहे. जर मला संपुर्ण त्याग करायचाच आहे तर या शरीरालाच ; जीवांना दान देणे हेच उत्तम आहे. सर्व जीवांना सुखाची प्राप्ती होईल, त्याप्रमाणे मी माझ्या शरीराला दान केले आहे., तेव्हा त्यांना जेव्हा वाटेल ते याला मारून शकतात, याची निंदा करु शकतात किंवा यावर धुळ फेकु शकतात. 

११. ते माझ्या शरीराशी खेळलेही किंवा विलास सुध्दा केला तरी मला त्याची काय पर्वा..? कारण मी त्यांना आपले शरीर दान दिले आहे. त्यांना माझ्या शरीराच्या ज्या - ज्या कार्यापासुन सुख प्राप्त होत असेल, ते ते कार्य ह्या शरीरापासुन घेऊ शकतात, कारण माझ्यामुळे कोणाचेही अहित होऊ नये.

१२. जे कोणी माझे निंदक असतील आणि जे कोणी अपकारक असतील आणि अाणखीही जे कोणी उपहास करणारे असतील ते सर्व बोधीला प्राप्त व्हावेत. जे अनाथ आहेत, त्यांचा मी नाथ व्हावे, तसेच पार जाणाऱ्यांची नाव सेतु व वाहक व्हावे. जीवांसाठी मी चिंतामणी रुपी उत्तम घर व्हावे, सिध्द व्हावे महान आैषधी व्हावे, तसेच कल्पतरु आणि कामधेनु व्हावे. 

१३. ज्याप्रमाणे पृथ्वी इत्यादी चार महाभुत हे अनंत आकाशापर्यंत व्याप्त अप्रमेय जीवांकरीता मी तोपर्यंत विविध प्रकारे आधार व्हावे, जोपर्यंत सर्व जीव मुक्त होत नाहीत. जसे आधी बनुन गेलेल्या सुगतांनी बोधीचित्ताला प्राप्त केले तसेच त्यांनी बोधीसत्वांच्या आचारसहिंतेचे पालन केले, त्याचप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी मी बोधीचित्ताला उत्पन्न करुन त्या शिकवणीला त्याच क्रमाने स्वीकार करेन.  

- बोधीसत्त्वचर्यावतार (आर्य शांतीदेव)

Do even fathers and mothers Have such a benevolent intention as this? Do the gods and sages? Does even Brahma have it?

इतक्या महान प्रार्थना कोणत्या धर्ममार्गात केल्या जातात का..? जिथे प्रत्येक जीव केवळ स्वतःच्याच हितासाठी प्रार्थना करतात आणि त्याद्वारे इतरांना हानी होत आहे किंवा नाही ह्या साध्या गोष्टींकडे सुध्दा त्यांचे लक्ष जात नाही. पण बोधीसत्त्व मात्र सर्व विश्वाच्या कल्याणासाठी स्वतः समर्थ बनण्यासाठी साधना करतात त्यासाठी ते त्यांच्या जीवनाचे दान देण्यासाठी सुध्दा मागे पुढे पाहत नाही.
वरील सर्व गोष्टी सांगण्यासाठी आज काही महायानाचा दिवस नाही परंतु बोधीसत्त्व सिध्दार्थाच्या सम्यक संबोधी प्राप्तीचा दिन मात्र आहे. ज्या दिवशी अनंत लोकांच्या कल्याणाच्या अकृत्रिम अभिलाषेसह अनेक पारमिता पूर्ण करुन बोधीसत्त्व सिध्दार्थाने सम्यक संबोधीची प्राप्ती केली. त्या ध्येयापर्यंत पोहोचतांना बोधीसत्त्व ह्याच मार्गावरून गेले, त्याबद्दल सामान्य माहिती होण्यासाठी ह्या लेखाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
 सर्व जीव सुखी होवोत, सर्वांना हिताचा मार्ग सापडो* 🙏🏻🙏🏻

-  © पियुष खोब्रागडे

      १०.०५.२०१७




www.buddhistsofindia.blogspot.in 

® सदर लेख कोणत्याही माध्यमांच्या द्वारे शेयर करतांना ह्या Blog चा URL सोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सर्व हक्क सुरक्षित...



+++

बुधवार, १७ मे, २०१७

मैत्रेय आणि महायानाबाबत असलेले काही गैरसमज..

महायान आणि बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीत आज बरेच गैरसमज समाजामध्ये पसरले आहेत. काही लोक त्या गैरसमजुतींना सत्य मानून आपल्याच मनाच्या कथा रचतांना बोधीसत्वाच्या ह्या महान संकल्पनेचा संबध कोणी अवतारवादाशी तर कोणी त्यांच्या प्रेषितांशी जोडून पाहत आपल्याच मनाचे मनोरे रचण्याचा प्रयत्न करित आहेत. त्या सर्वांच्या गोड गैरसमजुतींचे खंडन करण्यासाठी सदर लेख लिहित आहे.


सर्वप्रथम काही लोक असा प्रचार करतांना दिसतात की, मैत्रेयाची संकल्पना ही महायान पंथाने जन्माला घातली असुन ती एक थोतांड पसरविणारी संकल्पना आहे. त्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की बोधीसत्त्व संकल्पना ही जरी महायानाची केंद्रीय संकल्पना असली तरी मैत्रेयाचे मुळ पारंपारिक पाली तिपिटकातच आहे. परंतु आपली समजूत महायानाला एक अंधश्रद्धेवर आधारलेला धर्म अशी झाल्यामुळे आपण त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो आणि प्रत्येक वेळी आपल्या श्रध्दांना न पटणाऱ्या किंवा अंधश्रध्देवर अाधारलेल्या गोष्टींचा संबंध आपण त्याच्याशी लावतांना दिसतो. जसे - काहींच्या मते पुनर्जन्माची संकल्पना ही महायानाची व्युत्पत्ती आहे, पण तसे नाही ती भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या श्रावकयानावरच आधारलेली आहे. ह्या सर्व गैरसमजुतींमुळे मी महायानाच्या बाबत थोडक्यात सांगू इच्छितो.


महायान जसा दिसतो तसा नाहीच, तुम्ही बाहेरून महायानाचा न्यायनिवाडा करु शकत नाहीत, त्यासाठी तुम्हाला त्याला बरोबर जाणून घेता आले पाहिजे, त्याचे योग्य प्रकारे आकलन करता आले पाहिजेत. तो एका नारळाच्या फळासारखा आहे, बाहेरून कठोर आणि खाण्यायोग्य न दिसणारा आतुन तितकाच सुयोग्य आहे. मी महायानाच्या बाबत जो काही अनुभव घेतलेला आहे, त्यानुसार सांगू शकतो की तो कर्मकांडावर आधारित धर्ममार्ग नाही, तर तो ज्या काही साधना सांगतो त्या सर्व फळ देणाऱ्याच आहेत. केवळ बाप्तिस्मा, सुंता, दीक्षा, इत्यादी प्रकारच्या विधींना संपन्न केल्याने तुम्ही महायानात प्रवेश मिळवू शकत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला तुमची योग्यता सिध्द करावी लागते, त्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रवेश परिक्षा द्यावी लागते, तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळतो. जगातला कोणताही धर्म ह्या प्रकारच्या कसोट्यांना पुर्ण करण्याचे आव्हान देत नाही. ते केवळ त्यांच्या धर्मसंस्थापकांची किंवा त्यांनी सांगितलेल्या ईश्वरांची भक्ती करायला सांगतात., त्यातूनच तुमचे पाप धुतले जातील सुगती प्राप्त होईल अन्यथा दूर्गति होईल असा सिध्दान्त सांगतात. याउलट महायानात सर्व कर्मावर आधारित आहे., कोणाच्या भक्तीवर नाही. हा मूलभूत फरक जरी समजला तरी सुध्दा आपण महायानाच्या महत्तेबद्दल समजून घेऊ शकतो. याविषयावर सांगण्यासारखे तर बरेच काही आहे, पण लेखाची लांबी लक्षात घेता मुख्य मुद्यावर येतो..


बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीतही बरेच गैरसमज पसरले आहेत, काहींच्या मते बोधीसत्त्व हा बुध्दांचा अवतारवाद प्रदर्शित करतो. त्यांच्या मते भगवान बुध्दांनी बोधीसत्वांच्या रुपांमध्ये अनेक अवतार घेतले आहेत. तर बाैध्द परंपरेमध्ये अनेक बुध्दांची जी काही संकल्पना मांडली जाते, त्यातील सर्व बुध्द हे एकाच बुध्दांचे अनेक रुप असुन धर्माचा विनाश झाल्यावर बुध्द स्वतः अवतार घेतो असा गोड गैरसमज अनेकांचा आहे. त्या सर्वांनी लक्षात घ्यावे की, बोधीसत्त्व हा काही स्वर्गातून पडलेला जीव नाही. तर "बुध्दो भवेयं जगतो हिताय" अर्थात सर्व जीवांच्या हितासाठी आणि सुखासाठी मी बुध्दत्वाची प्राप्ती करेन अशा प्रकारची अकृत्रिम अभिलाषा आपल्या चित्तामध्ये निर्माण करुन त्यासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्यागाची सुध्दा तयारी ठेवणारा आपल्यासारख्या सामान्य मनुष्याच्या चित्ताचेच विकसित रुप आहे. त्याच्या त्या साधनांमुळे त्याचे चित्त (बोधीचित्त) त्या स्तरावर पोहोचले आहे, जिथे इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाचे दान देतांना सुध्दा त्याला आनंद होतो. महायानात ज्या काही प्रार्थना (साधना) केल्या जातात त्या अशा मार्गावर चालण्यासाठी मन प्रगल्भ व्हावे यासाठीच .. अर्थात बोधीसत्त्व हा सामान्य मनुष्यच आहे, पण त्याचे चित्त सामान्य नसून बोधीचित्त आहे. असा हा बोधीसत्त्व अनेक पारमिता पूर्ण करुन शेवटी जगाच्या कल्याणासाठी  बुध्दत्वाची प्राप्ती करतो (ज्या कालावधी मध्ये धर्माचा नाश झालेला असतो, जेव्हा लोकांनी बुध्द हे नाव सुध्दा ऎकलेले नसते) अशी बोधीसत्त्व संकल्पना अाहे.


अनेक बुध्दांच्या संकल्पनेच्या विषयी सांगायचे झाले तर, प्रत्येक जीव हा बुध्द बनण्याची क्षमता राखतो. ह्या जगातील प्रत्येक जीव हा बुध्द बनू शकतो, त्यामुळे अनेक बुध्दांच्या संकल्पने विषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही. कारण गाैतम बुध्द हे प्रथम बुध्द नव्हतेच, त्यांच्यापुर्वी सुध्दा अनेक बुध्द होऊन गेले आणि नंतरही अनेक होतील. याचा अर्थ असा नव्हे की, एकच बुध्द अनेक वेळा अवतार घेतो. गाैतम बुध्दांच्या पूर्वी जे काही बुध्द होऊन गेलेत आणि नंतर जे कोणी होतील त्यांचा गाैतम बुध्दांशी संबंध नाही, ते वेगवेगळे व्यक्ती आहेत; ज्यांनी स्वयंप्रयत्नाने बुध्दत्वाला प्राप्त केले आहे.

त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की, " बुद्धाला जेव्हा विचारले गेले तुमच्या पश्चात आम्हास मार्गदर्शन कोण करेल तेव्हा बुद्ध म्हणाले मी मैत्रेय म्हणुन. जन्मास येइल वा मैत्रेय हा त्याकाळी बुद्ध असेल."  हा चुकीचा सिध्दांत आहे, भगवान बुध्दांनी असे कधीही सांगितलेले नाही. भगवान बुध्दांना जेव्हा विचारले गेले की, तुमच्या पश्चात आम्हाला मार्गदर्शन कोण करेल..? तर भगवानांनी उत्तर दिले धम्म..!! मी उपदेश केलेला धर्मच माझ्या पश्चात तुम्हाला मार्गदर्शन करेल. भगवान बुध्दांनी असे सांगितले नाही की, मी मैत्रेय म्हणून जन्मास येईल. असे होऊच शकत नाही, कारण ते धर्मविरोधी आहे. बुध्दांनी पुनर्जन्माचा क्षय केलेला आहे, त्यांनी मनाच्या सर्व बंधनांना तोडले आहे, त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. भगवान बुध्द ज्या मैत्रेयाच्या विषयी बोलत आहेत, ती बुध्दत्व प्राप्तीसाठी प्रयत्नरत दुसरी व्यक्ती आहे, स्वतः गाैतम बुध्द नाहीत. गाैतम बुध्दांच्या द्वारे उपदेश केलेला धर्म जेव्हा नष्ट होईल, अर्थात ह्या धर्माच्या बाबतीत कोणालाही काहीच माहिती नसेल तेव्हा मैत्रेय बोधीसत्त्व हा बुध्द बनणार. एका बुध्दांची शिकवण अस्तित्वात असल्यावर दुसरा कोणताही बुध्द जन्म घेऊ शकत नाही. ह्या सिद्धांताच्या मागे सुध्दा अनेक कारणे आहेत.

काही लोक ह्या बोधीसत्त्व संकल्पनेचा संबंध अवतार वादाशी लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात -

बोधीसत्वांच्या अनेक जन्मांचा किंवा जातकांचा हा सिध्दान्त ब्राह्मणांच्या अवतारवाद ह्या सिध्दांतासारखा वाटतो, अर्थात ईश्वराच्या अवतारासंबंधीचा सिध्दान्त. (पण तसे नाही, त्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे) जातक सिध्दान्त हा भगवान बुध्दांच्या सर्वश्रेष्ठ शुध्द अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. यामध्ये बोधीसत्वाचे जीवन शुध्द असलेच पाहिजे, बोधीसत्त्व आपल्या जीवनामध्ये जन्मोजन्मी पवित्र बनत जातो व त्याचे अनुकरण कराणार्याचे रक्षण करतो. परंतु अवतारवादामध्ये ईश्वराच्या अवताराची जडणघडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणी संकल्पनेचा अर्थ इतकाच की, ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. परंतु बोधीसत्वाच्या बाबतीत मात्र तसे नाही, बुध्द बनण्यासाठी बोधीसत्वाला (किमान) सलग दहा जन्मांपर्यंत सर्वोच्च शुध्द जीवनाचे बंधन घालण्यात अाले आहे. बोधीसत्वाने अनेक जन्मांपर्यंत, बुध्दत्वाच्या प्राप्तीसाठी आवश्यक अशा शुध्द जीवन अवस्थेतुनच गेले पाहिजे. ह्या सिध्दांताला दुसऱ्या कोणत्याही शासनामध्ये तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या शास्त्याला अशा प्रकारच्या कसोटीला पूर्ण करण्याचे आव्हान देत नाही.

- दि बुध्द अॅण्ड हिज धम्म

ह्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असतील अशी अपेक्षा करतो. तसेच जे लोक इस्लामी प्रेषितांना बुध्दांनी सांगितलेला मैत्रेय मानतात, त्या लोकांनी सुध्दा बोधीसत्त्व संकल्पनेचा योग्य प्रकारे अभ्यास करावा ही विनंती करतो. तसेच मला त्यांच्या विषयी एक पडलेला प्रशन म्हणजे, ते त्यांच्या प्रेषितांना मैत्रेय ह्या बोधीसत्व रुपात मानतात की, बुध्द रुपात...? त्यानंतर सुध्दा आणखी अनेक प्रश्न पडतात -

अ. बोधीसत्त्व रुपात पाहत असतील तर :

१. बुध्दांची शिकवण अस्तित्वात असतांना ते बुध्दांना शरण का बरं गेले नाहीत...?

२. एका बोधीसत्वांच्या शुध्द व नैतिक जीवनाच्या कसोटीप्रमाणे त्यांचे जीवन होते का...?


ब. बुध्द रुपात पाहत असतील तर :

१. त्यांनी धर्मचक्राचे प्रवर्तन कशा प्रकारे केले..?

२. धर्म अस्तित्वात असतांना त्याला शरण जायला सोडून ईश्वराला (जे एक बाह्य शरण आहे) त्याला शरण जायला का बरं सांगितले..?

३. ते सर्व विकारांच्या पासून मुक्त होते का..? वास्तविक पाहता त्यांनिओ ज्या ईश्वराची संकल्पना मांडली आहे, तो भेदभाव करणारा, लोकांना गटसमुहांमध्ये विभागणारा, त्याची न ऎकणार्या जीवांना नरकात पाठविणारा जीव आहे, ज्याच्यावर माराचे साम्राज्य अस्तित्वात अाहे, असा ईश्वर सुध्दा जेव्हा माराच्या बंधनातून मुक्त नाही तर त्यांच्या प्रेषितांच्या बाबतीत आपण काय अपेक्षा करावी..?


कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करतांना आपण नेहमीच ती नेमकॊ कशाशी करत आहोत, याचे भान ठेवावे...




हे सुध्दा वाचा :


शनिवार, २८ मे, २०१६

धर्माच्या बाबतीत पसरविण्यात येणारे गैरसमज आणि त्यांचे निराकरण

            काही दिवसांपासुन फेसबुकवर भगवान बुध्दांच्या बाबतीत लोकांना भ्रमीत करणारी व समाजामध्ये गैरसमज पसरविणारी एक पोस्ट व्हायरल झालेली आहे. ज्या पोस्टमध्ये भगवान बुध्द कशाप्रकारे हिंदुत्त्ववादी होते. (वास्तवात भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाणाच्या सहस्त्र वर्षानंतर सुध्दा "हिंदुत्वहि संकल्पना तरी अस्तित्त्वात होती का.. ?ते एक हिंदु म्हणुनच जगले व हिंदु म्हणुनच निर्वाण पावले. इत्यादी गैरसमज पसरवि जाणाऱ्या  अनेक गोष्टी पोस्टकर्त्याने मुळ अर्थ जाणुन न घेता अर्धवट संदर्भ देऊन सिध्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.

अशा ह्या गैरसमज पसरविणाऱ्या लेखांपासुन लोकांनी सावध रहावे , व सत्य काय आहे याची शहानिशा करावी.

१. पोस्टकर्त्याचा प्रथम आक्षेप आहे कि  "भगवान बुध्दांनी आपण नवा धर्म संस्थापित आहोत , असं कुठेही वाटलं नाही. तो हिंदु म्हणुनच जन्माला आलावाढला व मेलाही हिंदु म्हणुनच. त्याने इण्डो - आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली."

            ह्या वाक्याचा संदर्भ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुस्तकातून घेतलेला आहेज्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषविले आहे. त्यांनी आपल्याच सोयीच्या बऱ्याच एकांगी संशोधनात्मक टिप्पण्या केल्या आहेत. ज्यांचे अनेक विद्वानांनी योग्य संदर्भासहित निराकरण सुध्दा केले आहे. लेखकाने हा प्रश्न विचारण्याचा मुख्य कारण म्हणजे , त्याला बुध्दांचा धर्म आणि त्यांना अभिप्रेत असलेला धर्माचा अर्थच समजलेला नाही ,नाहीतर त्याने असा प्रश्नच केला नसता.

            भगवान बुध्दांनी कोणत्याही संप्रदायाची स्थापना केली नाही , कारण त्यांचा संप्रदाय व्यवस्थेवर विश्वास नव्हता. एखाद्या गट समुहात बंध होऊन राहणे हे त्यांना मान्य नव्हते , म्हणुनच तर भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा केवळ मानवांसाठीच नाही तर जगातील सर्व पशु , पक्षी व सर्वच सजीवांसाठी आहे. भगवान बुध्दांनी धर्माची स्थापना केली नाही तर त्याचे संशोधन केले , त्याला शोधुन काढले जगातील सर्व जीवांच्या कल्याणासाठी. त्यामुळे आम्ही म्हणतो ,
स्वाखातो भगवता धम्मो ,
संदिट्ठिको , अकालिको ,
एहिपस्सिको , ओपनाय्यिको ,
पच्चतं वेदितब्बो विञ्ञु हि ति

अर्थात भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा सांदृष्टिक - ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते , अकालिक - ज्याला काळाची , प्रदेशाची मर्यादा नाही , एहिपस्सिको - जो म्हणतो या आणि पहा ,स्वतः अनुभव करा , ओपनाय्यिको - जो पुढे घेऊ जाणारा आहे , पच्च्तं वेदितब्बो विञ्ञु हि - असा हा धर्म केवळ इकडे ऐकुन तिकडे सांगण्यासाठी नाही ,तर स्वतः आचरणात आणण्यासाठी आहे.

येथे आम्ही भगवान बुध्दांनी स्थापन केलेला धर्म नाही तर भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म असे संबोधतो , कारण धर्माची (निसर्ग नियमांची) स्थापना भगवान बुध्दांनी केलेली नाही तर , त्याला जाणुन त्यांचा उपदेश भगवान बुध्दांनी केला आहे.

  • भगवान बुध्द हे हिंदु म्हणुन नाही , तर एक मानव म्हणुन जन्मले होते. जन्मानंतर ते कोणी हिंदु म्हणुन वगैरे नाही तर एक बोधीसत्त्व म्हणुन वाढले. बोधीसत्त्व ज्याला कोणत्याही जातीचीवंशाची, प्रदेशाची, संप्रदायाची बंधने बांधुन ठेऊ शकत नाहीतर सरु जीवांच्या कल्याणासाठी जो कोणत्याही प्रकाराचा त्याग करण्यासाठी तो सदैव तयार असतो. आणि अनंत लोकांच्या शोकाचे नाशक बनुन परिनिर्वाणास प्राप्त झाले.
भगवान बुध्द नेहमीच उल्लेख करतात , भिक्खुंनो ,माझ्या शासनात..... ' यात भगवान बुध्दांच्या शासनाचा अर्थ ज्याला समजला असेल , तो हा प्रश्न का बरं विचारणार  ... ?

सब्ब पापस्स अकरणं ,
कुसलस्स उपसंपदा ,
सचित्त परियोदपणं,
एतं बुध्दानं सासनं
कोणत्याही प्रकारचे पाप न करणे , कुशल कर्मांचे संपादन करणेहेच बुध्दांचे शासन (धर्म) आहे.

पोस्टकर्त्याचा दुसरा आक्षेप आहे आहे कि , बुध्द हा स्वतःच विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता. तो म्हणतो, "बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत नाहीत" , पण हीन कुळ म्हणजे नेमके कोणते कुळ , याचा आपण विचार केला आहे का.. ? बुध्दांना अभिप्रेत असलेला हीन कुळ हा अर्धी पुस्तके वाचलेल्यांना कसा समजणार ... ?

खुद्दक निकायाच्या सुत्त निपातामध्ये भगवान बुध्दांनी एका कुत्र्याचे मांस खाणाऱ्या चांडाळपुत्र मातंगाची गोष्ट सांगीतली आहे. (गाथा क्रं.   १३७ ते १४२  ) त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत दुर्लभ असे यश मिळाले. तो श्रेष्ठ होऊन गेला. भगवान बुध्दांच्या नुसार तुमच्या परंपरे प्रमाणे हीन समजला जाणारा तो मातंग कुमार श्रेष्ठ आहे , तर संपन्न कुळातील वैदिक ब्राह्मण अनेकदा पापकर्मांचे आचरण करीत असलेले दिसुन येतात त्यांची येथेच निंदा होऊन दुर्गती होते. (तुमच्या परंपरे प्रमाणे श्रेष्ठ समजल्या जाणार्या कुळात झालेला) त्यांचा जन्म दुर्गती पासुन किंवा निंदेपासुन त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. (सुत्त निपात -१:७:२५-२६ )

येथे भगवान बुध्दांनी सदाचारी चांडाळपुत्र मातंगाच्या कुळाला श्रेष्ठ कुळ म्हटले आहे , जेथे वैदिक परंपरे प्रमाणे त्याला हीन समजले जाते , तर दुराचारी वैदिक ब्राह्मणांच्या कुळाला हीन कुळ म्हटलेले आहे. अर्थात उच्च किंवा हीन कुळांचे वर्गीकरण करण्याचे बुध्दांचे माप हे त्यांच्या सदाचार व दुराचार यांवर आधारीत आहे. याच मापनानुसार बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत नाही अर्थात दुराचार युक्त कुळात जन्म घेत नाही. पण इतक्या हजारो वर्षांच्या अंतराच्या नंतर सुध्दा जाती व्यवस्थेने ग्रासलेला मेंदु इतका उदात्त विचार करु शकत नाही. बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत नाही , पण ते हीन कुळ तुमच्या अर्थानुसार नव्हे...

२.१. अंबट्ठ सुत्तातुन काही बोध घेण्यापुर्वी तो नीट वाचावा ,व अर्थ न समजल्यास पुन्हा पुन्हा वाचावा. शाक्य कुळ हे बुध्दांचे कुळ नव्हते , ते सिध्दार्थ गौतमाचे होते. बुध्दांना कोणत्याही जाती, पंथ, संप्रदायप्रदेश वंश राष्ट्रादिंच्या मर्यादा नसतात. अंबट्ठ सुत्तामध्ये अंबट्ठ हा भगवान बुध्दांना नीच , चांडाळ , व ब्रह्म्याच्या पायातुन उत्पन्न झालेला त्याचा अनैतिक पुत्र आहे असे म्हणत , त्याने शाक्य कुळावर सुध्दा अनेक आक्षेप घेतले... व त्याचा  "कण्हायण" गोत्र कशाप्रकारे श्रेष्ठ आहे , हे समजावुन देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान बुध्दांनी त्याच्याच अर्थानुसार त्याला कण्हायण गोत्राचा इतिहास सांगीतला. भगवान बुध्दांनी असे म्हटले नाही की, "आम्ही शाक्य - क्षत्रीय वंशाचे शुध्दत्व राखण्यासाठी बहिण - भावांमध्ये लग्न करतो"तर त्याला असे सांगीतले की, "अक्कोसकाचे वंशज जे पुढे शाक्य म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी त्यांच्या वंशाचे शुध्दत्त्व राखण्यासाठी बहिण भावांमध्ये लग्न केले होते". (शाक्य लोक हे वंशाभिमानी होते , यात दुमत नाही..! याचे तिपिटकातच अनेक संदर्भ सापडतात , पण याचा अर्थ भगवान बुध्द हे वंशाभिमानी होते , असा अर्थ कोणी मुर्खच काढु शकतो..) वंशाभिमानाने आंधळा झालेल्या अंबट्ठाला भगवान पुढे म्हणाले - त्या अक्कोसक राजा आणि कण्ह नावाच्या दासीपासुन एक पुत्र झाला , त्याचे वंशजच आता कण्हायण म्हणुन ओळखले जातात. असे म्हणत भगवान बुध्दांनी त्याला जातीवाद , वंशवाद व गोत्रवाद ,इत्यादींचा त्याग करण्याचा उपदेश केला.

जातित्थद्धोधनत्थद्धो,
गोत्तत्थध्दो च यो नरों !
सञंति अतिञ्ञेति
च पराभवो मुखं !!

जी व्यक्ती आपल्या जातीचा , धनसंपत्तीचा , गोत्राचा व्यर्थ अभिमान बाळगते , आणि त्याच अहंकाराने इतरांचा अपमान करते , हेच तिच्या पराभवाचे कारण आहे.

            भगवानांना आपल्या वंशाचा किंवा वर्णाचा अभिमान होता , हा अत्यंच चुकीचा आणि खोडसाळ आरोप आहे. भगवान बुध्दांना आपल्या वर्णाचा असो वा वंशाचा किंवा अन्य कशाचाही जरा सुध्दा अभिमान नव्हता. वास्तवात अभिमान , तृष्णा यांच्यासारख्या अनेक विकारांवर विजय मिळवुनच कोणी बुध्दत्त्वाची प्राप्ती करु शकतो. भगवानांच्या बाबतीत सांगायचे झाले तर"ज्याचा अभिमान नष्ट झाला आहे, ज्याच्यात गाठी नाहीतज्याचे चित्त सर्व प्रकारच्या बंधनातुन मुक्त झाले आहे. तो 'मी म्हणतोअसे सुध्दा म्हणतो आणि 'मला म्हटले जातेअसे सुध्दा म्हणतोपरंतु केवळ व्यवहारासाठी तो अशाप्रकारचा शब्दप्रयोग करीत असतो. तो विद्वान तृष्णेच्या वर निघुन गेलेला आहेत्याला कसल्याही प्रकारची बंधने नाही."

            सुत्तनिपातातील सुंदरिक भारद्वाज सुत्तामध्ये,  सुंदरीक भारद्वाज ब्राह्मण भगवानांना म्हणतो"तु जन्माने कोण आहेस... ?" त्यावर भगवान बुध्द म्हणतात"मी ब्राह्मण नव्हे किंवा राजपुत्र (क्षत्रिय) नव्हे , वैश्य नव्हे अथवा अन्य कोणी नव्हेसामान्य जनांचे गोत्र ऐकुन अंकिचन असा मी इहलोकी प्रज्ञापुर्वक वागतो. चीवर पांघरुनमुंडण करुनशांत चित्तगृहरहित व मनुष्यांपासुन अलिप्त होऊन मी फिरत असतो. तेव्हा हे ब्राह्मणातुझा हा गोत्रासंबंधीचा प्रश्न अनाठायी आहे."
                                                                   खुद्दक निकाय , सुत्तनिपात ४५४-४५६

संयुक्त निकायात सुंदरिक सुत्तामध्ये , एक ब्राह्मण भगवानांना विचारतो"आपली जात कोणती..? कारण काही ब्राह्मण सुध्दा मुंडण करीत असतात." यावर भगवान म्हणतात"जात विचारु नकोसकर्म विचार. लाकडाने सुध्दा अग्नी उत्पन्न होत असतो. (तुमच्याद्वारे) नीच समजल्या जाणाऱ्या कुळात जन्मलेले सुध्दा धीर मुनी होत असतात. श्रेष्ठ व लज्जाशील मनुष्य होत असतात."
                                                                                      संयुक्त निकाय ७:९:१

v जाती आणि वर्ण व्यर्थ आहेत , शीलच सर्वश्रेष्ठ आहे. जो शीलांपासुन दुर आहे , त्याच्या बहुश्रुत असण्याला काहीही अर्थ नाही. अधार्मिक क्षत्रिय असो ,अधार्मिक ब्राह्मण असो , अथवा अधार्मीक वैश्य असोतो दोन्ही लोकांना सोडुन दुर्गतीला प्राप्त होतो.
                                                                             जातक अट्ठकथा, ३६२

वरील उदाहरणे व संदर्भ भगवान बुध्दांचा जाती , गोत्रवर्ण , वंश , इत्यादींबाबत चा दृष्टीकोन समजुन घेण्यास पुरेसा आहे. शिवाय भगवान बुध्दांनी कोणती मोठी सामाजिक क्रांती केली , ते सुध्दा ह्या गाथा वाचुन आपल्याला समजते.


३. पोस्टकर्त्याने पुर्वीच जाणीवपुर्वक भगवान बुध्दांना वंशाभिमानी ठरविण्याचा केविलवाणा व फसलेला प्रयत्न केला आहे. मी वरील गाथांद्वारे संदर्भासहित स्पष्ट केले आहे किभगवान बुध्दांना कसल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. त्यामुळे पुढील अनेक आक्षेप निकालात निघतात. कारण पोस्टकर्त्याने भगवान बुध्द हे वंशाभिमानी होतेइत्यादी सांगत त्यांचे महान ऐतिहासिक कार्य नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. जसे तो म्हणतो"बुध्द स्वतः वंशश्रेष्ठत्व राखतोतो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा.. ?" अर्थात पोस्टकर्त्यालाभगवान बुध्दांनी  "अस्पृश्यता नष्ट केली नाहीअसे सिध्द करता येत नाही , म्हणुनच त्याने भगवान बुध्दांना वंशश्रेष्ठत्व स्वतःच एक मानणारा असे सांगुन एक प्रश्न निर्माण केला कीजो बुध्द वंशश्रेष्ठत्व राखतोतो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा.. ? येथे मी सिध्द केले आहे की , भगवान बुध्द वंशश्रेष्ठत्व मानीत नाहीत , तर मग त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली , हे पोस्टकर्ता स्वीकारेल का.. ? सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे इंडियन फिलॉसॉफी हे एकांगी लिहिले गेलेले व दुषीत पुर्वग्रहांनी भरलेले पुस्तक आहेज्याची अनेक विद्वानांनी त्याच काळात चिरफाड केली होती.

बुध्द वंशाभिमानी नाहीतना त्यांचा पंथ वंशाभिमानी आहे. त्यांच्या संघात कोणत्याहीजाती, वर्णवंश, गोत्राच्या लोकांना प्रवेश आहे. भगवान ब्राह्मण असो वा क्षत्रिय कुळात जन्म घेण्याला गुण श्रेष्ठत्वाचे प्रतिक मानीत नाहीत. भगवान बुध्दांना जन्माधारीत व्यवस्था मान्य नव्हतीतर कर्माधारीत व्यवस्थेवर त्यांचा अधिक विश्वास होता. सुत्त निपातात भगवानांनी स्पष्टपणे सांगीतले आहे कि , "जन्माने कोणीच नीच किंवा श्रेष्ठ होत नाहीतर तो त्याच्या कर्मानेच होतो." बुध्दांनी कोणती फार मोठी सामाजीक क्रांती केली नाही म्हणणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, "जगाच्या इतिहासामध्ये भगवान बुध्द हेच प्रथम मानव होते , ज्यांनी जाती आणि वर्णव्यवस्थेला नाकारत मानवाला सामाजिकराजकीय , मानसिक , इत्यादी गुलामगिरीतुन मुक्त करीत धर्मराज्याची स्थापना केली.  मानवा - मानवांमध्ये भेद निर्माण  करणाऱ्या  जन्माधारीत व्यवस्थेला नष्ट करण्याची सुरुवात त्यांनी आपल्या संघापासुनच केली. भगवान बुध्दांनी सांगीतलेल्या निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर चालण्यासाठी कोणालाही प्रतिबंध नव्हता , किंवा कोणाची जात पाहुन त्याला संघामध्ये प्रवेश दिला जात नसे. अनेक ब्राह्मण , क्षत्रीय , वैश्य किंवा शुद्रच नाही तर अस्पृश्य जमातीतील लोक सुध्दा संघामध्ये होते , ज्यांनी संघात अग्र स्थान प्राप्त केले होते."  जसे, विनय पिटकाचे संकलन करणारे उपाली हा न्हावी कुळात जन्माला आला होतासुनीत भंगी जो पुर्वी गटार साफ करण्याचे कार्य करीत असेसोपाक हा चांडाळ कुळात जन्मलेला होता तर स्वाती कोळी. पण त्यांनी संघात प्रवेश करुन आपल्या कर्माने जे उच्च स्थान प्राप्त केले होते. तेवढे उच्च स्थान तर वैदिक ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुध्दा (जन्माधारीत व्यवस्थेप्रमाणे) कोणी प्राप्त करु शकत नाहीत. हे लोक कोणत्याही कुळातुन आले असले तरी संघप्रवेशा नंतर त्यांच्यात भेद उरत नसे. भगवान बुध्द म्हणतात"ज्याप्रमाणे  गंगा ,  यमुना ,  अचिरवती ,  शरयुमही , इत्यादी नद्या समुद्रात मिळाल्यावर त्यांचे पाणी ओळखणे अशक्य आहेत्या पाण्याला महासागर असे म्हणतात. त्याचप्रमाणे क्षत्रीय , ब्राह्मण , वैश्य व शुद्र या चारही वर्णातील लोक जेव्हा संघात प्रवेश करतात , तेव्हा ते केवळ "शाक्यपुत्रीय श्रमण" याप्रमणेच ओळखतात."

            संघात प्रव्रज्जीत झालेला सुनीत म्हणतो , "मी अत्यंत दरिद्री , जिथे खाण्यास अन्न सुध्दा मिळत नव्हते अशा नीच कुळामध्ये जन्माला आलो होतोमाझे पिता हीन प्रकारचे काम करीत होते , (त्यामुळे मी सुध्दा) कचरा फेकणारा झालो.  मनुष्यांनी माझा द्वेष केलाअपमान व तिरस्कार केला, (असे असतांना देखील) मी मात्र त्यांना नम्रपणे वंदन केले. तेव्हा त्या अर्हंत सम्यक संबुध्द भगवांना श्रेष्ठ नगरी मगध मध्ये जाताना बघितलेखराटा व टोपली खाली ठेऊन मी भगवान बुध्दांना वंदन करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलोमाझ्यावर कृपा करुन पुरुषोत्तम तिथेच थांबले. तेव्हा भगवान बुध्दांच्या चरणांना वंदन करुन मी एका बजुला उभा राहिलो आणि सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ अशा बुध्दांना मी प्रव्रज्येसाठी विनंती केली. तेव्हा सर्व जगावर अनुकंपा करणार्या महाकारुणिक भगवान बुध्दांनी "भिक्षु ये" असे मला म्हटले आणि तीच माझी उपसंपदा झाली. त्यानंतर सुनीत ने आपल्या कर्माने अशा प्रकारचे स्थान प्राप्त केले कि , भगवान बुध्द त्याला म्हणाले , "तपश्चर्याब्रह्मचर्य , संयम आणि दमन यांनी युक्त मनुष्यच ब्राह्मण म्हणुन समजल्या जातो. म्हणुन हा (सुनीत) श्रेष्ठ पुरुष होय. "
                                                                                                सुनीतत्थेरगाथा

            सुनीत थेरांचे हे आत्मकथन कदाचीत राधाकृष्णन यांनी वाचलेले नसेल , म्हणुनच त्यांना भगवान बुध्दांनी कोणती मोठी सामाजीक क्रांती केली , हे समजले नसेल. सुनीत जो लोकांचा मैला साफ करायचा , ज्याला खाण्यासाठी अन्न मिळत नव्हते ,अस्पृश्य जमातीत जन्मल्यामुळे हीन प्रकारचे कामच त्याच्या वाट्याला आले होते , त्यामुळे लोक त्याचा तिरस्कार व पावलो पावली अपमान करीत असत. असे असतांना तो भगवान बुध्दांना शरण गेला व संघात प्रव्रज्जीत झाला , तेथे साधना करुन त्याने अशा प्रकारचे स्थान प्राप्त केले की , वैदिक कुळातील उच्चवर्णीय समजला जाणारा ब्राह्मण वर्ग ज्या इंद्राची आणि ब्रह्माची पुजा करीत असे , ते इंद्र आणि ब्रह्मच सुनीतची वंदना करायला आले होते. तर भगवान बुध्दांनी सुनीतला 'ब्राह्मण ' संबोधले , जे पद त्याने आपल्या जन्माने नव्हे तर कर्माने प्राप्त केले होते.

४. पोस्टकर्ता पुढे भगवान बुध्दांना यज्ञांचा पुरस्कर्ता व स्तुतीपाठक असल्याचे सांगतो , त्याच्यानुसार याचे मुख्य कारण म्हणजे अग्नीहोत्र करा , असा तिपिटकात आलेला उल्लेख होय. किंवा भगवान बुध्दांनी कोणत्या प्रकारचा फलदायक होतो हे सुध्दा सांगीतले आहे , म्हणुन बुध्दांनी यज्ञसंस्थेचे कौतुक केले होते असा पोस्टकर्त्याचा समज आहे. पण वास्तवात पोस्टकर्त्याने ती पुस्तकं अर्धीच वाचल्याने त्याला तो विषयच बरोबर समजलेला नाही , कारण त्याने दिलेल्या संदर्भातच त्याच्या प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत .

१. यज्ञापेक्षा सत्पुरुषाला वंदन करणे श्रेष्ठ होय :

Ø हजारो धन खर्च करुन दर महिन्याला एक यज्ञ असे शंभर वर्षांपर्यंत जरी कोणी यज्ञ करील आणि भावितात्मा असलेल्या एकाच पुरुषाची जरी केवळ मुहुर्तभर पुजा करील तर शंभर वर्ष केलेल्या हवनापेक्षा ती पुजाच श्रेष्ठ आहे.
Ø जर कोणी व्यक्ती शंभर वर्षापर्यंत वनामध्ये अग्नीची परिचर्या करेल आणि भावितात्मा असलेल्या एकाच पुरुषाची जरी केवळ मुहुर्तभर पुजा करील तर शंभर वर्ष केलेल्या हवनापेक्षा ती पुजाच श्रेष्ठ आहे.
Ø पुण्याच्या अपेक्षेने या लोकी वर्षभर जे काही हवन केले असेल त्या सर्वांनी ऋजु   चालणाऱ्या सत्पुरुषांच्या वंदनाच्या चौथ्या भागाइतके सुध्दा महत्व नाही. ते वंदनच श्रेष्ठ आहे.
                                                                                      धम्मपद (१०६-१०९)

२. यज्ञातील पशुहिंसेला विरोध :

भगवान बुध्द म्हणतात, "शेळ्या मेंढ्या आणि अनेक गायी ज्या यज्ञात मारल्या जातात असा यज्ञ करायला विद्वान लोक सांगत नाहीत. ज्या यज्ञामध्ये शेळ्या ,मेंढ्या आणि अनेक प्रकारच्या गायी मारल्या जात नाहीमहर्षी आणि विद्वान अशाच प्रकारचा यज्ञ सांगतात. अशा प्रकारचा यज्ञ करणार्यांचे कल्याण होत असतेहा यज्ञ महान आहे."
                                                - संयुक्त निकाय , सगाथ वग्ग , कोशल संयुक्त , अग्नी सुत्त

३. कल्याणकारी यज्ञ कोणता. ,?

भगवान बुध्दांनी आपल्या वरील वाक्यात यज्ञातील पशुहिंसेवर प्रहार केला आहे , पण त्याच बरोबर ज्या यज्ञात पशुहिंसा केली जात नाही , अशा यज्ञाची प्रशंसा केली आहे , त्यामुळे गैरसमज निर्माण होतात.

v बेरोजगारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ :

          यज्ञाच्या बाबतीत भगवान बुध्दांचे काय मत होते हे जाणुन घेण्यासाठी आपण दीघ निकायातील कुटदंत सुत्त वाचा. या सुतामध्ये भगवान बुध्द कुटदंत ब्राह्मणाला यज्ञाचा खरा अर्थ समजावुन सांगण्यासाठी महाविजीत राजाची कथा सांगतात. राजाने आपल्या राज्यातील बेरोजगारी नष्ट करावीतोच खरा यज्ञ आहे.      त्या यज्ञात गाईबकरेमेंढेकोंबड्या व इतर प्रकारचे प्राणी मारण्यात आले नाहीत. युपांकरीता झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञ कार्यासाठी जे दास नौकर होते त्यांना सक्ती करण्यात आली नाही. ज्यांनी जी काही कामे केली ती सर्व कोणत्याही प्रकारच्या दंडाच्या भयाने नाही किंवा रडत केली नाहीत. अशाप्रकारे कोणत्याही जीवाची हत्या न करता यज्ञ संपन्न झाला.
                                                                                      दीघनिकाय , कुटदंत सुत्त

४. अग्नीहोत्रात लाकडे जाळणे म्हणजे यज्ञ नव्हे :

भगवान बुध्द म्हणतात"हे ब्राह्मणा , अग्नीहोत्रात लाकडांना जाळल्याने आपली शुध्दी होईल असे समजु नकोस. अशा वरवरच्या ढोंगांनी शुध्दी प्राप्त करण्याला विद्वान लोक शुध्दी म्हणत नाहीत. हे ब्राह्मणामी लाकडांना जाळणे सोडुन आंतरिक ज्योतीला जाळीत आहे (धर्माचे - सदाचाराचे पालन करीत आहे) ही अग्नीज्योत नेहमीच जळत असते, मी अर्हंत आहे."  अशा आंतरिक यज्ञाबद्दल सांगतांना भगवान पुढे म्हणतात "अभिमान (गर्व) तुझ्यासाठी अन्नक्रोध धुरखोटे बोलणे राख तर हृदय म्हणजे अग्नीहोत्र होय. आपण स्वतःच ज्योत आहोत. "                                          संयुक्त निकाय , ब्राह्मण संयुक्त , सुंदरीक सुत्त...

            अर्थात भगवान बुध्दांनी अग्नीहोत्राचा उल्लेख भौतिक यज्ञासाठी नाही , तर आंतरिक यज्ञाच्या दृष्टीकोनातुन केला आहे. एवढेच नाही तर अशा प्रकारचा यज्ञ संपन्न करण्याचा विधी सुध्दा सांगीतला आहे. यासाठी आपण अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातातील , महायान्न वग्गामध्ये आलेले अग्नी सुत्त वाचावे. त्यात भगवान आंतरिक यज्ञ करतांना सर्वात आधी कामाग्नीद्वेषाग्नी,   मोहाग्नी , या तीन अग्नींचा त्याग करायला सांगतात तर तीन अग्नींचा सत्कार करायला सांगतात , निश्चीतच भगवान बुध्दांच्या नुसार चित्ताच्या शुध्दतेशिवाय मोठा यज्ञ नाही.


५. पोस्टकर्त्याचा असा आक्षेप आहे कि , भगवान बुध्दांनी आपला धर्म म्हणजे ब्राह्मण धर्मच आहे असे तिपिटकात शेकडो वेळा सांगीतले. यासाठी ते भगवान बुध्दांचे ब्राह्मण या शब्दासंबंधीच्या काही गाथा पुरावे म्हणुन दाखवितात.

जसे भगवान बुध्द धम्मपदामध्ये म्हणतात ,

ü ब्राह्मणांवर प्रहार करु नये , ब्राह्मणाने प्रहार करणाणाऱ्या वर कोपु नये. ब्राह्मणावर प्रहार करणाऱ्या चा धिक्कार आहे , पण त्यापेक्षाही अधिक प्रहार करणाऱ्या कोपणाऱ्या  ब्राह्मणाचा धिक्कार आहे.

वरील गाथेने भुरळुन जाऊन जन्माधारीत व्यवस्थेवर श्रध्दा असणारे लोक केवळ एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या विशिष्ट वर्गात जन्म घेतला आहे म्हणुन, स्वतःला ब्राह्मण समजतात. पण भगवानांचे हे वाक्य कोणत्याही जातीधर्म किंवा समाजाशी संबंधीत नाही. या वाक्याचा मुळ अर्थ समजण्यासाठी ,आपल्याला सर्वप्रथम भगवान बुध्दांना अभिप्रेत असलेला "ब्राह्मणह्या शब्दाचा खरा अर्थ समजुन घेता आला पाहिजे. भगवान बुध्दांनी ब्राह्मणावर कोपणाऱ्या  धिक्कार केलेला आहे , पण हा ब्राह्मण म्हणजे नेमका कोण ... ? हे सुध्दा सांगीतले आहे.
भगवान बुध्द म्हणतात ,   

Ø अहमस्मि , भिक्खवे ,ब्राह्मणो , भिक्षुंनो , मी ब्राह्मण आहे.
Ø जे अनासक्त आहेत , सुगत आहेत , बुध्द आहेत ,त्यांना मी ब्राह्मण म्हणतो.
Ø भिक्खुंनो , हा जो राग - क्षय , द्वेष क्षय , मोह क्षय ,आहे हाच ब्राह्मण्याचा खरा अर्थ आहे.
Ø ज्यांनी आपल्या सर्व पापांना नष्ट केले आहे , सर्व प्रकारच्या बंधनांना तोडले आहे , असे बुध्दच या लोकांत ब्राह्मण आहेत.

            आजकाल बरेचशे लोक धम्मपदातील गाथांचा जरासाही अभ्यास न करता , त्यांना नीट न वाचता सुध्दा आपल्याच सोयीचा अर्थ घेऊन भगवान बुध्दांना ब्राह्मणवादी घोषीत करतात , काही मुर्खांनी तर त्यांचा मनुपेक्षाही अधिक मोठा ब्राह्मणवादी म्हणुन सत्कार केलेला आहे. पण मुर्ख मित्रांनो त्या धम्मपदाच्या ब्राह्मण वग्गामध्येच भगवान बुध्द काय म्हणतात ते नीट वाचा :

ü ना जटेने , ना गोत्राने , ना जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यतासदाचार , शुचिता असते , तोच ब्राह्मण.
अर्थात जटांनी , गोत्राने किंवा (वर्णाश्रम धर्माप्रमाणे) ब्राह्मण समजल्या जाणार्या जातीत किंवा वर्णात जन्म घेतल्याने ब्राह्मण होत नाही , तर ज्याच्यात सत्यता ,सदाचार , शुचिता , इत्यादी गुण वसलेले आहेत , मग जरी तो कोणत्याही गोत्राचा असला , जन्माने कोणत्याही जातीत किंवा वर्णात तो जन्मलेला असेनातो ब्राह्मण होय.

ü ब्राह्मण मातेच्या योनीतुन उत्पन्न झालेल्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. - भगवान बुध्द
वर्णाश्रम परंपरा हि जन्माधारीत व्यवस्था आहे ,तिच्यानुसार कोणी विशिष्ट जाती - वर्णात केवळ जन्मला म्हणुन त्याला ब्राह्मण समजले जाते. जी परंपरा आजपर्यंत सुरुच आहे. पण भगवान बुध्द मात्र कर्माला महत्व देतात. त्यांच्या अर्थानुसार कोणी कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे , कोणत्या कुळात ,कोणत्या वंशात जन्म घेतला आहे , हे जास्त महत्त्वाचे नाही. तर त्या व्यक्तीचे आचरण महत्त्वाचे आहे.

ü शिव्या , दंड , बंधन यांना जो चांगुलपणाने सहन करतो , क्षांती हिच त्याची बलवान सेना आहे , त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.
ü ज्याच्या चित्तातुन मोह , द्वेष , मान , अहंकार , मत्सर निखळला आहे , जसे सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी , त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.
ü जो अप्रिय न बोलता , सत्य वचन बोलतो , ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.
            इत्यादी , असे अनेक गुण भगवानांनी सांगीतले आहेतजे ज्या मानवाच्या अंगी असतील , त्यालाच भगवान ब्राह्मण म्हणतात. मग तो कोणत्या जातीचावर्णाचा, वंशाचाप्रदेशाचाइत्यादी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. पण वर्णाश्रम परंपरे प्रमाणे मात्र तो विशिष्ट समुहात, गोत्रातवंशातजन्मला तर त्याला ब्राह्मण समजले जाते. अशांना भगवान बुध्द म्हणतात"हे दुर्बुध्द मानवा..! या जटा कशाला.. ? हे व्यघ्र वस्त्र कशाला..? तु आतुन मळलेला आहेसआणि बाहेरुन गंगास्नान करीत आहेस ... ?" केवळ विशिष्ट जमातीत किंवा मातापित्यांच्या पोटी जन्माला आल्याने स्वतःला ब्राह्मण समजणाऱ्या  दुराचारी माणसाला भगवान हेच म्हणतात कि,  केवळ कोणाच्या पोटी जन्म घेतल्यानेकोणत्या गोत्राने किंवा जटांनी तु ब्राह्मण ठरणार नाहीस.. हे दुर्बुध्द मनुष्या , तुझे चित्त आतुन मळलेले आहे,  आणि तरी तु बाहेरुन गंगास्नान करुन त्या मळाला साफ करण्याचा प्रयत्न करीत आहेस. केवळ असे केल्याने तु ब्राह्मण ठरणार नाहीस...

            वरील संदर्भ काळजीपुर्वक वाचुन पोस्टकर्त्याने किंवा लोकांची दिशाभुल करण्यासाठी अर्धेच देणाऱ्या लोकांनी  अनावधानाने त्यातुन चुकिचा अर्थ काढणाऱ्या लोकांनी  लक्षात घ्यावे किभगवान बुध्दांना "ब्राह्मणहा शब्द विशिष्ट जातीसाठी - वर्णासाठी अभिप्रेत नव्हतातर सदाचारी जीवासाठी होतामग तो कोणत्याही जातीधर्मवर्णाचा का असेना. भगवान त्यालाच ब्राह्मण म्हणतात.

वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असे लक्षात येते कि, भगवान बुद्धांनी जन्माधारित परंपरेने विशिष्ट जातींना मिळणारे सर्व अधिकार नष्ट केले, त्यांना त्यांच्या जातीचा, वंशाचा किंवा कुळाचा अथवा अन्य कसल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. त्यामुळे पोस्टकर्त्याने केलेला हा आरोप सुध्दा निकाली निघतो.

v या सर्वांच्या पुढे जाऊन पोस्टकर्ता असा आरोप करतो कि, बुध्दाचा पंथ जो वैदिकच होता, त्याला त्याच्या अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविले. खरंतर पोस्टकर्त्याच्या ह्या विधानाला कशाचाही जरा सुध्दा आधार नाही. पण स्वतःच्या मनाच्या आनंदासाठी त्याने आपल्याच सोयीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत.भगवान बुद्धांनी कधीही वैदिकांचाच नाही, तर कोणत्याच जीवाचा द्वेष केलेला नाही. किंबहुना द्वेषासारख्या मनाच्या विकारांवर मात करूनच बुद्धत्व प्राप्त करता येते. त्यांनी वैदिकांचा कधीही द्वेष केलेला नाही, याउलट ते सर्व जगाचे कल्याणकर्ते असल्याने, सर्व जगाचे हित जाणणारे असल्याने, त्यांनी वैदिकांना त्यांच्या हिताच्याच गोष्टी सांगितल्या, कोणत्या गोष्टींमुळे त्यांचे हित होणार आहे, आणि कशामुळे त्यांचे अहित. भगवान बुद्धांनी वैदिक धर्मावर त्यांच्यात असलेल्या जुन्या व वाईट चालीरीती त्यांनी टाकून, नव्या व शुध्द परंपरांचा स्वीकार करावा यासाठी टीका केली होती, जेणेकरून त्यांचे कल्याण व्हावे, प्रतिस्पर्धी पंथ म्हणून नाही. कारण बुध्द विशिष्ट पंथ, संप्रदाय, वंश, यांच्या बंधनात अडकलेले नाहीत, तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन कोणत्याही भेदभावा विना सर्व जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे आहेत. वास्तवात त्यांनी भगवान बुद्धांचे आभारच मानायला हवे, ज्यांनी त्यांच्या रानटी धर्माला थोड्याफार प्रमाणात का होईना, मनुष्यत्त्वात आणून दिले, पण स्वतःच द्वेषाने आंधळे झालेल्यांना त्यांची हि महानता दिसणार नाहीत.
                                                                             - पियुष खोब्रागडे

v सदर लेख लेखकाने, अत्यंत अभ्यासपूर्ण व मेहनतीने लिहिला  आहे, कृपया हा लेख अन्य कोणत्याही माध्यमातून शेयर करतांना स्वतःच्या नावावर प्रसिध्द करु नये, सोबत आपल्या Blog चे URL सुध्दा लिहावे., जेणेकरून लोकांना ह्या ब्लॉग बद्दल माहिती होऊन इतर लेखसुद्धा त्यांना वाचायला मिळतील..