काही
दिवसांपासुन फेसबुकवर भगवान बुध्दांच्या बाबतीत
लोकांना भ्रमीत करणारी व समाजामध्ये गैरसमज पसरविणारी एक पोस्ट व्हायरल झालेली
आहे. ज्या पोस्टमध्ये भगवान बुध्द कशाप्रकारे हिंदुत्त्ववादी होते. (वास्तवात
भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाणाच्या सहस्त्र वर्षानंतर सुध्दा "हिंदुत्व" हि संकल्पना तरी अस्तित्त्वात होती का.. ?) ते एक हिंदु
म्हणुनच जगले व हिंदु म्हणुनच निर्वाण पावले. इत्यादी गैरसमज पसरवि जाणाऱ्या
अनेक गोष्टी पोस्टकर्त्याने मुळ अर्थ जाणुन न घेता अर्धवट संदर्भ देऊन सिध्द
करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.
अशा ह्या गैरसमज पसरविणाऱ्या लेखांपासुन लोकांनी सावध रहावे , व सत्य काय आहे याची
शहानिशा करावी.
१. पोस्टकर्त्याचा
प्रथम आक्षेप आहे कि "भगवान
बुध्दांनी आपण नवा धर्म संस्थापित आहोत , असं कुठेही वाटलं नाही. तो हिंदु म्हणुनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिंदु म्हणुनच. त्याने इण्डो - आर्यन
संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली."
ह्या
वाक्याचा संदर्भ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे, ज्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषविले आहे. त्यांनी आपल्याच सोयीच्या बऱ्याच एकांगी
संशोधनात्मक टिप्पण्या
केल्या आहेत. ज्यांचे अनेक विद्वानांनी योग्य संदर्भासहित निराकरण सुध्दा केले
आहे. लेखकाने हा प्रश्न विचारण्याचा मुख्य कारण म्हणजे , त्याला बुध्दांचा धर्म आणि
त्यांना अभिप्रेत असलेला धर्माचा अर्थच समजलेला नाही ,नाहीतर त्याने असा प्रश्नच केला नसता.
भगवान
बुध्दांनी कोणत्याही संप्रदायाची स्थापना केली नाही , कारण त्यांचा
संप्रदाय व्यवस्थेवर विश्वास नव्हता. एखाद्या गट समुहात बंध होऊन राहणे हे त्यांना
मान्य नव्हते , म्हणुनच तर
भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा केवळ मानवांसाठीच नाही तर जगातील सर्व पशु , पक्षी व सर्वच सजीवांसाठी
आहे. भगवान बुध्दांनी धर्माची स्थापना केली नाही तर त्याचे संशोधन केले , त्याला शोधुन काढले जगातील
सर्व जीवांच्या कल्याणासाठी. त्यामुळे आम्ही म्हणतो ,
स्वाखातो भगवता धम्मो ,
संदिट्ठिको , अकालिको ,
एहिपस्सिको , ओपनाय्यिको ,
पच्चतं वेदितब्बो विञ्ञु
हि ति
अर्थात भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा सांदृष्टिक -
ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते , अकालिक -
ज्याला काळाची , प्रदेशाची
मर्यादा नाही , एहिपस्सिको -
जो म्हणतो या आणि पहा ,स्वतः अनुभव
करा , ओपनाय्यिको -
जो पुढे घेऊ जाणारा आहे , पच्च्तं
वेदितब्बो विञ्ञु हि - असा हा धर्म केवळ इकडे ऐकुन तिकडे सांगण्यासाठी नाही ,तर स्वतः आचरणात आणण्यासाठी आहे.
येथे आम्ही भगवान बुध्दांनी स्थापन केलेला धर्म नाही तर
भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म असे संबोधतो , कारण धर्माची
(निसर्ग नियमांची) स्थापना भगवान बुध्दांनी केलेली नाही तर , त्याला जाणुन त्यांचा
उपदेश भगवान बुध्दांनी केला आहे.
- भगवान बुध्द हे हिंदु म्हणुन नाही , तर
एक मानव म्हणुन जन्मले होते. जन्मानंतर ते कोणी हिंदु म्हणुन वगैरे नाही तर
एक बोधीसत्त्व म्हणुन वाढले. बोधीसत्त्व ज्याला कोणत्याही जातीची, वंशाची, प्रदेशाची, संप्रदायाची बंधने बांधुन ठेऊ शकत नाही, तर
सरु जीवांच्या कल्याणासाठी जो कोणत्याही प्रकाराचा त्याग करण्यासाठी तो सदैव
तयार असतो. आणि अनंत लोकांच्या शोकाचे नाशक बनुन परिनिर्वाणास प्राप्त झाले.
भगवान बुध्द नेहमीच उल्लेख करतात , ' भिक्खुंनो ,माझ्या शासनात..... ' यात भगवान बुध्दांच्या शासनाचा अर्थ ज्याला समजला असेल , तो हा प्रश्न का बरं
विचारणार ... ?
सब्ब पापस्स अकरणं ,
कुसलस्स उपसंपदा ,
सचित्त परियोदपणं,
एतं बुध्दानं सासनं
कोणत्याही प्रकारचे पाप न करणे , कुशल कर्मांचे
संपादन करणे, हेच बुध्दांचे
शासन (धर्म) आहे.
२. पोस्टकर्त्याचा
दुसरा आक्षेप आहे आहे कि , बुध्द हा
स्वतःच विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता. तो म्हणतो, "बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत नाहीत" , पण हीन कुळ
म्हणजे नेमके कोणते कुळ , याचा आपण
विचार केला आहे का.. ? बुध्दांना
अभिप्रेत असलेला हीन कुळ हा अर्धी पुस्तके वाचलेल्यांना कसा समजणार ... ?
खुद्दक निकायाच्या सुत्त निपातामध्ये भगवान बुध्दांनी एका
कुत्र्याचे मांस खाणाऱ्या चांडाळपुत्र मातंगाची गोष्ट सांगीतली आहे. (गाथा क्रं. १३७ ते १४२ ) त्या मातंगाला
अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत दुर्लभ असे यश मिळाले. तो श्रेष्ठ होऊन गेला. भगवान
बुध्दांच्या नुसार तुमच्या परंपरे प्रमाणे हीन समजला जाणारा तो मातंग कुमार श्रेष्ठ आहे , तर संपन्न
कुळातील वैदिक ब्राह्मण अनेकदा पापकर्मांचे आचरण करीत असलेले दिसुन येतात त्यांची
येथेच निंदा होऊन दुर्गती होते. (तुमच्या परंपरे प्रमाणे श्रेष्ठ समजल्या जाणार्या
कुळात झालेला) त्यांचा जन्म दुर्गती पासुन किंवा निंदेपासुन त्यांचे रक्षण करण्यास
असमर्थ आहे. (सुत्त निपात -१:७:२५-२६ )
येथे भगवान बुध्दांनी सदाचारी चांडाळपुत्र मातंगाच्या कुळाला श्रेष्ठ कुळ
म्हटले आहे , जेथे वैदिक
परंपरे प्रमाणे त्याला हीन समजले जाते , तर दुराचारी
वैदिक ब्राह्मणांच्या कुळाला हीन कुळ म्हटलेले आहे. अर्थात उच्च किंवा हीन कुळांचे
वर्गीकरण करण्याचे बुध्दांचे माप हे त्यांच्या सदाचार व दुराचार यांवर आधारीत आहे.
याच मापनानुसार बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत नाही अर्थात दुराचार युक्त कुळात
जन्म घेत नाही. पण इतक्या हजारो वर्षांच्या अंतराच्या नंतर सुध्दा जाती व्यवस्थेने
ग्रासलेला मेंदु इतका उदात्त विचार करु शकत नाही. बोधीसत्त्व हीन कुळात जन्म घेत
नाही , पण ते हीन कुळ
तुमच्या अर्थानुसार नव्हे...
२.१. अंबट्ठ सुत्तातुन काही बोध घेण्यापुर्वी तो नीट वाचावा ,व अर्थ न समजल्यास पुन्हा पुन्हा वाचावा. शाक्य कुळ हे
बुध्दांचे कुळ नव्हते , ते सिध्दार्थ
गौतमाचे होते. बुध्दांना कोणत्याही जाती,
पंथ, संप्रदाय, प्रदेश, वंश, राष्ट्रादिंच्या मर्यादा नसतात. अंबट्ठ सुत्तामध्ये अंबट्ठ हा भगवान बुध्दांना नीच , चांडाळ , व ब्रह्म्याच्या पायातुन
उत्पन्न झालेला त्याचा अनैतिक पुत्र आहे असे म्हणत , त्याने शाक्य
कुळावर सुध्दा अनेक आक्षेप घेतले... व त्याचा "कण्हायण" गोत्र
कशाप्रकारे श्रेष्ठ आहे , हे समजावुन
देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान बुध्दांनी त्याच्याच अर्थानुसार त्याला
कण्हायण गोत्राचा इतिहास सांगीतला. भगवान बुध्दांनी असे म्हटले नाही की, "आम्ही शाक्य - क्षत्रीय
वंशाचे शुध्दत्व राखण्यासाठी बहिण - भावांमध्ये लग्न करतो". तर त्याला असे सांगीतले की, "अक्कोसकाचे
वंशज जे पुढे शाक्य म्हणून
ओळखले जाऊ लागले त्यांनी त्यांच्या
वंशाचे शुध्दत्त्व राखण्यासाठी बहिण भावांमध्ये लग्न केले होते". (शाक्य लोक हे वंशाभिमानी होते , यात
दुमत नाही..! याचे तिपिटकातच अनेक संदर्भ सापडतात , पण याचा अर्थ भगवान बुध्द हे वंशाभिमानी
होते , असा
अर्थ कोणी मुर्खच काढु शकतो..) वंशाभिमानाने आंधळा झालेल्या अंबट्ठाला भगवान पुढे म्हणाले
- त्या अक्कोसक राजा आणि कण्ह नावाच्या दासीपासुन एक पुत्र झाला , त्याचे वंशजच आता कण्हायण
म्हणुन ओळखले जातात. असे म्हणत
भगवान बुध्दांनी त्याला जातीवाद , वंशवाद व
गोत्रवाद ,इत्यादींचा
त्याग करण्याचा उपदेश केला.
जातित्थद्धो, धनत्थद्धो,
गोत्तत्थध्दो च यो नरों !
सञंति अतिञ्ञेति
च पराभवो मुखं !!
जी व्यक्ती आपल्या जातीचा , धनसंपत्तीचा , गोत्राचा व्यर्थ अभिमान बाळगते , आणि त्याच अहंकाराने इतरांचा अपमान करते , हेच तिच्या पराभवाचे कारण आहे.
भगवानांना
आपल्या वंशाचा किंवा वर्णाचा अभिमान होता , हा अत्यंच
चुकीचा आणि खोडसाळ आरोप आहे. भगवान बुध्दांना आपल्या वर्णाचा असो वा वंशाचा किंवा
अन्य कशाचाही जरा सुध्दा अभिमान नव्हता. वास्तवात अभिमान , तृष्णा यांच्यासारख्या
अनेक विकारांवर विजय मिळवुनच कोणी बुध्दत्त्वाची प्राप्ती करु शकतो. भगवानांच्या
बाबतीत सांगायचे झाले तर, "ज्याचा अभिमान नष्ट झाला आहे, ज्याच्यात गाठी
नाहीत, ज्याचे
चित्त सर्व प्रकारच्या बंधनातुन मुक्त झाले आहे. तो 'मी म्हणतो' असे
सुध्दा म्हणतो आणि 'मला म्हटले जाते' असे
सुध्दा म्हणतो, परंतु केवळ व्यवहारासाठी तो अशाप्रकारचा
शब्दप्रयोग करीत असतो. तो विद्वान तृष्णेच्या वर निघुन गेलेला आहे, त्याला
कसल्याही प्रकारची बंधने नाही."
सुत्तनिपातातील
सुंदरिक भारद्वाज सुत्तामध्ये, सुंदरीक
भारद्वाज ब्राह्मण भगवानांना म्हणतो, "तु जन्माने कोण आहेस... ?" त्यावर भगवान बुध्द म्हणतात, "मी ब्राह्मण नव्हे किंवा राजपुत्र (क्षत्रिय)
नव्हे , वैश्य नव्हे अथवा अन्य कोणी नव्हे, सामान्य जनांचे गोत्र ऐकुन अंकिचन असा मी इहलोकी
प्रज्ञापुर्वक वागतो. चीवर पांघरुन, मुंडण करुन, शांत चित्त, गृहरहित व मनुष्यांपासुन अलिप्त होऊन मी फिरत असतो. तेव्हा
हे ब्राह्मणा, तुझा हा गोत्रासंबंधीचा प्रश्न अनाठायी आहे."
- खुद्दक निकाय , सुत्तनिपात ४५४-४५६
संयुक्त निकायात सुंदरिक सुत्तामध्ये , एक ब्राह्मण
भगवानांना विचारतो, "आपली जात कोणती..? कारण काही ब्राह्मण सुध्दा मुंडण करीत असतात." यावर भगवान म्हणतात, "जात विचारु नकोस, कर्म विचार. लाकडाने सुध्दा अग्नी उत्पन्न होत असतो. (तुमच्याद्वारे) नीच
समजल्या जाणाऱ्या कुळात जन्मलेले सुध्दा धीर मुनी होत असतात. श्रेष्ठ व लज्जाशील मनुष्य होत
असतात."
- संयुक्त निकाय ७:९:१
v
जाती आणि वर्ण व्यर्थ आहेत , शीलच सर्वश्रेष्ठ आहे. जो शीलांपासुन दुर आहे , त्याच्या बहुश्रुत असण्याला काहीही अर्थ
नाही. अधार्मिक क्षत्रिय असो ,अधार्मिक ब्राह्मण असो , अथवा अधार्मीक वैश्य असो, तो दोन्ही लोकांना सोडुन दुर्गतीला प्राप्त होतो.
- जातक अट्ठकथा, ३६२
वरील उदाहरणे व संदर्भ भगवान बुध्दांचा जाती , गोत्र, वर्ण , वंश , इत्यादींबाबत चा दृष्टीकोन
समजुन घेण्यास पुरेसा आहे. शिवाय भगवान बुध्दांनी कोणती मोठी सामाजिक क्रांती केली , ते सुध्दा ह्या गाथा वाचुन
आपल्याला समजते.
३. पोस्टकर्त्याने पुर्वीच जाणीवपुर्वक भगवान बुध्दांना
वंशाभिमानी ठरविण्याचा केविलवाणा व फसलेला प्रयत्न केला आहे. मी वरील गाथांद्वारे
संदर्भासहित स्पष्ट केले आहे कि, भगवान
बुध्दांना कसल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. त्यामुळे पुढील अनेक आक्षेप निकालात
निघतात. कारण पोस्टकर्त्याने भगवान बुध्द हे वंशाभिमानी होते, इत्यादी सांगत त्यांचे महान ऐतिहासिक कार्य नाकारण्याचा
प्रयत्न केला आहे. जसे तो म्हणतो, "बुध्द
स्वतः वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता
नष्ट करीलच कसा.. ?" अर्थात
पोस्टकर्त्याला, भगवान
बुध्दांनी "अस्पृश्यता
नष्ट केली नाही" असे सिध्द
करता येत नाही , म्हणुनच
त्याने भगवान बुध्दांना वंशश्रेष्ठत्व स्वतःच एक मानणारा असे सांगुन एक प्रश्न
निर्माण केला की, जो बुध्द
वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता
नष्ट करीलच कसा.. ? येथे मी सिध्द
केले आहे की , भगवान बुध्द
वंशश्रेष्ठत्व मानीत नाहीत , तर मग त्यांनी
अस्पृश्यता नष्ट केली , हे पोस्टकर्ता
स्वीकारेल का.. ? सर्वपल्ली
राधाकृष्णन यांचे इंडियन फिलॉसॉफी हे एकांगी लिहिले गेलेले व दुषीत पुर्वग्रहांनी
भरलेले पुस्तक आहे, ज्याची अनेक
विद्वानांनी त्याच काळात चिरफाड केली होती.
बुध्द वंशाभिमानी नाहीत, ना त्यांचा
पंथ वंशाभिमानी आहे. त्यांच्या संघात कोणत्याही, जाती, वर्ण, वंश, गोत्राच्या लोकांना प्रवेश आहे. भगवान ब्राह्मण असो वा
क्षत्रिय कुळात जन्म घेण्याला गुण श्रेष्ठत्वाचे प्रतिक मानीत नाहीत. भगवान
बुध्दांना जन्माधारीत व्यवस्था मान्य नव्हती, तर कर्माधारीत
व्यवस्थेवर त्यांचा अधिक विश्वास होता. सुत्त निपातात भगवानांनी स्पष्टपणे
सांगीतले आहे कि , "जन्माने कोणीच नीच किंवा श्रेष्ठ होत नाही, तर तो
त्याच्या कर्मानेच होतो." बुध्दांनी कोणती फार मोठी सामाजीक क्रांती केली नाही म्हणणाऱ्या लोकांनी एक गोष्ट
लक्षात ठेवावी, "जगाच्या इतिहासामध्ये भगवान बुध्द हेच प्रथम मानव
होते , ज्यांनी जाती आणि वर्णव्यवस्थेला नाकारत मानवाला सामाजिक, राजकीय , मानसिक , इत्यादी गुलामगिरीतुन मुक्त करीत धर्मराज्याची स्थापना केली. मानवा -
मानवांमध्ये भेद निर्माण
करणाऱ्या जन्माधारीत व्यवस्थेला नष्ट करण्याची सुरुवात त्यांनी आपल्या संघापासुनच
केली. भगवान बुध्दांनी सांगीतलेल्या निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर चालण्यासाठी
कोणालाही प्रतिबंध नव्हता , किंवा कोणाची जात पाहुन त्याला संघामध्ये प्रवेश दिला जात नसे. अनेक ब्राह्मण , क्षत्रीय , वैश्य किंवा शुद्रच नाही तर अस्पृश्य जमातीतील लोक सुध्दा संघामध्ये होते , ज्यांनी संघात अग्र स्थान प्राप्त केले होते." जसे,
विनय पिटकाचे संकलन करणारे उपाली हा न्हावी कुळात जन्माला आला होता, सुनीत भंगी जो पुर्वी गटार साफ करण्याचे कार्य करीत असे, सोपाक हा चांडाळ कुळात जन्मलेला होता तर स्वाती कोळी. पण
त्यांनी संघात प्रवेश करुन आपल्या कर्माने जे उच्च स्थान प्राप्त केले होते. तेवढे
उच्च स्थान तर वैदिक ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुध्दा (जन्माधारीत
व्यवस्थेप्रमाणे) कोणी प्राप्त करु शकत नाहीत. हे लोक कोणत्याही कुळातुन आले असले
तरी संघप्रवेशा नंतर त्यांच्यात भेद उरत नसे. भगवान बुध्द म्हणतात, "ज्याप्रमाणे गंगा ,
यमुना ,
अचिरवती ,
शरयु, मही , इत्यादी नद्या समुद्रात मिळाल्यावर त्यांचे पाणी ओळखणे अशक्य आहे, त्या
पाण्याला महासागर असे म्हणतात. त्याचप्रमाणे क्षत्रीय , ब्राह्मण , वैश्य व शुद्र या चारही वर्णातील लोक जेव्हा संघात प्रवेश करतात , तेव्हा ते केवळ "शाक्यपुत्रीय
श्रमण" याप्रमणेच ओळखतात."
संघात
प्रव्रज्जीत झालेला सुनीत म्हणतो , "मी अत्यंत
दरिद्री , जिथे खाण्यास अन्न सुध्दा मिळत नव्हते अशा नीच कुळामध्ये जन्माला आलो होतो, माझे पिता
हीन प्रकारचे काम करीत होते ,
(त्यामुळे मी सुध्दा) कचरा फेकणारा झालो. मनुष्यांनी माझा द्वेष केला, अपमान व
तिरस्कार केला, (असे असतांना देखील) मी मात्र त्यांना नम्रपणे वंदन केले. तेव्हा त्या अर्हंत
सम्यक संबुध्द भगवांना श्रेष्ठ नगरी मगध मध्ये जाताना बघितले, खराटा व
टोपली खाली ठेऊन मी भगवान बुध्दांना वंदन करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो, माझ्यावर
कृपा करुन पुरुषोत्तम तिथेच थांबले. तेव्हा भगवान बुध्दांच्या चरणांना वंदन करुन
मी एका बजुला उभा राहिलो आणि सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ अशा बुध्दांना मी
प्रव्रज्येसाठी विनंती केली. तेव्हा सर्व जगावर अनुकंपा करणार्या महाकारुणिक भगवान
बुध्दांनी "भिक्षु
ये" असे मला म्हटले आणि तीच माझी उपसंपदा झाली. त्यानंतर
सुनीत ने आपल्या कर्माने अशा प्रकारचे स्थान प्राप्त केले कि , भगवान बुध्द त्याला म्हणाले ,
"तपश्चर्या, ब्रह्मचर्य , संयम
आणि दमन यांनी युक्त मनुष्यच ब्राह्मण म्हणुन समजल्या जातो. म्हणुन हा (सुनीत)
श्रेष्ठ पुरुष होय. "
- सुनीतत्थेरगाथा
सुनीत
थेरांचे हे आत्मकथन कदाचीत राधाकृष्णन यांनी वाचलेले नसेल , म्हणुनच त्यांना भगवान
बुध्दांनी कोणती मोठी सामाजीक क्रांती केली , हे समजले
नसेल. सुनीत जो लोकांचा मैला साफ करायचा , ज्याला
खाण्यासाठी अन्न मिळत नव्हते ,अस्पृश्य
जमातीत जन्मल्यामुळे हीन प्रकारचे कामच त्याच्या वाट्याला आले होते , त्यामुळे लोक त्याचा
तिरस्कार व पावलो पावली अपमान करीत असत. असे असतांना तो भगवान बुध्दांना शरण गेला
व संघात प्रव्रज्जीत झाला , तेथे साधना
करुन त्याने अशा प्रकारचे स्थान प्राप्त केले की , वैदिक कुळातील
उच्चवर्णीय समजला जाणारा ब्राह्मण वर्ग ज्या इंद्राची आणि ब्रह्माची पुजा करीत असे , ते इंद्र आणि ब्रह्मच
सुनीतची वंदना करायला आले होते. तर भगवान बुध्दांनी सुनीतला 'ब्राह्मण ' संबोधले , जे पद त्याने आपल्या
जन्माने नव्हे तर कर्माने प्राप्त केले होते.
४.
पोस्टकर्ता पुढे भगवान बुध्दांना यज्ञांचा पुरस्कर्ता व स्तुतीपाठक असल्याचे
सांगतो , त्याच्यानुसार
याचे मुख्य कारण म्हणजे अग्नीहोत्र करा , असा तिपिटकात
आलेला उल्लेख होय. किंवा भगवान बुध्दांनी कोणत्या प्रकारचा फलदायक होतो हे सुध्दा
सांगीतले आहे , म्हणुन
बुध्दांनी यज्ञसंस्थेचे कौतुक केले होते असा पोस्टकर्त्याचा समज आहे. पण वास्तवात
पोस्टकर्त्याने ती पुस्तकं अर्धीच वाचल्याने त्याला तो विषयच बरोबर समजलेला नाही , कारण त्याने दिलेल्या
संदर्भातच त्याच्या प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत .
१. यज्ञापेक्षा सत्पुरुषाला वंदन करणे श्रेष्ठ होय :
Ø हजारो धन खर्च
करुन दर महिन्याला एक यज्ञ असे शंभर वर्षांपर्यंत जरी कोणी यज्ञ करील आणि
भावितात्मा असलेल्या एकाच पुरुषाची जरी केवळ मुहुर्तभर पुजा करील तर शंभर वर्ष केलेल्या
हवनापेक्षा ती पुजाच श्रेष्ठ आहे.
Ø जर कोणी
व्यक्ती शंभर वर्षापर्यंत वनामध्ये अग्नीची परिचर्या करेल आणि भावितात्मा असलेल्या
एकाच पुरुषाची जरी केवळ मुहुर्तभर पुजा करील तर शंभर वर्ष केलेल्या हवनापेक्षा ती
पुजाच श्रेष्ठ आहे.
Ø पुण्याच्या
अपेक्षेने या लोकी वर्षभर जे काही हवन केले असेल
त्या सर्वांनी ऋजु चालणाऱ्या सत्पुरुषांच्या
वंदनाच्या चौथ्या भागाइतके सुध्दा महत्व नाही. ते वंदनच श्रेष्ठ आहे.
- धम्मपद (१०६-१०९)
२. यज्ञातील पशुहिंसेला विरोध :
भगवान बुध्द म्हणतात,
"शेळ्या मेंढ्या आणि अनेक गायी ज्या यज्ञात
मारल्या जातात असा यज्ञ करायला विद्वान लोक सांगत नाहीत. ज्या यज्ञामध्ये शेळ्या ,मेंढ्या आणि
अनेक प्रकारच्या गायी मारल्या जात नाही, महर्षी आणि विद्वान अशाच प्रकारचा यज्ञ सांगतात. अशा
प्रकारचा यज्ञ करणार्यांचे कल्याण होत असते, हा यज्ञ महान आहे."
- संयुक्त
निकाय , सगाथ
वग्ग , कोशल
संयुक्त , अग्नी
सुत्त
३. कल्याणकारी यज्ञ कोणता. ,?
भगवान बुध्दांनी आपल्या वरील वाक्यात यज्ञातील पशुहिंसेवर
प्रहार केला आहे , पण त्याच
बरोबर ज्या यज्ञात पशुहिंसा केली जात नाही , अशा यज्ञाची
प्रशंसा केली आहे , त्यामुळे
गैरसमज निर्माण होतात.
v बेरोजगारी
नष्ट करणे हाच खरा यज्ञ
:
यज्ञाच्या बाबतीत भगवान बुध्दांचे काय मत होते हे जाणुन घेण्यासाठी आपण दीघ
निकायातील कुटदंत सुत्त वाचा.
या सुतामध्ये भगवान बुध्द कुटदंत ब्राह्मणाला यज्ञाचा खरा अर्थ समजावुन
सांगण्यासाठी महाविजीत राजाची कथा सांगतात. राजाने आपल्या राज्यातील बेरोजगारी
नष्ट करावी, तोच खरा यज्ञ
आहे. त्या यज्ञात गाई, बकरे, मेंढे, कोंबड्या व इतर प्रकारचे प्राणी मारण्यात आले नाहीत.
युपांकरीता झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञ कार्यासाठी जे दास नौकर होते त्यांना
सक्ती करण्यात आली नाही. ज्यांनी जी काही कामे केली ती सर्व कोणत्याही प्रकारच्या
दंडाच्या भयाने नाही किंवा रडत केली नाहीत. अशाप्रकारे कोणत्याही जीवाची हत्या न
करता यज्ञ संपन्न झाला.
- दीघनिकाय , कुटदंत सुत्त
४. अग्नीहोत्रात लाकडे जाळणे म्हणजे यज्ञ नव्हे :
भगवान बुध्द म्हणतात, "हे ब्राह्मणा , अग्नीहोत्रात लाकडांना जाळल्याने आपली शुध्दी
होईल असे समजु नकोस. अशा वरवरच्या ढोंगांनी शुध्दी प्राप्त करण्याला विद्वान लोक
शुध्दी म्हणत नाहीत. हे ब्राह्मणा, मी लाकडांना जाळणे सोडुन आंतरिक ज्योतीला जाळीत आहे
(धर्माचे - सदाचाराचे पालन करीत आहे) ही अग्नीज्योत नेहमीच जळत असते, मी अर्हंत
आहे." अशा आंतरिक यज्ञाबद्दल सांगतांना भगवान पुढे
म्हणतात, "अभिमान (गर्व) तुझ्यासाठी अन्न, क्रोध धुर, खोटे बोलणे राख तर हृदय म्हणजे अग्नीहोत्र होय. आपण स्वतःच ज्योत आहोत. " - संयुक्त निकाय , ब्राह्मण संयुक्त , सुंदरीक सुत्त...
अर्थात
भगवान बुध्दांनी अग्नीहोत्राचा उल्लेख भौतिक यज्ञासाठी नाही , तर आंतरिक यज्ञाच्या
दृष्टीकोनातुन केला आहे. एवढेच नाही तर अशा प्रकारचा यज्ञ संपन्न करण्याचा विधी
सुध्दा सांगीतला आहे. यासाठी आपण अंगुत्तर निकायाच्या
सत्तक निपातातील , महायान्न
वग्गामध्ये आलेले अग्नी सुत्त वाचावे. त्यात भगवान आंतरिक यज्ञ करतांना सर्वात आधी
कामाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी , या तीन अग्नींचा त्याग
करायला सांगतात तर तीन अग्नींचा सत्कार करायला सांगतात , निश्चीतच भगवान
बुध्दांच्या नुसार चित्ताच्या शुध्दतेशिवाय मोठा यज्ञ नाही.
५. पोस्टकर्त्याचा असा आक्षेप आहे कि , भगवान बुध्दांनी आपला धर्म
म्हणजे ब्राह्मण धर्मच आहे असे तिपिटकात शेकडो वेळा सांगीतले. यासाठी ते भगवान
बुध्दांचे ब्राह्मण या शब्दासंबंधीच्या काही गाथा पुरावे म्हणुन दाखवितात.
जसे भगवान बुध्द धम्मपदामध्ये म्हणतात ,
ü ब्राह्मणांवर
प्रहार करु नये , ब्राह्मणाने
प्रहार करणाणाऱ्या वर कोपु नये. ब्राह्मणावर प्रहार करणाऱ्या चा धिक्कार आहे , पण त्यापेक्षाही अधिक
प्रहार करणाऱ्या कोपणाऱ्या ब्राह्मणाचा धिक्कार आहे.
वरील गाथेने भुरळुन जाऊन जन्माधारीत व्यवस्थेवर श्रध्दा असणारे लोक केवळ
एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या विशिष्ट
वर्गात जन्म घेतला आहे म्हणुन, स्वतःला
ब्राह्मण समजतात. पण भगवानांचे हे वाक्य कोणत्याही जाती, धर्म किंवा समाजाशी संबंधीत नाही. या वाक्याचा मुळ अर्थ
समजण्यासाठी ,आपल्याला
सर्वप्रथम भगवान बुध्दांना अभिप्रेत असलेला "ब्राह्मण" ह्या शब्दाचा खरा अर्थ
समजुन घेता आला पाहिजे. भगवान बुध्दांनी ब्राह्मणावर कोपणाऱ्या धिक्कार
केलेला आहे , पण हा
ब्राह्मण म्हणजे नेमका कोण ... ? हे सुध्दा
सांगीतले आहे.
भगवान बुध्द म्हणतात ,
Ø
अहमस्मि , भिक्खवे ,ब्राह्मणो , भिक्षुंनो , मी ब्राह्मण आहे.
Ø
जे अनासक्त आहेत , सुगत आहेत , बुध्द आहेत ,त्यांना मी ब्राह्मण म्हणतो.
Ø
भिक्खुंनो , हा जो राग - क्षय , द्वेष क्षय , मोह क्षय ,आहे हाच ब्राह्मण्याचा खरा अर्थ आहे.
Ø
ज्यांनी आपल्या सर्व पापांना नष्ट केले आहे , सर्व प्रकारच्या बंधनांना तोडले आहे , असे बुध्दच या लोकांत ब्राह्मण आहेत.
आजकाल
बरेचशे लोक धम्मपदातील गाथांचा जरासाही अभ्यास न करता , त्यांना नीट न वाचता
सुध्दा आपल्याच सोयीचा अर्थ घेऊन भगवान बुध्दांना ब्राह्मणवादी घोषीत करतात , काही मुर्खांनी तर त्यांचा
मनुपेक्षाही अधिक मोठा ब्राह्मणवादी म्हणुन सत्कार केलेला आहे. पण मुर्ख मित्रांनो
त्या धम्मपदाच्या ब्राह्मण वग्गामध्येच भगवान बुध्द काय म्हणतात ते नीट वाचा :
ü ना
जटेने , ना
गोत्राने , ना
जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यता, सदाचार , शुचिता
असते , तोच
ब्राह्मण.
अर्थात जटांनी , गोत्राने
किंवा (वर्णाश्रम धर्माप्रमाणे) ब्राह्मण समजल्या जाणार्या जातीत किंवा वर्णात
जन्म घेतल्याने ब्राह्मण होत नाही , तर ज्याच्यात
सत्यता ,सदाचार , शुचिता , इत्यादी गुण वसलेले आहेत , मग जरी तो कोणत्याही
गोत्राचा असला , जन्माने
कोणत्याही जातीत किंवा वर्णात तो जन्मलेला असेना, तो ब्राह्मण
होय.
ü ब्राह्मण
मातेच्या योनीतुन उत्पन्न झालेल्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. - भगवान बुध्द
वर्णाश्रम परंपरा हि जन्माधारीत व्यवस्था आहे ,तिच्यानुसार कोणी विशिष्ट जाती - वर्णात केवळ जन्मला म्हणुन
त्याला ब्राह्मण समजले जाते. जी परंपरा आजपर्यंत सुरुच आहे. पण भगवान बुध्द मात्र
कर्माला महत्व देतात.
त्यांच्या अर्थानुसार कोणी कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे , कोणत्या कुळात ,कोणत्या वंशात जन्म घेतला आहे , हे जास्त महत्त्वाचे नाही.
तर त्या व्यक्तीचे आचरण महत्त्वाचे आहे.
ü शिव्या , दंड , बंधन यांना जो
चांगुलपणाने सहन करतो , क्षांती
हिच त्याची बलवान सेना आहे , त्यालाच
मी ब्राह्मण म्हणतो.
ü ज्याच्या
चित्तातुन मोह , द्वेष , मान , अहंकार , मत्सर निखळला
आहे , जसे
सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी , त्यालाच
मी ब्राह्मण म्हणतो.
ü जो
अप्रिय न बोलता , सत्य
वचन बोलतो , ज्याच्या
बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.
इत्यादी , असे अनेक गुण भगवानांनी
सांगीतले आहेत, जे ज्या
मानवाच्या अंगी असतील , त्यालाच भगवान
ब्राह्मण म्हणतात. मग तो कोणत्या जातीचा, वर्णाचा, वंशाचा, प्रदेशाचा, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. पण वर्णाश्रम परंपरे प्रमाणे मात्र तो विशिष्ट समुहात, गोत्रात, वंशात, जन्मला तर त्याला ब्राह्मण समजले जाते. अशांना भगवान बुध्द
म्हणतात, "हे दुर्बुध्द मानवा..! या जटा कशाला.. ? हे व्यघ्र
वस्त्र कशाला..? तु
आतुन मळलेला आहेस, आणि
बाहेरुन गंगास्नान करीत आहेस ... ?" केवळ विशिष्ट
जमातीत किंवा मातापित्यांच्या पोटी जन्माला आल्याने स्वतःला ब्राह्मण समजणाऱ्या दुराचारी माणसाला भगवान हेच म्हणतात कि, केवळ कोणाच्या पोटी जन्म घेतल्याने, कोणत्या गोत्राने किंवा जटांनी तु ब्राह्मण ठरणार नाहीस..
हे दुर्बुध्द मनुष्या , तुझे चित्त
आतुन मळलेले आहे, आणि तरी तु
बाहेरुन गंगास्नान करुन त्या मळाला साफ करण्याचा प्रयत्न करीत आहेस. केवळ असे
केल्याने तु ब्राह्मण ठरणार नाहीस...
वरील
संदर्भ काळजीपुर्वक वाचुन पोस्टकर्त्याने किंवा लोकांची दिशाभुल करण्यासाठी अर्धेच
देणाऱ्या लोकांनी अनावधानाने त्यातुन चुकिचा अर्थ काढणाऱ्या लोकांनी
लक्षात घ्यावे कि, भगवान
बुध्दांना "ब्राह्मण" हा शब्द विशिष्ट जातीसाठी - वर्णासाठी अभिप्रेत
नव्हता, तर
सदाचारी जीवासाठी होता, मग
तो कोणत्याही जाती, धर्म, वर्णाचा का
असेना. भगवान त्यालाच ब्राह्मण म्हणतात.
वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असे लक्षात येते कि, भगवान बुद्धांनी जन्माधारित परंपरेने विशिष्ट जातींना
मिळणारे सर्व अधिकार नष्ट केले, त्यांना
त्यांच्या जातीचा, वंशाचा किंवा
कुळाचा अथवा अन्य कसल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. त्यामुळे
पोस्टकर्त्याने केलेला हा
आरोप सुध्दा निकाली निघतो.
v या सर्वांच्या पुढे जाऊन पोस्टकर्ता असा आरोप करतो कि, बुध्दाचा
पंथ जो वैदिकच होता, त्याला त्याच्या अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविले. खरंतर
पोस्टकर्त्याच्या ह्या विधानाला कशाचाही जरा सुध्दा आधार नाही. पण
स्वतःच्या मनाच्या आनंदासाठी त्याने आपल्याच सोयीच्या गोष्टी लिहिलेल्या
आहेत.भगवान बुद्धांनी कधीही वैदिकांचाच नाही, तर कोणत्याच जीवाचा द्वेष केलेला नाही. किंबहुना
द्वेषासारख्या मनाच्या विकारांवर मात करूनच बुद्धत्व प्राप्त करता येते. त्यांनी
वैदिकांचा कधीही द्वेष केलेला नाही, याउलट ते सर्व जगाचे कल्याणकर्ते असल्याने, सर्व जगाचे
हित जाणणारे असल्याने,
त्यांनी वैदिकांना त्यांच्या हिताच्याच
गोष्टी सांगितल्या, कोणत्या गोष्टींमुळे त्यांचे हित होणार आहे, आणि कशामुळे त्यांचे अहित. भगवान बुद्धांनी वैदिक धर्मावर त्यांच्यात असलेल्या जुन्या व वाईट चालीरीती
त्यांनी टाकून, नव्या व शुध्द परंपरांचा स्वीकार करावा यासाठी टीका केली होती, जेणेकरून
त्यांचे कल्याण व्हावे,
प्रतिस्पर्धी पंथ म्हणून नाही. कारण बुध्द विशिष्ट पंथ, संप्रदाय, वंश, यांच्या
बंधनात अडकलेले नाहीत,
तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन कोणत्याही भेदभावा विना सर्व
जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे आहेत. वास्तवात त्यांनी भगवान बुद्धांचे आभारच मानायला हवे, ज्यांनी
त्यांच्या रानटी धर्माला थोड्याफार प्रमाणात का होईना, मनुष्यत्त्वात
आणून दिले, पण स्वतःच द्वेषाने आंधळे झालेल्यांना त्यांची हि महानता दिसणार नाहीत.
- पियुष खोब्रागडे
v सदर
लेख लेखकाने, अत्यंत
अभ्यासपूर्ण व मेहनतीने लिहिला आहे, कृपया हा लेख अन्य कोणत्याही माध्यमातून शेयर करतांना
स्वतःच्या नावावर प्रसिध्द करु नये, सोबत आपल्या Blog चे URL सुध्दा
लिहावे., जेणेकरून लोकांना ह्या ब्लॉग बद्दल माहिती होऊन इतर लेखसुद्धा त्यांना
वाचायला मिळतील..
Well done piyush!
उत्तर द्याहटवाWell done piyush!
उत्तर द्याहटवाजिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा।
उत्तर द्याहटवाएव ञत्वा यथाभूतं निब्बानं परम सुखं॥
बुद्ध म्हणतात, की सर्व रोगांचे मूळ शेवटी जिघृक्षा आहे.
ग्रहण करण्याची इच्छा, तृष्णा. सर्व दुःखाचे मूळ आहे संस्कार. हेच जाणून घेत....__
https://bhimrath.blogspot.com/2018/08/blog-post_14.html?m=1
या पोस्ट मुळे हेच सिद्ध झालं की गौतम बुद्ध हे आर्य व हिंदुच होते 😂😂😂
उत्तर द्याहटवामहान लोक विचारांवर चर्चा करतात,दुसऱ्या दर्जाचे लोक घटनांवर तर तिसऱ्या व सर्वात निकृष्ट दर्जाचे लोक व्यक्तींवर. एकंदरीत तुमच्या प्रतिक्रियेवरुन आपण कोणत्या दर्जाचे आहात ते समजते. तसेच संपूर्ण लेख वाचून ते तुमच्या बुध्दीत शिरले नाही हे सुध्दा यावरून सिध्द होते. तसेच आर्य आणि हिंदू यांच्यातील फरक सुध्दा तुम्हाला माहीत नाही हे सुध्दा यावरून अधोरेखित होते. तुम्ही आर्य समाजाच्या लोकांना विचारा कि ते स्वतः हिंदू आहेत किंवा नाहि आणि त्यानंतरच येथे प्रतिक्रिया द्यायला या..
हटवातथागत भगवान बुद्धांचे उपदेश आणि त्याचे महत्व सत्य काय आहे याची शहानिशा न करता समाजामध्ये गैरसमज पसरणारे लेख आणि जाणून बुजून अर्धवट माहितीच्या किंवा अपुऱ्या ज्ञानाच्या लेखांपासुनआधारे लोकांना भ्रमित ठेवणारी,असत्य विधाने वापरून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांना
उत्तर द्याहटवातसेच गोत्र कशाप्रकारे श्रेष्ठ आहे , कुळात कशाप्रकारे श्रेष्ठ आहे , यज्ञ कशाप्रकारे श्रेष्ठ आहे ,लोक धम्मपदातील गाथांचा जरासाही अभ्यास न करता , त्यांना नीट न वाचता आपल्याच सोयीचा अर्थ घेऊन भगवान बुध्दांना ब्राह्मणवादी घोषीत करतात , काही मुर्खांनी तर त्यांचा मनुपेक्षाही अधिक मोठा ब्राह्मणवादी म्हणुन सत्कार करता.विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी लोकांना जाती व्यवस्थेने ग्रासलेला मेंदु इतका उदात्त विचार करु शकत नाहीत त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवतात .
लोकांनी सावध रहावे , व सत्य काय आहे याची शहानिशा न करता गैरसमज पसरणारे लेख योग्य आणि अयोग्य यामधील फरक यांचा अभ्यास करून बौद्ध धर्माच्या बाबतीत पसरवण्यात येणारे गैरसमज व त्यांचे निराकरणचा प्रयत्न करा....
भगवान बुध्द काय म्हणतात ते नीट वाचा,आपण बौद्ध धर्माचे उपासक आहोत. प्रत्येक उपासकाने तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार ,उपदेश धम्मपदातील गाथा यांचा अभ्यास करून लोकांनी सत्य गोष्टींचे ज्ञान (बुद्ध धम्माची पुस्तके) लोकांपर्यंत आपापल्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न करा....
पियुष खोब्रागडे यांनी बौद्ध धर्माच्या बाबतीत पसरवण्यात येणारे गैरसमज व त्यांचे निराकरण हे त्यांच्या कार्यास माझा प्रणाम करतो...