जयमंगल अष्टगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जयमंगल अष्टगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ८ : बक ब्रह्माचे गर्वहरण)


बक ब्रह्माची कथा हि जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा या लेखमालिकेतील शेवटची कथा आहे..


एकदा भगवान बुद्ध उकट्ठ मधील सुभगवनामध्ये विहार करीत असताना बक नावाच्या ब्रह्माला दुष्ट दृष्टी उत्पन्न झाली, तो समजु लागला कि मी ज्या लोकात (ब्रह्मलोकात) राहतो आहे तो नित्य, ध्रुव आणि शाश्वत आहे, मी अमर आहे असे तो स्वतःला समजु लागला होता. तेव्हा भगवान बुद्धांनी बक ब्रह्माचे मन ओळखुन ते ब्रह्मलोकात गेले आणि बक ब्रह्माला म्हणाले,


हे ब्रह्मा, तु अज्ञानाच्या घोर अरण्यामध्ये विहार करतो आहेस. जेव्हा अनित्याला नित्य म्हणतोस, अध्रुवला ध्रुव, अशाश्वताला शाश्वत ; ब्रह्मलोकापासुन श्रेष्ठ शांती (निर्वाण) असुन सुद्धा तु म्हणतो आहेस कि यापेक्षा श्रेष्ठ शांती नाही.



बकब्रह्मा म्हणाला :
हे श्रमण गौतमा, आम्ही (ब्रह्मा) आपल्या पुण्यकर्माने जगावर राज्य करत आहोत. ब्रह्मलोकात उत्पन्न होणे हीच दुःखापासुन मुक्ती आहे.


भगवान म्हणाला :
हे ब्रह्मा तु ज्या आयुष्याला मोठे समजत आहेस ते आयुष्य सुद्धा थोडेच आहे, शेकडो, हजारो वर्षांच्या तुझ्या आयुष्याला मी जाणतो. मी अनंतदर्शी भगवान आहे. वेदनेच्या पलीकडे गेलो आहे.

हे ब्रह्मा.. मी तुझ्या गतीच्या प्रभावाला जाणतो, महान ऋद्धीबल असलेला तु महाशक्तीशाली आहेस... परंतु दुसऱ्या लोकसमुहातील असे लोक आहेत ज्यांना तु जाणत नाहीस, त्यांना तु पाहु शकत नाहीस, परंतु मी त्यांना पाहतो, मी त्यांना जाणतो.


तु आभस्सर नावाच्या लोकातुन येथे उत्पन्न झाला आहेस, तो खुप लांब प्रवास असल्याने तुला त्याची स्मृती नाही., परंतु मी त्याला जाणतो, मी त्याला पाहतो. यापुर्वीही तु सुभकिण्ह, वेहप्पाल, अभिभु नावाच्या लोकांमधुन प्रवास केला आहेस. परंतु तु त्याला जाणत नाहीस. परंतु मी जाणतो.

ब्रह्मा! पृथ्वी, जल, वायू, अग्नी आदींना त्यांच्या योग्य स्वरुपात जाणले, मी जगाच्या परम सत्याला, निर्वाणाला जाणले, याद्वारे ज्ञानामध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व ऐकुन बक ब्रह्मा भगवान बुद्धांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही.



बकब्रह्मा म्हणाला : माझे पहिले शील आणि व्रत काय होते..?


भगवान म्हणाले,


• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु पुष्कळ तहानलेल्यांची तहान भागवली आहेस.
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहातुन वाहत जाणार्या माणसाला तु वाचविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहात नावेला पकडलेल्या मोठ्या सर्पापासुन तु सोडविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु मी तुझा कप्प नावाचा शिष्य होतो, ज्याला तु बुद्धीमान समजलेस.



हे सर्व ऐकुन अचंबीत झालेला बकब्रह्मा म्हणाला,, खरोखरच भगवान आपण माझ्या आयुष्याला जाणता, त्याचप्रमाणे इतर गोष्टींना सुद्धा जाणता. आपल्या दैदिप्यमान तेजाने संपुर्ण ब्रह्मलोक प्रकाशमान झाले आहे.




दुग्गाहदिठ्टिभुजगेन सुदठ्टहत्थं, ब्रम्ह विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं । ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्ति संपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...




एतापि बुद्ध जयमंगल अठ्ट गाथा, यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वान नेका विविधानि चुपद्दवानि, मोक्खं सुंखं अधिगमेय्य नरो सपञ्ञो



जो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना....



सब्बे सत्ता सुखी होंन्तु , सब्बे होंन्तु च खेमिनो । सब्बे भद्रानिपस्स न्तु , माकत्र्चि दुक्खमागमा

सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




आमच्या ब्लॉगचे सदस्य व्हा.

आम्हाला फेसबुकवर Follow करा

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ नाथपुत्रावर विजय)

सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थाविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले. सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा....



तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा 


मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही..



एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने स्थाविर अश्वजीत यांना बघितले. ते भिक्षाटन करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली.


भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि,, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले.


त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थाविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)


सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?


त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत.


यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात.


ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे.


तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?


यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे..


यानंतर त्यान विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.


वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता.


• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे.

• रुप अनित्य आहे.

• जो अनित्य आहे, तो दुःख आहे.

• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही.

• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे.



त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक काशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?

भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, नाही हा माझा आत्मा आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात.


यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंतत्व प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत जेवणाला आमंत्रीत केले...




सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं, वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं । पञ्ञा पदीपजलितो जितवा मुनिंदो, तं तेजसा भवतु ते जयमंगलाननि



ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

जयमंगल अष्टगाथा मधील पाचवी गाथा आपल्याला चिंचा नावाच्या स्त्री बद्दल माहीती सांगते,, या कथेत चिंचा नावाची स्त्री जैन तीर्थकांच्या सांगण्यावरुन भगवान बुद्धांवर अनैतिकतेचा आरोप करत असते.....




सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या.



लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चरित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला. 


त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे. तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके.


जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.


एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....

स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!

जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.


नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.


चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले.


त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले.


अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,




कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे । सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।


ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)



४. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)



सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)



जयमंगल अष्टगाथामधील चौथी गाथा अंगुलीमालाच्या जीवनावर प्रकाश टाकते.... अंगुलीमाल नावाचा डाकु भगवान बुद्धाच्या प्रभावाने संघात सामील होतो... आणि अरहंत पदापर्यंत पोहोचतो...




उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावं तियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलान 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.




अंगुलीमालावर विजय





सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना,, एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. 



एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न केला, कि आपण या वाटेने जाऊ नका पुढे अत्यंत क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमाल नावाचा हिंसाचारी दरोडेखोर रहातो. त्यामुळे त्या जंगलाजवळच्या गावातील लोकांनी आपल्या गावाचा त्याग करुन ते आता श्रावस्ती, साकेत आदी शहरात रहायला आले. तो त्याच्या दृष्टीस पडलेल्या कोणत्याही माणसाला जीवंतपणे जाऊ देत नाही. 



त्यावर भगवान बुद्ध म्हणत, अरे, पण तो सुद्धा माणुसच आहे ना? तो सध्या हिंसाचारी डाकु असला तरी भविष्यात एक चांगला पुरुष होणार नाही , असे कसे म्हणता येईल? असे बोलुन तथागत पुढे निघुन जात. तो एक राजमार्ग होता पुर्वी या मार्गाने अनेक लोक प्रवास करीत असत, परंतु अंगुलीमालामुळे त्या रस्त्याने कोणीच प्रवास करीत नव्हते. परंतु त्याच राजमार्गावर एक दृढ निश्चयी, मुखावर निर्भयता व अंतकरणातील करुणा मुखावरच दिसणारा तेजस्वी महमानव क्रुर व निष्ठुर ह्रदयी अंगुलीमालाच्या निवासस्थानाजवळ आला. तोच त्या महाकारुणीकाच्या पायाच्या आवाज त्याच्या कानी पडला. त्याने तिकडे बघितल्यावर त्याची दृष्टी भगवंतांवर पडली, विश्वातील सर्वश्रेष्ठ मानव रस्त्याने चालला होता. त्यांच्याकडे पाहुन अंगुलीमाल आश्चर्यचकीत झाला. त्याने असा दिव्य पुरुष कधीच बघितला नव्हता. त्याच्यावरुन नजर न हटावी, त्याच्याकडे पहातच रहावे असे अंगुलीमालाला वाटत होते. त्या महामानवाला पकडण्यासाठी अंगुलीमाल धावु लागला परंतु तो त्यांना पकडु शकत नव्हता.




तेव्हा तो बुद्धास म्हणाला, थांब श्रमणा थांब, त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, अंगुलीमाला मी तर केव्हाचाच स्थीर होऊन थांबलो आहे, तुच पळतो आहेस...


तेव्हा अंगुलीमाल स्वतःशीच म्हणाला हा श्रमण खोटे का बोलत आहे? मला कोणाची भिती आहे तर मी पळणार,, ज्याचे साधे नाव जरी ओठावर आले तरी सर्वांना थरकाप सुटतो, तो अंगुलीमाल पळत सुटणार असे तुला कसे वाटले? श्रमणा, आता मात्र तु खोटे बोलत आहेस, तु इतक्या जलद गतीने पळत आहेस मी घोड्याच्या गतीने तुझा पाठलाग करतो आहे तरी तु मला अजुनपर्यंत सापडला नाहीस..


श्रमण चालत असुन म्हणता मी थांबलो आहे, आणि मलाच थांबलेलो असता थांब म्हणता, श्रमण तुला ह्याचा अर्थ विचारतो, तु कसा थांबला आहेस आणि मी कसा थांबलो नाही.


भगवान म्हणाले,, मी सर्व प्राण्यांबद्दल हिंसा दंड भावना सोडुन दिल्यामुळे नेहमी करीता थांबलो आहे. तु मात्र प्राण्यांबद्दल असंयमी आहेस, म्हणुन मी थांबलेलो आहे, आणि तु थांबलेला नाहीस. तुझ्यातील साधुत्व अजुन मेलेले नाही, जर त्याला तु संधी देशील तर तुझ्यात बदल घडुन येतील.


भगवंतांच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावुन गेला होता.

अंगुलीमाल म्हणाला मी महर्षीची वंदना केली. चिरकाळानंतर श्रमणाचे महावनात आगमन झाले. आपण उपदेशिलेल्या धम्माचे श्रवण करुन त्या हजार पापाचा त्याग करुन मी त्याग करीन. असे म्हणत त्याने आपल्या गळ्यातील माळ व तलवार व धनुष्यबाण वगैरे फेकुन दिले आणि सुगताच्या पायाची वंदना केली. आणि प्रव्रज्जेची याचना केली.


देव व मनुष्यांचे शास्ता अशा महाकारुणीक भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला 'भिक्षु ये' असे म्हटले तेथेच त्याची उपसंपदा झाली. अशा प्रकारे महाहिंसक, महाक्रोधी अंगुलीमालास आपल्या अलौकीक ॠद्धीने जिंकले,.......




उक्खित्त खग्ग-मतिहत्थ सुदारूणन्त, धावंतियोजनपथंगुलिमालवन्तं । इधंदीभिसंखत मनो जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि 


ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)



शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)

जयमंगल अष्टगाथांमधील तिसरी गाथा आपल्याला भगवान बुद्धांनी नालागीरी हत्तीवर कशाप्रकारे विजय मिळविला याची कथा सांगीतली आहे....





नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...




देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ त्याच्यावर नेहमी जळत असे,,


एकदा जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तु मध्ये आले आणि शाक्यांना धम्मदेशना करु लागले, त्या देशनेने प्रभावित होऊन अनेक शाक्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश केला. त्यावेळेस देवदत्त ने सुद्धा भगवान बुद्धाच्या संघात प्रवेश केला. आणि फार थोड्या कालावधीतच त्याने असीम नैसर्गीक शक्ती मिळविल्या. तो आता ध्यान साधनेचा सराव करु लागला होता. पण तरी सुद्धा त्याच्या मनात बुद्धाच्या प्रती असलेला द्वेष कमी होत नव्हता.


एकदा तो राजा अजातशत्रुच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या शक्तीने राजाला प्रभावित केले. त्यामुळे अजातशत्रु देवदत्ताचा शिष्य बनला होता.


इकडे संघात,, आपण संघनायक बनलो पाहिजे यासाठी देवदत्त बुद्धासमोर नेहमीच बढाया मारायचा.


एकदा त्याने संघात मला मानाचे स्थान नाही असा बुद्धावर आणि संघावर आरोप केला. त्यानंतर तो मगध राष्ट्रांत आपला मित्र अजातशत्रुकडे मदतीसाठी गेला. (अजातशत्रु हा बिंबीसाराचा मुलगा होता,, आणि बिंबीसार हा बुद्धाच्या प्रमुख अनुयायांपैकी एक. अजातशत्रुने बिंबीसाराची हत्या केली होती. ) त्यामुळे अजातशत्रुने देवदत्ताला बुद्धाच्या विरोधात मदत करण्याची हमी दिली.


सर्वप्रथम अजातशत्रुने धनुर्विद्येत अतिशय पारंगत अशा सोळा धनुर्धरांची नियुक्ती बुद्धाची हत्या करण्यासाठी केली होती. परंतु भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्या धनुर्धरांचे ह्रदय परिवर्तन झाले.


या अपयशाने यापुढे देवदत्त स्वतः बुद्धाची हत्या करण्याचा प्रयत्न करु लागला. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या संघासोबत एका पर्वतशिखरा खालुन जात असताना. त्या पर्वतशिखराहुन एक मोठा दगड भगवान बुद्धांच्या दिशेने फेकला. परंतु तो दगड भगवान बुद्धांच्या समोर पडला आणि त्या दगडाचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायाला जखम झाली. देवदत्ताचा हा प्रयत्न फसला परंतु तरीही त्याने पराभव स्वीकारला नव्हता.


त्यानंतर तो एका नालागीरी नावाच्या हत्तीजवळ गेला, त्याने त्या हत्तीला दारु, आणि अन्य नशा येणारे पदार्थ खायला दिले, त्यामुळे तो हत्ती आपली शुद्ध हरवुन बसला होता. नशेच्या प्रभावामुळे नालागीरी आता अत्यंत क्रुर व भयानक बनला होता. वाटेत भेटेल त्याला पायाने चिरडत समोर तो चालला होता, लोक त्याच्या भितीमुळे सैरावैरा पळु लागले होते, संपुर्ण नगरीत त्याची दहशत माजली होती तरीसुद्धा अशा भयानक परिस्थीत भगवान बुद्ध आपल्या संघासोबत त्याच दिशेने चालले होते. तेव्हा एका स्त्रीने आपल्या बाळाला भगवान बुद्धांच्या पायाखाली आणुन ठेवले, तो नालागीरी हत्ती त्या बाळाला लाथ मारणार एवढ्यातच भगवान बुद्धांनी त्या हत्तीला स्पर्श केला आणि काय तो हत्ती शांत झाला आणि गुडघ्यावर बसला. तो आता भगवान बुद्धांचा मित्र बनला होता, सर्व नगरवासी भगवान बुद्धांचा हा पराक्रम बघत होते. भगवान बुद्धांनी त्या हत्तीला काही कोणत्या जादुई शक्तीने प्रभावित केले नव्हते तर भगवान बुद्धांकडे एक अलौकिक शक्ती होती त्यांच्या चेहऱ्यावार एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते, ज्याला बघुनच लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे....





नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)

मागील भागात आपण माराची कथा बघितली,, जर तुमच्यापैकी कोणी वाचली नसेल तर इथे क्लिक करा.....


या भागात आपण बुद्ध भगवंतांनी आलवक नावाच्या निष्ठुर ह्रदयी यक्षावर कशाप्रकारे विजय मिळविला ते पाहणार आहोत, तरी त्यातुन आपण योग्य तो बोध घ्यावा....




मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनाल वक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



एकदा भगवान बुद्ध आळवी मध्ये आरामांत थांबले होते. तेव्हा आलवक नावाचा निष्ठुर यक्ष त्यांच्या जवळ येऊन म्हणाला,

इथुन चालता हो,,

त्यावर तथागत उत्तरले, मित्रा, मी इथुन जाणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर.

मी तुला प्रश्न विचारतो, जर तु त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझे पाय पकडुन गंगेच्या पलीकडे फेकीन.


भगवान म्हणाले, माझ्या मित्रा सर्व देवांगणांत, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये नाही श्रमण आणि ब्राह्मणांमध्ये असा कोणी जो माझ्या मनापर्यंत पोहोचु शकेल. आणि माझे पाय धरुन मला गंगेच्या पलीकडे फेकु शकेल. पण जाऊदे,, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार.

आलवक म्हणाला,

•मनुष्याचे श्रेष्ठ धन कोणते?

•कोणते सत्कृत्य त्याच्यासाठी सुखकारक आहे?

•कोणत्या प्रकारच्या आचरणाने त्याचे जीवन श्रेष्ठ होते?



भगवान म्हणाले -

••► श्रद्धा हे मनुष्याचे श्रेष्ठ धन होय.

••►सद्धम्माचे संपादन केल्यास जीवन सुखकारक होते. सत्य हा सर्वोच्च उद्धारक आहे.

••►सन्मार्गाने प्रज्ञापुर्वक वागणाऱ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे.



आलवक म्हणाला,

• मनुष्य पुरातुन बाहेर कसा निघतो?

• तो अर्णव (समुद्र) कसा पार करतो?

•मनुष्य दुःखाच्या पार कसा जातो?
तो परिशुद्ध कसा होतो.?



भगवान म्हणाले,

••► मनुष्य श्रद्धेने पुरातुन पोहुन बाहेर येतो.

••► सावधानपणाने अर्णव तरतो.

••► उत्साहाने दुःखाच्या पार जातो.

••► प्रज्ञेने परिशुद्ध होतो.



आलवक म्हणाला,

• मनुष्य कशाने प्रज्ञा मिळवतो?

• धन कसे मिळवतो?

• किर्ती कशी प्राप्त करतो?

• मित्र कसे मिळवितो?

• कोणता मनुष्य परलोकात गेल्यावर शोक करत नाही?




भगवान म्हणाले,

••►अरहंताच्या निर्वाणप्राप्तीच्या धम्मावर श्रद्धा ठेवुन श्रद्धावान व प्रज्ञावंत मनुष्य शुश्रुषेने प्रज्ञा मिळवितो.

••► योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा, सत्याने किर्ती प्राप्त करणारा, दानाने मित्र जोडतो.

••► ज्या गृहस्थाकडे सत्य, संयम, अहिंसा व दमन हे गुण आहेत. तो परलोकात गेल्यावर शोक करत नाही. हवे असल्यास निरनिराळ्या श्रमण ब्राह्मणांकडे जाऊन विचार श्रेष्ठ, दम, त्याग आणि क्षांति यांच्यापेक्षा श्रेष्ठ या लोकात काय आहे?


यावर आलवक नामक यक्ष म्हणाला, मी निरनिराळ्या श्रमण आणि ब्राह्मणांना कशाला विचारु? जेव्हा तथागतांनी येथेच मला सत्याचे दर्शन घडवुन दिले. मला माझ्या जीवनाचा लाभ समजला आहे.


खरोखरच माझ्या लाभासाठी तथागत आळवीला रहावयास आले, त्यामुळे कोणाला दान दिले असता ते लाभदायक होते हे मला समजले. मी सम्यक संबुद्धाला आणि त्याच्या धम्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत गावो गावी आणि शहरो शहरी फिरत राहीन.


धन्य धन्य गौतमा,, आजपासुन मी तुला शरण जातो.
असे म्हणत आलवक भगवान बुद्धांना शरण गेला तेथेच त्याची उपसंपदा झाली.




मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनालवक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवतु ते जयमंगलानि



ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)




जयमंगल अष्टगाथा अर्थात भगवान बुद्धांचे आठ मोठे विजय ज्यांना Stanzas of Victory असेही म्हणतात. या जयमंगल अष्टगाथांचे बौद्ध तत्वज्ञानात खुप महत्व आहे. जयमंगल अष्टगाथा व त्यांच्या कथा या लेखमालिकेत आपण त्या आठ विजयांबद्दल सविस्तर माहीती, त्यांच्या गाथांमागे असलेल्या कथा काय आहेत ते पाहुया... त्या कथांमधुन तुम्ही योग्य तो बोध घ्यावा..... 


जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे,,,





बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधंतं
गिरिमेखलं उदित-घोर-सरेन मारं
दानादि धम्म विदिना, जितवा मुनिंदो,
तं ते जसा भवतु ते जयमङ्गलानि



ज्या मुनींद्राने अत्यंत तीक्ष्ण हत्यार घेऊन सहस्रबाहु, गिरिमेखलं नावाच्या हत्तीवर आरुढ झालेल्या व अत्यंत भयानक व अफाट सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदि धर्मबळाने जिंकले,, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...



मारावर विजय



परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली.


अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही.


तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही.


त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला.


आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा.


श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्य मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन.

तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.


हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.


तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वाने पुढील गाथा म्हटली,,



अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं
विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।




धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,,


यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने। एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥

जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.


खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले...



बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,
गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार
दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो
तं ते जसा भवतु ते जयमङलानि




ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या मस्त हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.


सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे.. (धम्मगुण - नक्की वाचा)


३. मराठी धम्मपद


४. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

५. बुद्ध वंदना : मराठी