सदर लेख आमचे मार्गदर्शक मित्र, विशालवज्र यांनी लिहिलेला आहे. ह्या धर्मामृताचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा...
भगवान बुद्ध ज्यावेळी आपला उपदेश देतात त्यावेळी तो उपदेश ते त्या जीवसत्वाच्या क्षमतेनुसार देतात. कुणीही ज्यावेळी बुद्धांकडे जातो त्यावेळी बुद्ध त्यांच्या दृष्टीने त्या जीवसत्वाचे अवलोकन करतात, त्याचे कर्म व पुण्य तपासतात व त्यानुसारच त्याला योग्य, समजण्याजोगी, तो त्या शिकवणीचा अभ्यास करून त्याचे फळ प्राप्त करू शकेल अशी शिकवण देतात.
म्हणूनच बुद्धांच्या शिकवणीत आपल्याला अर्हतांसाठी, प्रत्येकबुद्ध व बोधिसत्वांसाठी अश्या सगळ्यांसाठी दिलेली शिकवण आढळते. आणि याच शिकवणींचे पालन करून त्याचे शिष्य काही अर्हत बनून जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन स्वतः साठी निर्वाण साधतात, तर काही येणाऱ्या जन्मांमध्ये प्रत्येकबुद्ध बनण्याचे पुण्य अर्जित करतात. आणि काही या दोघांपेक्षा वेगळे असे सर्वोच्च ध्येय केवळ स्वतः साठी नाही तर या विश्वातील प्रत्येक जीवसत्वासाठी तुमच्या आमच्यासाठी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी झटत असतात, त्याच जीवांना बोधिसत्व महासत्व असे संबोधले जाते, ते केवळ बुद्धांचे शिष्य नसून त्याचे पुत्र व पुत्री म्हणून संबोधले जातात.
करुणा हा बोधिसत्वांचा सर्वोच्च गुण आहे, त्या करुणेमुळेच ते सर्व सत्वांच्या हितासाठी बुद्ध बनण्याचा संकल्प करू शकतात. त्या करुणेमुळेच ते कल्प कल्पांचा हा बुद्ध बनण्याचा हा कठीण प्रवास करतात.

