प्रत्येक धर्माला त्याच्या शिकवणी नुसार एक पवित्र समजले जाणारे पुस्तक असते. ख्रिश्चनांचे बायबल, मुस्लीमांचे कुराण, त्याचप्रमाणे बौद्धांचे त्रिपिटक..! परंतु त्रिपिटक म्हणजे कुराण - बायबल सारखे एखाद्या ग्रंथाचे नाव नसुन ग्रंथालयाचे नाव आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण बौद्धांच्या धर्मग्रंथाबद्दल नव्हे तर बौद्धांच्या धर्मग्रंथालया बद्दल माहिती घेऊया...
भाषेचे पावित्र्य नाही..!
प्रामुख्याने बौद्ध साहित्य आपल्याला पाली आणि बौद्ध मिश्र संस्कृत या भाषेमध्ये सापडते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि धम्माची स्वतःची अशी एक कोणतीही पवित्र समजली जाणारी भाषा नाही. भगवान बुद्धांचा धर्म प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकण्याची परवानगी स्वतः भगवान गौतम बुद्धांनी दिली आहे, बौद्ध विश्वात हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.
एकदा (उपसंपदेपुर्वी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले) दोन तरुण भिक्खु एकदा भगवानांजवळ आले, आणि त्यांना म्हणाले, कि आम्हाला भगवानांची शिकवण संस्कृतमध्ये भाषांतर करण्याची परवानगी द्यावी. परंतु भगवान गौतम बुद्धांनी याला सरळ नकार दिला. याच्यामागचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत हि जनभाषा नव्हती तर देवांची भाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेला समजण्याचा आणि शिकण्याचा अधिकार तेवढा तो एखाद्या विशिष्ट वर्गालाच होता. भगवान म्हणाले माझ्या शिकवणीचे संस्कृत मध्ये भाषांतर झाले तर ती केवळ एखाद्या विशिष्ट वर्गा पुरताच मर्यादीत होईल. माझी शिकवण प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेत शिकवण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुम्हाला संस्कृत येते तेव्हा तुम्ही संस्कृत मध्ये शिका. हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.
आमच्याकडे एक ग्रंथ नाही, संपुर्ण ग्रंथालय आहे.
आज जगात धर्म या नावाने वाढणारे विविध सांप्रदाय आहेत. आणि धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक पुस्तकही आहे. यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिस्त्यांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वेदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी. या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. तेव्हा याचे सरळ आणि सोपे उत्तर म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे.
जे त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...
धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक ती भागात विभागले आहे.
१. विनयपिटक,
२. सुत्तपिटक,
३. अभिधम्मपिटक
१. विनयपिटक : सामान्यतः विनयपिटकामध्ये
(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार. या पाच ग्रंथांचा समावेश आहे.
२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :
१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक
३. अभिधम्मपिटक : अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान
पाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.
पाली अनुपिटक :
१. नेत्तिपकरण
२. पेटकोपदेश
३. मिलिंद प्रश्न
४. विसुद्धीमग्ग
५. अट्ठकथा
६. टिका
दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण, इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका मध्ये होतो.
पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे ४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.
शिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड, चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड. याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे...
![]() |
सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा... |
→ मराठी धम्मपद
→ आम्हाला फेसबुकवर Follow करा
→ भगवान बुद्धांचा भिक्खु संघ