सदर लेख आमचे मार्गदर्शक मित्र, विशालवज्र यांनी लिहिलेला आहे. ह्या धर्मामृताचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा...

एके समयी शुद्धपर नगरीत एक गृहपती राहायचा, जो शहरातील एक श्रीमंत माणूस होता. जरी तो परिश्रमाने कमवायचा तरी त्याला योग्य व अयोग्य शिकवणीतून फरक करता येत नव्हता, त्यामुळे तो निग्रंथाचा शिष्य झाला व रोज त्याला दान करायला लागला.
बुद्धांना गृहपतीची दया आली आणि त्यांनी त्याला धर्म शिकवण्याचे ठरवले. बुद्ध त्यांच्या शिष्यांना घेऊन शुद्धपर नगरीत दाखल झाले. निग्रंथाला जेव्हा तथागतांच्या येण्याविषयी कळले, तेव्हा तो खूप घाबरला व भयभीत झाला. तो विचार करू लागला, " ज्यावेळी बुद्ध येतील, सर्वच त्यांच्या प्रज्ञा आणि पुण्य बळाने त्यांच्या धर्मात परिवर्तित होतील. ते मला टाकून देतील व मला दान करणार नाहीत. अश्या परिस्थितीत मी काय करावे? हे घडण्यापासून कोणत्या मार्गाने रोखावे याचा मी विचार केला पाहिजे."
तेव्हा विचार करून निग्रंथाने गृहपतीला सांगितले, " बुद्ध एक कुपुत्र आहे, त्याने आपल्या पालकांचा त्याग केला आहे, तो आपल्या राजकारभारात लक्ष देत नाही व केवळ जागो जागी भटकत असतो. तो जिथे जिथे जातो तिथे पीक उगवत नाही व लोक भुकेले राहतात. आपण सावध असायला पाहिजे."
गृहपतीने विचारले, "अश्या परिस्थितीत आपण काय करावे?"
निग्रंथ म्हणाला, "मला माहिती आहे की बुद्धाला जिथे खूप हिरवी झाडे, पाण्याचे प्रवाह व सरोवर आहेत असा भाग निवास करण्यासाठी अतिशय आवडतो. त्यामुळे जर शहराबाहेर अशी स्थळे असतील तर आपण तेथील झाडे तोडून टाकायला पाहिजे व पाण्याचे प्रवाह, तळे इत्यादी मातीने , घाणीने भरून टाकायला पाहिजे. जर त्यांनी शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या शस्त्रांसहित त्यांना रोखले पाहिजे. त्यानंतर मी त्यांना मंत्रांचा वापर करून निघून जाण्यास भाग पाडेल. त्यांच्या पासून सुटका करण्याचा हाच एक मार्ग आहे. गृहपतीला निग्रंथाची आज्ञा मोडायचे धाडस झाले नाही व त्याने सर्वांना निग्रंथाच्या आज्ञेनुसार वागायला सांगितले.
लवकरच बुद्धांचे त्यांच्या शिष्यांसहित शहराबाहेर आगमन झाले. त्यांनी पाहिले की सर्व झाडे मोडून पडली आहेत आणि पाण्याचे प्रवाह व तळी कचऱ्याने भरली आहेत. ते दृश्य एवढे घाणेरडे होते की ते पाहून बुद्धांना खूप वाईट वाटले.
बुद्धांनी त्यांचे ऋद्धीबल वापरून सर्व झाडांना पूर्ववत केले, सर्व पाण्याचे प्रवाह व तळी शुद्ध व स्वछ पाण्याने भरून गेली, इतके नितळ की त्यातून खालचा तळ स्पष्ट दिसत होता. तसेच शहाराभोवतीची विटांची भिंत सुद्धा काचेची झाली जेणेकरून शहरातील लोक बाहेर काय घडले ते पाहू शकतील. हे सर्व पाहून गृहपती व इतर लोक आपोआपच बुद्धांना ऐकण्यासाठी त्यांच्याकडे आले. बुद्ध त्याला म्हणाले, "तुझ्यावर अपार आशिष आहेत व तुझा भूतकाळातील पुण्य संचय मोठा आहे. म्हणून विचारपूर्वक मी तुला इथे धर्म सांगण्यासाठी आलो आहे. मिथ्या मार्गांची तुलना सत्य मार्गाशी होऊ शकत नाही. मिथ्या मार्ग तुला स्वर्गप्राप्ती देऊ शकत नाही तर तो तुला केवळ दुर्दैवी पुर्नजन्म देऊ शकतो. मग असा हा मूल्यवान मनुष्यजन्म व मर्यादित शक्ती अश्या मिथ्या मार्गावर व्यर्थ घालवण्यासारखेच नाही का? जर तू माझी शिकवण त त्याच भक्तीने जी तू निग्रंथाला देत होतास, स्वीकारली तर तुला मोठे सुखही प्राप्त होईल व प्रज्ञा देखील प्राप्त होईल."
बुद्धांचे ऋद्धीबल पाहूनच गृहपती व इतरांचे मतपरिवर्तन झाले होते. भगवंतांचे शब्द ऐकून त्यांना त्यांच्या कृत्यांचा खूप पश्चाताप झाला. ते त्या मुलांप्रमाणे होते ज्यांना दीर्घकाळ पर्यंत छळले गेले होते आणि शेवटी त्यांना त्यांची आई सापडली. गृहपती बुद्धांप्रति आदर आणि स्तुतीने भरून गेला. तो केवळ एवढेच म्हणू शकला, "हे भगवान बुद्ध तुम्ही करुणामय व विस्मयकारक आहात!"

एखाद्या लहानश्या जोतीची तुलना चंद्र सूर्याच्या प्रकाशाशी होऊ शकते का? बुद्धांच्या काळी विविध संप्रदायांचे अनेक लोक बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी यायचे. पण अद्भुत बुद्ध मात्र सदैव त्यांच्या त्रुटी करुणापूर्वक त्यांना लक्षात आणून द्यायला तत्पर असायचे व त्यांना पश्चाताप व सुधारणा करण्यात मदत करायचे.
~ मास्टर ह्सिंग युन
फुटप्रिंटस् इन दि गँजेस्: दि बुद्धास् स्टोरीस् ऑन कल्टीवेशन अँड कंपॅशन या पुस्तकातून साभार
हे सुध्दा वाचा :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा