सर्व
देव आणि मनुष्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगल कामना...
वैशाखी
पौर्णिमेचे महत्व अनन्य साधारण आहे. याच दिवशी :
१.
बोधीसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला,
२.
यशोधरेचा जन्म,
३.
सिद्धार्थ - यशोधरेचा मंगल परिणय,
४.
बोधीसत्व सिद्धार्थाला संबोधी प्राप्ती आणि
५.
भगवान गौतम बुद्धांचे महपरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले म्हणुन या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.
बोधीसत्वाने
गृहत्याग केला याबद्दल काही टिकाकार अन्याय्य टिका करत असतात. आपल्या बायको,
मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा
बेजबाबदारीपणा होता काय?
सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे
सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे
त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने
जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला
त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य
बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते
सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.
आपण
या लेखामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या असीम करुणा, मंगल मैत्री आणि सहिष्णुता या गुणांबद्दल माहीती घेऊया.....
सेलो यथा एकघना वातेन समीरती, एवं निंदापसंसासु न समिञ्ज पण्डिता
- (धम्मपद : ८१)
अर्थ : ज्याप्रमाणे शैल पर्वत वाऱ्याने हलत नाही, त्याचप्रमाणे विद्वान निंदा किंवा प्रशंसेने विचलीत होत नाही.
या
सुभाषिता प्रमाणेच भगवान बुद्धांचे व्यक्तीत्व होते. त्यांची मंगल मैत्री
महासागराप्रमाणे अथांग तर सहिष्णुता हिमालयच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे स्थीर होती.
ज्याप्रमाणे हिमालयाला कितीही वादळांचा सामना करावा लागला तरी तो स्थीर राहतो आणि
महासागरातुन कितीही पाणी काढले आणि त्यात टाकले तरी त्याला काहीच फरक पडत नाही,
अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्धांची कोणी कितीही निंदा किंवा प्रशंसा
केली तरी त्याने काहीच फरक पडत नव्हता., कोणी भगवानांची
निंदा केली तेवढ्याने त्यांच्या मनात असलेली निंदकबद्दलची करूणा आणि मंगल मैत्री
कमी होत नव्हती. याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे
सुत्तपिटकाची
सुरुवात अशाच एका दृष्टांताने होते. दीघनिकाच्या ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुप्रिय आणि भारद्वाज
हे दोघे गुरु शिष्य भगवानांबद्दल चर्चा करीत असताना ब्रह्मदत्त हा भगवान बुद्धांची
प्रशंसा करीत असतो तर सुप्रिय निंदा. यावर भगवान म्हणतात - भिक्खुंनो,
कोणीही बुद्धाची, धर्माची किंवा संघाची कोणी प्रशंसा केली तर त्याने हुरळून जाऊ नका किंवा निंदा
केली तर त्याच्यावर कोपु नका, त्याच्याशी वैरभावाने वागु नका,
असे केल्याने स्वतःचीच हानी होते. याउलट जर तुमच्यावर अथवा बुद्ध,
धर्म आणि संघावर जे आरोप केले आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे
याची शहानिशा करा आणि तुमच्यात दोष असतील तर तत्काळ त्यांचा नाश करा. निंदकाला तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे बघा.
अंबठ्ट
सुत्तामध्ये अंबठ्ट नावाचा माणवक म्हणतो - श्रमण गौतम हा मुंडक,
नीच, चांडाळ, ब्रह्माच्या
पायातुन उत्पन्न झालेला आहे. एवढेच नव्हे तर त्याने शाक्यांवर सुद्धा अनेक आक्षेप
घेतले. त्याच्या आरोपावर सम्यक संबुद्धांनी संयमाने अंबठ्टाच्या 'कण्हायण' गोत्राचा त्याला सांगताना सिद्ध केले की तो
शाक्यांचे पुर्वीचे राजे अक्कोसक आणि दासी पुत्र 'कण्ह'
चा वंशज आहे आणि त्याला गोत्रवाद, जातीवादाचा
गर्व सोडण्याचा उपदेश केला.
जातित्थद्धो, धनत्थद्धो, गोत्तत्थद्धो च यो नरो, संञ्ञ्ति अतिञ्येति पराभवो मुखं
- पराभव सुत्त १४
अर्थ : जी व्यक्ती आपल्या जन्मजातीचा, धनसंपत्तीचा, गोत्राचा गर्व करते आणि त्याच अहंकाराने आपल्या इतर समाज बांधवांचा अनादर करते हेच तिच्या पराभवाचे कारण आहे.
वसल
सुत्तामध्ये अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मण म्हणतो - हे मुंडक श्रमणा,
तिथेच थांब, हे वृषला, हे
चांडाळा तिथेच थांब पुढे येउ नकोस. अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मणाने केलेल्या
निंदेने जराही विचलीत न होता, जराही क्रोध न करता भगवानांनी
त्याला वृषल व्यक्तीचे लक्षण सांगीतले. जन्माने कोणीही विद्वान किंवा चांडाळ होत नाही,
तो त्याच्या कर्मानेच होतो.
मागण्डिय
सुत्तामध्ये, मागण्डिय परिव्राजक भगवानांची निंदा करताना म्हणाला
- हा
श्रमण गौतम मानवतेचा विनाशक आहे, तो हत्यारा आहे. मागण्डियाने
केलेल्या निंदेने भगवानांनी जराही विचलीत न होता त्याला सदाचाराचा उपदेश केला,
त्या उपदेशाने मागण्डिय परिव्राजक इतका प्रभावीत झाला की त्याने
संघप्रवेशाची मागणी केली, तेथेच त्याची उपसंपदा झाली आणि खुप
कमी काळात त्याने अर्हंतपद प्राप्त केले...
धम्मपदाच्या
अट्ठकथेमध्ये, कोसंबीचा राजा उदयनच्या महाराणीने, भगवान बुद्धांनी तिच्या लग्न प्रस्तावाचा अस्वीकार केला होता हा अपमान
ध्यानी ठेऊन तिने भगवानांना शिव्या द्यायला आपल्या दासांना पाठविले. ते
त्यांच्याजवळ येउन म्हणु लागले - श्रमण गौतम तु चोर आहेस, तु
मुर्ख, तु गाढव आहेस. यावर आनंद भगवानांना म्हणाले - भगवान..
हे लोक अभद्र बोलत आहेत. आपण दुसऱ्या नगरात चारीका करायला जाऊया. यावर सम्यक
संबुद्धांनी प्रत्युत्तर दिले. - जर त्या नगरातही असेच लोक मिळतील तर मग आपण कुठे
जावे...? मी युद्धामध्ये उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे,
ज्याप्रमाणे युद्धामध्ये हत्ती बाणांना सहन करतो, त्याचप्रमाणे मी अपशब्द सहन करेन.
यक्ष
संयुत्तामध्ये सुचीलोम आणि आळवक यक्षांनी सुरुवातीला भगवानांना त्रास देण्याचा
प्रयत्न केला पण आपली डाळ शिजत नाही आहे हे पाहुन त्यांनी भगवान बुद्धांना काही
प्रश्न विचारले आणि योग्य उत्तरे न दिल्यास - छाती फोडुन,
दोन्ही पाय पकडुन गंगेच्या पलीकडे नेउन फेकण्याची धमकीच दिली. परंतु,
भगवान बुद्धांनी या धमकीने जराही विचलीत न होता स्मित केले आणि
म्हणाले - ना कोणी देव, गंधर्व, मार,
असुर किंवा ब्रह्मा माझा पराभव करु शकेल. असे म्हणत त्या महाकारुणीक
प्रज्ञासुर्याने यक्षांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देउन त्यांना इतके प्रभावीत
केले की त्यांनी भगवानांची माफी मागुन उपासक संघप्रवेशाची याचना केली.
सुर्योदयानंतर
काजवे जसे लुप्त होतात तशी विरोधकांची अवस्था झाली होती,
त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते त्यांना बदनाम करण्याचा
प्रयत्न करीत होते. धम्मपदाच्या अट्ठकथेत विरोधकांनी सुंदरी नावाच्या
परिव्राजीकेच्या प्राणघाताचा आरोप भगवान बुद्धांवर आणि त्यांच्या श्रावक संघावर
लावला परंतु भगवान बुद्ध त्याने अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी आपल्या श्रावकांना
संयम बाळगण्याचा आणि शेवटी सत्य जगासमोर आलेच.
जयमंगल
अष्टगाथेच्या ५ व्या गाथेच्या कथेत चिंचा नावाची माणविका गर्भवतीचे सोंग घेउन
भगवान बुद्धांवर आरोप करते - की मी श्रमण गौतमांपासुन गरोदर आहे पण भगवानांवर
तिच्या निंदेचा काहीच परिणाम होत नाही आहे हे पाहुन ती घाबरली आणि तिच्या पोटाला
बांधलेला लाकडाचा तुकडा ढिला झाला आणि खाली पडला ते पाहुन तिथे जमलेल्या लोकांनी
तिची निंदा करीत तिला लाथाबुक्क्यांनी तुडविण्याचा प्रयत्न केला परंतु महाकारुणीक
अर्हंत सम्यक संबुद्ध भगवानांनी त्यांना अडविले आणि तिला मुक्त करायला सांगीतले.
ब्राह्मण
संयुत्तात भारद्वाज आणि असुरिंदक ब्राह्मण भगवान बुद्धांना शिवीगाळ करु लागले
परंतु बदल्यात श्रमण गौतम क्रोध करीत नाही आहेत हे पाहून ते घाबरले. तेव्हा भगवान
म्हणाले - ज्याचे चित्त्त अगदी शांत झालेले आहे अशा क्रोध रहिताला क्रोध कसला...?
जो रागावणाऱ्यावर परत रागावत असतो त्याच्यामुळे त्याचीच हानी होते.
क्रुद्धाच्या प्रती क्रोध न करणारा अजिंक्य, संग्राम जिंकत
असतो. हे ऐकल्यावर त्यांनी संघप्रवेश केला आणि ते अर्हंतांपैकी एक झाले.
भगवान
बुद्धांच्या संघामध्ये जातीभेद नव्हता, ज्याप्रमाणे
नदी सागराला मिळाल्यावर तिचे पाणी ओळखणे शक्य नाही, त्याचप्रमाणे
संघामध्ये प्रवेश केल्यावर त्यांची जात लोप पावत होती. सुंदरीक सुत्तामध्ये
सुंदरीक ब्राह्मणाने भगवानांचे मुंडन पाहुन तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची
निंदा करत त्यांना त्यांची जात विचारली, तेव्हा भगवान
शांतचित्ताने म्हणाले - जात विचारु नकोस कर्म विचार, लाकडाने
सुद्धा अग्नी उत्पन्न होत असतो, नीच समजल्या जाणाऱ्या
कुळातुन सुद्धा धीर मुनी होत असतात.
भगवानांच्या
जीवनातुन आपल्याला प्रेरणा मिळते की जरी कोणी आपली कितीही निंदा केली तरी जराही
विचलीत न होता प्रसंगाला सामोरे जावे. जर निंदकाच्या निंदेत सत्य असेल तर तात्काळ
आपल्याला सुधारावे परंतु निंदकावर कोपु नये, त्याने
स्वतःचीच हानी होते. निंदकाच्या प्रती नेहमीच मंगल मैत्रीची भावना ठेवावी.
यावर
कल्याण मित्रांनी सांगीतलेले एक सुभाषित आठवले - हिरवळ नावाला सुद्धा दिसु
नये, जो भेटतो तो कठोर व्यवहार करणारा नसावा, उगाच अपमान करणारा निघावा, सगळ्या घटना मनाविरुद्ध
घडल्या तरी आपल्या मनात जरासुद्धा द्वेष बाळगत नाही तोच बुद्धाचा खरा श्रावक आहे.
आपल्याला अशा अवस्थेत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. भगवान बुद्धांची
अनेकांनी निंदा केली परंतु निंदकाच्या प्रती त्यांच्या मनात नेहमीच करूणा आणि मंगल
मैत्रीचीच भावना होती.
ज्याच्या विजयाचा क्रोधरुपी मार पराभव करु शकला नाही, त्या सम्यक संबुद्ध अर्हंत भगवानांना आपण आपल्या जीवनात कोणत्या मार्गाने
न्याल.....?
सर्व जीव सुखी होवोत,
सर्वांना हिताचा मार्ग सापडो...
![]() |
सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा... |
See Also :
→ भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)
→ बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...
→ चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]